स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

आपण घरी भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या यांची लागवड करत असतो. ही लागवड करत असतांना बिया महत्त्वाच्या असतात. या बियांची साठवणूक कशी करावी ? सर्वसाधारण आणि काही विशिष्ट भाज्यांच्या बिया साठवण्याची योग्य पद्धत काय ? याविषयीची काही महत्त्वपूर्ण सूत्रे या लेखात देत आहोत.

 

१. विश्वसनीय बियाणे मिळण्यासाठी स्वतःच त्याची साठवण करणे आवश्यक

‘आपण आपल्या बागेत भाज्यांचे पीक घेतो. (‘भाज्या लावतो’, यापेक्षा ‘पीक घेतो’ असे म्हटल्यावर नैतिक उत्तरदायित्व वाढते आणि कामात अधिक गांभीर्यही येते.) त्या पिकांचे आयुष्य ३ – ४ मासांचे असते. वांगी, मिरची इत्यादी काही पिके सोडल्यास इतर फळभाज्या आणि पालेभाज्या यांची पुढील लागवड करण्यासाठी बियांची आवश्यकता असते. (वांगी, मिरची इत्यादी पिकांच्याही बियांची आवश्यकता असते. केवळ प्रत्येक ऋतूनंतर (‘सीझन’नंतर) भरीव छाटणी केल्यास नवीन फुटींवरही पुढच्या ऋतूला भाज्या मिळतात. केवळ पहिल्या खेपेपेक्षा संख्या आणि क्वचित् आकार अल्प पडतो. असे साधारण ३ – ४ ऋतू चालते.) रोपवाटिका किंवा बियाणांच्या दुकानातून मिळणार्‍या बिया या जर ‘हायब्रिड’ असतील, तर प्रत्येक वेळच्या लागवडीसाठी आपल्याला बिया विकत आणाव्या लागतात; पण जर आपण देशी बियाणे वापरत असू, तर पुढील लागवडीसाठी लागणार्‍या बिया आपल्या आपणच सिद्ध करून त्या साठवू शकतो. असे केल्याने वेळ आणि पैसा, तर वाचतोच; पण आपल्याला विश्वसनीय (खात्रीशीर) बियाणे उपलब्ध होते.

श्री. राजन लोहगांवकर

 

२. श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी स्थानिक पिकाची लागवड करणे लाभदायक

साधारणतः आपापल्या विभागातील माती, वातावरण, पर्जन्यमान यांचा विचार केवळ भाज्याच नव्हे, तर कुठलेही पीक घेत असतांना केला जात असतो. हे अगदी पूर्वापार चालत आलेले आहे आणि त्यामागे अभ्यास आणि अनुभव आहे. निसर्गतः कुठलीही बी तिला आवश्यक तो ओलावा, तापमान आणि ऊर्जा मिळाल्यावर रुजते; परंतु तिची पुढील वाढ, त्या बीपासून आलेले झाड फुलणे आणि फळणे यांसाठी माती, वातावरण, सूर्यप्रकाश आणि त्यांमधली तीव्रता या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात अन् त्या आपण पुरवू शकत नाही. अन्यथा बर्फाळ प्रदेशातही नारळाची झाडे दिसू शकली असती. श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी स्थानिक वाणाची (जातीची) आणि पीक प्रकाराची निवड केली जाते.

 

३. स्वतः साठवलेल्या बियांपासून निर्माण होणार्‍या पुढच्या
पिढ्या स्थानिक वातावरणातील पालटांना तोंड देण्यास सक्षम होत जाणे

आपण जेव्हा पहिल्यांदाच कुठल्या बिया वापरणार असू, तर त्यासाठी देशी किंवा पारंपरिक (हेअरलूम) प्रकारातील बिया निवडल्या आणि त्या प्रत्येक ऋतूनंतर आपण साठवत जाऊन पुढील लागवडीसाठी वापरल्या, तर आपल्या येथील वातावरणास तोंड देण्यास अशा बिया प्रत्येक पिढीनंतर अधिक सक्षम होत जातात. बियांच्या साठवणीमागे हेही सूत्र महत्त्वाचे असते.

