पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !

संतसन्मान सोहळ्यात साधकांना लाभली भावानंद अनुभवण्याची पर्वणी !

पू. सौ. मनीषा पाठक यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सन्मान करताना सद्गुरु स्वाती खाडये (डावीकडे)

पुणे, १८ मार्च (वार्ता.) – काही दिवसांतच गुढीपाडव्याला नववर्षाला आरंभ होणार आहे. नववर्ष म्हणजे आनंदीआनंदच ! भगवान श्रीकृष्णाच्या अगम्य लीलेमुळे सनातनच्या साधकांना हा आनंद गुढीपाडव्याच्या आठ दिवस आधीच मिळाला. जो भावसोहळा साधकांनी आधीच अंतरी अनुभवला होता, ज्या क्षणाची सर्वच साधक आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो क्षण अखेर आला…! १४ मार्च, म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) यांच्या रूपाने सनातनच्‍या समष्‍टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले. एका अनौपचारिक सत्संगात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मुखातून ‘मनीषाताई ‘संत’ झाल्या’, हे वृत्त ऐकताच पुणे जिल्ह्यातील सर्वच साधक आनंदून गेले. यानंतर कुणी गुरुदेवांनी केलेली अपार कृपा अनुभवून भावस्थितीत गेले, तर काहींच्या डोळ्यांतून भावाश्रू ओघळले. काही साधक कृतज्ञताभावात होते, तर काही साधकांच्या चेहर्‍यावर निराळाच आनंद दिसत होता. काहींची भावजागृती होऊन त्यांच्या अंगावर रोमांच येत होते. ‘आनंदवार्ता ऐकून जणू काळही थांबला आहे कि काय’, असेच वाटत होते. भगवंताने गुढीपाडव्याच्या आधीच आनंदाची पर्वणी अनुभवण्यास दिल्याने साधक भावानंदात न्हाऊन निघाले.

या सत्संगाला पुणे जिल्ह्यातील काही साधक प्रत्यक्ष, तर ३७० हून अधिक साधक ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून जोडलेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना पुष्पहार घालून, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र देऊन त्यांचा सन्मान केला. सौ. मनीषाताई संतपदी विराजमान झाल्यानंतर ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे सत्संगाला जोडलेल्या काही साधकांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये उलगडली.

 

…असे उलगडले संतपदाचे गुपित !

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक

सत्संगाच्या स्वरूपाविषयी सर्वांनाच जरी कुतूहल असले, तरी ‘मनीषाताई संत म्हणून घोषित होणार’, असे प्रत्येकाला आतून वाटत होते. कुणी याविषयी एकमेकांशी प्रत्यक्ष बोलत नसले, तरी साधकांच्या चेहर्‍यावरील आनंदातूनच ते दिसत होते. ‘मनातील विचार कधी एकदा सत्यात उतरणार’, याची ओढ प्रत्येकालाच लागली होती. काही क्षणांनी व्यासपिठावर सद्गुरु स्वातीताई आणि सौ. मनीषा पाठक यांचे आगमन झाले.

सौ. मनीषाताईंचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. त्यांना पाहूनच साधकांची भावजागृती होऊ लागली. ‘धन्य जाहलो आम्ही सर्व साधक ! माऊली आमुची संत जाहली !’, असाच विचार प्रत्येक साधकाच्या मनात आला असावा !

 

सद्गुरु ताईंची मंगलमय वाणी । भावाश्रू दाटले लोचनी ।।

इतक्यात सद्गुरु ताईंनी सांगितले, ‘‘आता आपण सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास पहाणार आहोत.’’ हे ऐकल्यावर ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे जोडलेल्या अनेक साधकांनी ‘सौ. मनीषाताई संत होतील’, असे वाटत आहे’, अशा स्वरूपाचे भावसंदेश पाठवले. त्यानंतर सौ. मनीषा पाठक यांनी त्यांचा साधनाप्रवास सांगण्यास आरंभ केला. त्यांची भावविभोर वाणी, परात्पर गुरुदेवांचा उच्चार करतांना दाटून येणारा त्यांचा कंठ हे सर्व पाहून साधकांना भावाश्रू अनावर झाले. ताईंच्या पूर्वायुष्यात घडलेले जीवघेणे प्रसंग आणि त्यातून गुरुदेवांनी त्यांचे केलेले रक्षण यांविषयी ऐकतांना सर्वांच्या अंगावर शहारे आले. त्यांचा जीवनप्रवास साधकांच्या डोळ्यांसमोरच जणू उभा राहिला होता !

लहानपणापासून भावभक्ती निर्माण करण्याचे ध्येय असलेल्या मनीषाताईंनी त्यांच्या जीवनात गुरुतत्त्वाने केलेले साहाय्य, त्यातून निर्माण झालेली दृढ श्रद्धा यांविषयी अतिशय तळमळीने आणि भावपूर्णरित्या अनुभवकथन केले. उपस्थित साधक हे सर्व प्रसंग एकाग्र चित्ताने आणि तन्मयतेने ऐकत होते. साधनाप्रवास सांगून झाल्यावर संतपदाच्या घोषणेसाठी सर्वांचेच कान अधीर झालेले असतांनाच सद्गुरु स्वातीताईंनी मनीषाताईंच्या संतपदाची घोषणा केली आणि साधकांना आनंदाची भावभेट दिली !

 

सेवेचा अखंड ध्यास असलेल्या आणि
‘गुरुलीला सत्संगा’तून साधकांची भाववृद्धी करणार्‍या
सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) सनातनच्या १२३ व्या संतपदावर विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. महेश आणि सौ. मनीषा पाठक हे साधक-दांपत्य पुणे येथे सनातनच्या सेवाकेंद्रात राहून साधना करत आहे. ते दोघेही संगणक अभियंता असून पूर्णवेळ साधना करण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आले आहेत.

सौ. मनीषा यांना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्या नेहमी आनंदी असतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुण असल्याने अमेरिकेतून पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील प्रसारकार्य वाढावे आणि साधकांची साधना चांगल्या प्रकारे व्हावी, यांसाठी तळमळीने प्रयत्न केले. शांत, स्थिर स्वभाव, इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती अन् प्रेमभाव या गुणांद्वारे त्यांचे सर्व साधकांशी आध्यात्मिक नाते निर्माण झाले असून सर्व साधकांमध्ये एक सुंदर कुटुंबभावना निर्माण झाली आहे.

कोरोना महामारीच्या कालावधीत सौ. मनीषा यांनी पुण्यात ‘गुरुलीला सत्संग’ घेण्यास आरंभ केला. कोरोनाच्या भयावह स्थितीत साधकांमध्ये भाव आणि श्रद्धा वाढवण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. या सत्संगामुळे साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आणि त्यांच्यात संघभावही निर्माण झाला. सतत भावावस्थेत असणार्‍या सौ. मनीषा यांनी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ या ओळीनुसार साधकांमधील भावज्योत प्रदीप्त केली. त्यामुळे पुण्यातील अनेक साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.

सौ. मनीषा यांनी त्यांची मुलगी कु. प्रार्थना (वय १२ वर्षे) हिच्यावरही साधनेचे उत्तम संस्कार केले आहेत. त्यामुळे उपजतच अनेक दैवी गुण असलेली ही दैवी बालिका ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून बालवयातच संतपदाकडे वाटचाल करत आहे.

सहजता, नेतृत्व आणि साधनेची तीव्र तळमळ या गुणांमुळे सौ. मनीषा यांनी वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. वर्ष २०२२ मध्ये त्यांची पातळी ६९ टक्के होती आणि १४ मार्च २०२३ या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या १२३ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांचे पती श्री. महेश (वय ४२ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आहे. सनातनमधील हा एकमेव परिवार आहे, ज्या परिवारातील तिन्ही सदस्यांनी अल्प वयात जलद आध्यात्मिक उन्नती करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

यापुढेही पाठक कुटुंबियांची, तसेच पू. (सौ.) मनीषा पाठक यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.३.२०२३)

 

सद्गुरु स्वाती खाडये यांनी
पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सद्गुरु स्वाती खाडये

१. पू. (सौ.) मनीषा पाठक यांची गुरूंवर श्रद्धा असल्याने त्या मायेत अडकल्या नाहीत. ज्याला देवालाच मिळवायचे आहे, त्याला मायेतील गोष्टींचे काही नसते.

२. गुरुकृपाप्राप्तीची तळमळ आणि तीव्र इच्छाशक्ती असेल, तर साधना केल्यानंतर आदर्श जीवन जगता येते, हे पू. (सौ.) मनीषाताईंच्या साधनाप्रवासातून शिकायला मिळाले.

३. विदेशात गेलेले अनेक जण स्वदेशी परत येत नाहीत; पण पू. (सौ.) मनीषाताईंनी साधनेचे विचार सोडले नाहीत. त्या पुन्हा भारतात आल्या आणि स्वतःसह मुलगी अन् पती यांच्यावर साधनेचे संस्कार टिकवून ठेवले.

 

पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा भावमय साधनाप्रवास !

पू. (सौ.) मनीषा पाठक (उजवीकडे) यांचा जीवनप्रवास जाणून घेतांना सद्गुरु स्वाती खाडये

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे पू. (सौ.) मनीषाताई जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेल्या. शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रासांत वाढ होत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेल्या त्यांच्या भावामध्येही वृद्धी होत होती. आस्थापनात नोकरी करत असतांनाही प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या स्मरणात राहून त्या भावस्थिती अनुभवत असत. त्यांनी सनातनच्या सेवाकेंद्रांत स्वच्छता सेवा करण्यापासून ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे पोचवण्यापर्यंतच्या विविध सेवा कौशल्याने आणि भावस्थितीत राहून केल्या. नोकरी सोडणे आणि आश्रमजीवन स्वीकारणे यांमध्ये त्यांनी केलेला त्याग, राष्ट्र-धर्मासाठी कार्य करण्याचा निर्धार आणि समष्टीवरील अपार प्रेम यांमुळे त्यांची संतत्वाकडे शीघ्रतेने वाटचाल झाली. त्यांनी यजमान श्री. महेश पाठक आणि मुलगी कु. प्रार्थना पाठक यांच्याकडूनही साधना करवून घेतल्याने त्या दोघांचीही साधनेत प्रगती झाली.

१. सौ. मनीषा पाठक यांनी शेगावच्या
गजानन महाराजांना मार्ग दाखवण्याची विनंती करणे आणि
सनातन संस्थेची ओळख झाल्यावर ‘तुझा शोध संपला’, असे महाराजांनी सांगणे

सौ. मनीषाताई लहानपणापासून गणपतीची उपासना करत होत्या. साधनेविषयीची ओढ असल्याने एकदा त्यांना शेगाव येथील श्री गजानन महाराजांकडे जाण्याचा योग आला. त्यांच्या मूर्तीतील डोळ्यांकडे पाहून त्यांनी ‘मला मार्ग दाखवा’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर काही काळाने सनातन संस्थेशी ओळख झाल्यावर गजानन महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले, ‘आता तुझा शोध संपला.’ हे ऐकल्यावर उपस्थित साधकांची भावजागृती झाली.

२. गुरु आणि शिष्य यांच्यातील दैवी संवाद चालू असल्याचे जाणवणे

साधनाप्रवास उलगडतांना सद्गुरु स्वातीताई मनीषाताईंना ‘तुमची दृढ श्रद्धा असल्याने तुमची साधना झाली’, असे वारंवार सांगत होत्या. त्यावर मनीषाताई ‘गुरुदेवांनीच करवून घेतले’, असे कृतज्ञतापूर्वक म्हणायच्या. त्या वेळी ‘हा गुरु-शिष्यामधील दैवी संवादच चालू आहे आणि गुरु शिष्याचे कौतुक करत असून शिष्य गुरूंना कर्तेपणा अर्पण करत आहे’, असे सर्वांना जाणवत होते.

३. ‘अनेक प्रतिकूल प्रसंग येऊनही
तुमची श्रद्धा ढळली कशी नाही ?’, असे सद्गुरु स्वातीताईंनी
विचारल्यावर मनीषाताईने त्यामागील गुरुभक्तीचे रहस्य उलगडणे

सद्गुरु स्वातीताईंनी त्यांना विचारले, ‘‘अनेक बिकट प्रसंग येऊनही तुमची श्रद्धा ढळली कशी नाही ? तुम्ही काय प्रयत्न केले ?’’ या वेळी पू. (सौ.) मनीषाताई म्हणाल्या, ‘‘संत मीराबाई, रामभक्त शबरी यांच्याप्रमाणे भक्तीचे ध्येय घेतल्याने मला प्रसंगांना सामोरे जाता आले. ‘माझ्या मनात काय चालू आहे ?’, हे परमपूज्य गुरुदेवांना ठाऊक आहे.’’ मनीषाताईंच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग ओढावले होते; पण ‘परमपूज्य गुरुदेवांनीच त्यातून वाचवले’, असा त्यांचा उत्कट भाव आहे.

४. संतांच्या सहवासाचा साधनेसाठी करून घेणे

सौ. मनीषाताई यांनी पुणे येथे असतांना सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या दृष्टीकोनांनुसार वाटचाल केली. ही सूत्रे ऐकतांना ‘संतसहवासाचा लाभ कसा करून घ्यायचा’, हे सर्व साधकांना शिकता आले.

 

पू. (सौ.) मनीषाताई यांचे साधकांसाठीचे मार्गदर्शक बोल !

आपले सर्वांचे जीवन ‘परम पूज्यमय’ व्हावे !

जर आपल्या सर्वांच्या साधनेचा केंद्रबिंदू केवळ आणि केवळ परम पूज्य गुरुदेव असतील, तर आपले दोष, अहं अन् आपले प्रारब्ध यांमुळे कितीही प्रतिकूल प्रसंग आले, तरी आपण परम पूज्य गुरुदेवांचे चरण कधीच सोडू शकणार नाही. गुरुदेव आपल्यासाठी जे काही करत आहेत, त्यासाठी कातड्याचे जोडे करून त्यांच्या चरणी अर्पण केले, तरी ते अल्पच आहेत. त्यामुळे आपण सर्व जणांनी त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी, तसेच त्यांच्या चरणी अर्पण होण्यासाठी साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढवूया.

या जन्मात आपल्याला परम पूज्य गुरुदेव लाभले आहेत. येणारी संकटे आणि प्रसंग हे गुरुदेवांपेक्षा मोठे नाहीत. गुरुदेवच आपले सर्वस्व आहेत. त्यामुळे प्रत्येक श्वासागणिक गुरुदेवांचे स्मरण, त्यांची सेवा, त्यांच्या चरणांचा ध्यास, अशा प्रकारे आपले सर्वांचे जीवन ‘परम पूज्यमय’ व्हावे आणि क्षणाक्षणाला त्यांना सर्वांना अनुभवता यावे, हीच गुरुचरणी प्रार्थना !

– (पू.) सौ. मनीषा पाठक, पुणे

 

पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे कुटुंबियांनी संत सोहळ्यात व्यक्त केलेले मनोगत !

(डावीकडून) उभे असलेले श्री. मयूर उथळे (पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे भावोजी), चि. शरण्या (श्री. मयूर यांची मुलगी), सौ. मानसी उथळे (पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या बहीण), श्रीमती सुरेखा सरसर (आई), कु. प्रार्थना पाठक (मुलगी), श्री. महेश पाठक (यजमान), आसंदीत बसलेल्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक

माझे पुण्य म्हणून मला पू. (सौ.) मनीषा हिच्यासारखी मुलगी लाभली !
– श्रीमती सुरेखा सरसर, नांदेड (पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या आई)

देवाने मला अशी मुलगी दिली, त्याविषयी देवाच्या चरणी कृतज्ञता ! माझे काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे पू. मनीषा मुलगी म्हणून, श्री. महेश हे जावई म्हणून आणि कु. प्रार्थना मला नात म्हणून लाभली. तिने आतापर्यंत केलेला त्याग योग्यच होता. मला तिचा पुष्कळ अभिमान वाटतो.

पू. (सौ.) मनीषा या सद्गुरु स्वातीताई यांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न करतात !
– महेश पाठक, पुणे (पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे पती, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

पू. (सौ.) मनीषा यांचा साधनाप्रवास ऐकतांना संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यांचा खडतर प्रवास आणि श्रद्धा यांमुळेच हा दिवस आला. तीव्र तळमळ, साधकाला साहाय्य करणे, स्वतःत प्रेमभाव वाढवून इतरांमध्ये तो निर्माण करणे, प्रत्येक कृती भावपूर्ण अन् परिपूर्ण कशी करावी, हे त्यांनी कृतीतून दाखवले. त्यांनीच मला साधनेत पुढे नेले. त्या नेहमी सद्गुरु स्वातीताई यांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न करतात. त्यांचा साधनाप्रवास ऐकतांना गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले.

पू. आई तत्त्वनिष्ठतेने चुका सांगून साधनेत साहाय्य करते !
– कु. प्रार्थना पाठक, पुणे (वय १२ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) (पू. (सौ.) मनीषा पाठक यांची मुलगी)

आज पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. पू. आईने मला पुष्कळ शिकवले आणि साधनेतही साहाय्य केले. तिच्याविषयी कृतज्ञता ! जेव्हा माझ्याकडून काही चूक होते, तेव्हा ती मला तत्त्वनिष्ठतेने त्याची जाणीव करून देते आणि यापुढे कसे प्रयत्न करायचे, हेही सांगते. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! गुरुदेवा, तुमच्याच कृपेने मला अशी आई लाभली !

पू. (सौ.) मनीषाताईचे मार्गदर्शन ऐकून साधनेचे प्रयत्न
करण्यास उभारी आली ! – सौ. मानसी उथळे, पुणे (पू. (सौ.) मनीषाताई यांची बहीण)

गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. अशी बहीण मिळण्यासाठी भाग्य लागते. पू. ताई तहान-भूक विसरून सेवा करते. ती मला साधनेतील प्रयत्न वाढवण्यासाठी सतत सांगते. परीस (पू. ताई) जवळ असूनही या लोखंडाचे लोखंडच राहिले. आता मला प्रयत्न करण्यासाठी  उभारी मिळाली आहे. ताई, भावोजी आणि प्रार्थना (भाची) यांच्याकडून मी साधनेचे प्रयत्न शिकण्याचा प्रयत्न करीन.

 

‘आई-मुलगी’ हे नाते आध्यात्मिक स्तरावर
अनुभवणार्‍या पू. (सौ.) मनीषाताई आणि कु. प्रार्थना !

पू. सौ. मनीषा पाठक यांना नमस्कार करताना कु. प्रार्थना पाठक

‘राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी असणारी दैवी बालिका आपल्या पोटी जन्माला यावी’, अशी सात्त्विक इच्छा बाळगणार्‍या पू. (सौ.) मनीषाताई यांना कु. प्रार्थना हिच्या रूपात दैवी बालिका लाभली ! पू. (सौ.) मनीषाताईंची सेवा निरपेक्षपणे करणारी, प्रतिकूल स्थितीतही अत्यंत स्थिर असणारी आणि सातत्याने ईश्वरी अनुसंधानात रहाणारी प्रार्थना ही सुद्धा आईच्या पावलावर पाऊल टाकत अध्यात्ममार्गात वाटचाल करत आहे.

 

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याविषयी
पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. तीव्र शारीरिक त्रास असूनही सतत सेवारत आणि आनंदी असणे अन् इतरांना आनंद देणे

मनीषाताई आय.टी. (माहिती आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातील नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ सेवारत झाल्या. तिला तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्या स्वतःला होणार्‍या त्रासाविषयी कधीही काही बोलत नाही. ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. त्यांना भ्रमणभाषवरून सत्संग घेतांना त्रास होत असूनही त्या उत्साहाने आणि आनंदाने बोलत असतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते. त्या सतत हसतमुख असतात आणि स्वतःच्या सान्निध्यात असलेल्या प्रत्येकाला आनंदी करते.

‘ताईकडे अनेक सेवा असूनही ती ‘समष्‍टीतील प्रत्‍येक सूत्र माझे दायित्‍व आहे’, या जाणिवेने पूर्ण करते.’

२. साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी केलेल्या चांगल्या सेवेचे कौतुक करणे

कोरोना महामारीच्या काळात प्रत्यक्ष संपर्क शक्य नसतांना ताईंनी सर्व साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांना भ्रमणभाषद्वारे जोडून ठेवले. साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी पुढाकार घेऊन चांगली सेवा केल्यास ताई त्यांचे आनंदाने कौतुक करून त्यांना आणखी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्या सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात.

काही साधक ‘कोरोना झालेल्‍या साधकांना रुग्‍णालयात पोचवणे, त्‍यांना डबा देणे’, अशा सेवा करायचे. ताई अशा साधकांचे सत्‍संगात आवर्जून कौतुक करत असे. स्‍वतःच्‍या जिवाचा विचार न करता साधकांना साहाय्‍य करणारे साधक आणि त्‍यांना घडवणारी मनीषाताई ! साधकांमधील भाव आणि श्रद्धा ताईमुळे वाढत चालली आहे. ताई नेहमी सांगते, ‘‘आपल्‍या जिल्‍ह्यातील एकही साधक मागे रहायला नको. आपल्‍या सर्वांना गुरुचरणी जायचे आहे.’’ या गुरुलीला सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून मनीषाताईने आम्‍हा सर्व साधकांना जोडून ठेवले आहे. सर्वांमध्‍ये संघभाव निर्माण केला आहे. जणू तिने सर्व साधकांना गुरुभक्‍तीच्‍या धाग्‍यात गुंफले आहे.’

३. तत्त्वनिष्ठ

ताईंशी कोणत्याही प्रसंगावर मनमोकळेपणाने बोलता येते. त्या सर्वांना प्रेमाने आणि तत्त्वनिष्ठतेने साहाय्य करते. साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून देऊन साहाय्य करतात. समष्टीत काही चूक होणार असल्यास किंवा झाली असल्यास संबंधित सेवेचे दायित्व असणार्‍या साधकांना ती तत्त्वनिष्ठतेने त्या चुकीची जाणीव करून देते.’

४. कृतज्ञताभाव

‘शारीरिक त्रास असतांनाही गुरुदेवांनी मला जिवंत ठेवले आहे आणि गुरुदेव सेवेची संधी देत आहेत’, याबद्दल मनीषाताईंना पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.’

५. ‘साधकांची साधना व्‍हावी’, अशी तीव्र तळमळ असणे

‘मनीषाताई पाठक व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात साधकांना ध्‍येय ठेवून प्रयत्न करायला सांगते, उदा. ‘दिवसभर संपूर्ण शरणागती अनुभवणे, १०० टक्‍के सकारात्‍मक रहाणे, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव वाढवणे, प.पू. गुरुदेवांशी अखंड अनुसंधान ठेवणे, सतत कृतज्ञताभावात रहाणे’ इत्‍यादी. ती साधकांना ‘व्‍यष्‍टी साधनेचा आढावा हा आमच्‍यात आंतरिक पालट होण्‍यासाठी आहे आणि त्‍यातून आपल्‍याला गुरुचरणांशी जायचे आहे’, याची जाणीव करून देते.

६. प्रेमभाव

‘कोरोना महामारीच्‍या कालावधीत प्रतिदिन ऑनलाईन ‘गुरुलीला सत्‍संग’ होत असे. त्‍या वेळी पुण्‍यात कोरोनाचे प्रमाण पुष्‍कळ वाढले होते. सर्व साधक घरीच होते. काही साधकांना कोरोना झाला होता. तेव्‍हा ‘ते साधक सर्व उपचार घेत आहेत ना ? नामजपादी उपाय करत आहेत ना ?’, याविषयी ताई विचारपूस करत असे.

एकदा सत्‍संग घेत असतांना तिला एका रुग्‍णाईत साधकाचा भ्रमणभाष आला. तेव्‍हा तिने लगेच अन्‍य साधकाला काही मिनिटे सत्‍संग घेण्‍यास सांगून तो भ्रमणभाष घेतला आणि ती त्‍या रुग्‍णाईत साधकाशी बोलली. एवढे प्रेम केवळ देवच करू शकतो ! ताई इतक्‍या प्रेमाने सूत्रे सांगायची की, ऐकतांना सर्व साधकांची भावजागृती होत असे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment