‘हायब्रीड’ बियाणे टाळा आणि देशी बियाण्याचे संवर्धन करा !

 

१. देशी बियाणे नामशेष होण्याला ‘हायब्रीड’
बियाणे विकणार्‍या आस्थापनांसह आपणही तेवढेच उत्तरदायी !

‘बियांच्या साठवणीमागे ‘आपला वेळ अन् पैसा वाचवणे’, ही कारणे फारच क्षुल्लक आहेत. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे गेल्या काही वर्षांत ‘हायब्रीड (तथाकथित अधिक उत्पादन देणार्‍या)’ बिया वापरून घेतलेल्या पिकांचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. बर्‍याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत (नामशेष) झालेल्या आहेत. ‘हायब्रीड’ बियांची विक्री करणारी आस्थापने याला उत्तरदायी आहेतच; पण त्यांच्यापेक्षाही आपणच अधिक उत्तरदायी आहोत. ‘हे बियाणे तुलनेने स्वस्त आणि आरंभी अल्प त्रासाचे अन् अधिक उत्पन्न देणारे जरी भासले, तरी पुढे जाऊन ते किती महाग पडते’, हे आज आपल्याला बर्‍यापैकी उमजलेले आहे.

 

२. ‘हायब्रीड’ बियाणे वापरण्याचे महाभयंकर दुष्परिणाम

मातीची सुपीकता गेली आहे. निसर्गचक्रात केलेले पालट सुधारणा होण्याच्या पलीकडे जात आहेत. पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत आहेत. त्यांचे निर्मूलन करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर होत आहे. यांपैकी काहींचे अंश अन्नावाटे आपल्याही शरिरात जात आहेत; कारण पिकांना दिले गेलेले रसायन अधिक प्रमाणात वापरले असेल किंवा दिलेला भाग पिकाने घेऊन पचवला नसेल, तर त्याचा थोडातरी अंश आपल्या पोटात जाणे अपरिहार्यच आहे. ‘तो पचवण्यासाठी आपली शारीरिक ठेवण आणि अंतर्गत रचना पूरक नसल्याने तो शरिरातच कुठेतरी साचणे अन् त्याचे दुष्परिणाम भयंकर रोगांद्वारे आपल्याला भोगावे लागणे’, हे आता नवीन राहिलेले नाही. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारखे विकार, तसेच अकाली वृद्धत्व हे सगळे आता समाजाच्या सर्वच वर्गात दिसू लागले आहे. हिशोब केला, तर लक्षात येईल की, आपल्या अन्नासाठी केल्या जाणार्‍या खर्चापेक्षा अधिक खर्च आज आपल्याला वेगवेगळ्या औषधांसाठी करावा लागत आहे. रासायनिक खते आणि औषधे यांची ही कधीही न संपणारी साखळी आहे अन् कळत नकळत अन् इच्छा नसतांनाही आपण त्यात ओढले गेलो आहोत. (काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये शीतपेयांमध्ये रसायनांचा अंश अधिक प्रमाणात सापडल्यावर असे सिद्ध झाले होते (किंवा करून दाखवले होते) की, शेतात वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके ही पाण्याबरोबर वाहत जाऊन नदीत मिसळली गेली अन् ते पाणी ‘पेप्सी’ आणि ‘कोकाकोला’ यांसारख्या आस्थापनांनी आपल्या उत्पादनासाठी वापरल्यामुळे ती रसायने शीतपेयांमध्ये अधिक प्रमाणात सापडली होती.)

श्री. राजन लोहगांवकर

 

३. ‘हायब्रीड’ बियाणे विकणार्‍या आस्थापनांच्या स्वार्थामुळे देशी बियाणे नष्ट होणे

‘हायब्रीड’ बियांच्या आस्थापनांनी केवळ आपल्याला त्यांच्या नादीच लावले, असे नाही, तर आपल्याकडच्या देशी वाणाच्या बिया घेऊन त्या नष्टही केल्या आहेत. त्यासाठी जे काही साम, दाम, दंड आणि भेद अवलंबावे लागले, तेही त्यांनी केले आहे. ‘तात्कालिक लाभाला बळी पडून आपण त्यांच्या म्हणण्याला बळी पडलो आहोत’, हे सत्य नाकारता येणार नाही. एक लक्षात घ्या, ही आस्थापने पुष्कळ मोठी आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या आपला व्यवसाय करत असतात. ही आस्थापने एकमेकांची स्पर्धक असली, तरी सामान्य शेतकर्‍यांशी लढतांना ती एकत्र येतातच. अशी आस्थापने स्थानिक वाणाच्या पुरवठादारांबरोबर कायदेशीर लढाया जिंकल्याचीही उदाहरणे आहेत.

३ अ. युरोपमध्ये कायद्याच्या आधारे तेथील स्थानिक देशी बियाणे नष्ट करू पहाणारी आस्थापने

युरोपीय संघाच्या देशांनी बियाण्यांसंबंधी कायदे केले आहेत. त्या कायद्यांनुसार तेथील पेठेत (बाजारात) नोंदणी नसलेल्या बियाण्यांची विक्री करता येत नाही. नोंदणी करण्याचे शुल्कही भरमसाठ असते. ते शुल्क केवळ आंतरराष्ट्रीय आस्थापनेच भरू शकतात. या कायद्याचे नियम सामान्य माणसासाठी पालन करण्यास कठीण आहेत. दुर्मिळ वाणांचे संवर्धन करायचे झाले, तरी या नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे तेथील दुर्मिळ वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नोंदणी न करता दुर्मिळ वाणांचे जतन करणार्‍या एका संस्थेवर तेथील आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी खटला प्रविष्ट केला आणि तेथील कायद्यानुसार दुर्मिळ वाणांचे जतन करणार्‍या संस्थेचे कार्य बंद पाडण्याची मागणी केली.

(संदर्भ : https://kulturpflanzen-nutztiervielfalt.org/press-release-july-16-2012-european-court-justice-confirms-sales-hurdles-plant-biodiversity)

३ आ. स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकर्‍यांना न्यायालयात खेचणारी आस्थापने

युरोपीय संघाने झाडांच्या विकसित केलेल्या नवीन वाणांना बौद्धिक संपदा अधिकाराच्या (Intellectual property rights) अंतर्गत स्थान दिले आहे. हा अधिकार ज्याच्या जवळ असेल, त्याच्या सहमतीविना नवीन वाणांची लागवड करता येत नाही. तसे केल्यास तो कायदेशीर अपराध ठरतो. ‘नॅडोरकॉट’ या संत्र्याच्या एका विशिष्ट वाणासंदर्भात त्या वाणाचा अधिकार असलेल्या आस्थापनाने त्यांच्या अनुमतीविना या वाणाची लागवड केली म्हणून लागवड करणार्‍या शेतकर्‍यावर खटला प्रविष्ट करून तो स्पेनच्या सर्वाेच्च न्यायालयापर्यंत नेला होता.

(संदर्भ : https://european-seed.com/2020/09/the-court-of-justice-of-the-european-union-sheds-light-in-case-c-176-18-on-the-scope-of-eu-plant-variety-rights/)

येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ‘हायब्रीड’ बियाणे विकणारी आस्थापने शेतकर्‍याच्या शेतात शिरून त्याने लावलेली झाडे आणि त्यांपासून येणारी फळे या वर वर पहाता क्षुल्लक दिसणार्‍या गोष्टीही न्यायालयात घेऊन जाण्यास मागेपुढे पहात नाहीत. त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक बळ असल्याने अधिवक्त्यांचे शुल्क भरणे त्यांना परवडते आणि बहुतेक वेळा ही आस्थापने खटले जिंकतात. सामान्य शेतकरी खटला शेवटपर्यंत लढला, तर जिंकूही शकेल; पण त्यासाठी आर्थिक बळ आणि साथीला उभे रहाणारे अन्य शेतकरी अन् पुढारी यांची आवश्यकता असते.

 

४. ‘देशी बियाणे वाचवणे’ हे आपले दायित्व !

कायदे आणि सत्ताधीश बलवानांच्या पाठीशी उभे रहाणारे असल्याने ‘बियांचे जे काही वाण आज शेष आहेत, ते वाचवणे आणि वाढवणे’ याचे दायित्व आपल्याच शिरावर आहे. ते आपण पूर्णपणे पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पुढील पिढीला केवळ ‘हायब्रीड’ किंवा जनुकीय पालट केलेले (जेनेटिकली मॉडिफाईड) नव्हे, तर इतरही प्रकारे पालट केलेल्या बियांपासून घेतलेले अन्न खाण्यावाचून कुठलाही पर्याय उपलब्ध रहाणार नाही आणि आपण कळत नकळत कुणाच्या तरी हातचे बाहुले बनून गेलेलो असू. कोरोना महामारीच्या प्रसंगावरून तरी हे आपल्या ध्यानात यायला आणि पटायलाही हवे.

तेव्हा ‘मीच का?’ किंवा ‘सरकारनेच काहीतरी करायला हवे’, असा कुठलाही विचार न करता आपण देशी वाणाचे रक्षण आणि संवर्धन करायला हवे. नव्हे, ती काळाची निकड आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. एकदा आपण हे कार्य हाती घेतले की, जे समाधान आपल्याला मिळेल, ते केवळ बागकामाने मिळणार्‍या समाधानापेक्षाही कितीतरी पटीने अधिक असेल, याची खात्री बाळगा.’

– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा, जिल्हा ठाणे

(साभार : https://vaanaspatya.blogspot.com)

Leave a Comment