 

४. योग्य पद्धत जाणून घेतल्यास बिया साठवणे सोपे असणे

साठवणीसाठी आणि पुढील लागवडीसाठी बिया धरण्यासाठी योग्य रोपाची निवड, रोपावरील फळ काढण्याचा योग्य कालावधी आणि बियांवर प्रक्रिया करून त्यांची योग्य पद्धतीने साठवण या प्रमुख गोष्टींकडे लक्ष द्यायची आवश्यकता असते. हे सारे अतिशय सोपे काम आहे. केवळ त्याची योग्य ती पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे.

 

५. बियांच्या साठवणीविषयी महत्त्वाची सूत्रे

५.अ. आपण जर ‘हायब्रिड’ बिया लावल्या असतील, तर अशा झाडांपासून मिळणार्‍या बिया या पुनर्लागवडीसाठी उपयोगी पडत नाहीत.

५.आ. ज्या रोपांमधे किंवा भाज्यांच्या प्रकारांमधे ‘स्वपरागीकरण (सेल्फ पोलिनेशन)’ आणि ‘मुक्त परागीकरण (ओपन पोलिनेशन)’ होत असते, अशीच रोपे बियांच्या साठवणीकरता निवडावीत.

५.इ. बागेत जर ‘हायब्रिड’ आणि देशी किंवा मुक्त परागीकरण (ओपन पोलिनेशन) होणार्‍या या दोन्ही प्रकारांतील बिया पेरल्या असतील, तर बियांच्या पुढील साठवणुकीसाठी देशी प्रकारातील सुदृढ आणि निरोगी झाडांची निवड करून ती वेगळी ठेवावीत. वार्‍यामुळे किंवा एकमेकांजवळ ठेवल्यामुळे ‘परपरागीकरण (क्रॉस पोलिनेशन)’ होण्याची शक्यता असते आणि येणारी पुढील पिढी कशी येईल, हे सांगता येत नसते; म्हणून ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

५.ई. बियांच्या साठवणुकीसाठी निवडलेल्या रोपांवर काही फळे (शक्यतो प्रथम आलेल्या फळांपैकी काही फळे) ही तशीच रोपांवर ठेवून ती पूर्ण पिकू द्यावीत. पिकत असतांना त्यांच्यात होत असलेल्या पालटांवर लक्ष ठेवावे. फळे किंवा शेंगा पूर्ण सिद्ध होत असतांना त्यांचा आकार एका मर्यादेपर्यंत वाढून त्यानंतर वाढ थांबते आणि रंग पालटू लागतो. काही फळांच्या संदर्भात त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. असे पालट नजरेस पडताच ती गळून खाली पडायच्या आधीच काढून घेऊन सावलीत ठेवावीत.

 

६. काही विशिष्ट भाज्यांचे बियाणे साठवण्याच्या पद्धती

सर्वसाधारणपणे सर्वच प्रकारच्या बियांच्या साठवणुकीची पद्धत एकच असली, तरी काही फळांच्या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागते.

६.अ. टोमॅटो

जर तुम्ही एकापेक्षा अधिक प्रकारचे देशी टोमॅटोंचे पीक घेत असाल, तर अशी रोपे वेगवेगळी ठेवून त्याची व्यवस्थित नोंद करावी. शक्य असेल, तर प्रत्येक प्रकारातील २ – ३ रोपे वेगळी ठेवल्यास उत्तम होईल. प्रत्येक प्रकारातील ३ – ४ टोमॅटो झाडांवर पूर्ण पिकू द्यावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो अर्धे कापून त्यांतील गर स्वच्छ धुतलेल्या चमच्याने एखाद्या भांड्यात काढून घ्यावा. भांडे पारदर्शक असल्यास उत्तम. हे करण्यापूर्वी हात आणि भांडे दोन्हीही स्वच्छ धुतलेले असावे. काढलेला गर तसाच ३ – ४ दिवस सावलीत ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावे. याला मुंग्या लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. टोमॅटोच्या बियांवर एक पातळसा पापुद्रा असतो. तो आपल्याला काढायचा आहे; पण तो बिया धुऊन हाताने काढतांना बियांना हानी पोचण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला भरपूर काळजी घेण्याची आवश्यकता असते.

