आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

१. घसा दुखणे किंवा खवखवणे, तसेच कोणत्याही प्रकारचा खोकला

‘दिवसातून २ – ३ वेळा ‘चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २  गोळ्या चघळून खाव्यात.’– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)

वैद्य मेघराज पराडकर

१ अ. अनुभव

‘बर्‍याचदा कोणत्याही कारणामुळे माझा घसा दुखायला लागून कणकण वाटणे चालू झाल्यावर मी लगेच ‘चंद्रामृत रस’ची १ गोळी चघळतो. बहुतेक वेळा केवळ एका गोळीमुळेही माझा घसा दुखणे बंद होऊन कणकणही जाते, तसेच पुढे जाऊन खोकला येण्याचेही टळते.’ – (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)

 

२. कोरडा खोकला (वातज कास)

‘काही वेळा केवळ खोकल्याची ढास लागते; परंतु कफ पडत नाही किंवा पडलाच, तर थोडासा पडतो. या प्रकारच्या खोकल्यामध्ये ‘श्वासनलिका आतून सोलपटून गेली आहे कि काय ?’, असे वाटू लागते. खोकून खोकून बरगड्या आणि पोट दुखू लागते. काही वेळा खोकल्यावरील औषधे घेऊन कफ सुकून गेल्यानेही असा खोकला येतो. काही वेळा झोपेत थंड वारा नाकातोंडात गेल्याने असा खोकला येतो. ही वातामुळे येणार्‍या खोकल्याची लक्षणे आहेत. आयुर्वेदात याला ‘वातज कास’ म्हणतात. ‘कास’ म्हणजे ‘खोकला’. अशा वेळी पुढील उपचार करावा.

अर्धी वाटी गरम पाणी घ्यावे. त्यामध्ये २ चमचे (१० मि.ली) साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालावे आणि ढवळून ढवळून प्यावे. (तुपाऐवजी तळणीचे तेलही वापरता येते. ‘तळणीचे तेल’ म्हणजे ‘ज्यामध्ये वडे, पापड, भजी असे खाद्यपदार्थ तळलेले आहेत, असे तेल’.) पिऊन झाल्यावर भांड्याला आतून लागलेले तूप भांड्यात थोडे गरम पाणी फिरवून काढून प्यावे. १ – २ वेळा असे केल्यावर खोकला थांबतो, असा अनुभव आहे. खोकल्यासह ताप किंवा कणकण असल्यास तुपासह चमचाभर तुळशीचा रसही घ्यावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर (२५.७.२०२२)

२ अ. अनुभव

‘माझी मुलगी चि. मुक्ता साडेचार वर्षांची आहे. जुलै २०२२ च्या तिसर्‍या आठवड्यात तिला सर्दी होऊन कोरडा खोकला चालू झाला. खोकून खोकून ती हैराण झाली होती. त्यात थोडा तापही आला. अशा वेळी एक चमचा तुळशीच्या रसामध्ये १ चमचा (५ मिली) तूप आणि थोडे मीठ घालून ढवळून तिला पाजले. त्या वेळी तिची खोकल्याची ढास पुष्कळ अल्प झाली. त्यानंतर साधारण ४ घंट्यांनी थोडा खोकला आल्यावर तिला याप्रमाणेच तूप पाजले. नंतर तिला खोकला आला नाही आणि तापही उतरला.’ – सौ. राघवी मयुरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२५.७.२०२२)

 

३. कणकण वाटणे किंवा ताप येणे

‘२ दिवस तुळशीची २ – २ पाने सकाळ-सायंकाळ चावून खावीत. एका जेवणाच्या वेळेस काहीही न खाता उपवास करून त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा थोडे गरम वरण १ चमचा तूप घालून प्यावे. २ दिवस अन्य काही न खाता केवळ गरम गरम वरणभात जेवावा. वरणभातावर थोडे तूप घ्यावे. चवीसाठी लोणचे घेतले, तरी चालते. पूर्ण बरे वाटेपर्यंत हाच आहार घ्यावा. अल्पाहार करू नये. त्याऐवजी चमचाभर मनुके चावून चावून खावेत किंवा वाटीभर गरम पाण्यात थोडा गूळ घालून ढवळून प्यावे. तहान लागेल, तेव्हा गरम पाणीच प्यावे. विश्रांती घ्यावी. असे केल्यास तापाचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते. ताप आलाच, तर त्याचा फार त्रास होत नाही आणि तो लवकर बरा होऊ लागतो.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२२)

 

४. डोकेदुखी

‘सूतशेखर रस’ या औषधाच्या एका गोळीचे बारीक चूर्ण करावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) हे चूर्ण तपकीर ओढतात त्याप्रमाणे नाकात ओढावे. असे करणे जमत नसल्यास चमचाभर पातळ तुपामध्ये हे गोळीचे चूर्ण मिसळावे. उताणे झोपून या तुपात मिसळलेल्या औषधाचे २ – २ थेंब दोन्ही नाकपुड्यांत घालून २ मिनिटे पडून रहावे. त्यानंतर उठून तुपात मिसळलेले बाकीचे औषध चाटून खावे.’

 

५. बद्धकोष्ठता

‘बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. यासह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे, ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या १५ मिनिटे आधी चघळून खाव्यात. याने पाचक स्राव चांगल्या प्रकारे निर्माण होतात. बद्धकोष्ठतेवरील हे उपचार १५ दिवस करावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२२)

येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

 

Leave a Comment