उष्णतेच्या तडाख्यात युरोप !

युरोपातील अनेक देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची भीषण लाट आली आहे. या उष्णतेमुळे एरव्ही थंड प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेले पोर्तुगाल, इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, इटली या देशांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी तेथील जंगलांमध्ये वणवे पेटणे, रुळांना तडे जाणे, नद्यांमधील बर्फ वितळून त्यांचे पात्र रुंदावणे, रस्त्यांना तडे जाणे, जलाशय आटणे, नागरिकांना उकाडा असह्य होणे, उष्माघाताने मृत्यू होणे आदींचे प्रमाण वाढले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे तेथील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि ते चिंतेत आहेत. हवामानतज्ञांच्या निरीक्षणांनुसार गेल्या दशकभरात एकूण जागतिक उष्णतेचे प्रमाण १ अंश सेल्सियसने वाढले आहे. या वाढलेल्या उष्णतेचा परिणाम वेगवेगळ्या माध्यमांतून विविध ठिकाणी जाणवत आहे. उष्णतेची लाट म्हणजे संबंधित प्रदेशाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सियसने वाढणे ! त्याचा सामना युरोपातील थंड हवामान असलेले देश सध्या करत असले, तरी अतीउष्ण हवामानाची स्थिती वर्ष १९४८ मध्येही युरोपमध्ये आली होती. तेव्हा ४८ अंश एवढे तापमान नोंदवले गेले होते. तसेच उष्णतेमुळे ७५ सहस्र नागरिकांचा मृत्यूही झाला होता.

 

१. तापमानवाढीची कारणे

तापमानातील ही वाढ एकाएकी नाही. या विषयावर संशोधन करणार्‍या तज्ञांच्या गटाने ‘या तापमानवाढीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे. काही मासांपूर्वी भारतातील प्रमुख शहरांतील हवा पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे लक्षात आले होते. देहलीत वाहनांची वाढती संख्या आणि उद्योग क्षेत्रांमध्ये विशेषत: फरशा, टाईल्स यांची निर्मिती करणारे कारखाने यांमुळे तेथे प्रदूषण झाले होते. जागतिक स्तरावर ॲमेझॉन या जगातील सर्वांत मोठ्या जंगलातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येत असल्यामुळे नैसर्गिक थंडावा अल्प होऊन उष्णतेत वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणातील ओलावा अल्प होतो. परिणामी वणव्यांचे प्रमाण वाढते. भारतातील काही प्रमुख शहरांमध्येही या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तापमान अधिक होते.

 

२. जागतिक तापमानवाढ

काही दशकांपूर्वी जगभरात ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमानवाढ) ही संकल्पना पुढे आली. त्या विषयावर बराच खल, चर्चा जागतिक समुदायाकडून झाली. जगातील विकसित देशांकडून जागतिक तापमानवाढीविषयी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले गेले आणि काही उपाययोजनाही ठरवण्यात आल्या; मात्र तापमानवाढ रोखण्यात कुणालाही यश आले नाही. आता तर युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू झाल्यापासून क्षेपणास्त्रे, बाँब आदी विध्वंसक शस्त्रांचा वापर करण्यात येत आहे. अनेक देशांकडून नवीन अण्वस्त्रांची निर्मिती आणि अणूप्रकल्पांची उभारणी चालू आहे. या गोष्टी जागतिक उष्णतेत भर घालत आहेत. एकीकडे उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम दुसर्‍या ठिकाणी होतो. अंटार्क्टिका येथील बर्फ तापमानवाढीमुळे वितळते, गोठलेल्या नद्या प्रवाहित होतात, त्याच्या परिणामामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढते. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे समुद्रालगतचा भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जलाशयाच्या पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते आणि पुन्हा अधिक प्रमाणात पाऊस, म्हणजेच अतीवृष्टी होते. जागतिक तापमानवाढीमुळे एकाच वेळी असे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. भारतात काही प्रदेशांत सध्या होणारा मुसळधार पाऊस हा तापमानवाढीचाच एक परिणाम आहे.

जागतिक तापमानवाढ ही एखाद्या पुस्तकातील संकल्पना अथवा विद्यावाचस्पती बनण्यासाठी (पीएच्.डी.साठी) संशोधनाचा आणि चर्चेचा विषय नसून ती प्रत्यक्षात साकार होत असलेली वस्तूस्थिती आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी आता ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा’, असे सांगून दुसर्‍या बाजूला रासायनिक उत्पादनांचे कारखानेही चालू करणे, अशी दुतोंडी भूमिका आता उपयोगाची नाही.

 

३. हिंदु संस्कृतीत उत्तर !

विज्ञानाचा शोध लागला आणि १०० वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी प्रदूषणग्रस्त झाली. विज्ञानाच्या चांगल्या शोधांचे कौतुक आहेच; मात्र त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण परिणामांचे काय ? प्रदूषण हे विज्ञानाचेच एक फलित आहे. मानवी जीवन सुकर करण्याच्या तात्कालिक प्रयत्नांमुळे दीर्घकालीन आणि रोखता न येण्यासारख्या होणार्‍या दुष्परिणामांचा विचार कुणी करतांना दिसत नाही. हिंदु संस्कृतीनुसार पृथ्वीवर मानवी व्यवहार अनेक युगे, सहस्रो वर्षे चालू होते. तेव्हा कधी प्रदूषणाचे भीषण प्रश्न आले नाहीत. उष्णतावाढ, भयाण दुष्काळ, अतीवृष्टी यांसारख्या मोठ्या समस्यांचा सामना आताच करावा लागत आहे. सुखसाधनांचा अतीवापर टाळून नैसर्गिक रहाणे, नैसर्गिक शेती करणे, प्रदूषणकारी उद्योग, प्लास्टिक आणि अन्य कारखाने बंद करणे; खासगी वाहनांचा उपयोग टाळून लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्यास बाध्य करणे, विध्वंसक शस्त्रे, अस्त्रे यांच्या निर्मितीवर बंदी आणणे; लोकांना हिंदु संस्कृतीनुसार धर्माचरण करण्यास सांगणे, मुख्य म्हणजे निसर्गदेवता प्रसन्न राहील, या दृष्टीने मानवी जीवनाची घडी बसवणे यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतील. हे आता शक्य होईल कि नाही, ते ठाऊक नाही; मात्र हिंदु राष्ट्रात यांचे पालन १०० टक्के केले जाईल.

पर्यावरणहानी आणि अन्य जागतिक प्रश्न हिंदु संस्कृतीनुसार आचरण केल्यानेच सुटतील !

Leave a Comment