या ३ – ४ दिवसांत गर प्रतिदिन एकदाच स्वच्छ चमच्याने हालवत रहावा. या वेळी वरच्या बाजूला पांढरट थर जमा होईल. तो साचू देऊ नये. यासाठी चमच्याने ढवळणे आवश्यक असते. असा पांढरा थर जर अधिक असेल आणि तो वेगळा करता येत असेल, तर तो चमच्यानेच काढून टाकावा. ३ – ४ दिवसांनी भांड्यात बिया खाली बसलेल्या दिसतील. मग चमच्याने हलकेच वरचा गर काढून टाकावा. आता भांड्यात केवळ बिया राहिल्या असतील. त्यांवर पाणी घालून ठेवावे. काही बिया वर तरंगताना दिसल्या, तर त्या काढून टाकाव्यात. नंतर २ – ३ वेळा बिया पाण्याने व्यवस्थित धुऊन घेऊन त्या कागदावर किंवा एखाद्या ताटलीमध्ये वाळत ठेवाव्यात. बिया पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या झिप लॉकच्या पिशवीमध्ये, कागदाच्या पाकिटात किंवा एखाद्या हवाबंद डबीमध्ये ठेवून वर पट्टी (लेबल) लावून त्यावर ‘बी’चा प्रकार, साठवण्याचा दिनांक हे सगळे लिहावे, म्हणजे पुढच्या ऋतूमध्ये हे सारे उपयोगी पडेल. डबी किंवा पिशवी जे काही बिया ठेवण्यासाठी वापरले असेल, ते साधारण तापमानात आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे.

६.आ. वांगी

वांग्यांचे जेवढे प्रकार लावले आहेत, त्यांपैकी प्रत्येकी न्यूनतम एक तरी रोप वेगळे काढून इतर रोपांपासून दूर ठेवावे. त्यावरील वांगी पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. वांगी आधी पिवळी होऊन मग तपकिरी रंगाची होतील. त्वचेचा तुकतुकीतपणा जाईल. कडकपणा जाऊन मऊ पडतील. पूर्ण पिकल्यावर वांगी एक तर झाडावरून गळून पडतील किंवा हात लावताच सहजासहजी हातात येतील. अशी वांगी काढून ४ – ५ दिवस घरातच उघड्यावर ठेवून द्यावीत. नंतर सुरीने हलकेच कापून घ्यावीत. आतला गर कोरडा पडला असेल. त्यातच तपकिरी रंगाच्या बिया दिसतील. टोकदार सुरीने बियांना न दुखवता त्या वेगळ्या कराव्यात. एखाद्या भांड्यात घेऊन त्या २ – ३ वेळा धुऊन घेऊन सगळा गर गेला असल्याची निश्चिती करावी. नंतर गाळून घेऊन एखाद्या कागदावर किंवा ताटलीमध्ये पसरून ठेवाव्यात. वाळल्यावर कागदी पाकिटात ठेवून देऊन वर प्रकार आणि दिनांक इत्यादी विवरण लिहून ठेवावे.’

६.इ. मिरचीवर्गीय फळे

‘मिरचीचा जो प्रकार आपण लावला असेल, त्यापैकीही प्रत्येकी १ – २ रोपे वेगवेगळी ठेवून देऊन त्यावरील न्यूनतम ५ – ६ फळे बियांसाठी राखून ठेवावीत. आपल्याला अधिक बिया हव्या असतील, तर जास्त फळे ठेवावीत. हिरव्या मिरच्या झाडावरच पिकून तांबड्या होतील. त्यांची वाढ पूर्ण होत आली की, त्या सुरकुततील. पूर्ण सुरकुतलेल्या मिरच्यांची साले जाड होतील. मिरच्या झाडावरच वाळल्या, तरी चालेल. अशा वाळलेल्या मिरच्या झाडावरून काढून घेऊन कागदावर त्यातील बिया काढून घ्याव्यात. हे करताना शक्यतो चमचा किंवा सुरी वापरावी. उपलब्ध असतील, तर हातमोजे वापरावेत; कारण मिरचीचा तिखटपणा हातांना लागतो आणि त्याचा त्रास होतो. बिया कागदावर किंवा प्लेटमध्ये काढून घेऊन त्या ३ – ४ दिवस पूर्ण वाळू द्याव्यात. अशा वाळलेल्या बिया पिशवीत किंवा डबीमध्ये ठेवून त्यावर लेबल लिहून वर सांगितल्याप्रमाणे सर्व विवरण लिहून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

६.ई. शेंगवर्गीय फळे

घेवडा, चवळी, मूग, वाटाणा इत्यादी ज्या शेंगवर्गीय भाज्या आहेत, त्यांच्या शेंगा जर तुम्ही कोवळ्या असतांना भाजीसाठी काढत असाल, तर काही शेंगा वेलींवर किंवा झुडूपांवरच पूर्ण पिकून वाळू द्याव्यात. शेंगा पूर्ण सिद्ध होत असतांना तुम्हाला त्या फुगीर दिसतील, म्हणजेच आतले दाणे सिद्ध होत असतील. शेंगा वाळत आल्यावर शेंगांचा वरचा भाग तपकिरी होईल. हाताला अशा शेंगा कडक लागल्यावरच काढून घ्याव्यात. तशाच राहिल्या, तर त्या फुटतील आणि बिया इतस्ततः पडतील. काढलेल्या शेंगा कुठल्याही खोलगट भांड्यात किंवा डब्यात वाळण्यासाठी ठेवाव्यात. वरच्या भागावर कापड बांधावे किंवा एखादे झाकण हलकेच ठेवावे जेणेकरून आत हवा, तर जाईल; पण वाळतांना शेंगा जर फुटल्याच, तर बिया बाहेर उडणार नाहीत. शेंगा पूर्ण वाळल्यावर त्या फोडून आतील सशक्त बियाच केवळ एखाद्या हवाबंद डब्यात किंवा पिशवीत ठेवून त्यावर पाटी (लेबल) लावून सारे विवरण लिहावे. काही बिया पोचट किंवा अशक्त दिसल्या, तर त्या फोडून कंपोस्टमध्ये टाकाव्यात. शेंगा न फोडता ठेवल्यास उत्तम. त्यामुळे हवेचा संपर्क न होता बिया सुरक्षित राहतील.

६.उ. पालेभाज्या

पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, माठ, ‘लेट्युस (एक विदेशी भाजी)’ इत्यादींचीही काही सशक्त आणि निरोगी रोपे तशीच ठेवावीत. वेळ पूर्ण होत असतांनाच त्यांच्यावर तुरे येतील, फुलतील आणि नंतर त्यांच्यातच बिया सिद्ध होतील. फुले येऊन ती वाढू लागल्यावर अशा रोपांवरील पाने जून होऊ लागतील. भाजीसाठी काढलेल्या कोवळ्या पानांपेक्षा यांची चव काहीशी कडवट असेल; म्हणून पाने काढू नयेत. तसेही बियांचे पोषण होण्यासाठी रोपांवर पाने असणे आवश्यक असते. फुलांमध्येच बिया असतील. फुलांचा रंग पालटेल. ती वाळू लागतील. रोपही मान टाकू लागेल. बियांचे वजन त्यांच्या दांड्याला पेलवेनासे झाल्यावर ते बाजूला कलंडू लागेल. ज्या रोपांवर, उदा. पालक इत्यादींवर अनेक फुलांचा तुरा येतो, त्या तुर्‍यातल्या खालच्या भागातल्या बिया लवकर पक्व होऊन वाळू लागतात. त्यामुळे खालच्या भागातल्या बिया किंवा फुले तपकिरी रंगाची होऊ लागताच ती काढून घेऊन घरात कागदावर सावलीत; पण उजेड पडेल, अशा ठिकाणी ठेवावीत. इतर भाज्यांच्या संदर्भात फुले पुष्कळ वाळल्यावर ती हलक्या हाताने काढून घेऊन घरात आणून एखाद्या कागदाच्या पाकिटात ठेवून द्यावीत. ५ – ६  दिवसांत ती पूर्ण वाळतील. मग ती फुले हाताने हलकेच चुरगळून त्यांतील बिया काढून घ्याव्यात. इतर कचरा, बीवरची वाळलेली साले आणि पाकळ्यांचे तुकडे दूर करावेत. वेगळ्या केलेल्या बिया काढून डबीमध्ये किंवा कागदाच्या पाकिटात ठेवून वर पट्टी (लेबल) लावून बियांची माहिती लिहावी.

