परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

अनुक्रमणिका

पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.

 

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठेपू. (सौ.) शालिनी मराठे यांचा आरंभीचा जीवनप्रवास सर्वसामान्‍यांप्रमाणे किंबहुना थोडा खडतरच होता, असे म्‍हटले तरी चालेल; पण त्‍यांच्‍या जीवनात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आल्‍यापासून त्‍यांचे जीवन अधिकाधिक आनंदी अन् समाधानी होत गेले. त्‍यांचा मूळ स्‍वभाव सात्त्विक, शांत आणि देवावर श्रद्धा असणारा असल्‍यामुळे गुरुप्राप्‍ती होताच त्‍यांचे जीवन अधिकच समृद्ध होत गेले. त्‍यांनी संसार करतांनाच साधनाही मनापासून आणि झोकून देऊन केली. त्‍यामुळे गुरुकृपेने काही वर्षांतच त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली आणि त्‍या जीवनमुक्‍त झाल्‍या. त्‍यांना श्री गुरूंविषयी लिहितांना ‘किती लिहू ? त्‍यांचे गुण कसे गाऊ ? कुठल्‍या शब्‍दांत कृतज्ञता व्‍यक्‍त करू ?’, असे होऊन जायचे. त्‍यांच्‍यातील या भावामुळे त्‍यांनी लिहिलेले लेख किंवा कविताही भावाने ओथंबलेल्‍या असायच्‍या. त्‍यामुळे ते लेख किंवा कविता वाचणार्‍यांचाही भाव जागृत व्‍हायचा.

‘गुरु प्रारब्‍ध नष्‍ट करत नाहीत, तर ते भोगण्‍याचे बळ देतात’ आणि ‘परिस्‍थिती स्‍वीकारणे ही सर्वोत्तम साधना आहे’, या गुरुवचनांवरील श्रद्धेनेच त्‍या कर्करोगासारख्‍या गंभीर दुखण्‍याला सामोर्‍या गेल्‍या. त्‍यांनी आलेली परिस्‍थिती स्‍वीकारली आणि त्‍या सतत गुरुस्‍मरणात राहिल्‍या. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर अवघ्‍या २९ दिवसांत त्‍या संतपदी विराजमान झाल्‍या. यांतून त्‍यांनी सर्व साधकांसमोर एक मोठा आदर्शच निर्माण केला आहे.

श्री. प्रकाश मराठे

१. जन्‍म

‘३.११.१९४७ या दिवशी आरोस (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे माझा जन्‍म झाला. लहानपणापासून माझी प्रकृती चांगली होती. कधीतरी ज्‍वर येत असे; पण त्‍याचा फारसा त्रास झाला नाही.

 

२. देवाची आवड असणे

माझ्‍या कुटुंबातील वातावरण धार्मिक होते. आमच्‍या कुटुंबात सर्व सण, उत्‍सव आणि कुलाचार धार्मिक पद्धतीने साजरे केले जात असत. त्‍यामुळे मला लहानपणापासूनच देवाची आवड होती.

 

३. कौटुंबिक स्‍थिती

आमचे एकत्र कुटुंब आणि शेतीचा व्‍यवसाय असल्‍याने आर्थिक स्‍थिती बेताचीच होती.

 

४. शिक्षण

माझे प्राथमिक शिक्षण आरोस (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथे झाले. पुढचे शिक्षण मी वेंगुर्ले येथे आजोळी राहून घेतले. त्‍यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मी माझ्‍या आईची (सौ. रुक्‍मिणी सिद्धये हिची) मैत्रीण सौ. गोरे यांच्‍या घरी राहून घेतले. श्री. गोरे यांची खानावळ होती. त्‍यांना जमेल, तेवढे साहाय्‍य करत मी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचे (बी.ए.) शिक्षण पूर्ण केले. पुण्‍याला मी टिळक महाविद्यालयातून ‘बी.एड्.’ केले. नंतर आम्‍ही गोवा येथे रहायला आल्‍यावर मी मुंबई विश्‍वविद्यालयातून ‘मराठी’ हा विषय घेऊन ‘एम.ए.’चे शिक्षण पूर्ण केले.

माझे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के), सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे (सनातनच्‍या २१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत) आणि सासरे कै. रामचंद्र बाळकृष्‍ण मराठे यांनी मला वेळोवेळी साहाय्‍य केले अन् प्रोत्‍साहन दिले. त्‍यामुळे मी विवाहानंतरही ‘बी.एड्.’ केले आणि नोकरी करत ‘एम्.ए.’पर्यंतचे शिक्षण घेऊ शकले. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍याप्रती पुष्‍कळ कृतज्ञ आहे.

 

५. परिस्‍थितीशी जुळवून घेऊन रहाणे

लहानपणापासून शिक्षणासाठी मी घरापासून लांब आजोळी राहिले होते. त्‍यानंतर श्री. गोरे यांच्‍याकडे राहिल्‍यामुळे मला कुठल्‍याही गोष्‍टीची आवड-नावड नव्‍हती. ‘समोर आलेल्‍या परिस्‍थितीशी जुळवून घ्‍यायला पाहिजे’, याची जाणीव ठेवून मी त्‍याप्रमाणे वागण्‍याचा प्रयत्न केला.

 

६. नोकरी

भावंडांमध्‍ये मी मोठी होते. मला दोन लहान भाऊ होते. माझे ‘बी.ए.’चे शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर ‘घरास आर्थिक साहाय्‍य व्‍हावे’, या दृष्‍टीने मी वयाच्‍या २२ ते २४ वर्षांपर्यंत ४ उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांत (हायस्‍कूलमध्‍ये) शिक्षिका म्‍हणून नोकरी केली. आमच्‍या घरी शिकलेले कुणी नसल्‍यामुळे नोकरी मिळवण्‍यासाठी मलाच सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागत असत. प्रत्‍येक वेळी मला विद्यालयात १ वर्षापुरतीच नोकरी मिळत असे. त्‍यामुळे मला पुन्‍हा दुसरे विद्यालय शोधावे लागत असे. असे असूनही देवाच्‍या कृपेने मला प्रतिवर्षी वेगळ्‍या विद्यालयात नोकर्‍या मिळाल्‍या. नोकरी करत असतांना मी कधी चुकारपणा न करता तत्त्वनिष्‍ठेने नोकरी केली. नोकरीचे स्‍थळ घरापासून लांब असल्‍याने नोकरीच्‍या ठिकाणी मला खोली घेऊन रहावे लागे. तेव्‍हा गावातील लोक लग्‍न न झालेल्‍या मुलीला खोली द्यायला सिद्ध होत नसत. त्‍यामुळे मी माझ्‍या दोन लहान भावांनाही माझ्‍या समवेत ठेवून घेऊन त्‍यांना शिक्षणासाठी साहाय्‍य करत असे.

नोकरी करत असतांना देवाने मला वेळोवेळी साहाय्‍य केल्‍यामुळेच मी ३१ वर्षे नोकरी करू शकले. वर्ष २००१ मध्‍ये मी स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली.

 

७. वैवाहिक जीवन

२४.१२.१९७२ या दिवशी माझा विवाह श्री. प्रकाश रामचंद्र मराठे यांच्‍याशी झाला. विवाहानंतर मी त्‍यांच्‍या समवेत पुण्‍याला त्‍यांच्‍या काकांकडे रहायला गेले. वर्ष १९७३ मध्‍ये आम्‍ही गोव्‍याला आलो आणि पाळे, शिरदोन येथे स्‍थायिक झालो.

 

८. रहाणीमान

माझे रहाणीमान साधेच आहे. आम्‍हाला घरातच सर्वकाही मिळत असल्‍याने आमचे उपाहारगृहात खाणे-पिणे फार अल्‍प प्रमाणात असे. यजमान श्री. प्रकाश मराठे यांचे वडील गावात पौरोहित्‍य करत असत. गावातील मंदिरांत ते पूजा करायला जायचे. त्‍यामुळे घरात सोवळे-ओवळे कडक असायचे. समाजात मला ‘ही पुरोहितांची सून आणि शिक्षिका’ म्‍हणून पुष्‍कळ प्रेम मिळायचे.

 

९. साधनेत नसतांनाही देवाने मोठ्या संकटातून केलेले रक्षण !

एकदा थिवी (गोवा) येथे आमच्‍या मिनीबसला अपघात झाला. त्‍यात बर्‍याच लोकांना दुखापत झाली. माझ्‍या डोक्‍यात काच घुसली होती आणि मी बसमधून बाहेर फेकले गेले होते. माझी शुद्ध हरपली होती. माझ्‍या अंगावर सगळे दागिने होते. काही वेळाने मी शुद्धीवर आल्‍यावर कुणीतरी येऊन माझी चौकशी केली आणि दुचाकीवरून मला जवळच्‍या आधुनिक वैद्य घुमटकर यांच्‍या रुग्‍णालयामध्‍ये नेले. आधी ते मला भरती करून घ्‍यायला सिद्ध नव्‍हते; पण मी पुन्‍हा काही वेळ बेशुद्ध झाले. तेव्‍हा माझी स्‍थिती बघून त्‍यांनी मला भरती करून घेतले. मी शुद्धीवर आल्‍यावर त्‍यांना घरचा (माझ्‍या भावाचा पत्ता) आणि दूरभाष क्रमांक दिला. तेव्‍हा त्‍यांनी दूरभाष करून भावाला बोलावून घेतले. त्‍यानंतर माझ्‍या भावाने मला पणजी येथील शासकीय (सरकारी) रुग्‍णालयात भरती केले. पडताळणीनंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘डोक्‍यावरील काचेचा घाव फार खोल नाही. त्‍यामुळे काळजीचे कारण नाही; पण घाव थोडा जरी अधिक खोल गेला असता, तर त्‍याच वेळी यांचा प्राण गेला असता.’’ अशा प्रकारे देवाने ‘कुणाच्‍यातरी माध्‍यमातून माझे रक्षण केले’, असे मला वाटले. ‘माझा अपघात झाला, त्‍या वेळी मी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करत होते’, एवढेच मला नंतर आठवले.

 

१०. सनातन संस्‍थेशी झालेला संपर्क !

१० अ. प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्‍कळ आवडल्‍यामुळे आम्‍ही कुटुंबियांनी त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करायला आरंभ करणे

एकदा प.पू. डॉक्‍टरांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) पणजी येथे ‘स्‍वामी विवेकानंद सभागृहात’ मार्गदर्शन होते. माझा छोटा भाऊ (श्री. अशोक सिद्धये) आणि आतेभाऊ श्री. उदय बर्वे त्‍या मार्गदर्शनासाठी गेले होते. माझ्‍या दोन्‍ही भावांना ते मार्गदर्शन पुष्‍कळ आवडले. त्‍यांनी माझ्‍या यजमानांना (श्री. प्रकाश मराठे यांना) प.पू. डॉक्‍टरांच्‍या पुढच्‍या मार्गदर्शनाला जायला सांगितले. यजमानांनाही देवाची आवड होती. त्‍यामुळे १०.१.१९९३ या दिवशी यजमान प.पू. डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाला गेले होते. त्‍यांनी घरी येऊन आम्‍हाला सांगितले, ‘‘प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मला पुष्‍कळ आवडले.’’ त्‍यानंतर आम्‍ही (मी, यजमान आणि सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे) प.पू. डॉक्‍टरांच्‍या प्रत्‍येक मासाला होणार्‍या अभ्‍यासवर्गाला जाऊ लागलो.

१० आ. प.पू. डॉ. आठवले यांच्‍याशी प्रत्‍यक्ष भेट आणि त्‍यांनी नामजप करण्‍याविषयी केलेले मार्गदर्शन !

एकदा आम्‍ही तिघेही फोंडा (गोवा) येथील ‘शहनाई सभागृहा’त प.पू. डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाला गेलो होतो. तेव्‍हा मला आणि सासूबाईंना परम पूज्‍य भेटले. आम्‍हाला आमचा कुलदेव आणि कुलदेवी ठाऊक नव्‍हती; म्‍हणून ते आम्‍हा दोघांना (मला आणि यजमानांना) म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही दोघे ‘श्रीलक्ष्मी-नारायणाय नमः ।’, असा नामजप करा’’ आणि सासूबाईंना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू ठेवा.’’ तेव्‍हापासून सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार आमच्‍या साधनेला आरंभ झाला. आम्‍ही कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला आरंभ केला.’

– सौ. शालिनी मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)

 

११. प.पू. डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी साधिकेच्‍या पाळे, शिरदोन येथील घरी दिलेली भेट !

‘पूर्वी पणजी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्‍ये सनातनचा सत्‍संग चालू होता. पणजी आणि जवळपासचे साधक तिथे यायचे. आम्‍हीही तिकडेच सत्‍संगाला जात होतो. एका शनिवारी फोंडा येथे अभ्‍यासवर्ग झाल्‍यानंतर दुसर्‍या दिवशी प.पू. डॉक्‍टर, डॉ. (सौ.) कुंदा आठवले, डॉ. पांडुरंग मराठे, सौ. मंगला मराठे, आधुनिक वैद्या रूपाली भाटकर आणि श्री. अभय वर्तक हे सर्व जण पाळे, शिरदोन येथील आमच्‍या घरी आले होते. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘या परिसरात सनातनचे पुष्‍कळ सत्‍संग होतील.’’ प.पू. डॉक्‍टरांचा संकल्‍प आणि कृपा यांमुळे पाळे, शिरदोन, नावशी, बांबोळी, वडवड, पिलाट, सुळाभाट, कुडकाय, नेवरा, डोंगरी, आजोशी इत्‍यादी ठिकाणी सनातनचे सत्‍संग चालू झाले.

 

१२. इंदूर येथील आश्रमात प.पू. भक्‍तराज महाराज यांची पाद्यपूजा करण्‍याची अनमोल संधी मिळणे आणि त्‍यांच्‍या कृपेने तेथील धार्मिक स्‍थळांचे दर्शन होणे

मे १९९३ मध्‍ये आमच्‍या मनात ‘सुट्टी घेऊन काशीयात्रा करावी’, असे होते; पण प.पू. डॉक्‍टरांनी आम्‍हाला सांगितल्‍याप्रमाणे आम्‍ही इंदूर येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या ‘भक्‍तवात्‍सल्‍याश्रम’ येथे ७ – ८ दिवस राहिलो. तेव्‍हा आमची प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याशी भेट होऊन आम्‍हाला त्‍यांची पाद्यपूजाही करता आली. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी त्‍यांच्‍या चारचाकी गाडीतून आम्‍हाला नर्मदेश्‍वराचे आणि नर्मदेश्‍वराजवळ असलेल्‍या ‘श्‍यामसाई’ अन् ‘अनंतानंद साईश’ यांच्‍या आश्रमांचेही दर्शन घडवले. महाराजांच्‍या सेवकाने आम्‍हाला उज्‍जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर आणि अन्‍य धार्मिक स्‍थळे दाखवली. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या आश्रमात आम्‍हाला प.पू. धांडे महाराज यांचे दर्शन झाले. प.पू. रामानंद महाराज यांनी आम्‍हाला सर्वतोपरी साहाय्‍य केले. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी आम्‍हाला पुढे रामनाथ देवस्‍थान (गोवा) येथे होणार्‍या गुरुपौर्णिमेविषयी विचारले.

 

१३. इंदूर येथे झालेल्‍या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सवात आम्‍हा कुटुंबियांना सहभागी होता येणे

२.२.१९९५ या दिवशी आम्‍ही तिघे (मी, यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) आणि सासूबाई पू. (कै.) सीताबाई मराठे (सनातनच्‍या २१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत) यांनी) प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सवासाठी इंदूर येथे गेलो. तेव्‍हा आम्‍ही गोव्‍यातील काही साधकांच्‍या समवेत प्रथमच बसने मुंबई ते इंदूर असा जाता-येता प्रवास केला. प.पू. भक्‍तराज महाराज यांचा अमृत महोत्‍सव मोठ्या थाटामाटात आणि भावपूर्ण वातावरणात झाला. त्‍या अमृत महोत्‍सवाचे पूर्ण नियोजन प.पू. डॉक्‍टरांनी केले होते. तेव्‍हा तो संपूर्ण परिसर ‘भूवैकुंठच’ आहे’, असे आम्‍हा सर्व साधकांना वाटत होते. मला प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या फेरीमध्‍ये सहभागी होता आले. अमृत महोत्‍सवाचा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्‍यति ।’, असा झाला.

 

१४. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या होणार्‍या गुरुपौर्णिमा आणि सनातन संस्‍थेच्‍या वतीने होणारे विविध सत्‍संग यांना उपस्‍थित रहाता येणे

१४ अ. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या होणार्‍या गुरुपौर्णिमांमध्‍ये सहभागी होता येणे

वर्ष १९९३ मध्‍ये रामनाथ देवस्‍थान (गोवा) येथील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गुरुपौर्णिमेत आम्‍हाला सहभागी होता आले. तिथे आम्‍हाला प.पू. भक्‍तराज महाराज आणि नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज यांचे दर्शन झाले. ही गुरुपौर्णिमा ‘न भूतो न भविष्‍यति ।’, अशी झाली. मी वर्ष १९९३ मध्‍ये गोवा येथील रामनाथ देवस्‍थान, वर्ष १९९५ मध्‍ये कुडाळ आणि वर्ष १९९६ मध्‍येे सांगली येथे झालेल्‍या गुरुपौर्णिमेसाठी गेले होते. वर्ष १९९६ नंतर गोव्‍यात पणजी, म्‍हापसा, रामनाथ देवस्‍थान या ठिकाणी आणि नंतर सनातन संस्‍थेच्‍या वतीने होणार्‍या गुरुपौर्णिमांमध्‍ये मला सहभागी होता आले.

१४ आ. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भंडार्‍यांना जाणे

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या विविध ठिकाणी होणार्‍या भंडार्‍यांनाही आम्‍ही जात होतो. एका वर्षी मी कांदळीला भंडार्‍याला गेले होते.

१४ इ. प.पू. डॉ. आठवले यांच्‍या गोव्‍यात होणार्‍या अभ्‍यासवर्गांना जाणे

आम्‍ही प.पू. डॉ. आठवले यांच्‍या होणार्‍या मासिक अभ्‍यासवर्गांना वेगवेगळ्‍या ठिकाणी; म्‍हणजे पणजी, फोंडा, मडगाव इत्‍यादी ठिकाणी जात होतो.

१४ ई. पंचमुखी हनुमत्‍कवच यज्ञ

फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे प.पू. दास महाराज यांच्‍या मार्गदर्शनाखाली ११ ‘पंचमुखी हनुमत्‍कवच यज्ञ’ झाले. त्‍या सर्व यज्ञांसाठी आम्‍ही दोघेही उपस्‍थित राहिलो होतो.

 

१५. प.पू. डॉ. आठवले यांच्‍या कृपेने करता आलेल्‍या सेवा

देवानेच माझ्‍याकडून विविध सेवा करून घेतल्‍या. माझा कुठलीही सेवा मनापासून आणि जीव ओतून करण्‍याचा प्रयत्न असतो.

अ. वेगवेगळ्‍या गावांत सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगाचा प्रचार करून प्रवचने आणि सत्‍संग घेतले.

आ. सनातन संस्‍थेच्‍या प्रभातफेर्‍या आणि सायंफेर्‍या यांमध्‍ये सहभाग घेतला.

इ. पाळे येथे सनातनचे ग्रंथ आणि उत्‍पादने यांचा साठा आणून प्रदर्शन आणि वितरण कक्ष, तसेच गणपतीपुळे येथील गणपति मंदिरात १ मास सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथांचा प्रदर्शन आणि वितरण कक्ष लावला होता. तिथेही मला सेवेची संधी मिळाली. तेव्‍हा मी कोतवडे (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सनातनचे साधक श्री. गिरिधर वझे यांच्‍याकडे निवासाला राहून ती सेवा केली.

ई. साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्‍यानंतर पाळे येथे घरी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या घड्या घालणे आणि अन्‍य साधकांनाही ती सेवा द्यायचे.

उ. मराठी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करायचे, अन्‍य साधकांच्‍या साहाय्‍याने त्‍याचे वितरण करायचे, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्‍यापूर्वी आणि नंतर दैनिकाचे वर्गणीदार करायचे, दैनिकाचे वितरण करायचे आणि त्‍याचा हिशोब (जमा-खर्च) ठेवायचे.

ऊ. प.पू. डॉक्‍टरांनी फोंडा (गोवा) येथे ‘सर्वधर्म सभा’ आयोजित केली होती. मला या सभेसाठी ‘सभांचे निमंत्रण फलक, पत्रके लावणे’ इत्‍यादी सेवेत सहभागी होेता आले.

ए. गुरुपौर्णिमेच्‍या वेळी अन्‍य साधकांच्‍या समवेत अर्पण गोळा करायला जाणे आणि पावती पुस्‍तकांचा हिशोब ठेवायचे.

ऐ. ‘दोनापावला’ येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय चालू झाले. तेव्‍हा तिथे झोपायला जागा नसल्‍यास साधक आमच्‍या घरी झोपायला यायचे. मी त्‍यांची निवासव्‍यवस्‍था करायचे.

ओ. आमच्‍या घरापासून बांबोळी येथील सरकारी रुग्‍णालय जवळ असल्‍याने तिकडे येणार्‍या साधकांना जेवण द्यावे लागे. तेही मला शक्‍य होईल, तसे देण्‍याचा मी प्रयत्न करायचे.

औ. आमच्‍या पाळे गावात साधक अधिक होते. कुठे सेवेनिमित्त प्रवासाला जायचे असेल, तर आमच्‍या येथून साधक पणजी, रायबंदर, वास्‍को, मडगाव इत्‍यादी ठिकाणी जायचे. तेव्‍हा त्‍यांना आवश्‍यक ते साहाय्‍य करायचे.

वरील सर्व सेवा प.पू. डॉक्‍टरांची कृपा आणि अन्‍य साधकांचे साहाय्‍य यांमुळे मला करता आल्‍या.’

 

१६. प.पू. डॉ. आठवले यांच्‍या कृपेने अनेक आश्रमांत आणि अनेक धर्मस्‍थानांच्‍या ठिकाणी जाऊन देवदर्शन करता येणे

‘वर्ष १९७४ (साधनेत येण्‍याच्‍या आधीपासून) ते वर्ष २०२२ पर्यंत मला पुणे येथील सेवाकेंद्र, पनवेल येथील देवद आश्रम, प.पू. भक्‍तराज महाराज यांचा इंदूर आणि कांदळी येथील आश्रम इत्‍यादी ठिकाणी जाता आले. मला ‘मथुरा, गोकुळ, जोगेश्‍वरी, अष्‍टविनायक, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, गाणगापूर, अक्‍कलकोट, गुहागर, गोकर्ण, उडुपी, श्री शैल्‍यम, तिरुपती, धर्मस्‍थळ, हळेबीड, मदुराई, योगी अरविंद आश्रम, शिवकांची, विष्‍णुकांची, केरळ येथील पद्मनाभ मंदिर, रामेश्‍वर, विवेकानंद स्‍मारक इत्‍यादी ठिकाणी जाऊन देवदर्शन घेता आले’, हे मी माझे भाग्‍य समजते. त्‍याचप्रमाणे मला देहली, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, बंगळुरू, चेन्‍नई इत्‍यादी ठिकाणीही जाता आले.

 

१७. यजमानांनी अधिकोशातून स्‍वेच्‍छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी सनातनच्‍या आश्रमात जाणे

‘२०.२.२००० या दिवशी यजमानांनी (श्री. प्रकाश मराठे , (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांनी) अधिकोषाच्‍या नोकरीतून स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली आणि ते सनातनच्‍या आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी गेले. ते गोवा येथील दोनापावला, मडगाव, नेसाई, सुखसागर अन् रामनाथी आश्रम इत्‍यादी ठिकाणी सेवा करत असत. यजमान आठवड्यातून एकदा घरी यायचे आणि लगेच दुसर्‍या दिवशी सेवेसाठी परत आश्रमात जायचे. त्‍या वेळी घरी मी आणि सासूबाई दोघीच रहात होतो. घरी येणारे साधक आणि पाहुणे यांचे स्‍वयंपाकपाणी अन् सासूबाईंचे सर्व करत नोकरी करतांना प.पू. गुरुदेवांनी माझ्‍याकडून जमेल तशी सेवाही करून घेतली.

 

१८. स्‍वेच्‍छानिवृत्ती आणि सासूबाईंचे देहावसान

वर्ष २००१ मध्‍ये साधारण वयाच्‍या ५२ व्‍या वर्षी मी ‘पॉप्‍युलर हायस्‍कूल’ येथील शिक्षिकेच्‍या नोकरीचे त्‍यागपत्र देऊन स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर फेब्रुवारी २००२ मध्‍ये पलंगावरून पडल्‍यामुळे सासूबाईंच्‍या (पू. (कै.) सीताबाई मराठे यांच्‍या) खुब्‍याचे हाड मोडले. त्‍यामुळे त्‍यांचे शस्‍त्रकर्म झाले. २६.१.२००८ या दिवशी त्‍यांनी वयाच्‍या ८९ वर्षी देह ठेवला. तोपर्यंत ६ वर्षे मला त्‍यांचे सर्व जागेवरच करावे लागत होते. आरंभी मला त्‍यांची सेवा मनापासून करता येत नव्‍हती; पण पुढे प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने आमच्‍या दोघींची मने जुळली. त्‍यामुळे त्‍यांची सेवा चांगली होऊन जातांना त्‍यांनी आम्‍हाला आशीर्वाद दिले.

 

१९. सनातनच्‍या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी जाणे आणि संगणक शिकून सेवा करणे

१.३.२००८ या दिवशी मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आले. त्‍याच वर्षापासून (वर्ष २००८ पासून) मला मधुमेह आणि रक्‍तदाब असे शारीरिक त्रास चालू झाले. रामनाथी आश्रमात आल्‍यानंतर मला ग्रंथांशी संबंधित सेवा करण्‍याची संधी मिळाली. मला संगणक येत नव्‍हता; पण अन्‍य साधकांनी साहाय्‍य केल्‍यामुळे मला आवश्‍यकतेपुरते मराठी टंकलेखन करता येऊ लागले.

 

२०. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने साधना होऊन जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त होणे

वर्ष २०१६ मध्‍ये गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी माझी ६१ टक्‍के आध्‍यात्मि पातळी घोषित झाली आणि प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला वेगवेगळ्‍या विषयांवर लेख अन् कविता सुचत गेल्‍या. त्‍यांच्‍याच कृपेने सुचलेले लेख आणि कविता ‘आवडली’, असे सांगून प.पू. डॉक्‍टर मला खाऊ (प्रसाद) पाठवून आनंद देत असत.

 

२१. कर्करोग होऊन रुग्‍णाईत होणे

२१ अ. रक्‍तस्राव होऊ लागल्‍यामुळे गर्भाशयाचे शस्‍त्रकर्म होणे

१६.२.२०२२ या दिवशी मला रक्‍तस्राव होऊ लागला. त्‍या वेळी मला अन्‍न-पाणी जात नव्‍हते; म्‍हणून सनातनचे साधक आधुनिक वैद्य मराठे यांच्‍या सांगण्‍यानुसार माझ्‍या क्ष-किरण (‘एक्‍स-रे’) आणि इतरही काही चाचण्‍या केल्‍या. त्‍यांनी मला मणिपाल रुग्‍णालयामध्‍ये भरती केले. ५.३.२०२२ या दिवशी माझ्‍या गर्भाशयाचे शस्‍त्रकर्म झाले.

२१ आ. आधुनिक वैद्यांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्‍याचे निदान करणे

१४.३.२०२२ या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला भेटायला बोलावले होते. त्‍यांनी माझे टाके काढले आणि मला ‘रेडिएशन’ (कर्करोगावरील किरणोत्‍सर्ग उपचारपद्धती) करण्‍याच्‍या विभागात जायला सांगितले. त्‍यानुसार मी आणि माझ्‍या समवेत आलेली साधिका कु. तृप्‍ती कुलकर्णी त्‍या विभागात जाऊन तेथील आधुनिक वैद्यांना भेटलो. त्‍यांनी मला सांगितले, ‘‘तुम्‍हाला कर्करोग झाला असून तो दुसर्‍या स्‍तरावर (स्‍टेजला) गेला आहे.’’ हे ऐकून मी घाबरले आणि लगेच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना प्रार्थना केली, ‘तुम्‍हीच मला बळ द्या. तुम्‍हीच मला सांभाळू शकता. आजपर्यंत तुम्‍हीच मला सांभाळले आहे. आताही तुम्‍हीच मला सांभाळणार आहात. हे प्रारब्‍ध संपवण्‍यासाठी तुम्‍हीच मला बळ द्या.’ त्‍या दिवशी आमच्‍या समवेत यजमान श्री. प्रकाश मराठेही रुग्‍णालयात आले होते. त्‍यांना हे कळल्‍यावर वाईट वाटले; पण त्‍यांनी मला धीर दिला.

२१ इ. कर्करोगावरील उपचार

आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘रेडिएशन’द्वारे उपचार करावे लागतील.’’ त्‍याप्रमाणे माझ्‍यावर २५ वेळा उपचार झाले; पण काहीच सुधारणा होत नव्‍हती. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘बेळगाव येथे जाऊन दोन वेळा उपचार घ्‍यावे लागतील.’’ त्‍याप्रमाणे मी दोन वेळा बेळगाव येथे जाऊन उपचार घेऊन आले; पण काही उपयोग झाला नाही. मला औषधे घेण्‍याचा तिटकारा आहे; पण या आजारपणात आधुनिक वैद्य सांगतील, त्‍याप्रमाणे मी सर्व उपचार करून घेतले आणि औषधेही घेतली.

२१ ई. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवलेच तारणहार आहेत’, याची जाणीव होऊन सर्व भार त्‍यांच्‍यावर टाकणे

कर्करोग झाल्‍यानंतरही आरंभी मला वाटायचे, ‘मी यातून बरी होईन’; पण दिवसेंदिवस माझा त्रास वाढतच गेला आणि लक्षात आले, ‘आता केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरच मला साहाय्‍य करू शकतात.’ त्‍यामुळे मी त्‍यांच्‍यावर सर्व भार टाकला.

 

२२. यजमान श्री. मराठे यांनी औषधोपचारात काहीच न्‍यून पडू न देणे

१८.२.२०२२ पासून १६.७.२०२२ पर्यंत मी नागेशी येथे रहायला होते. रामनाथी येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ झाल्‍यानंतर जून मासात ते केवळ रात्री झोपायला यायचे आणि सकाळी रामनाथी आश्रमात सेवेसाठी परत जायचे. त्‍यांना माझे श्रम-कष्‍ट पहावत नसत; पण ते शांत रहात असत. मी त्‍यांना सांगितले, ‘‘तुम्‍ही तुमची काळजी घ्‍या. माझी काळजी करू नका. तुम्‍हाला यायला जमत नसेल, तर केवळ भ्रमणभाष करा.’’ त्‍यांना माझ्‍या आजारपणात बरेच पैसे व्‍यय करावे लागले; पण त्‍यांनी माझ्‍या औषधोपचारात काहीही न्‍यून पडू दिले नाही.

 

२३. कर्करोगाचे दुखणे वाढत गेले, तशी विरक्‍तीही वाढणे

माझे दुखणे बळावत गेले, तशी माझी विरक्‍ती वाढत गेली. अनेक साधक मला भेटायला येत. त्‍यांना बरे वाटावे; म्‍हणून मी त्‍यांच्‍या समवेत छायाचित्रे काढून घेत असे आणि त्‍यांची समजूतही काढत असे. मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय तळमळीने पूर्ण करत असे. मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सतत अनुसंधानात रहाण्‍याचा प्रयत्न करत असे. काही वेळा मला एवढा त्रास होई की, ते सहन न होऊन मला रडूही येत असे. ‘इतरांना त्रास व्‍हायला नको’, यासाठी मी एकटी असतांना मधेमधे रडतही असे. माझी प.पू. डॉक्‍टरांवर दृढ श्रद्धा आहे. केवळ त्‍या बळावरच मी तग धरू शकले. १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली आणि माझी आध्‍यात्मिक पातळी १ टक्‍क्‍याने वाढून ती ६७ टक्‍के झाली असल्‍याचे घोषित झाले. गुरुदेवांनी माझ्‍या या स्‍थितीतही मला असा आनंद दिला.

 

२४. प्रार्थना

२२.५.२०२२ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवाच्‍या वेळी मला त्‍यांचे दिव्‍य दर्शन झाले. मला पुष्‍कळ आनंद झाला. माझे जीवन आनंदाने उजळून निघाले. माझ्‍याकडून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कळकळीची प्रार्थना झाली, ‘यापुढेही माझी जीवननौका पार करून मला तुमच्‍या चरणी समर्पित करून घ्‍या.’

 

२५. कृतज्ञता

माझ्‍या या आजारपणात मला सर्व संत, सर्व साधक, तसेच आधुनिक वैद्य यांनी पुष्‍कळ साहाय्‍य केले. विशेष करून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, तसेच पू. परांजपेकाका आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेकाकू, प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) माई यांनी मला वेळोवेळी धीर देऊन साहाय्‍य केले. त्‍या सर्वांना माझा साष्‍टांग नमस्‍कार ! मला कु. कविता राठिवडेकर (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के), सौ. मनीषा पानसरे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के), डॉ. पांडुरंग मराठे, कु. सुगुणा गुज्‍जेटी, सौ. सारिका अय्‍या यांच्‍यासह अन्‍य साधकांनी पुष्‍कळ साहाय्‍य केले आणि भरभरून प्रेमही दिले. त्‍यासाठी त्‍या सर्वांप्रती कृतज्ञता !

लहानपणापासून आई-वडील, भाऊ, लग्‍नानंतर सासू-सासरे, यजमान श्री. मराठे आणि पुढे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे माझ्‍यासारख्‍या एका सामान्‍य जिवाचे जीवन कृतार्थ झाले. यासाठी मी प.पू. भक्‍तराज महाराज, प.पू. डॉक्‍टर, सद़्‍गुरु, संत, साधक आणि आतापर्यंत माझ्‍या जीवनात आलेला प्रत्‍येक सहयोगी जीव यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे. मला हे सर्व दिल्‍याबद्दल सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी अनंत कृतज्ञता !’

– सौ. शालिनी मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)
(हे लिखाण पू. (सौ.) शालिनी मराठे संत होण्‍यापूर्वीचे आहे.)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment