कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे १२७ वे (व्‍यष्‍टी) संत पू. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) यांची त्‍यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

११.१०.२०२३ या दिवशी कर्णावती (गुजरात) येथील सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्‍यांचा सन्‍मान केला. त्‍यानिमित्त पू. श्रीपाद हर्षेआजोबा यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

पू. श्रीपाद हर्षे

सेवेची तळमळ आणि देवावर श्रद्धा असलेले कर्णावती (गुजरात) येथील डॉ. श्रीपाद नरहर हर्षे सनातनच्‍या १२७ व्‍या संतपदी विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कर्णावती (गुजरात) येथील डॉ. श्रीपाद नरहर हर्षे (वय ८९ वर्षे) यांनी पदव्‍युत्तर शिक्षणानंतर (एम्.एस्‍सी. पीएच्.डी.) इंग्‍लंडमध्‍ये वास्‍तव्‍य केले. भारतात परतल्‍यानंतर त्‍यांनी आरंभी नोकरी आणि नंतर व्‍यवसाय केला. त्‍यांना त्‍यांच्‍या संशोधनाच्‍या कार्यासाठी वर्ष १९७७ मध्‍ये ‘राष्‍ट्रपती पुरस्‍कार’ मिळाला. पूर्वीपासून ते देवपूजा, स्‍तोत्रपठण आणि नित्‍य देवदर्शन करत असत. तरुणावस्‍थेत त्‍यांनी श्री गजानन महाराज (अक्‍कलकोट), प.पू. नानामहाराज तराणेकर इत्‍यादी अनेक संतांच्‍या भेटी घेतल्‍या. त्‍यांनी फेब्रुवारी १९९७ मध्‍ये कर्णावती येथे सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला.

वयाच्‍या ८९ व्‍या वर्षी हर्षेआजोबा समष्‍टीसाठी नामजप करतात, तसेच ते आध्‍यात्‍मिक त्रास असणार्‍या साधकांना नामजप शोधून देण्‍याची सेवा करतात. ही सेवा करण्‍यासाठी त्‍यांनी सनातनच्‍या ‘प्राणशक्‍तीवहन संस्‍थेतील अडथळ्‍यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’ या, तसेच अन्‍य उपायांविषयीच्‍या ग्रंथांचा सखोल अभ्‍यास केला आहे.

संसारात राहून साधना करून आध्‍यात्‍मिक उन्‍नती करण्‍याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्‍या हर्षेआजोबांची आध्‍यात्‍मिक उन्‍नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१४ मध्‍ये त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली. जुलै २०२३ मध्‍ये त्‍यांची आध्‍यात्‍मिक पातळी ६७ टक्‍के होती. ‘सेवेची तळमळ, चिकाटी, देवावरील श्रद्धा’ इत्‍यादी अनेक गुणांमुळे अवघ्‍या ३ मासांत त्‍यांची आध्‍यात्‍मिक पातळी ४ टक्‍क्‍यांनी वाढली असून आजच्‍या शुभदिनी (११.१०.२०२३ या दिवशी) त्‍यांनी ७१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली आहे आणि ते ‘व्‍यष्‍टी’ संत म्‍हणून सनातनच्‍या १२७ व्‍या संतपदावर विराजमान झाले आहेत.

‘पू. डॉ. श्रीपाद हर्षे यांची पुढील आध्‍यात्‍मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला निश्‍चिती आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.१०.२०२३)

पू. श्रीपाद हर्षेआजोबा यांचा श्रीकृष्‍णाची प्रतिमा देऊन सन्‍मान करतांना सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर

हर्षेकाका संतपदी झाले विराजमान ।

हर्षेकाका संतपदी झाले विराजमान ।
गुरूंच्‍या अविरत ध्‍यासाने मिळाला त्‍यांना हा मान ॥ १ ॥

अनेक शस्‍त्रकर्मे होऊनही, असती शारीरिक त्रासही ।
परि गुरूंच्‍या कृपेने मात केली त्‍यांनी प्रारब्‍धावरी ॥ २ ॥

अविरत साधना करत त्‍यांनी केली सेवा ।
प.पू. गुरुदेवांनी (टीप १) दिला आज त्‍यांना अनमोल ठेवा ॥ ३ ॥

प्रेमळ स्‍वभाव आणि चिकाटी हे गुण त्‍यांच्‍यात असती ।
साधकांना त्‍यांच्‍या वाणीतून मिळते मार्गदर्शनाची तृप्‍ती ॥ ४ ॥

पू. काकांचा पुढील प्रवास अविरत राहो सुरू ।
त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली आम्‍ही साधक पुढे सरू ॥ ५ ॥

असे पू. हर्षेकाका आम्‍हा साधकांना लाभले ।
प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञतारूपी वहाते फुले ॥ ६ ॥

टीप १ : परात्‍पर गुरु डॉ. आठवले

– सौ. गीता धारप, कर्णावती (अहमदाबाद), गुजरात.

१. पू. हर्षेआजोबांचे कुटुंबीय

१ अ. सौ. संध्‍या आगरकर, भोपाळ (पू. हर्षेआजोबांची मुलगी)

सौ. संध्‍या आगरकर

१ अ १. चिकाटी : ‘एकदा आमचा ग्रंथविक्रीचा हिशोब जुळत नव्‍हता. आम्‍ही रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होतो. तेव्‍हा पू. बाबांनी (पू. हर्षेआजोबा यांनी) पहाटे ४ वाजता उठून हिशोब पूर्ण होईपर्यंत सेवा केली आणि हिशोब अंतिम केला.

१ अ २. सेवा परिपूर्ण करणे : पू. बाबा साधकांसाठी जप शोधण्‍याची सेवा करतात. त्‍यांची नोंद करण्‍यासाठी त्‍यांनी एक वही केली आहे. त्‍या वहीमध्‍ये सर्व माहिती व्‍यवस्‍थित लिहिलेली असते. त्‍यांनी प्रत्‍येक साधकाच्‍या नावानुसार त्‍याला कोणत्‍या दिवशी कोणता नामजप दिला ?, हे नीट रकाने करून लिहिले आहे.

१ आ. सौ. अंशू संत, बडोदा (पू. हर्षेआजोबा यांची नात)

सौ. अंशू संत
१ आ १. काटकसरी वृत्ती

अ. ‘सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात येण्‍याआधीपासून पू. आजोबा पाठकोरे कागद जमवून ठेवत असत आणि लिखाणासाठी त्‍यांचा वापर करत असत.

आ. एकदा त्‍यांच्‍या घरातील एक ‘प्‍लास्‍टिक’चे ‘स्‍टूल’ तुटले. तेव्‍हा त्‍यांनी ते ‘स्‍टूल’ साहाय्‍य घेऊन घरातच दुरुस्‍त केले. ते इतके व्‍यवस्‍थित झाले की, पुढे अनेक वर्षे त्‍यांनी ते वापरले.

१ आ २. सातत्‍य : आतापर्यंत त्‍यांची ७ मोठी शस्‍त्रकर्मे झाली आहेत. त्‍यांना तीव्र शारीरिक त्रास आहेत, तरीही ते त्‍यांची साधना नियमित करत आहेत.’

२. सनातनचे साधक

२ अ. सौ. संध्‍या जामदार (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ १. पू. हर्षेकाका संत होणार असल्‍याची पूर्वसूचना मिळणे : ‘आम्‍ही या वर्षात २ – ३ वेळा कर्णावतीला गेलो. तेव्‍हा त्‍यांना भेटल्‍यावर आम्‍हाला त्‍यांच्‍याकडे पाहून पुष्‍कळ आनंद वाटला. ‘त्‍यांच्‍या चेहर्‍यावर पुष्‍कळ तेज आहे’, असे मला जाणवले आणि ‘आता ते लवकरच संत होतील’, असे वाटले.

२ अ २. वेळेचे पालन करणे

अ. पू. हर्षेकाकांमध्‍ये चिकाटी, सातत्‍य आणि नियोजनबद्धता हे गुण आहेत. ते झोपणे, उठणे, अल्‍पाहार करणे, जेवण घेणे, औषध घेणे, मानसपूजा करणे इत्‍यादी त्‍यांच्‍या ठरलेल्‍या वेळीच करतात.

आ. पू. हर्षेकाकांना कुठेही जायचे असेल, तर ते ठरलेल्‍या वेळेतच सिद्ध असतात. ‘सर्व कृती वेळेत केल्‍या की, कुठल्‍याही सेवेत अडचण येत नाही’, असा त्‍यांचा भाव असतो. सत्‍संग, ग्रंथ प्रदर्शन, प्रवचन वा अन्‍य सेवा यांसाठी वेळेतच गेले पाहिजे’, असा त्‍यांचा आग्रह असतो. ‘आपण वेळेत उपस्‍थित राहिलो की, तेथे देवताही आलेल्‍या असतात. त्‍यांच्‍या तत्त्वाचा आपल्‍याला लाभ होतो’, असा त्‍यांचा भाव असतो.

२ अ ३. प्रेमभाव : पू. हर्षेकाका यांंना ‘सर्व साधकांनी त्‍यांच्‍या घरी यावे आणि सत्‍संगाचे नियोजन करावे’, असे वाटते. आम्‍हाला त्‍यांनी प्रत्‍येक प्रसंगात पुष्‍कळ साहाय्‍य केले आहे. आम्‍हाला त्‍यांचा आधार वाटतो.

२ अ ४. ग्रंथ वाचनाची आवड : पू. काकांना ग्रंथांचे वाचन करायला आवडते. ग्रंथ वाचून त्‍यावर चिंतन अन् मनन करतात.’

२ आ. सौ. सुजाता सुहास गरुड, बडोदा

२ आ १. साधनेची तळमळ : ‘गुरुपौर्णिमेच्‍या काळात प्रत्‍येक जिल्‍ह्यात साधकांच्‍या आध्‍यात्‍मिक पातळीचा आराखडा पाठवला जातो. पू. आजोबांची आध्‍यात्मिक पातळी वाढली नसल्‍याचे समजल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ खंत वाटत असे. तेव्‍हा ते साधकांना विचारायचे, ‘‘मी सेवेत अल्‍प पडतो. मी अजून कसे प्रयत्न करू ?’’

२ आ ३. पू. आजोबांना साधकांचे त्रास लवकर दूर व्‍हावेत, याची तळमळ असणे : पू. आजोबा सर्व साधकांनी त्‍यांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासांवर वेळेवर जप घेऊन तो नियमित करावा, यासाठी स्‍वतःच पाठपुरावा करतात. कधी त्‍यांच्‍याकडून साधकांना नामजप द्यायचा राहिला असेल, तर ते आधी क्षमायाचना करतात आणि लगेच जप शोधतात अन् भ्रमणभाष करून सांगतात. या वयातही त्‍यांची सेवेची तळमळ आणि सेवेप्रतीचा कृतज्ञताभाव जाणवतो.’

(सर्व सूत्रांसाठी दिनांक १४.१०.२०२३)

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेले सनातनचे संत पू. श्रीपाद हर्षे !

‘पू. श्रीपाद हर्षे सनातनच्‍या १२७ व्‍या (व्‍यष्‍टी) संतपदी विराजमान झाले’, हे समजल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद झाला आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. वर्ष १९९८ ते २००० पर्यंत मी आणि श्री. माधव देशपांडे मुंबई येथून कर्णावती अन् बडोदा येथे अध्‍यात्‍मप्रचारासाठी जात होतो. कर्णावती येथे गेल्‍यानंतर आमचे रहाणे, जेवणे, साहित्‍य ठेवणे, प्रसार अहवाल सिद्ध करणे इत्‍यादींची सोय पू. हर्षेकाका यांच्‍या घरी होत असे. या कालावधीत मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पू. शिवाजी वटकर

१. पू. हर्षेकाका यांनी साधना आणि सेवा यांविषयी जाणून घेणे, हळूहळू त्‍यांच्‍यात जिज्ञासा निर्माण होणे आणि श्रद्धा वाढून भाव निर्माण होणे

पू. हर्षेकाका निवृत्त झाल्‍यानंतर रासायनिक उत्‍पादने करणार्‍या आस्‍थापनांना मार्गदर्शन (कन्‍सल्‍टन्‍सी इन केमिकल्‍स) करत असत. आरंभी ते पुष्‍कळ बुद्धीवादी होते. ते मला अध्‍यात्‍माविषयी अनेक प्रश्‍न विचारायचे. त्‍यांनी सर्व काही जाणून घेऊनच साधना आणि सेवा करण्‍यास आरंभ केला. त्‍यांच्‍यामध्‍ये अध्‍यात्‍म आणि साधना यांविषयी हळूहळू जिज्ञासा निर्माण झाली. पुढे त्‍यांची श्रद्धा वाढून परात्‍पर गुरु डॉ. आठवले, सनातन संस्‍था आणि संस्‍थेचे साधक यांच्‍याप्रति त्‍यांच्‍यात भाव निर्माण झाला.

२. आम्‍हाला पुष्‍कळ प्रेम देणे

कर्णावती येथे असतांना त्‍यांनी आम्‍हाला पुष्‍कळ प्रेम दिले आणि आमची सर्वतोपरी काळजी घेऊन वेळोवेळी अध्‍यात्‍मप्रसाराला साहाय्‍य केले.

३. कुटुंबियांना साधनेकडे वळवणे

त्‍यांनी त्‍यांच्‍या सर्व कुटुंबियांना साधनेकडे वळवले. साधना करण्‍यास कुणालाही विरोध न करता साहाय्‍य केले; म्‍हणून त्‍यांचे सर्व कुटुंबीय सनातन संस्‍थेशी जोडले आहेत.

४. कर्तेपणा स्‍वतःकडे न घेणे

मी त्‍यांना अधूनमधून भ्रमणभाष करून त्‍यांची विचारपूस करतो आणि कर्णावती येथे पूर्वी मला साहाय्‍य केल्‍याबद्दल त्‍यांचे आभार मानतो. तेव्‍हा ते म्‍हणतात, ‘‘तुमच्‍यामुळे माझा अध्‍यात्‍माचा अभ्‍यास झाला. तुम्‍ही आमच्‍या साधनेचा पाया पक्‍का केला. त्‍यामुळे आम्‍ही सर्व कुटुंबीय साधना आणि सेवा करू शकतो.’’ प्रत्‍यक्षात कर्णावती येथे अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करण्‍यासाठी त्‍यांनी मला सर्वतोपरी साहाय्‍य केले आहे, तसेच ते आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांनी झोकून देऊन साधना अन् सेवा केली आहे. असे असतांना ते त्‍याचे श्रेय मला देतात.

५. सतत परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍मरण करणे आणि कृतज्ञताभावात असणे

ते सतत परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍मरण करतात आणि नेहमी कृतज्ञताभावात असतात. पू. हर्षेकाका यांनी गुरुकृपेने उतारवयात संतपद गाठले आहे. ‘त्‍यांनी संसारात राहून साधना आणि सेवा कशी करावी ?’, याचा आदर्श साधकांच्‍या समोर ठेवला आहे. यासाठी त्‍यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे अल्‍पच आहे. ‘यापुढेही त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगती अशीच होवो’, अशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१०.२०२३)

Leave a Comment