गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

Article also available in :

अनुक्रमणिका

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी बरेच जण या प्रचलित मंत्राचा जपही करत असतात.  तर आता आपण गायत्रीदेवीच्या चरणी वंदन करून तिच्या संदर्भातील माहिती जाणून घेऊया.

कु. मधुरा भोसले

१. उत्पत्तीची कथा

१ अ. श्रीगणेशाला साहाय्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने गायत्रीदेवीची निर्मिती करणे

‘सत्ययुगाचा आरंभ होण्यापूर्वी ब्रह्मदेवाने देवतांची निर्मिती केली. सत्ययुगाला आरंभ झाल्यानंतर देवतांचे तेज मनुष्यापर्यंत पोहोचेना; कारण देवता अधिक प्रमाणात निर्गुण स्वरूपात होत्या. देवतांमध्ये असणार्‍या निर्गुण तत्त्वाचे रूपांतर सगुण तत्त्वामध्ये करण्यासाठी श्रीगणेशाला एका शक्तीच्या साहाय्याची आवश्यकता होती. त्यामुळे ब्रह्मदेवाने सरस्वती आणि सवितृ या देवतांच्या संयुक्त तत्त्वांपासून गायत्री देवीची निर्मिती केली.’ – (संदर्भ : ज्ञानातून मिळालेली माहिती)

 

 

२. गायत्री शब्दाचा अर्थ

‘गायत्री शब्दाच्या व्युत्पत्ती आहेत – ‘गायन्तं त्रायते ।’, म्हणजे गायन केल्याने (मंत्र म्हटल्याने) रक्षण करते ती आणि ‘गायंतं त्रायंतं इति ।’ म्हणजे सतत गात गेल्यामुळे जी शरिराला गायला लावते (शरीरात मंत्राची सूक्ष्म स्पंदने निर्माण करते.) आणि जी तारण्याची शक्ती उत्पन्न करते (रक्षण करते), ती गायत्री होय.’ – संदर्भ (सनातनचा ग्रंथ : मंत्रयोग)

 

३. अन्य नावे

अथर्ववेदात गायत्रीला ‘वेदमाता’ म्हटले आहे. गायत्री देवीची उत्पत्ती सरस्वतीपासून झालेली असल्यामुळे काही ठिकाणी तिचा उल्लेख ‘सावित्री’ असाही केला जातो. गणेश गायत्री, सूर्य गायत्री, विष्णु गायत्री आदी प्रचलित असणार्‍या गायत्रीमंत्रांच्या नावानेही गायत्रीला संबोधले जाते.

 

४. निवास

तिचा निवास ब्रह्मलोकापासून सूर्यलोकाकडे जाणार्‍या मार्गात आहे. हा ब्रह्मलोकाचा उपलोक असून त्याला ‘गायत्रीलोक’ असे म्हणतात. तेथे अखंड वेदमंत्रांचा जयघोष चालू असतो आणि तेथे सोनेरी रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. तेथे रात्र कधीच होत नाही. तेथील वातावरण उत्साहवर्धक आणि आल्हाददायी आहे. गायत्री उपासकांना मृत्यूनंतर गायत्रीलोकांत स्थान प्राप्त होते. काही सूर्योपासकांनाही या लोकात स्थान मिळते.

 

५. त्रिगुणांचे प्रमाण (टक्के)

५ अ. सत्त्व – ७०

५ आ. रज – २०

५ इ. तम – १०

 

६. क्षमता प्रमाण (टक्के)

६ अ. उत्पत्ति – ६०

६ आ. स्थिती – ३०

६ इ. लय – १०

 

७. शक्ती

७ अ. प्रगट शक्तीचे प्रमाण (टक्के) : ७०

७ आ. शक्तीचा प्रकार

७ आ १. तारक शक्तीचे प्रमाण (टक्के) : ७०

७ आ १ अ. मारक शक्तीचे प्रमाण (टक्के) : ३०

७ आ २. सगुण शक्ती प्रमाण (टक्के) : ५०

७ आ २ अ. निर्गुण शक्ती प्रमाण (टक्के) : ५०

 

८. मूर्तीविज्ञान

गायत्रीदेवी दोन प्रकारे दाखवली जाते.

८ अ. पहिले रूप

‘गायत्रीदेवी धन आणि ऐश्‍वर्य यांचे प्रतीक असणार्‍या लाल कमळावर विराजमान असते. तिला पाच मुख असतात. त्यांची नावे अनुक्रमे ‘मुक्ता, विद्रुमा, हेमा, नीला आणि धवला’ अशी आहेत. ती दश नेत्रांनी दशदिशांचे अवलोकन करत असते. तिच्या आठ हातांमध्ये शंख, सुदर्शनचक्र, परशु, पाश, जपमाळ, गदा, कमळ आणि पायसपात्र (देवीला नैवेद्य रूपाने दाखवण्यात येणारे ‘पायस’ नावाचा पदार्थ असलेले पात्र) असते. तिचा नववा हात आशीर्वाद देणार्‍या आणि दहावा हात अभयदान देणार्‍या मुद्रांमध्ये असतात.

८ आ. दुसरे रूप

गायत्रीदेवी हंसावर आरूढ असते. ती द्विभुज असून तिच्या एका हातात ज्ञानाचे प्रतीक असणारे वेद असतात आणि दुसरा हात आशीर्वादाच्या मुद्रेत असतो.’ – संदर्भ (संकेतस्थळावरील माहिती)

 

९. कार्य आणि वैशिष्ट्ये

९ अ. आदिशक्तीस्वरूप

गायत्रीदेवी ही सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवींचे एकत्रित रूप आहे. ती आदिशक्तीस्वरूप आहे.

९ आ. ब्रह्मदेवाची कार्यरत शक्ती

ती ब्रह्मदेवाची कार्यरत शक्ती असून तिच्याशिवाय ब्रह्मदेव निष्क्रीय असतो.

९ इ. १२ आदित्य आणि सूर्य यांना तेज प्रदान करणे

सवितृपासून गायत्रीला आणि गायत्रीपासून १२ आदित्य यांना तेज प्रदान केले जाते. स्थुलातून दिसणार्‍या सूर्यालाही तेज देणारी शक्ती गायत्रीच आहे. तिच्यात सूर्याच्या सोळापट शक्ती आहे.

९ ई. देवतांची अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती आणि चैतन्य प्रगट होणे

गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे विविध देवतांची अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती आणि चैतन्य प्रगट होऊन कार्यरत होते. त्यामुळे उपासकाला देवतांची कृपा शीघ्र प्राप्त होते.

 

१०. उपासना

१० अ. प्रतिमेचे पूजन करणे

गायत्रीदेवीच्या उपासनेच्या अंतर्गत तिच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.

१० आ. गायत्रीमंत्राचे उच्चारण करणे

त्रिकाल संध्या उपासनेत आणि मौंजीबंधनाच्या वेळी गायत्री मंत्राचे उच्चारण केले जाते. गायत्री मंत्र म्हटल्याने वेदोच्चारण केल्याचे फळ मिळते.

१० इ. गायत्रीयाग

सवितृ आणि गायत्री या देवींना प्रसन्न करण्यासाठी अनुक्रमे सवितृकाठ्ययाग (टीप) आणि गायत्रीयाग केले जातात.

टीप : सवितृ देवतेला प्रसन्न करण्यासाठी सवितृकाठ्ययाग केला जातो. सहस्रो वर्षांपूर्वी अत्री ऋषींनी हा याग पिठापूर, आंध्रप्रदेश येथे केला होता, असा उल्लेख श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरित्रात आहे. या यागाचा उल्लेख धर्मशास्त्रात आहे.

 

११. गायत्रीमंत्र

११ अ. गायत्रीमंत्र

‘हा चौदा अक्षरी मंत्र असून त्याचा संबंध मनुष्याच्या शरिरातील २४ ठिकाणी वास करणार्‍या २४ देवतांशी आहे. हा सिद्ध मंत्र आहे.

११ अ १. गायत्रीमंत्राची व्युत्पत्ति आणि अर्थ

पहिला शब्द ॐ उमटला. त्याच्यापासून मुख्य गायत्री मंत्र झाला; म्हणून गायत्री मंत्राला ‘सर्व वैदिक मंत्रांचा राजा’, अशी संज्ञा आहे. छंदामध्येसुद्धा मुख्य छंद गायत्रीच आहे. ते गायनमात्र मंत्ररूप असावे, नाहीतर तो जप होतो.’ – संदर्भ (सनातनचा ग्रंथ : मंत्रयोग)

११ अ २. गायत्रीमंत्र

ॐ भूर्भुवः स्वः तत् सवितुः वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।धियो यो नः प्रचोदयात् ।

११ अ ३. गायत्रीमंत्राचा अर्थ

श्‍लोकाचा अर्थ कळण्यासाठी शब्दांची पालटलेली रचना : सवितु: देवस्य तत् वरेण्यं भर्ग: धीमहि । य: न: प्रचोदयात् ।

अर्थ : जो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो, त्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो.

११ अ ४. संबंधित ऋषि आणि देवता

या मंत्राचे ऋषि विश्‍वामित्र असून या मंत्राची देवता सवितृ आहे.

११ अ ५. गायत्रीमंत्राचे प्रकार

११ अ ५ अ. त्रिपादगायत्री : यात ॐ पुढीलप्रमाणे तीन वेळा येतो.

ॐ भूर्भुवः स्वः ।

ॐ तत् सवितुः वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।

ॐ धियो यो नः प्रचोदयात् ।

त्रिपादगायत्रीत श्‍वास घेतांना पहिले पद, रोखून ठेवल्यावर दुसरे पद आणि सोडतांना तिसरे पद मनात म्हटले की, पूरक, कुंभक आणि रेचक यांचे प्रमाण १:४:२ असलेला प्राणायामही होतो.

पूरक, कुंभक आणि रेचक या प्राणायामातील क्रिया आहेत.

११ अ ५ आ. चतुष्पादगायत्री : यात त्रिपादगायत्रीतील तीन ॐ आहेतच. चौथा ॐ ‘प्रचोदयात्’ नंतर लावतात. चौथ्या ॐ मुळे रेचकानंतरचा कुंभकही होतो.

११ अ ५ इ. अजपागायत्री : श्‍वास आत घेतांना नैसर्गिकरित्या ‘सोऽ (सः)’ आणि श्‍वास सोडतांना नैसर्गिकरित्या होणार्‍या ‘हं’ या ध्वनीवर (सोऽहं) लक्ष देणे, याला अजपागायत्री किंवा अजपाजप म्हणतात.

११ अ ६. विविध देवदेवतांचे गायत्री मंत्र

निरनिराळ्या देवतांचे निरनिराळे गायत्रीमंत्र आहेत, उदा. कृष्ण, राम, सरस्वती. आवश्यकतेनुसार कोणत्या गायत्रीमंत्राचा जप करावा, हे उन्नत (संत) सांगतात.

११ अ ७. गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे होणारे लाभ

११ अ ७ अ. वाणी शुद्ध होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे वाणी शुद्ध होते. शुद्ध वाणीनेच वेदमंत्रांचे उच्चारण करायचे असते. त्यामुळे उपनयनाच्या वेळी बटूला गायत्रीमंत्राची दीक्षा दिली जाते.

११ अ ७ आ. पिंडाची शुद्धी होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे पिंडाची शुद्धी होऊन जिवांमध्ये वेदमंत्रांचे उच्चारण केल्यानंतर निर्माण होणारी दैवी ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होते.

११ अ ७ इ. जिवाची अंतर्बाह्य शुद्धी होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे प्राणवहनातील अडथळे दूर होऊन देहातील रक्तवाहिन्या, ७२००० नाड्या आणि प्रत्येक पेशी यांची शुद्धी होऊन जिवाची अंतर्बाह्य शुद्धी होते.

११ अ ७ ई. वेदाध्ययनास सहाय्यक असणे : गायत्रीच्या उपासनेमुळे वेदाध्ययन करणे सुलभ जाते.

११ अ ७ उ. कर्मकांडानुसार उपासना करण्यासाठी साहाय्यक असणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे देवतांचे तत्त्व त्यांच्यातील दिव्य तेजासहित जागृत होऊन कार्यरत होते. त्यामुळे कर्मकांडानुसार उपासना करतांना, म्हणजे धार्मिक विधी आणि यज्ञादी कर्मे करत असतांना गायत्री मंत्र किंवा विशिष्ट देवतेचा गायत्री मंत्र याचे आवर्जून उच्चारण केले जाते.

