नैसर्गिक किटकनाशक घरच्या घरी तयार करा !

१. नैसर्गिक किटकनाशक – अग्नीअस्त्र

‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक किटकनाशक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्‍या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.

सौ. राघवी मयूरेश कोनेकर

 

१ अ. घरगुती लागवडीसाठी अग्नीअस्त्र किटकनाशक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

देशी गायीचे मूत्र १ लिटर (१ तांब्या), कडुनिंबाचा पाला १०० ग्रॅम (एक ओंजळ भरून), तंबाखू २५ ग्रॅम (साधारण अर्धी वाटी), तिखट हिरव्या मिरचीची चटणी ५० ग्रॅम (साधारण १० चमचे), लसुणीची चटणी १२ ते १५ ग्रॅम (साधारण ४ चमचे), ठेचलेले आले १० ग्रॅम (साधारण २ इंच), हळद पूड १० ग्रॅम (२ चमचे).

येथे चमच्यांचे प्रमाण चहाच्या चमच्यांत दिले आहे. मिरची, आले आणि लसूण मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यात कुटून घ्यावी. लसूण सालासकट घ्यावी. वरील सर्व प्रमाण थोडे अल्प-अधिक झाले, तरी अपाय होत नाही. साधारण १ लिटर अग्नीअस्त्रासाठीचे हे प्रमाण आहे. यापेक्षा अल्प प्रमाणात हे बनवायचे झाल्यास तेवढ्या प्रमाणात सर्व घटक अल्प घ्यावेत.

नैसर्गिक किटकनाशक घरच्या घरी तयार करा

१ आ. कृती

वरील सर्व साहित्य पातेल्यात एकत्र करून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक उकळी काढावी. हे मिश्रण ४८ घंटे असेच झाकून ठेवावे आणि दिवसातून २ वेळा ढवळावे. ४८ घंट्यांनंतर सिद्ध झालेले अग्नीअस्त्र कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे आणि बाटलीवर सिद्ध झालेल्या दिवसाच्या दिनांकाची नोंद करावी.

अग्नीअस्त्र सिद्ध झाल्यापासून ३ मास वापरू शकतो. याचे तुषारसिंचन (फवारणी) करतांना १ लिटर (१ तांब्या) पाण्यात ३० ते ४० मिलि (पाव वाटी) अग्नीअस्त्र मिसळून तुषारसिंचन करावे.’

 

२. नैसर्गिक किटकनाशक – नीमास्त्र

‘किडींपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी सुभाष पाळेकर कृषी पद्धतीमध्ये काही सोपी आणि नैसर्गिक औषधे वापरली जातात. त्यांतीलच हे एक आहे. १ लिटर (१ तांब्या) पाण्यात ५ मिलि (१ चमचा) गोमूत्र, ५ ग्रॅम (२ चमचे) कडूनिंबाच्या पानांची चटणी आणि ५ ग्रॅम (२ चमचे) देशी गाईचे ताजे शेण मिसळून चांगले ढवळून घ्यावे. (चमच्यांचे प्रमाण चहाच्या चमच्याने मोजावे.) हे मिश्रण २४ घंटे झाकून ठेवावे. २४ घंट्यांनंतर हे गाळून घ्यावे आणि पाणी न मिसळता तुषारांच्या (स्प्रेच्या) बाटलीत भरून झाडांवर तुषारसिंचन (स्प्रे) करावे. आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ‘नीमास्त्र’ बनवून ते ताजेच वापरावे. निमास्त्राच्या फवारणीने पिठ्या ढेकूण (मिलिबग), तसेच रस शोषणार्‍या अळ्या यांचे नियंत्रण होते. बहुतेक किडी पानांच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे तीन्हीसांजेच्या वेळी पानांच्या खालच्या बाजूने औषधाचे तुषारसिंचन करावे.’

 

३. मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे शत्रू

‘शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले. याविषयीची अधिक माहिती वाचा…मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे मित्र कि शत्रू ?

 

४. या तिथींना किटकनाशकांची फवारणी अवश्य करावी

‘पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या तिथी हा वेगवेगळ्या अळ्या आणि किडी यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. या दिवशी ‘नीमास्त्रा’सारख्या नैसर्गिक किटकनाशकांची फवारणी केल्यास किडींची वाढ नियंत्रणात येते. या तिथींना पूर्वनियोजन करून नियमित फवारणी केल्यास किडींमुळे होणारी पिकांची हानी टाळता येते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२९.११.२०२२)

Leave a Comment