‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास पाहूया.

‘पू. श्रीमती उषा कुलकर्णीआजी लहानपणी एकत्र कुटुंबात रहात असल्याने त्यांना लहानपणापासूनच ‘सर्वांशी जुळवून घेणे आणि समाधानी रहाणे’ याचे बाळकडू मिळाले. त्या भावंडांत मोठ्या असल्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच सहनशीलता हा गुण आहे. त्यांना त्यांच्या वडिलांमुळे एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठलमंदिराच्या गाभार्‍यात जाण्याचे भाग्य लाभले. त्यांचा शिवणाचा कोर्स झाला असल्याने त्या शिवणकाम करून संसाराला हातभार लावत असत.

त्यांच्या मुलीच्या घरी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन झाल्यावर त्या भेटीतच त्यांचा भाव जागृत झाला. त्यांना साधनेची तळमळ असल्याने त्यांनी स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी मुलीकडून जाणून घेतले. त्यांनी अनेक सेवा तळमळीने केल्या. त्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगांत साधनेच्या बळावर स्थिर राहू शकल्या.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पू. श्रीमती उषा कुलकर्णीआजी यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी

१. बालपण आणि शिक्षण

१ अ. जन्म

‘११.११.१९४१ या दिवशी माझा जन्म धुळे येथे माझ्या मामाच्या घरी झाला.

१ आ. बालपण

१ आ १. एकत्र कुटुंबात रहाणे आणि कुटुंबियांत वडील एकटेच नोकरी करत असल्याने कुटुंबाचा भार त्यांच्यावर असणे : माझे सर्व बालपण नगर येथे गेले. आमचे एकत्र कुटुंब होते. माझ्या बाबांना (कै. माधव वैद्य यांना) सख्खे ५ भाऊ होते. आम्ही सख्खे आणि चुलत अशी २८ भावंडे होतो. आमची आई कै. (सौ.) मालती वैद्य सतत कामात व्यस्त असे. माझे बाबा महसूल खात्यात नोकरी करत होते. माझे अन्य काका नोकरी करत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचा भार माझ्या बाबांवर होता. घरची शेती असल्यामुळे आम्हाला धान्य, भाजीपाला, दूध, तूप इत्यादी विपुल प्रमाणात मिळत असे. मोठे काका-काकू सोनई (नगर) येथे राहून शेती करत असत.

१ आ २. बालपणापासून ‘सर्वांशी जुळवून घेणे आणि समाधानी रहाणे’ याचे बाळकडू मिळणे : आम्हा सर्व भावंडांमध्ये १ – २ वर्षाचे अंतर असल्याने आम्हाला सर्वांशी जुळवून घ्यायची सवय लागली. आमच्यात भांडणे झाली, तरीही आम्हीच ती सोडवून नंतर पुन्हा एकत्र खेळत असू. घरात खाऊ आणल्यावर आम्हा सर्व मुलांना देत असत. सणासुदीला म्हणजेच दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांच्या वेळी कापडाचा एक तागा आणला जात असे. त्यातून माझे काका सर्व मुलींना ‘फ्रॉक’ शिवत असत. मुलांचा पांढरा शर्ट आणि खाकी पँट असा पोशाख देत असत. आम्हा सर्व भावंडांना जे मिळेल, त्यात समाधानी आणि आनंदी रहाण्याचे बाळकडू मिळाले होते. मी भावंडांत मोठी असल्यामुळे मला भावंडांना सांभाळावे लागत असे.

१ आ ३. शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतांना सहनशक्ती वाढणे : माझ्या आईचा स्वभाव थोडा तापट होता. त्यामुळे घरात काही कुरबुरी झाल्या, तर तिचा राग माझ्यावर निघत असे; पण मी ते सर्व निमुटपणे सहन करत असे. लहानपणी मला ‘टॉन्सिल्स’चा पुष्कळ त्रास असल्यामुळे मी सतत तापाने रुग्णाईत असायचे.