११ अ ७ ऊ. गायत्रीमंत्राचे पुरश्‍चरण केल्यामुळे विविध प्रकारचे ऐहिक लाभ होणे : प्रतिदिन नियमितपणे एक सहस्र वेळा गायत्रीमंत्राचे पुरश्‍चरण केल्यामुळे व्यक्ती पापमुक्त होते, तिला धनलाभ होतो आणि स्वर्गसुखाची प्राप्ती होते.

११ अ ७ ए. गायत्रीमंत्राचे पुरश्‍चरण केल्यामुळे पारमार्थिक लाभ होणे : संपूर्ण आयुष्यभर गायत्रीमंत्राचे भावपूर्ण, नियमित आणि श्रद्धेने पुरश्‍चरण केल्यामुळे गायत्रीदेवी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला मुक्ती अन् मोक्ष यांची प्राप्ती होते.’

 

१२. पुण्याचे मंत्रतज्ञ डॉ. मोहन फडके यांनी सांगितल्याप्रमाणे
गायत्रीमंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले जल प्राशन केल्यानंतर आलेल्या अनुभूती

दोन मासांपूर्वी पुण्याचे मंत्रतज्ञ डॉ. मोहन फडके हे सनातनच्या रामानथी आश्रमात आले होते. त्यांनी माझ्या शरिरातील मेद न्यून करण्यासाठी मला प्रतिदिन गायत्री मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले जल पिण्यास सांगितले. मी प्रतिदिन १०८ वेळा गायत्रीमंत्र म्हणत तांब्याच्या पेल्यामध्ये ठेवलेल्या पाण्यात उजव्या हाताची बोटे बुडवून जल अभिमंत्रित करत होते. मंत्रजप पूर्ण झाल्यावर जेव्हा मी पेल्यातील पाण्याला स्पर्श केला तेव्हा ते पुष्कळ उष्ण झाले आहे’, हे माझ्या लक्षात आले. मी सलग १५ दिवस गायत्रीमंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले पाणी पीत होते. त्यामुळे माझ्यावर पुढील परिणाम झाले.

१२ अ. त्रासदायक शक्तीचे दाट काळे आवरण वितळून जातांना जाणवणे

‘माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले त्रासदायक शक्तीचे दाट काळे आवरण वितळून जात आहे अन् मनाचा उत्साह वाढत आहे आणि बुद्धीला नवनवीन विचार सुचत आहेत’, असे मला जाणवले.

१२ आ. देहात चांगली ऊर्जा निर्माण होणे

माझ्या नाभीच्या ठिकाणी चांगली ऊर्जा निर्माण होऊन तिचा विस्तार माझ्या नाभीपासून माझे आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र येथपर्यंत होतांना जाणवले.

१२ इ. देहाच्या विविध भागांतून उष्ण वाफा बाहेर पडतांना जाणवणे

मंत्रजप करत असतांना माझे कान, डोळे, ओठ, गाल, हातांचे आणि पायांचे तळवे यांमधून उष्ण वाफा बाहेर पडतांना जाणवल्या.

१२ ई. गायत्रीमंत्रातील ऊर्जा सहन न झाल्याने विविध शरीरिक त्रास होणे

मी सलग पंधरा दिवस गायत्रीमंत्राने अभिमंत्रित केलेले जल (तीर्थ) प्राशन केल्यावर मला गायत्रीमंत्रातील ऊर्जा सहन न झाल्यामुळे पोटात वेदना होऊ लागल्या आणि मला तोंड आले. त्यामुळे मी प्रतिदिन १०८ ऐवजी केवळ २१ वेळा गायत्रीमंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले जल पिऊ लागले. तेव्हापासून मला होणारे त्रास पूर्णपणे थांबले.

 

१३. कृतज्ञता

गायत्रीमातेच्याच कृपेने तिच्या संदर्भातील माहिती मिळून हा लेखप्रपंच पूर्ण झाला, यासाठी तिच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! सूर्याचे क्षात्रतेज आणि वेदांचे ब्राह्मतेज आम्हा मानवांपर्यंत पोहोचवणार्‍या गायत्रीदेवीच्या चरणी वंदन करून आपण भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करूया आणि तिच्या चरणांवर नतमस्तक होऊन भावसुमनांजली अर्पण करूया.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०१७)

सूक्ष्म ज्ञान : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.