आम्लपित्त : अलीकडच्या काळातील मोठी समस्या आणि त्यावरील उपाय !

Article also available in :

 

१. आम्लपित्ताचा त्रास असणारे रुग्ण मनानेच
औषधे घेत असल्याने त्यांना विविध शारीरिक त्रास होणे

आपल्या आजूबाजूला आम्लपित्ताचा (ॲसिडिटीचा) त्रास असलेले ४-५ तरी लोक असतात. आम्लपित्ताचे रुग्ण पित्ताची औषधे स्वतःच्या मनाने वर्षानुवर्षे घेत आहेत, असे अनेकदा लक्षात येते. त्यात ‘प्रोटॉन पम्प इन्हिबिटर्स’ या वर्गात मोडणारी औषधे सर्वाधिक प्रमाणात घेतली जातात. ही औषधे वैद्यकीय सल्ल्याविना अधिक काळ घेतल्याने किडनीचे विविध आजार, प्रसंगी किडनी निकामी होणे, विविध हृदयविकार, तसेच हाडे कमकुवत होऊन अस्थिभंग होणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या गोळ्यांसमवेत रुग्ण ‘डोमपेरिडोन’ हे औषधही स्वत:च्या मनाने वारंवार घेतांना दिसतात. स्त्रियांमध्ये ‘डोमपेरिडोन’मुळे ‘प्रोलॅक्टिन’ या हॉर्मोनचे प्रमाण वाढून मासिक पाळी अनियमित होऊ शकते. त्यामुळे ही औषधे आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना घेणे टाळले पाहिजे.

 

२. आम्लपित्त दूर करण्यासाठी करावयाचे उपाय !

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

आम्लपित्ताच्या त्रासामागील कारणांचा तज्ञांच्या साहाय्याने शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपचार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीमध्ये पालट करण्याची सिद्धता हवी. अधिक वेळा थोडे थोडे खाणे, खाल्ल्यानंतर लगेच न बसणे, तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अल्प प्रमाणात सेवन करणे, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन टाळणे, नियमित व्यायाम करून वजन अल्प ठेवणे, मानसिक ताण न्यून करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा सगळ्या गोष्टींचा पुष्कळ लाभ होऊ शकतो. उपाशीपोटी पाणी पिणे (गरम नव्हे) याचाही लाभ होऊ शकतो.

 

३. छातीत जळजळ होऊ लागल्यास लवंग, आले, दालचिनी,
ताक, जिरे, बडीशेप, थंड दूध आणि नारळपाणी यांचे सेवन करावे !

अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक झडप असते. जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की, ती झडप बंद होते आणि आम्लाला वर अन्ननलिकेत येऊ देत नाही. आम्लपित्त होण्याचे एक कारण, म्हणजे जठरामध्ये अल्प आम्ल असणे, हेही असू शकते. त्यामुळे अन्ननलिका आणि जठर यांच्यातील झडप पूर्णपणे बंद होत नाही आणि आम्ल अन्ननलिकेतून वर येऊन छातीत जळजळ होऊ लागते. अशा वेळी आम्लपित्तासाठी लवंग, आले, दालचिनी, ताक, जिरे, बडीशेप, थंड दूध, नारळपाणी अशा पदार्थांचे सेवन लाभदायक ठरू शकते. सतत गोळ्या घेण्यापेक्षा हे उत्तम आणि सुरक्षित आहे.

आम्लपित्ताचा अधिक त्रास असलेल्यांनी जठर आणि आतडे विकारांचे तज्ञ यांचा सल्ला वेळेत घेणे उत्तम !

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे

Leave a Comment