१ इ. घरी धार्मिक वातावरण असणे

१ इ १. प्रतिदिन संध्याकाळी श्लोक म्हणणे आणि आईच्या समवेत देवळात जाणे : घरी सर्व कर्मकांडातील विधी होत असत. सणावाराला सोवळे पाळले जात असे. संध्याकाळी दिवा लावल्यावर आम्ही सर्व मुले श्लोक आणि पाढे म्हणत होतो. आम्ही प्रतिदिन संध्याकाळी देवाला नमस्कार करत होतो आणि आईच्या समवेत देवळात जात होतो.

१ इ २. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍यात जाण्याचे भाग्य लाभणे : बाबा नोकरीनिमित्त पंढरपूर येथे होते. त्या वेळी आम्ही प्रतिदिन विठ्ठलाच्या मंदिरात काकड आरतीला जात होतो. पू. मामासाहेब दांडेकर आमच्या घरी येऊन गेल्यामुळे थोडे फार अध्यात्म घडत गेले. आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभला. मी ह.भ.प. गोविंदराव आफळे (राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील) आणि निजामपूरकर बुवा यांच्या कीर्तनाला जात होते. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवशी विठ्ठलाची पूजा करण्याचा मान माझ्या वडिलांना मिळाला होता. त्या वेळी मला गाभार्‍यात जाऊन मूर्तीला स्पर्श करण्याचे भाग्य लाभले आणि एक अनोखा अनुभव अन् आनंद मिळाला. आमचे पंढरपूर येथील दिवस फार चांगले गेले. त्यानंतर २ वर्षांनी माझ्या वडिलांचे स्थलांतर कोल्हापूर येथे झाले.

१ ई. शिक्षण

१ ई १. बाबांच्या नोकरीमुळे आम्हाला सतत स्थलांतर करावे लागत असे. त्यामुळे माझे चवथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या गावी झाले. त्यानंतर आम्ही नगर येथेच राहिलो आणि बाबा एकटेच नोकरीच्या गावी जात असत.

१ ई २. अकरावीपर्यंत शिक्षण होणे आणि महाविद्यालय जवळ नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेऊ न शकणे : माझे चौथी ते दहावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण नगर येथे झाले. नंतर बाबा मामलेदार झाल्यामुळे त्यांचे स्थलांतर वडुज येथे झाले. आम्ही बाबांच्या समवेत वडुजला गेलो. वडुज हे खेडेगाव असल्यामुळे तेथे कुठल्याच सुविधा नव्हत्या. तेथे पाणी आणि वीज नव्हती. त्यामुळे दिवसा प्रकाश असतांनाच मला अभ्यास करावा लागत असे. शाळेत अकरावीचा वर्ग नुकताच चालू झाल्यामुळे वर्गात आम्ही चारच मुली आणि अन्य सर्व मुले होती. त्या काळी वडुज खेडेगाव असल्यामुळे मला अवघड वाटत असे. मला अकरावीची परीक्षा देण्यासाठी फलटण येथे जावे लागले. माझी परीक्षा झाल्यावर वडिलांचे स्थलांतर बार्शी (जि. सोलापूर) येथे झाले. तेथे महाविद्यालय नसल्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकले नाही. मी लहान भावाचा अभ्यास घेत असे.

१ ई ३. शिवणकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि हिंदी राष्ट्रभाषेच्या ४ परीक्षा देणे : ‘शिवणकाम आणि विणकाम करणे’, हाच माझा विरंगुळा होता. मी शिवणकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण केला. बार्शी येथून बाबांचे स्थलांतर लगेच पंढरपूर येथे झाले. तेथे मी हिंदी राष्ट्रभाषेच्या ४ परीक्षा दिल्या.

१ उ. आई रुग्णाईत असल्याने स्वयंपाक करावा लागणे : बाबा मामलेदार असल्यामुळे आमच्या घरी पुष्कळ पाहुणे येत असत. घरी आई-वडील, आजी आणि आम्ही ६ भावंडे होतो. आई रुग्णाईत असे. मी मोठी असल्यामुळे मला स्वयंपाक करावा लागत असे. आम्ही कोल्हापूर येथे असतांनाच माझे लग्न झाले.

२. कौटुंबिक जीवन

२ अ. साधी रहाणी

मला पहिल्यापासून साधे रहाणे आवडते. मला कपडे किंवा अलंकार यांची फारशी आवड नव्हती. आमची परिस्थिती साधारण असल्यामुळे मी स्वतःसाठी काही केले नाही. तेव्हा ‘घरी बनवलेले पदार्थच खायचे’, अशी शिकवण असल्यामुळे आम्ही कधीच उपाहारगृहात गेलो नाही.

२ आ. संसाराला हातभार लावण्यासाठी मुलांना सांभाळून शिवणकाम करणे

लग्न झाल्यानंतर संसाराला हातभार लावण्यासाठी मी शिवणकाम चालू केले. तेव्हा आमची मोठी मुलगी ज्योती (आताच्या सौ. ज्योती नरेंद्र दाते (या सध्या रामनाथी आश्रमात रहातात.) लहान होती. मी तिला सांभाळून दिवस-रात्र शिवणकाम करत असे. तेव्हा मी लहान मुलांचे कपडे शिवून दिले; पण त्याचे मूल्य कधीच घेतले नाही. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहायची इच्छा होती; त्यांना मी विनामूल्य शिवणकाम शिकवले. मी त्यांना शिवणकामातील सर्व बारकावे शिकवले. आमच्या शेजारी एक आजी रहात होत्या. त्यांची परिस्थिती साधारण होती. माझ्याकडे शेष राहिलेल्या पांढर्‍या कापडातून मी त्यांना पोलके शिवून देत असे. त्यांनी माझ्या मुलांकडे लक्ष देऊन पुष्कळ साहाय्य केले.

२ इ. व्यवसाय करतांना देवाने वेळोवेळी साहाय्य करणे

लग्नानंतर आम्ही मुंबई येथे रहात होतो. तेथे आमचे कुणीच नातेवाईक रहात नव्हते. देवाने मला शिवणकाम करतांना नेहमीच साहाय्य केले. एकदा माझे यजमान गावाला गेले होते. तेव्हा आमच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी गोवर झाला. त्या वेळी देवाच्या कृपेनेच मी मुलांना सांभाळू शकले. त्या वेळी ज्योती लहान होती. तेव्हा माझी फार तारांबळ उडत असे. नाताळ हा सण जवळ आला होता. मी बर्‍याच लोकांचे शिवणकाम घेऊन ठेवले होते. आमची दोन्ही मुले रुग्णाईत झाल्यावर मी लोकांना त्यांचे कापड परत घेऊन जायला सांगितले. त्या वेळी महिलांनी मला धीर देऊन सांगितले, ‘‘आम्हाला केवळ मशीनवरचे काम करून द्या. आम्ही हाताने शिवायचे सर्व काम करू.’’ त्या वेळी देवानेच मला साहाय्य केले आणि मी तसे करू शकले, नाहीतर माझ्या हातचे सर्व काम गेले असते. अशा ‘अनेक प्रसंगांत देव माझ्या पाठीशी आहे’, याची मला सतत जाणीव होत असे.

२ ई. कौटुंबिक दायित्व निभावत व्यवसाय करणे

१. मी व्यवसाय करत गौरी, गणपति, नवरात्र, खंडोबाचे नवरात्र असे सर्व सणवार रीतीप्रमाणे करत असे. मला वडीलधार्‍यांची (मोठ्या माणसांची) सेवा करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना साहाय्य करत असे. मी साहाय्यासाठी कुणालाही ‘नाही’ म्हटले नाही. माझ्या मामेसासूबाईंना कर्करोग झाला होता. त्या वेळी माझी मुले लहान होती, तरीही मी मामेसासूबाईंची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस रुग्णालयात रहात होते. त्या वेळी माझे वडील आणि माझे मामेसासरे आमच्या घरी राहिले होते. नंतर माझे मामेसासरे गंभीर आजाराने रुग्णाईत होते. मी रुग्णालयात राहून त्यांची सेवा केली. कुटुंबातील कुणीही रुग्णालयात भरती असले, तरी माझी रुग्णालयात रहाण्याची सिद्धता असे.

२. दोन्ही मुलींची योग्य वेळी लग्ने झाली. वर्ष १९९२ मध्ये माझे यजमान (कै. मधुसूदन कुलकर्णी) नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर आम्ही पुणे येथे स्थायिक झालो.

३. साधना

मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, असा नामजप करत असे. आम्ही मुंबई येथे रहात असतांना आमच्या ओळखीच्या जोशीबाई गजानन महाराज यांच्या पोथीचे पारायण करत असत. तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना थोडे साहाय्य करत असे. आमच्या ओळखीचे श्री. सप्रे आमच्या घरी नेहमी येत असत. ते प.पू. क्षीरसागर महाराज यांचे भक्त होते. महाराज श्री. सप्रे यांच्या घरी येत असत. श्री. सप्रे यांच्यामुळे मला बर्‍याच वेळा त्यांच्या घरी आणि नगर येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाण्याचा योग आला.’

४. सनातन संस्थेशी संपर्क

४ अ. मुलीच्या घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन होणे आणि त्यांच्या चरणांवर नतमस्तक होतांना भाव जागृत होणे

माझी मुलगी सौ. ज्योती दाते हिच्या घरी मला प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर नतमस्तक होतांना मला पुष्कळ भरून आले होते आणि माझा भाव जागृत झाला होता. त्याआधी सौ. ज्योती मला नेहमी सांगायची, ‘‘तू सत्संगाला येत जा’’; पण काही अडचणींमुळे मला सत्संगाला जायला जमत नसे. वर्ष १९९६ पासून मी नियमित सत्संगाला जाऊ लागले. मला वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे गुरुपौर्णिमेला जाण्याचा योग आला. तेव्हापासून मला अध्यात्माविषयी अधिक ओढ वाटू लागली. मी सनातन संस्थेत आल्यानंतर कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करू लागले.

४ आ. केलेल्या विविध सेवा

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक सभेच्या निमित्ताने साधक घरी रहायला येणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांची सार्वजनिक सभा शिंदे हायस्कूलचे मैदान, सहकार नगर, पुणे येथे झाली. आमचे घर मैदानाच्या जवळ असल्यामुळे सभेच्या सेवेसाठी आलेले बरेच साधक आमच्या घरी रहायला होते. साधिका माझ्या साहाय्याला येत असत. ती सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. वर्ष २०१३ मध्ये श्री जगद्गुरु शंकराचार्य यांची सभा होती, तेव्हाही आमच्या घरी बरेच साधक रहायला होते.

२. त्यानंतर कुठेही भंडारा किंवा सभा असतांना मी प्रसारासाठी आणि सेवेला जात असे. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत मी घरोघरी जाऊन लोकांना आमंत्रण देऊन साधनेविषयी सांगत असे.

३. प्रत्येक सोमवारी अरण्येश्वर मंदिर, नवरात्रीत चतुःशृंगी, महालक्ष्मी मंदिर आणि दशभुजा गणपति मंदिर अशा ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर मी सेवा करत होते. मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करत असे. मी खाऊही करून देत असे.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

माझ्याकडून काही चुका होत असत किंवा अहं वाढत असे, तेव्हा मी सौ. ज्योतीला विचारत असे. त्या वेळी ती मला मार्गदर्शन करत असे.

वर्ष १९९६ पासून मी नियमित साधना करत होते; पण मध्येच काही वर्षे माझी समष्टी साधना होत नव्हती. मी नामजप करत असे. ‘माझ्याकडून साधना नीट होत नाही’, याचे मला पुष्कळ वाईट वाटत असे. मला पुष्कळ वेळा रडू येत असे. माझ्या मनात वाईट विचार येत असत. मला वाटत असे, ‘मी काहीच करू शकत नाही.’ मी कुणाला साहाय्य केले आणि त्याची जाणीव त्या व्यक्तीला झाली नाही, तर मला फार वाईट वाटून त्रास होत असे. नंतर मला हळूहळू जाणीव होऊ लागली, ‘मी माझे कर्तव्य केले. ‘इतरांनी कसे वागावे ?’, ते माझ्या हातात नाही.’ एकदा माझी आई मला सहज म्हणाली, ‘‘मी (आई) जीवन हौसेने व्यतीत केले आणि माझं माझं पुष्कळ केलं; पण शेवटी आपल्याला काहीच नेता येत नाही अन् आपलं काहीच नसतं.’’ हे विचार तिने तिच्या निधनाच्या २ दिवस आधी व्यक्त केले होते. ते विचार माझ्या मनावर कायमचे कोरले गेले.

६. बुद्धीचा वापर न करता सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन करणे

मी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठायच्या आधी अधिकाधिक साधना करण्याचा प्रयत्न केला. मी ग्रंथ वाचून त्यातील विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न केले. मला कुणीही आणि कोणतीही सेवा करण्यास सांगितली की, मी त्यांचे आज्ञापालन करत असे. मी कधीच कुणाला ‘असे का ?’, हा प्रश्न विचारला नाही.

७. प्रतिकूल परिस्थितीतही साधनेमुळे स्थिर रहाता येणे

मला आयुष्यात बर्‍याच वेळा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशीच माझा मोठा अपघात झाला. मी दुचाकीवरून पडले. माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला बरेच टाके पडले. तेव्हा मला खंत वाटली, ‘माझा गुरुपौर्णिमेच्या दिवशीच का बरे अपघात झाला ?’ तेव्हा मला गुरूंनी सांगितलेले वचन आठवले, ‘आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात.’ त्यानंतर माझे मन स्थिर झाले. मला बर्‍याच वेळा पैशांची अडचण आली आणि त्यातूनही मला देवाने मार्ग दाखवला. वर्ष २०१४ मध्ये माझ्या सुनेचा लहान वयात अपघाती मृत्यू झाला. तेव्हाही मी स्थिर होते. तेव्हा माझा दत्ताचा नामजप चालू होता. त्यामुळे त्या प्रसंगातूनही मी साधनेमुळेच बाहेर पडू शकले. माझ्या यजमानांना न्यूमोनिया झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. तेव्हा साधनेमुळेच मी स्थिर राहून त्या दुःखातून बाहेर पडू शकले.

८. साधनेत कुटुंबियांकडून वेळोवेळी मिळालेले अनमोल साहाय्य

मला साधनेसाठी कुटुंबियांकडून कधीच विरोध झाला नाही. माझा मुलगा श्री. पराग मधुसूदन कुलकर्णी मला नेहमीच साथ देत असतो. आम्ही ३ – ४ साधिका प्रसाराला कुठेही निघालो, तर तो आम्हाला चारचाकी गाडीने सोडत असे. मी त्याला सांगेन, तेवढे तो अर्पण देतो. माझी धाकटी मुलगी सौ. मेधा हर्डीकर मला साहाय्य करते आणि वेळोवेळी अर्पण देते. मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असतांना ती मला दुचाकी गाडीवर घेऊन जात असे. ती मला कुणाच्या घरी जायचे असेल, तेव्हा दुचाकी गाडीवरून सोडत असे.

९. जुलै २०१३ मध्ये आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित झाल्यावर डोळ्यांत आनंदाश्रू येणे

साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्याचे घोषित झाल्यावर मला वाटत असे, ‘मी काहीच करत नाही आणि माझी प्रगती होण्यासाठी मला पुष्कळ प्रयत्न करावे लागतील.’ जुलै २०१३ मध्ये एक दुःखद प्रसंग घडला होता. मी सर्व दुःख बाजूला ठेवून गुरुपौर्णिमेला गेले. मी सर्वांत शेवटी बसले होते. त्या वेळी सौ. ज्योतीने मला पुढे बसायला सांगितले. सद्गुरु स्वाती खाडये साधकांची नावे घेऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करत होत्या. त्यांनी साधकाचे नाव घोषित केले गेले की, माझ्या डोळ्यांतून अश्रू यायचे. मला सारखे वाटायचे, ‘सौ. ज्योतीचे नाव का बरं येत नाही ?’ सद्गुरु स्वातीताईंनी अकस्मात् माझे नाव घेतले आणि मला फार आनंद झाला. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ‘गुरूंनी मला कसे काय त्यांच्या चरणकमलांशी आणले ?’, असे मला वाटले.

१०. शातच गुंतून न रहाणे

माझी साधना करण्याची तळमळ हळूहळू वाढत गेली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी कशातच गुंतून रहात नाही.’

११. समाजातील एका महिलेच्या घरी सेवेनिमित्त गेलो असतांना तिला चंदनाचा सुगंध येणे

माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी एकदा मी आणि एक साधिका एका घरी गेलो असतांना तेथील एक महिला आम्हाला म्हणाली, ‘‘तुम्ही चंदनाचे अत्तर लावले आहे का ? मला चांगला सुगंध येत आहे’’; मात्र त्या वेळी आमच्या दोघींकडे चंदनाचे कोणतेच उत्पादन नव्हते आणि आम्ही अत्तरही लावले नव्हते. त्या महिलेने असे सांगितल्यावर आम्हा दोघींचा भाव जागृत झाला.

१२. संतांचे लाभलेले कृपाशीर्वाद !

साधनेच्या प्रवासात मला अनेक संतांचे कृपाशीर्वाद लाभले आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. (कै.) पद्माकर होनप, सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु स्वाती खाडये अशा अनेक संतांचा सत्संग मला लाभला.

१३. आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करतांना भाव

प्रतिदिन महाप्रसाद ग्रहण करतांना माझ्या मनात ‘हा सर्व स्वयंपाक रामनाथी आश्रमात बनवला आहे. यांतून मला अन्नपूर्णादेवीचा आशीर्वाद लाभत आहे’, असा भाव असतो.

१४. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे आणि नंतर संतपद गाठल्याचे घोषित होण्यापूर्वी धाकटी मुलगी सौ. मेधा हर्डीकर हिच्या माध्यमातून पूर्वसूचना मिळणे

माझी आध्यात्मिक पातळी होण्याच्या वेळी मला वाटत होते, ‘सौ. ज्योतीची आध्यात्मिक पातळी घोषित होणार असेल.’ त्या वेळी माझी धाकटी मुलगी सौ. मेधा हर्डीकर मला म्हणाली, ‘‘आई, तुझीच आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असणार.’’ मला हे एक आश्चर्य वाटले. एकदा मी सौ. मेधाला म्हणाले, ‘‘चांगल्या साड्या नेसून यायला सांगितले आहे, म्हणजे नक्की आज कुणीतरी संत झाले असणार.’’ तेव्हाही सौ. मेधा मला म्हणाली, ‘‘आई, तूच संत झाली आहेस. तुझेच नाव घोषित करतील बघ.’’ मी संत झाल्याचे घोषित केले गेले, तेव्हा माझा भाव दाटून आला. मला वाटत होते, ‘परात्पर गुरूंनी मला सौ. मेधाच्याच मुखातून मी संतपद गाठल्याची पूर्वसूचना दिली होती.’

१५. जाणवलेले पालट

अ. ‘माझ्या त्वचेवरची चकाकी वाढली आहे आणि त्वचा मऊ झाली आहे’, असे मला जाणवते.

आ. मी नामजप करत असतांना काही वेळा सुगंध येतो.

इ. देवघरातील सनातन-निर्मित ‘दत्ताचे चित्र निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवते. त्याचा रंग फिका होत चालला आहे.

१६. कृतज्ञता

मला गुरुमाऊलीप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) केवळ कृतज्ञता आणि कृतज्ञताच वाटते. मी ती शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ‘मी सनातन संस्थेशी जोडले जाणे आणि मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभणे, म्हणजेच मला मिळालेला परिस स्पर्श आहे. याचमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले’, असे मला वाटते.

वर्ष १९९६ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हापासून मी जमेल तशी व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहे. मला सर्व साधकांनी पदोपदी पुष्कळ साहाय्य केले. परात्पर गुरूंनी मला सूक्ष्मातून पुष्कळ साहाय्य केले. त्यांच्या कृपेनेच माझी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली आणि माझी मोक्षाकडे वाटचाल होत आहे. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) श्रीमती उषा मधुसूदन कुलकर्णी, पुणे (१६.३.२०२३)

१७. पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचे आध्यात्मिक उन्नती केलेले कुटुंब

Leave a Comment