साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात
गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी साधकांना मिळाली शुभवार्ता !

सद्गुरुपद घोषित केल्यावर  कृतज्ञता भावस्थितीतील पू. राजेंद्र शिंदे
सद्गुरुपद घोषित केल्यावर
कृतज्ञता भावस्थितीतील पू. राजेंद्र शिंदे

पनवेल – साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांना सद्गुरुपदी विराजमान करून भगवंताने सनातनच्या साधकांना गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अनमोल भेट दिली. नेतृत्व, नियोजनकौशल्य, तत्परता, समयसूचकता, सतर्कता, प्रीती, आर्त शरणागती, क्षात्रवृत्ती आदी गुणसमुच्चयाने युक्त असलेले पू. राजेंद्रदादा यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे सनातनच्या देवद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ६९ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. अश्‍विनी पवार यांनी घोषित केले. या सुवार्तेमुळे पू. राजेंद्रदादा यांचे संत ते सद्गुरु या प्रवासाचे साक्षीदार असलेल्या देवद आश्रमातील साधकांचे नेत्र पाणावले !

… अशी झाली घोषणा !

पू. राजेंद्रदादा यांना समोर येऊन व्यासपिठावरील आसंदीवर बसण्याची विनंती करण्यात आली, तेव्हा पू. राजेंद्रदादा यांची भावजागृती झाली ! प.पू. पांडे महाराज यांच्या करकमलांनी पू. राजेंद्रदादा यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्या क्षणी पू. दादांनी सद्गदीत होऊन प.पू. पांडे महाराजांचे चरणकमल धरले ! उपस्थित सनातनचे संतगण आणि साधक भावविभोर होऊन हा सन्मानसोहळा पहात असतांना त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते ! या वेळी प.पू. पांडे महाराजांनी पू. राजेंद्रदादांना हार आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

सद्गुरुपद घोषित झाल्यानंतर आनंदाने  आलिंगन देतांना प.पू. पांडे महाराज आणि पू. राजेंद्र शिंदे
सद्गुरुपद घोषित झाल्यानंतर आनंदाने
आलिंगन देतांना प.पू. पांडे महाराज आणि पू. राजेंद्र शिंदे

अनेक शारीरिक त्रासांतही सतत उत्साही आणि सेवारत रहाणारे आणि साधकांच्या प्रगतीसाठी तळमळणारे पू. राजेंद्रदादा यांनी संत झाल्यापासून अवघ्या ६ वर्षांत सद्गुरुपद प्राप्त केले. या वेळी सौ. अश्‍विनी पवार यांनी सनातनचे संतरत्न पू. राजेंद्र शिंदे यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार वाचून साधकांची भावावस्था अधिक वृद्धींगत केली. या वेळी सनातनचे संत पू. उमेशआण्णा, पू. भाऊ परब यांसह अन्य साधक यांनी पू. राजेंद्रदादा यांनी साधकांना कसे घडवले आणि घडवत आहेत, याविषयीचे अनुभव आणि अनुभूती सांगून पू. राजेंद्रदादांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. पू. राजेंद्र शिंदे यांची रामनाथी आश्रमातील कन्या कु. वैदेही शिंदे हिनेही भ्रमणभाषवरून या वेळी कृतज्ञतापर उद्गार काढले, तर भ्रमणभाषवरून हा सोहळा ऐकत असलेल्या पू. राजेंद्रदादा यांच्या धर्मपत्नी सौ. मीनल शिंदे यांनी त्यांना आनंद झाल्याचे या वेळी सांगितले.

पू. राजेंद्र शिंदे यांनी संत आणि ईश्‍वर यांची
महती वर्णन करणार्‍या कृतज्ञतापर मनोगतातील निवडक सूत्रे

१. पू. राजेंद्र शिंदे म्हणाले, माझ्या जीवनात आलेला हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. ईश्‍वर सर्वांना मोक्षाला नेणारच आहे, अशी दृढा श्रद्धा प्रत्येकाने ठेवावी.

२. पू. राजेंद्र शिंदे यांना काही वर्षांपूर्वी वैद्यांनी सांगितले होते की, त्यांच्या पोटातील स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की, त्यांनी अत्यंत अल्प बोलावे लागते. त्या वेळी त्यांना सत्संग घेण्याची सेवा होती. त्यांनी संतांचे आज्ञापालन करायचे ठरवले. झोपून बोलणे, अन्य साधकांचे साहाय्य घेऊन समोरच्या साधकांना प्रतिसाद देणे आदी विविध गोष्टी करून सलग ८ घंटे सत्संग घेण्याची सेवा कितीतरी दिवस करून कठोर आज्ञापालन केले. तरी त्यांना आतापर्यंत शारीरिक समस्या उद्भवली नाही. यावरून संतांच्या आज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येते, असे पू. राजेंद्र शिंदे या वेळी म्हणाले.

३. प्रसाराची सेवा न करता रुग्णाईत म्हणून पडून रहाणे, ही परिस्थिती स्वीकारणे ही साधना आहे या वचनामुळे त्यांनी स्वीकारली. आहे त्या स्थितीत काय करू शकतो, असा दृष्टीकोन ठेवल्याने रुग्णाईत असतांना त्या स्थितीतही देवद आश्रमात पालट घडवण्याच्या दृष्टीने ते एक एक गोष्ट सांगू लागले. त्यामुळे इच्छा आणि तळमळ असेल, तर देव सुचवतो आणि करून घेतो. त्यासाठी मनाला कुंपण घालायला नको. साधनेला मर्यादा नाहीत, असे त्यांनी या वेळी सांगितले.

४. या वेळी पू. दादांनी सांगितले, देवाला शरण गेलो, तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वतः काही करू शकतो, हा अपसमज गेल्यावरच प्रगती होते. त्यामुळे हा अपसमज लवकर घालवला पाहिजे.

तळमळ या गुणाचे मूर्तीमंत रूप असलेले पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

नियोजनकौशल्य आणि नेतृत्व गुण असलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी मुंबई अन् कर्नाटक येथील प्रसारकार्य वाढवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. शरीर अस्वास्थ्यामुळे काही वर्षांपासून ते देवद आश्रमात वास्तव्याला असून तेथील साधकांना व्यष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करतात. तीव्र तळमळ असल्यास स्थूलदेहाच्या मर्यादा ओलांडून अखंड सेवारत रहाता येते, याचा मोठा आदर्श त्यांनी साधकांसमोर ठेवला आहे. यातूनच अध्यात्मात तळमळ हा गुण का सर्वश्रेष्ठ समजला जातो, हेही लक्षात येते.

त्यांच्या या गुणांमुळेच मागील गुरुपौर्णिमेला ७८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांची पातळी आता ८१ टक्के झाली असून ते आज सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत. वर्ष २०१० मध्ये संतपद प्राप्त केलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी केवळ ६ वर्षांत हा मोठा टप्पा पार केला आहे. त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होऊ दे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्गुरुपदी विराजमान झालेले पू. राजेंद्र शिंदे यांच्याविषयी
प.पू. पांडे महाराज आणि अन्य संत यांनी काढलेले कौतुगोद्गार

धर्मसंस्थापनेच्या कार्याच्या पायातील एक दगड म्हणजे त्यागमूर्ती पू. राजेंद्र शिंदे ! – प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसंस्थापनेच्या इमारतीचा (कार्याचा) जो पाया रचला आहे, त्या पायातील एक दगड म्हणजे संसाराचा त्याग केलेले आणि समर्पित जीवन जगणारे

पू. राजेंद्र शिंदे हे आहेत. धर्मसंस्थापना सामान्याचे काम नाही. त्यासाठी भगवंताला यावे लागते. भगवंत अवतार घेतो, त्या वेळी विविध देवताही त्याच्यासमवेत येतात. हे साधक म्हणजे देवच आहेत आणि त्यांना भगवंताने ओळखले आहे, हे भगवंताचे महत्त्व आहे.

पू. उमेश शेणै पू. राजेंद्रदादांविषयी म्हणाले, आज कर्नाटक राज्यातील पुष्कळ साधकांनी प्रगती केल्याचे आपण पहात आहोत, त्याचा पाया पू. राजेंद्रदादांनी रचला आहे. त्यांनी तिथे नियोजन, शिस्त आणि प्रीती शिकवली. त्याचे फळ आज दिसत आहे. मला अनेक सत्संग घेऊन पू. दादांनी घडवले, स्वीकारायला शिकवले.

पू. भाऊ (सदाशिव) परब म्हणाले, सगळीकडे अध्यात्मप्रसार करून झाल्यावर मी पू. राजेंद्रदादांकडे आलो. पू. दादांनी मला साधनेत साहाय्य केले.

या वेळी साधक श्री. कौस्तुभ येळेगावकर, श्री. यज्ञेश सावंत आणि श्री. संदेश नाणोसकर यांनी पू. राजेंद्रदादांची गुणवैशिष्ट्ये वर्णन करणारी सूत्रे सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात