आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

Article also available in :

गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा रहस्यमय ‘बाणस्तंभ’ प्राचीन भारतीय संस्कृतीचा आहे साक्षीदार !

गुजरातमधील समुद्राच्या किनार्‍यावरील वेरावळ येथे असलेले सोमनाथ मंदिर हे हिंदूंसाठी सर्वांत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अनेक परकीय आक्रमणकर्त्यांनी वारंवार उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची अनेक वेळा पुनर्बांधणी केली गेली. सोमनाथ मंदिराच्या परिसरात ‘बाणस्तंभ’ नावाची एक वास्तू आहे. या स्तंभाभोवती अनेक रहस्ये आहेत.

सोमनाथ मंदिराचा रहस्यमय ‘बाणस्तंभ’ प्राचीन भारतीय संस्कृतीचा साक्षीदार !
श्री. शिरीष देशमुख

हा स्तंभ केव्हा बांधला गेला, याचा नेमका पुरावा नाही. तथापि काही पुरातत्व तज्ञांचे मत आहे की, तो ६ व्या शतकात कधी तरी बांधला गेला असावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्तंभाची वास्तू विशेष नमूद करण्यासारखी नसून त्यावर असलेला संस्कृत शिलालेख खरे आश्चर्यजनक आहे. हा शिलालेख संस्कृत भाषेत असून त्याचा अर्थ ‘या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कोणताही अडथळा नाही’, असा आहे.

 

१. सोमनाथ मंदिर ते दक्षिण ध्रुवामधील रेषेमध्ये कोणताही भूखंड न सापडणे आणि ‘बाणस्तंभा’ने केवळ दक्षिण ध्रुवाकडेच निर्देश करणे

विशेष म्हणजे आता उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांनी या मार्गावर भूमीचा तुकडा नसल्याची पुष्टी केली आहे; पण लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र हे आहे की, १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी त्या स्तंभावर म्हणजेच ‘बाणस्तंभा’वर ते लिहिलेले होते, जेव्हा ‘गूगल’ किंवा आधुनिक भू-मॅपिंग उपकरणे, ड्रोन किंवा उपग्रह नव्हते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर त्या काळात असे भारतीय वैज्ञानिक होते, ज्यांना पृथ्वी गोल आहे आणि उत्तर अन् दक्षिण ध्रुव आहेत, याची जाणीव होती. ‘त्या काळात भारत हा मागासलेला देश आहे. त्यात तथाकथित तांत्रिक वैज्ञानिक मागासलेपणा आहे’, असे आजचे भारतीय बुद्धीवादी म्हणतात; मात्र भारतामध्ये असे विद्वान लोक होते की, जे सोमनाथ मंदिर ते दक्षिण ध्रुवामधील रेष इतक्या अचूकतेने दर्शवू शकतात की, त्यामध्ये कोणतेही भूखंड सापडू नये. ‘बाणस्तंभ’ केवळ दक्षिण ध्रुवाकडेच निर्देश करत नाही, तर प्राचीन भारतातील खगोलशास्त्र, भूगोल, गणित आणि सागरी शास्त्र यांचे ज्ञानही स्पष्ट करतो.

 

२. आर्यभट्ट यांनी ख्रिस्ताब्द ५०० मध्येच ‘गोल पृथ्वीचा व्यास सुमारे ४० सहस्र १६८ किलोमीटर आहे’, असे सांगणे

‘विशेष म्हणजे पृथ्वी गोल आहे, हे युरोपमधील शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढले’, असे सर्वत्र मानले जात असले, तरी ही वस्तूस्थिती भारतियांना त्यापूर्वीच ठाऊक होती. आर्यभट्ट यांनी ख्रिस्ताब्द ५०० मध्ये ‘या गोल पृथ्वीचा व्यास सुमारे ४० सहस्र १६८ किलोमीटर’ म्हणून मोजून काढला. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पृथ्वीचा व्यास ४० सहस्र ७५ किलोमीटर गृहीत धरण्यात आला आहे, म्हणजे आर्यभट्ट यांच्या मूल्यांकनात केवळ ०.२ टक्के एवढाच नगण्य भेद होता.

त्यामुळे सुमारे १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी आर्यभट्ट यांनी त्याचा शोध लावला आणि अंटार्क्टिकाकडे निर्देश करणार्‍या सोमनाथ मंदिरातील ‘बाणस्तंभ’ या शोधाचा साक्षीदार आहे.

– श्री. शिरीष देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१३.१०.२०२२)

(सौजन्य : श्री. राम तायडे, बेंगळुरू)

Leave a Comment