श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याचा भाववृत्तांत !

त्‍यागी आणि कुटुंबियांना साधना करण्‍यास प्रोत्‍साहन देणार्‍या श्रीमती विजया वसंत पानवळकर सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) यांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यांच्‍यावर लहानपणापासून देवाधर्माचे संस्‍कार झाले नव्‍हते; पण वर्ष १९९६ मध्‍ये, म्‍हणजे वयाच्‍या ५६ व्‍या वर्षी पुत्र श्री. विनय पानवळकर यांच्‍याकडून गुरुकृपायोगानुसार साधना समजल्‍यानंतर त्‍यांनी त्‍वरित साधना आणि सेवा करायला आरंभ केला. साप्‍ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्‍यावर त्‍या सहसाधिकेच्‍या समवेत ‘बसस्‍थानकावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, साप्‍ताहिकाच्‍या घड्या घालणे, त्‍यांवर पत्ते चिकटवणे, गुरुपौर्णिमेला अर्पण गोळा करणे’ इत्‍यादी सेवा करू लागल्‍या. हळूहळू देवरुखचे त्‍यांचे घर सनातन संस्‍थेचे सेवाकेंद्रच झालेे.

त्‍यांनी त्‍यांचा मुलगा श्री. विनय पानवळकर आणि सून सौ. नेहा विनय पानवळकर यांना व्‍यवसाय बंद करून, तसेच मुलगी सौ. प्राची हेमंत जुवेकर अन् जावई श्री. हेमंत जुवेकर यांना नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले आणि स्‍वतः नातवंडे अन् घर यांचे दायित्‍व घेतले.

‘आपत्‍काळात टिकून राहण्‍यासाठी आध्‍यात्मिक पातळी चांगली असायला हवी’, हे लक्षात आल्‍यावर त्‍यांनी प्रयत्न चालू केले. वर्ष २०१४ मध्‍ये वयाच्‍या ७४ व्‍या वर्षी त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली.

त्‍यानंतर त्‍यांनी मृत्‍यूपूर्वी संतपद गाठण्‍याचे ध्‍येय मनाशी ठरवले. त्‍यासाठी त्‍यांनी साधनेची तळमळ वाढवली; मात्र तीव्र गुडघेदुखी आणि इतर शारीरिक दुखणी यांमुळे त्‍या घराबाहेर पडून सेवा करू शकत नव्‍हत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी श्रीकृष्‍णाशी सूक्ष्मातून संवाद वाढवला. त्‍या श्रीकृष्‍णाशी नियमित बोलू लागल्‍या आणि त्‍याचे मार्गदर्शन घेऊ लागल्‍या. ‘श्रीकृष्‍ण आपल्‍याशी बोलत आहे’, अशी अनुभूतीही त्‍यांना येऊ लागली. ‘नियमितपणे नामस्‍मरण, चिंतन आणि श्रीकृष्‍णाच्‍या मार्गदर्शनानुसार कृती करणे’, हीच त्‍यांची साधना झाली.

ईश्‍वरप्राप्‍तीचा ध्‍यास असलेल्‍या पानवळकरआजी घरी आलेल्‍या नातेवाइकांशी प्रापंचिक विषयांवर फारशा बोलत नाहीत; मात्र ‘साधना किंवा अध्‍यात्‍म’, हा विषय निघाला, तर बराच वेळ बोलतात. ‘चिकाटी, सातत्‍य आणि नियोजनबद्धता’, हे गुण असणार्‍या पानवळकरआजी स्‍वतःमधील स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. आता त्‍यांनी त्‍यांच्‍या आवडी-निवडीचा त्‍याग करायला आरंभ केला आहे. अलीकडे त्‍या प्रत्‍येक प्रसंगाचा ‘ईश्‍वरेच्‍छा’ या भावाने स्‍वीकार करण्‍याचा प्रयत्न करू लागल्‍या आहेत.

पानवळकरआजींचा मुलगा श्री. विनय पानवळकर आणि सून सौ. नेहा विनय पानवळकर हे देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथे अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करत आहेत. आजींची मुलगी सौ. प्राची हेमंत जुवेकर या वाराणसी येथील आश्रमात, जावई श्री. हेमंत जुवेकर हे उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) येथे, नातू (मुलीचा मुलगा) श्री. प्रशांत जुवेकर अन् नातसून सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) हे जळगाव येथे पूर्णवेळ साधनारत आहेत.

स्‍वतः समष्‍टी साधनेत नसूनही व्‍यष्‍टी साधनेच्‍या जोडीला कुटुंबियांना समष्‍टी साधना करण्‍यास प्रोत्‍साहन देणार्‍या पानवळकरआजींनी सर्वच आई-वडिलांपुढे एक मोठा आदर्श ठेवला आहे. जुलै २०२३ मध्‍ये त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के होती. ‘त्‍यागी वृत्ती, ईश्‍वरप्राप्‍तीची तीव्र तळमळ आणि श्रीकृष्‍णाशी सतत अनुसंधान’ इत्‍यादी गुणांमुळे त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी अवघ्‍या २ मासांत २ टक्‍के वाढली असून शुभदिनी (५.१०.२०२३ या दिवशी) त्‍यांनी ७१ टक्‍के आध्‍यात्मिक गाठली आहे अन् त्‍या ‘व्‍यष्‍टी’ संत म्‍हणून सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदावर विराजमान झाल्‍या आहेत.

‘पू. (श्रीमती) विजया वसंत पानवळकर यांची पुढील आध्‍यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला निश्‍चिती आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.१०.२०२३)
पू. श्रीमती विजया पानवळकर यांचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र देऊन  सन्‍मान करतांना सद़्‍गुरु स्‍वाती खाडये

देवरुख – सातत्‍य, चिकाटी आणि श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या येथील सनातनच्‍या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

५ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी झालेल्‍या या सोहळ्‍यात सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे यांनी त्‍यांच्‍या प्रेमळवाणीद्वारे श्रीमती विजया पानवळकरआजींशी त्‍यांच्‍या साधनाप्रवासाविषयी संवाद साधला. त्‍यानंतर सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पानवळकरआजींविषयी लिहिलेला संदेश वाचून आजी व्‍यष्‍टी संतपदी विराजमान झाल्‍याची आनंदवार्ता सर्वांना दिली. याप्रसंगी सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचीही वंदनीय उपस्‍थिती लाभली. सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी पू. पानवळकरआजी यांना पुष्‍पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्‍तू आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट देऊन त्‍यांचा सन्‍मान केला. यानंतर उपस्‍थित असलेले पानवळकर कुटुंबीय आणि साधक यांनी पू. पानवळकरआजींविषयी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.

पू. (श्रीमती) पानवळकरआजींचे मनोगत

पू. (श्रीमती) विजया पानवळकर

श्रीकृष्‍णाने सांगितलेली आध्‍यात्मिक परिपक्‍वतेची १२ सूत्रे कृतीत आणल्‍यामुळेच प्रगती साध्‍य ! –  पू. (श्रीमती) विजया पानवळकर

वर्ष २०१४ मध्‍ये वयाच्‍या ७४ व्‍या वर्षी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक प्रातळी प्राप्‍त झाल्‍यानंतर ‘मृत्‍यूपूर्वी संतपद प्राप्‍त करायचे असल्‍यास मी कोणते प्रयत्न करू ?’, असे मी श्रीकृष्‍णाला सूक्ष्मातून सातत्‍याने विचारत होते. त्‍यावर श्रीकृष्‍णाने आध्‍यात्मिक परिपक्‍वतेविषयी जाणीव करून देणारी १२ सूत्रे मला सुचवली. त्‍यानुसार कृती करायला प्रारंभ केल्‍यामुळे आणि त्‍यासाठी श्रीकृष्‍णाने साहाय्‍य केल्‍यामुळेेच आज ध्‍येय साध्‍य करता आले.

श्रीकृष्‍णाशी सातत्‍याने साधलेल्‍या संवादातून आणि मिळालेल्‍या मार्गदर्शनामुळेच माझ्‍याकडून आजपर्यंत साधना होऊ शकली आहे. यासाठी त्‍याच्‍या चरणी कृतज्ञता !

पू. पानवळकरआजींना ‘प्रगती कशी करावी ?’ हे श्रीकृष्‍णच सुचवत होता ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे

पू. पानवळकरआजींच्‍या साधनाप्रवासावरून ‘त्‍यांचे श्रीकृष्‍णाशी सातत्‍याने अनुसंधान होते’, असे लक्षात येते. श्रीकृष्‍णाने सुचवल्‍याप्रमाणे त्‍यांनी प्रत्‍यक्ष कृती केली आणि त्‍यामुळेच अध्‍यात्‍मात प्रगती करून त्‍यांनी संतपद प्राप्‍त केले. श्रीकृष्‍णच त्‍यांना ‘प्रगती कशी करावी ?’ हे आतून सुचवत होता. अपेक्षा न करणे, आसक्‍ती न्‍यून होणे आणि ईश्‍वरेच्‍छेने वागणे, हे त्‍यांचे गुण सर्वांसाठी अनुकरणीय आहेत.

पू. आजींनी केलेले आज्ञापालन कौतुकास्‍पद ! – सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम म्‍हणाले की, पू. आजी श्रीकृष्‍णाशी सातत्‍याने सूक्ष्मातून बोलतात. ‘मी साधनेत कुठे न्‍यून पडते ?’, असे त्‍याला विचारतात. मीही येथे आल्‍यानंतर मलाही त्‍यांनी तेच विचारले होते. त्‍यांची ही तळमळच पुष्‍कळ महत्त्वाची आहे. त्‍या नेहमी शिकण्‍याच्‍या भूमिकेत रहातात. आध्‍यात्मिक परिपक्‍वतेची १२ सूत्रे त्‍यांनी तात्‍काळ कृतीत आणली, हे त्‍यांचे आज्ञापालन कौतुकास्‍पद आहे. कुटुंबातही त्‍यांचे मुलगा आणि सून यांच्‍याशी संबंध अत्‍यंत खेळीमेळीचे आहेत. त्‍यांचा कधीही नाराजीचा सूर नसतो. त्‍यांनी कुटुंबातील समन्‍वय चांगला साधला आहे.

कुटुंबियांनी व्‍यक्‍त केलेली मनोगते

१. श्री. हेमंत जुवेकर, उज्‍जैन (पू. आजींचे जावई)

आम्‍ही सर्वांनी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करावी, यासाठी पू. पानवळकरआजी सतत प्रेरणा आणि प्रोत्‍साहन देत असत. त्‍यांनी मला जावई म्‍हणून नव्‍हे, तर स्‍वतःच्‍या मुलाप्रमाणे सांभाळले. पू. आजींशी बोलतांना त्‍यांच्‍यातील निरागसभाव अनुभवला. त्‍या सद़्‍गुरु, संत, तसेच साधकांशी संवाद साधून स्‍वत:तील स्‍वभावदोष आणि अहंभाव न्‍यून करण्‍यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.

२. सौ. प्राची जुवेकर (पू. आजींची मुलगी)

पू. आईच्‍या सहवासात माझे मन शांत आणि स्‍थिर होत असे. पू. आईने जीवनात पुष्‍कळ कष्‍ट झेलून आम्‍हाला घडवले. पू. आईमुळे ‘काटकसरीने संसार कसा करू शकतो ?’, हे शिकायला मिळाले. पू.आईची गुरूंवर नितांत श्रद्धा असून तिच्‍यामध्‍ये भोळा भाव आणि चिकाटी हे गुण आहेत. त्‍यामुळेच तिने गुरूंचे मन जिंकले.

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणार्‍या पू. (श्रीमती) विजया पानवळकर !

पू. (श्रीमती) विजया पानवळकर यांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यांच्‍यावर लहानपणापासून देवाधर्माचे संस्‍कार झाले नव्‍हते. त्‍यांना त्‍यांच्‍या वयाच्‍या ५६ व्‍या वर्षी साधना समजली; मात्र साधना समजल्‍यावर त्‍यांनी त्‍वरित साधना आणि सेवा करायला आरंभ केला. त्‍यांनी त्‍यांचा मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिलेच; पण घराचे दायित्‍वही घेतले. काही वर्षांनी शारीरिक स्‍थिती बिघडल्‍यामुळे सेवा करण्‍यावर बंधने आल्‍यावर त्‍या सतत श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात राहिल्‍या. त्‍यांचा मुलगा श्री. विनय पानवळकर आणि सून सौ. नेहा पानवळकर यांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्री. विनय वसंत पानवळकर

श्री. विनय पानवळकर

१ अ. ‘लहानपणापासून देव आणि धर्म यांविषयी काही ठाऊक नसूनही साधना समजल्‍यावर त्‍वरित साधना अन् सेवा चालू करणे

१. ‘तरुण वयात आईला वाटायचे, ‘संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, ब्रह्मचैतन्‍य श्री गोंदवलेकर महाराज इत्‍यादी पूर्वीसारखे संत आता समाजात नाहीत. सध्‍या समाजात असलेले साधू-संत भोंदू आहेत.’ त्‍यामुळे मुंबईत आई रहात असलेल्‍या भागात एका संप्रदायाचे एक संत येऊनही आई त्‍यांच्‍या प्रवचनाला गेली नाही. लग्‍नानंतरही तिने कधी पूजा-अर्चा किंवा व्रतवैकल्‍ये केली नाहीत. तिचा देवावर विश्‍वास होता; परंतु ‘देवासाठी काही करायचे असते’, असा संस्‍कार तिच्‍यावर कधी झाला नव्‍हता. त्‍यामुळे ‘देवाधर्माचे काही करावे’, अशी इच्‍छाच तिला होत नसे; मात्र जेव्‍हा प्रापंचिक जीवनात अनेक गोष्‍टी मनाविरुद्ध कराव्‍या लागायच्‍या, तेव्‍हा ती देवावर रागवायची.

२. मुलांच्‍या लग्‍नानंतर ती गावी देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथे रहायला आली. सप्‍टेंबर १९९६ मध्‍ये देवरुख येथे ‘सनातन भारतीय संस्‍कृती संस्‍थे’ने सत्‍संग चालू केले. ती सत्‍संगाला आली नाही; परंतु माझ्‍याकडून सत्‍संगातील विषय ऐकल्‍यावर तिने नामजप आणि सेवा करायला आरंभ केला. तेव्‍हापासून तिची साधना आणि सेवा चालू झाली.

२. सौ. नेहा विनय पानवळकर

सौ. नेहा पानवळकर

२ अ. स्‍वतः घराचे दायित्‍व घेऊन मुलगा आणि सून यांना सेवेसाठी प्रोत्‍साहन देणे

२ अ १. मुलगा आणि सून यांना उपाहारगृह बंद करून पूर्णवेळ साधना अन् सेवा करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणे : ‘सासूबाईंनीच आम्‍हाला (मला आणि यजमान श्री. विनय यांना) उपाहारगृह बंद करून पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले. तेव्‍हा आमचा मुलगा श्री. पुरस्‍कार हा केवळ ६ वर्षांचा होता. त्‍याचे शिक्षण आणि पालनपोषण यांचा प्रश्‍न असूनही सासूबाईंंनी आम्‍हाला पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले. ‘मी माझ्‍या निवृत्तीवेतनातून आपले घर चालवीन. तुम्‍ही काळजी करू नका’, असे आश्‍वासनही त्‍यांनी आम्‍हाला  दिले. त्‍यामुळे आम्‍ही आमचे उपाहारगृह बंद करून पूर्णवेळ साधना आणि सेवा करण्‍यास आरंभ केला.

२ अ २. मुलगा आणि सून यांना अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेसाठी अन्‍य जिल्‍ह्यांमध्‍ये जाण्‍याची अनुमती देणे अन् नातवाला सांभाळून सेवाही चालू ठेवणे : यजमान श्री. विनय अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेसाठी विदर्भात गेले. तेव्‍हा सासूबाईंनी मलाही पूर्णवेळ अध्‍यात्‍मप्रसारासाठी इतर जिल्‍ह्यांत जाण्‍याची अनुमती दिली. रत्नागिरी जिल्‍ह्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्‍याआधी ८ मास त्‍यांनी नातवाला सांभाळण्‍याची सिद्धता दर्शवून मला रत्नागिरी येथे निवास करून दैनिक कार्यालयात सेवा करण्‍यासाठी पाठवले. तेव्‍हा त्‍यांनी नातवाला सांभाळून त्‍यांची सेवाही चालू ठेवली होती.’

२ आ. स्‍वतःमधील स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी केलेले प्रयत्न

२ आ १. स्‍वतःमधील स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी सतर्क रहाणे : ‘सध्‍या सासूबाई स्‍वतःमधील स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी अधिक सतर्क झाल्‍या आहेत. ‘आपल्‍यामध्‍ये अजूनही खाण्‍या-पिण्‍याची आवड-नावड असून काही जणांविषयी आपल्‍या मनात अपेक्षेचे विचार येतात’, हेे त्‍यांच्‍या लक्षात आले. ‘या स्‍वभावदोषांमुळे आपल्‍या मनाला त्रास होतो आणि त्‍यामुळे आपली प्रगती होत नाही’, याची त्‍यांना खंत वाटली. या संदर्भात त्‍या मुलाशी (श्री. विनय यांच्‍याशी) बोलतात.

२ आ २. परेच्‍छा आणि ईश्‍वरेच्‍छा साधण्‍यासाठी प्रयत्न करणे : गुरुदेवांनी सांगितले आहे, ‘परेच्‍छा आणि ईश्‍वरेच्‍छा साधली, तर दोन पावलांत मोक्ष आहे’; पण ‘त्‍यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याचे उत्तर मिळाल्‍यावर त्‍यांनी त्‍यानुसार कृती करण्‍यास आरंभ केला. आता त्‍यांनी त्‍यांच्‍या आवडी-निवडीचा त्‍याग करायला आरंभ केला आहे, तसेच कुणाकडून कसलीही अपेक्षा करणे सोडून दिले आहे. अलीकडे त्‍या प्रत्‍येक प्रसंगाचा ‘ईश्‍वरेच्‍छा’ या भावाने स्‍वीकार करण्‍याचा प्रयत्न करू लागल्‍या आहेत.’ (२९.८.२०२३)

कुटुंबियांनी व्‍यक्‍त केलेली मनोगते

१. सौ. क्षिप्रा जुवेकर (पू. आजींची नातसून) – मला वर्षातून क्‍वचित् एकदा देवरुखला जाण्‍याची संधी मिळते. आतापर्यंत मी जेव्‍हा जेव्‍हा देवरुखला गेले, तेव्‍हा पू. आजींनी कधी माझ्‍याशी फार वेळ गप्‍पा मारल्‍या, असे झाले नाही; परंतु त्‍यांच्‍या शेजारी केवळ बसल्‍यावर मला पुष्‍कळ शांत वाटायचे आणि पू. आजींच्‍या चेहर्‍यावर मला तेज जाणवायचे.

२. श्री. पुरस्‍कार विनय पानवळकर (पू. आजींचा नातू) – बाबा आणि आई अध्‍यात्‍मप्रसारासाठी बाहेर जायचे. इयत्ता दुसरीपासून आजीनेच माझा प्रेमाने सांभाळ केला. ती मला रामायण-महाभारतातील कथा सांगायची. मी एकच कथा तिला अनेक वेळा सांगायला सांगायचो. त्‍या वेळी ती न कंटाळता एकच गोष्‍ट परत तेवढ्याच गांभीर्याने सांगायची. योग्‍य कृती कशी करायची? आणि का करायची ? यांचे महत्त्वही आजी मला समजावत असे. मागील ३-४ मासांपासून ती संसारातून पूर्णपणे अलिप्‍त झाल्‍यासारखी वाटत आहे. आज ती ‘पू. आजी’ झाल्‍याचे ऐकून मला पुष्‍कळ आनंद झाला.

३. सौ. ऋतुजा पानवळकर (पू. आजींची नातसून) – पू. आजींचा श्रीकृष्‍णासमवेत जो संवाद व्‍हायचा, त्‍याविषयी त्‍या आम्‍हाला सांगायच्‍या. त्‍यांच्‍या मनात साधनेत प्रगती व्‍हावी आणि कधीतरी संतपदापर्यंत पोचावे, ही भावना प्रबळ असायची. कितीही आजारपण आले, तरीही त्‍या साधनेचे प्रयत्न आणि प्रतिदिनचे नामस्‍मरण यांमध्‍ये खंड पडू देत नसत. सतत ‘मी कुठे न्‍यून पडते का?’, असा त्‍यांचा विचार असे. ‘मनापासून आणि चिकाटीने प्रयत्न केल्‍यास आपण साधनेत नक्‍कीच प्रगती करू शकतो’, हेच पू. आजींकडून आम्‍हाला शिकायला मिळाले.

३. श्री. विनय वसंत पानवळकर आणि सौ. नेहा विनय पानवळकर

३ अ. आध्‍यात्मिक पातळी वाढण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करून ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठणे

‘आपत्‍काळात टिकून रहाण्‍यासाठी आध्‍यात्मिक पातळी चांगली असायला हवी’, असे तिच्‍या लक्षात आल्‍यावर तिने ‘स्‍वतःची आध्‍यात्मिक पातळी वाढावी’, यासाठी गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना करून प्रयत्न चालू केले. वर्ष २०१४ मध्‍ये तिच्‍या वयाच्‍या ७४ व्‍या वर्षी गुरुदेवांच्‍या कृपेने तिची आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के झाली.

३ आ. मृत्‍यूपूर्वी संतपद गाठण्‍याचे ध्‍येय ठेवणे आणि शारीरिक स्‍थिती बिघडल्‍याने सेवा करण्‍यावर बंधने आल्‍यावर सतत श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात राहून साधना चालू ठेवणे

त्‍यानंतर तिने मृत्‍यूपूर्वी संतपद गाठण्‍याचे ध्‍येय मनाशी ठरवले. त्‍यासाठी तिने साधनेची तळमळ वाढवली; मात्र आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाल्‍यानंतर तिची शारीरिक स्‍थिती पुष्‍कळच बिघडत गेली. तीव्र गुडघेदुखी आणि इतर शारीरिक दुखणी यांमुळे ती घराबाहेर पडून सेवा करू शकत नव्‍हती. तेव्‍हा तिने श्रीकृष्‍णाशी सूक्ष्मातून संवाद वाढवला. ती श्रीकृष्‍णाशी नियमित बोलू लागली आणि त्‍याचे मार्गदर्शन घेऊ लागली. ‘श्रीकृष्‍ण तिच्‍याशी बोलत आहे’, अशी अनुभूतीही तिला येऊ लागली. ‘नियमितपणे नामस्‍मरण, चिंतन आणि श्रीकृष्‍णाचे मार्गदर्शन यांनुसार कृती करणे’, हीच तिची साधना झाली.

३ इ. श्रीमती विजया पानवळकर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

३ इ १. स्‍वावलंबी आणि ‘आपल्‍यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे : गुडघेदुखीचा त्रास आणि शारीरिक दुर्बलता यांमुळे तिला घरात ‘वॉकर’ घेऊनच चालावे लागते, तरीही ती स्‍वतःची छोटी-मोठी सर्व कामे स्‍वतःच करते. ‘आपल्‍यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा तिचा विचार असतो. या स्‍थितीतही तिने घरातील काही कामांचे दायित्‍व घेतले असून ती अजूनही ते निरंतर पार पाडत आहे, उदा. घासलेली भांडी जागेवर लावून ठेवणे इत्‍यादी.

३ इ २. स्‍वयंशिस्‍त : आईमध्‍ये चिकाटी, सातत्‍य आणि नियोजनबद्धता हे गुण आहेत. ‘झोपणे-उठणे, अल्‍पाहार, जेवण आणि औषधे घेणे’, हे सर्व ती तिच्‍या ठरलेल्‍या वेळीच करते. तिचे ‘नामजप आणि मानसपूजा केव्‍हा करायची ?’, याचेही नियोजन ठरलेले असते. तिने सातत्‍याने अन् चिकाटीने ते अनेक वर्षे पाळले आहे.

३ इ ३. नामजप सत्‍संगात सहभागी होण्‍यासाठी सकाळी लवकर उठणे : मागील काही वर्षे तिला रात्री अल्‍प वेळ झोप लागते आणि पहाटे शांत झोप लागते. त्‍यामुळे ती पहाटे झोपून विश्रांती घेते; मात्र मे २०२३ पासून सकाळी ६ ते ७ या वेळेत नामजप सत्‍संगाला आरंभ झाला. तेव्‍हा तिने तिच्‍या उठण्‍याच्‍या पद्धतीत पालट केला आणि ती लवकर उठून नियमितपणे सत्‍संगात सहभागी होऊ लागली.

३ इ ४. नातेवाइकांशी साधनेविषयी बोलणे : ती घरी आलेल्‍या नातेवाइकांशी प्रापंचिक विषयांवर फारशी बोलत नाही; मात्र ‘साधना किंवा अध्‍यात्‍म’, हा विषय निघाला, तर बराच वेळ बोलते.

३ इ ५. सतत श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात असणे : आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्‍येक कृती करतांना श्रीकृष्‍णाशी बोलते. ‘तो आपल्‍या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्‍येक कृती करते. ती प्रत्‍येक कृती त्‍याला विचारून आणि सांगून करते. हे करण्‍यातील तिची चिकाटी आणि सातत्‍य आम्‍हालाही अचंबित करते.

३ इ ६. ‘स्‍वतःची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, अशी तळमळ असणे : वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेला तिची आध्‍यात्‍मिक पातळी ६९ टक्‍के झाली; परंतु या वर्षी (वर्ष २०२३ मध्‍ये) तिची आध्‍यात्मिक पातळी वाढली नाही. तेव्‍हा तिच्‍या मनाला ‘मी पुढील प्रगतीसाठी कुठे न्‍यून पडले ?’, अशी पुष्‍कळ तळमळ लागली. तिने अत्‍यंत तळमळीने गुरुदेवांना प्रार्थना करून सांगितले, ‘मला पुढील मार्गदर्शन मिळण्‍यासाठी कुणाला तरी पाठवा, म्‍हणजे ‘मी आणखी काय प्रयत्न करायला हवेत ?’, हे मला कळेल.’ त्‍यानंतर अकस्‍मात् आम्‍हाला ‘सद़्‍गुरु स्‍वाती खाडये भेटायला येणार आहेत’, असा निरोप मिळाला. सद़्‍गुरु स्‍वातीताईंची भेट झाल्‍यामुळे आईला पुष्‍कळ आनंद झाला. तिला वाटले, ‘माझी प्रार्थना गुरुदेवांच्‍या चरणांपर्यंत पोचली.’ तिने सद़्‍गुरु स्‍वातीताईंशी बोलून ‘आणखी कुठलेे आणि कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे जाणून घेतले.’

४. कृतज्ञता

‘आईविषयी लिहीत असतांना आम्‍हा दोघांनाही आनंद आणि चैतन्‍य जाणवत होते. अशी आदर्श आईं आम्‍हाला दिल्‍याबद्दल आणि आमच्‍याकडून तिच्‍याविषयी लिहून घेतल्‍याबद्दल श्री गुरुमाऊलींच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विनय वसंत पानवळकर आणि सौ. नेहा विनय पानवळकर, देवरुख, जिल्‍हा रत्नागिरी. (२९.८.२०२३)

(‘वरील सूत्रे श्रीमती विजया पानवळकर या संत म्‍हणून घोषित होण्‍यापूर्वीची असल्‍याने त्‍यांच्‍या नावाआधी ‘पूज्‍य’ लावलेले नाही.’ – संकलक)

Leave a Comment