६.ऊ. वेलवर्गीय भाज्या

दुधी, तांबडा भोपळा, काकडी, शिराळी, घोसाळी, कारली, पडवळ इत्यादींच्याही संदर्भात न्यून-अधिक भेदाने असेच असते. वेलींवर काही फळे ठेवून देऊन ती पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, उदा. काकडी, कारली, पडवळ ती फळे जून झाल्यावर त्यांना बाहेरून हलक्या हाताने छेद द्यावा आणि आतला गर काढून घेऊन तो एखाद्या भांड्यात घेऊन आतल्या बियांपासून गर वेगळा करून घ्यावा. भांड्यात राहिलेल्या बिया १ – २ वेळा धुऊन घेऊन वर तरंगणार्‍या बिया काढून टाकाव्यात. खाली राहिलेल्या बिया कागदावर वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर त्या कागदाच्या पाकिटात ठेवून वर नोंद करून ठेवावी.

दुधी, शिराळी, घोसाळी इत्यादींची जून फळे वेलींवरून तोडून घेऊन वाळवावीत. काही दिवसांतच यातला गरही वाळून जातो आणि आतमध्ये वाढ होत असतांना सिद्ध झालेल्या शिरा उरतात. अशी वाळलेली फळे हालवून पाहिल्यास आतल्या बियांचा आवाजही येतो. अशी वाळलेली फळे तशीच ठेवून दिल्यास बिया खराब होत नाहीत. पुढील लागवड करतांना ही वाळलेली फळे फोडून आतल्या बिया घ्याव्यात. तसे करायचे नसेल, तर बिया काढून घेऊन त्या कागदाच्या पाकिटातही ठेवून देऊ शकतो.

६.ए. इतर भाज्या आणि कंदमुळे

या प्रकारातल्या भाज्यांच्या बिया घेण्यासाठीही ती वेगळी ठेवून पूर्ण सिद्ध होऊ द्यावीत. अशा रोपांची पाने किंवा मुळे खाण्यासाठी घेऊ नयेत. यथावकाश यांच्यावर फुले येऊन परागीकरण होऊन शेंगा किंवा फुलांचे गुच्छ सिद्ध होतात. ते वाळू लागताच काढून घेऊन पूर्ण वाळू देऊन सावकाश बिया काढून घ्याव्यात. आपण साठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया या एकत्र करू नयेत. मोठ्या फळांच्या बिया मोजक्याच असतील, तरीही त्यासाठी वेगळी पिशवी किंवा डबी वापरावी.

६.ऐ. भेंडी, गवार यांसारख्या भाज्या

अशा भाज्यांची काही फळे रोपांवर तशीच जून होऊन वाळू द्यावीत. भेंडीच्या टोकाकडची बाजू विलग होऊ लागताच अशा भेंड्या काढून घेऊन दोरा बांधून किंवा रबरबँड लावून वाळत ठेवाव्यात. गवारीच्या शेंगाही काढून वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर जेव्हा हव्या तेव्हा आतील बिया काढून पेराव्यात.

कोबी, फ्लॉवर, ‘ब्रोकोली (एक विदेशी भाजी)’ यांच्या बिया साठवणे पुष्कळ कठीण काम असते आणि ते एका ऋतूमध्ये होत नाही; म्हणूनच त्यावर लिहिले नाही. आशा आहे की, वर दिलेली माहिती आपणांस उपयोगी ठरेल.

– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे

(साभार : https://vaanaspatya.blogspot.com)

 

Leave a Comment