सतत इतरांचा विचार करणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेला त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

 

 

१. घरातील वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असणे

अ. ‘पू. आबांना (पू. राजाराम नरुटे यांना) लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे. आमच्या घरात धार्मिक वातावरण आहे. पू. आबांचे आई-वडील ((कै.) भाऊ मरगु नरुटे आणि (कै.) श्रीमती अनुबाई भाऊ नरुटे) साधना करणारे होते. त्यांनी पू. आबांवर देवा-धर्माचे संस्कार केले.

आ. त्यांच्या जन्मानंतरच्या १२ व्या दिवशी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. त्यामुळे ते आधी वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्यांचे पंढरपूरची वारी करणे आणि भजन-कीर्तनाला जाणे, असे चालू होते. त्यानंतर काही वर्षांनी ते ‘कलंकी केशव संप्रदाया’नुसार साधना करू लागले. त्या संप्रदायानुसार भगवंताच्या १० व्या अवताराचे कार्य ते सर्वांना सांगत असतात.

​इ. त्यांचे शिक्षण झालेले नाही. त्यांना लिहायला किंवा वाचायलाही येत नाही. त्यांनी प्रवचने, कीर्तने आणि पुराणातील गोष्टी ऐकल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी मुखोद्गत आहेत. ते नेहमी त्या गोष्टी सांगत असतात.

ई. पू. आबा धर्माचरणी आहेत. ते शिखा ठेवतात आणि जानवे घालतात. आमच्या घरासमोर पू. आबांचे ‘कुलकर्णी’ नावाचे मित्र रहात होते. पू. आबांनी त्यांच्याकडून काही विधी शिकून घेतले. पू. आबा तुळशीचा विवाह लावणे, यांसारखे विधी करायचे. त्या वेळी लोकांनी त्यांना दिलेली दक्षिणा ते पुरोहितांना, म्हणजेच आमच्यासमोर रहाणाऱ्या कुलकर्णी कुटुंबियांना द्यायचे. पू. आबा सांगायचे, ‘‘हा त्यांचा मान आहे.’’

उ. घरी धार्मिक कार्यक्रम किंवा देवाधर्माचे अधिक करत असल्यामुळे सात्त्विक वातावरण आहे. आमच्या घरात एखाद्या मंदिराप्रमाणे शांतता असते. आमचे घर पांढऱ्या मातीचे आहे, तरी घरात शांत झोप लागते.

ऊ. आमच्या घरी पूर्वीपासून मांसाहार केलेला चालत नाही. बाहेरील कुणीही मांसाहार करून घरी येऊ शकत नाही. पू. आबांनी सांगितले, ‘‘एखादा चुकून मांसाहार करून घरी आलाच, तर त्याला त्रास होतो. तो त्वरित घराबाहेर जातो. असे काही प्रसंग पूर्वी झाले आहेत.’’

 

२. स्वतः शेती आणि अन्य व्यवसाय करून लहान भावाला शिक्षण देणे

पू. आबांनी स्वतःच्या लहान भावाच्या ((कै.) रामकृष्ण नरुटे यांच्या), म्हणजे माझ्या काकांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांनी स्वतः शेती आणि अन्य व्यवसाय करून माझ्या काकांना शिक्षण दिले. माझ्या काकांना शिक्षण घेतांना काही अडचणी आणि त्रास सोसावे लागले. पू. आबांनी त्यांच्या भावाला ‘माघार न घेता अडचणींवर कशी मात करायची ? कितीही संघर्ष झाला, तरी त्या संघर्षावर मात करून विजय कसा मिळवायचा ?’, यासंदर्भात मार्गदर्शन केले. काकांना चांगली नोकरी लागली. काका पू. आबांशी आदराने वागत असत. पू. आबांनी त्यांना शेवटपर्यंत आधार दिला.

 

३. पू. आबा नातेवाइकांचा आधारस्तंभ असणे आणि त्यांनी पू. आबांनी सांगितल्यानुसार श्रद्धेने कृती करणे

श्री. शंकर नरुटे

भावंडांना कष्ट करायला लागू नयेत; म्हणून पू. आबांनी स्वतः कष्ट केले. त्यांनी सर्व भावंडांवर (श्रीमती शकुंतला रामचंद्र जाधव (वय ८८ वर्षे), श्रीमती कमल तुकाराम कदम (वय ८६ वर्षे) आणि (कै.) रामकृष्ण नरुटे यांच्यावर) चांगले संस्कार केले. ते सर्व भावंडांशी प्रेमाने बोलतात आणि वागतात. सर्व जण त्यांची अडचण पू. आबांना सहजतेने सांगतात.

पू. आबा नातेवाइकांचा आधारस्तंभ आहेत. पू. आबांना भेटल्यावर नातेवाइकांना समाधान वाटते. त्यांच्या बोलण्यातील प्रेमभावामुळे नातेवाइकांना आनंद होतो. नातेवाईक किंवा समाजातील व्यक्ती पू. आबांनी सांगितलेल्या सूत्रांचे काटेकोर पालन करतात. तसे केल्याने त्यांना चांगली प्रचीती येते. सर्वांच्या मनात पू. आबांप्रती श्रद्धा निर्माण झाली आहे.

 

४. मुलांना देवतांची नावे ठेवणे

आमच्या घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे प्रत्येक गोष्ट अध्यात्माला धरून केली जायची. माझ्या मोठ्या बहिणीचा (सौ. शोभा विठ्ठल थोरात हिचा) जन्म गोकुळाष्टमीला झाला; म्हणून तिचे नाव ‘गोकुळा’, असे ठेवले. माझा जन्म श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी झाला; म्हणून माझे नाव ‘शंकर’ ठेवले.

 

५. आई-वडिलांनी देवाला नवस केल्यावर मुलाचा (श्री. शंकर यांचा) जन्म होणे

आई-बाबांना ((कै.) सौ. शालन नरुटे,  आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि पू. राजाराम नरुटे यांना) मुलगा नव्हता. त्यांनी देवाला नवस केला. त्यानंतर अध्यात्मातील जाणकारांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला मुलगा होईल.’’ माझ्या बहिणीच्या जन्मानंतर ७ वर्षांनंतर माझा जन्म झाला. त्यामुळे ‘माझा जन्म अन्य गोष्टींसाठी नसून भगवंताच्या कार्यासाठी आहे’, हे सनातनमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आले.

 

६. मुलांवर चांगले संस्कार करणे

अ. पू. आबांनी आम्हा सर्व भावंडांवर (सौ. शोभा विठ्ठल थोरात, सौ. मंगल शंकर काजारे आणि श्री. शंकर राजाराम नरुटे यांच्यावर) लहानपणापासून चांगले संस्कार केले. ते आम्हाला प्रत्येक सूत्र शांतपणे सांगून आमच्याकडून कृती करवून घेत असत. ते आमच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी वेळप्रसंगी थोडेफार रागवायचेही; पण त्यांचा राग काही क्षणांतच न्यून होऊन त्यांचे वागणे नेहमीसारखे होत असे.

आ. ‘मी साधनेत पुढे जावे’, यासाठी ते मला समर्थ रामदासस्वामी यांच्यासारख्या संतांची उदाहरणे देऊन ‘त्यांच्यासारखे कठोर प्रयत्न करायला हवेत’, असे सांगतात.

 

७. प्रेमभाव

अ. पूर्वीपासून पू. आबांचे सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि वागणे असल्यामुळे गावातील सर्वांशी त्यांची जवळीक आहे. ते सर्वांशी सहजतेने बोलतात. त्यांचे कुणाशी भांडण झाले नाही, तसेच कुणाशी वैर निर्माण झाले नाही. ते सतत इतरांसाठी झटतात. ते ‘इतरांना आनंद कसा देता येईल ?’, अशा प्रकारे कृती करतात.

आ. ते प्रतिदिन सकाळी झाडांवरची फुले काढून देवांना वहातात. ते शेजारी रहाणाऱ्या व्यक्तींनाही देवपूजेसाठी फुले देतात.

ई. एखादा चांगला पदार्थ असल्यास ते तो इतरांना आवर्जून देतात. त्यांचा उपवास असतांना त्यांच्यासाठी बनवलेली साबुदाण्याची खिचडी ते घरातील लहान मुलांना आणि मला देतात अन् स्वतः थोडीशीच घेतात. त्यांना स्वतः खाण्यापेक्षा इतरांना देण्यात पुष्कळ आनंद होतो. त्यानेच त्यांचे पोट भरते.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १६.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.  (भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

८. अनोळखी व्यक्तींशीही जवळीक साधणे, सर्वांशी आदराने बोलणे आणि बालपणीच्या मित्रांशी मैत्री शेवटपर्यंत टिकून रहाणे

बसमधून प्रवास करतांना किंवा कोणत्याही कार्यक्रमात पू. आबा अनोळखी व्यक्तीची स्वतःहून ओळख करून घेतात. समाजातील व्यक्ती पू. आबांना नमस्कार करतात. समाजातील मोठ्या व्यक्तीही पू. आबांना ‘आबा’, ‘महाराज’ किंवा ‘राजारामबुवा’, असे आदराने संबोधतात. पू. आबा सर्वांशी आदराने बोलत असल्याने सर्व जण त्यांच्याशी आदरानेच बोलतात. पू. आबांची बालपणीच्या मित्रांशी मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. खरेतर पू. आबा ९० वर्षांचे आहेत. त्यांच्या वयाचे आता कुणी हयात नाही; पण त्यांच्या मित्रांची मुले अजूनही पू. आबांची आठवण काढतात.

 

९. पाळीव प्राण्यांवर प्रेम करणे

घरी शेळी, म्हैस, मांजर इत्यादी प्राणी आहेत. पू. आबा दिसले नाहीत की, ते प्राणी ओरडतात अन् पू. आबा दिसले की, शांत होतात. पू. आबा त्या प्राण्यांच्या पाठीवरून हात फिरवतात, तसेच त्यांना प्रेम देतात. त्यामुळे ते प्राणीही तेवढ्याच प्रेमाने त्यांच्या जवळ येतात. एखादा प्राणी आजारी झाल्यास पू. आबा उपाय करून त्याला बरेही करतात.

 

१०. साधनेचे खडतर प्रयत्न जिद्दीने करणे

ईश्वरपूर येथील संभोआप्पा मठात कार्तिक पौर्णिमा या दिवशी यात्रा असते. या यात्रेच्या १५ दिवसांच्या कालावधीत पू. आबा ‘वळू’ (देवाच्या दरबारात सेवा करणे) म्हणून मठात थांबून तिकडच्या सेवा करायचे. ते त्या कालावधीत घरीही येत नसत. ते साधनेचे असे खडतर प्रयत्न जिद्दीने करत असत.

 

११. संपर्कातील व्यक्तींना अध्यात्माविषयी सांगणे

अ. पू. आबांना कुणीही भेटले, तरी ते त्यांना अध्यात्माविषयी सांगतात. ते भेटलेल्या व्यक्तींना ‘अध्यात्मातील विविध गोष्टी सांगून ‘आपला हिंदु धर्म किती श्रेष्ठ आहे !’, हे पटवून देतात.

आ. ‘पू. आबा ९० वर्षांचे आहेत, तरीही ते प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि आंतरिक भावाने समोरच्या व्यक्तीला सांगतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्या आत्मसात् होतात, तसेच त्यांच्या मनातही जातात’, असेही जाणवते.

 

१२. ‘स्वतःच्या अडचणी परमेश्वर सोडवणार आहे’, असा भाव असणे आणि इतरांच्या अडचणी ऐकून त्यांना मार्गदर्शन करणे

‘पू. आबांना कितीही अडचणी आल्या, तरीही ते इतरांना कधीच सांगत नाहीत. ‘स्वतःला आलेल्या अडचणी परमेश्वर सोडवणार आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे ते स्वतःच्या अडचणींचा विचार कधीच करत नाहीत. ते देवाच्या अनुसंधानात रहातात आणि इतरांच्या अडचणींचा विचार करून त्यांना मार्गदर्शन करतात.

 

१३. कष्टाची कामे करणे

घरची स्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुष्कळ कष्टाची कामे करावी लागली; पण त्यांच्या तोंडवळ्यावर कष्ट केल्यामुळे ताण किंवा थकवा कधीच दिसत नसे. तेव्हाही ते आनंद अनुभवायचे. ते ट्रकमधील वाळू उतरवणे, ट्रकमध्ये वाळू भरणे इत्यादी कामे करायचे. ते ‘इतरांच्या शेतातील कामे करणे, शेताची देखभाल करणे’, असे सर्व करत असल्यामुळे शेतमालकाला त्याकडे लक्ष द्यावे लागत नसे. त्यामुळे त्यांनाही पू. आबांचा आधार वाटायचा. ‘शेतात पीक कोणते आणि कसे लावायचे ? त्याची काळजी कशी घ्यायची ? उत्पन्न कसे काढायचे ?’, हे सर्व निर्णय शेतमालक पू. आबांना विचारूनच घेत असत. शेतमालकाने त्यांच्याकडे कधी नोकर म्हणून पाहिले नाही. ते पू. आबांना घरातीलच एका सदस्याप्रमाणे वागणूक द्यायचे.

 

१४. साधनेने एका व्यक्तीवरील करणी नष्ट करणे

पू. आबा नामजपादी उपाय करून काही जणांना मार्गदर्शनही करत असतात. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘करणीमधील ‘मूठ मारणे’ हा प्रकार माझ्या लक्षात आल्यावर मी ती करणी हवेतून जात असतांना थांबवली आणि साधनेच्या साहाय्याने नष्ट केली. तिच्यामुळे पुढे एका व्यक्तीची मोठी हानी होणार होती. तसे व्हायला नको; म्हणून मी ती करणी नष्ट केली. करणी उलटवता येते. करणी उलटवली, तर ती ज्यांनी केली होती, त्याला त्रास होऊ शकतो. दोघांनाही त्रास व्हायला नको; म्हणून मी करणीचा त्रास मध्येच संपवला.’’

 

१५. इस्लामपूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे

ईश्वरपूर येथील ‘इस्लामपूर अर्बन बँक’ या अधिकोषाच्या इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ प.पू. भक्तराज महाराज यांच्या हस्ते झाला होता. त्या वेळी पू. आबा त्या अधिकोषाचे सदस्य म्हणून तेथे उपस्थित होते. तेव्हा त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. रवींद्र बोरकर हे त्या अधिकोषाचे उपाध्यक्ष होते. तेही पू. आबांचे चांगले मित्र होते.

 

१६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची झालेली प्रथम भेट !

१६ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. आबा यांची दैवी भेट होणे अन् त्या वेळी ‘भक्त गुरूंना आणि गुरु भक्ताला अनेक जन्मांनंतर भेटत आहे’, असे वाटणे

पू. आबांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी ते दोघे बोलत असतांना मला वाटत होते, ‘भक्त गुरूंना आणि गुरु भक्ताला अनेक जन्मांनंतर भेटत आहेत. भगवंताच्या मागील अवतारी कार्यानंतर कलियुगातील या अवतारी कार्यात एकमेकांची परत भेट घडून आली आहे.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. आबा यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्या दोघांमध्ये फार पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे आनंदात संवाद चालू होता. त्या वेळी मला संत तुकाराम महाराज यांचा ‘सापडलो एकामेकां ।’, हा अभंग आठवला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नियोजित वेळेनुसार भगवंताचे कार्य होत असते आणि ते पुढेही जात असते. हे भगवंताचे नियोजन असते आणि त्या नियोजनानुसार प्रत्येक गोष्ट जुळून येते अन् तसे घडते. त्याचा कार्यकारणभाव भगवंत आपल्यासमोर योग्य वेळ आल्यावर प्रगट करतो.’

१६ आ. पू. आबांचे संतत्व प्रकट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आतुर असणे आणि ती त्यांची उच्च कोटीची अवस्था असल्याचे जाणवणे

पू. आबांचे संतत्व प्रकट करण्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांनी ‘आपण त्यांचा सत्कार लवकर करूया’, असा निरोप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना देणे’, असा निरोप पाठवला. यातून लक्षात येते, ‘भक्ताचे संतत्व प्रकट करण्याची वेळ आल्यावर भगवंत सर्वांना आनंद देण्यासाठी आतुरलेला असतो. भगवंताची आतुरलेली स्थिती, म्हणजे त्याची उच्च कोटीची अवस्था असते.’

१६ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी भेटीच्या वेळी पू. आबा आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी काढलेले उद्गार !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘तुझ्या बाबांच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवते. त्यांच्या बोलण्यातही चैतन्य आहे. त्यांचे शब्द जरी वेगळे असले, तरी ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. त्यांच्या बोलण्यात सहजता आहे. त्यांचा एकेक शब्द महत्त्वाचा आहे. ते एकेक विचार देवाशी जोडतात. हे ते कुठे शिकले ? त्यांच्या जीवनावर एक ग्रंथ होईल.’’

२. परात्पर गुरु डॉक्टर कुटुंबियांना म्हणाले, ‘‘तुम्ही वडिलांची सेवा करता. यातूनच तुमची साधना होणार आहे. शंकरची आध्यात्मिक प्रगती लवकर का होत आहे ?’, हे आता मला समजले.’’

३. परात्पर गुरु डॉक्टर पू. आबांना म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे त्याची (श्री. शंकर नरुटे यांची) आध्यात्मिक प्रगती लवकर होत आहे.’’

१७. संतपदी विराजमान होणे

१३.३.२०२२ या दिवशी पू. आबा संतपदी विराजमान झाले.

१७ अ. पू. आबा संतपदी विराजमान झाल्यावर ‘आरंभापासूनच ईश्वर त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे’, हे लक्षात येणे

पू. आबांच्या योग्य आचरणामुळे आणि त्यांनी ‘प्रत्येक सेवा ईश्वराने दिली आहे’, या भावाने केल्यामुळे त्यांचे कर्म चांगले झाले. ‘कर्मफलन्यायानुसार भगवंतही त्यांच्या समवेतच असतो’, हे यावरून लक्षात येते. ‘प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते’, हा त्यांचा भाव असल्यामुळे त्यांच्या मनात सुख-दुःखाचे विचार नसून ते सतत आनंदी असतात. पू. आबा संतपदी विराजमान झाल्यावर उलगडा झाला की, आरंभापासूनच ईश्वर त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे.

१७ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आबांचे संतत्व समाजासमोर प्रकट करून त्यांच्या साधनाप्रवासाला गती दिली’, असे जाणवणे

पू. आबांनी प्रत्येक कृती देवाला समवेत घेऊन केल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपातील भगवंताने त्यांचे संतत्व जाणले आणि ते समाजासमोर प्रकट केले. पू. आबांमधील संतत्व कोणाला जाणता आले नाही. ते केवळ भगवंतच जाणू शकतो. भगवंत भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणतो. त्याची कृपादृष्टी एखाद्या जिवावर पडली की, त्या जिवाचा आतापर्यंतचा साधनाप्रवास जाणून त्याला पुढच्या साधनाप्रवासासाठी आशीर्वाद देणे, म्हणजेच गती देणे, हे भगवंताचे परम कर्तव्य असते. तेच परम कर्तव्य परात्पर गुरु डॉक्टरांनी केले.

१७ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आबांमधील संतत्व प्रगट केल्यावर त्यांची आंतरिक साधना जन्मापासूनच चालू असल्याचे लक्षात येणे

मी गेल्या २१ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तेव्हापासून मी ‘पू. आबांनी साधना करावी. त्यांचा सनातनशी परिचय व्हावा’, यासाठी प्रयत्न करत होतो; पण तो योग जुळून येत नव्हता. ‘त्यांची साधना चालू आहे. त्यांच्या संप्रदायानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार ते करत आहेत’, असे मला वाटत होते. खरेतर त्यांची आंतरिक साधना जन्मापासूनच होत होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे संतत्व प्रकट केल्यावर त्याविषयी माझ्या लक्षात आले. आतापर्यंत आमच्या घरी सनातनचे काही संत आणि साधक येऊन गेले. ‘पू. आबांची साधना चांगली चालू आहे’, हे सर्वांच्याच लक्षात येत होते.

१७ ई. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेल्या प्रथम भेटीतच पू. आबांनी सहजतेने बोलणे आणि त्यांची आंतरिक साधना चालू असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी जाणणे

पू. आबा परात्पर गुरु डॉक्टरांशी सहजतेने बोलले. पू. आबा म्हणाले, ‘‘यापूर्वी मी बाहेर कधी बोललो नाही.’’ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपादृष्टी पू. आबांवर पडल्यामुळे ‘त्यांची आंतरिक साधना कशी आहे ?’, ते त्यांच्या मुखातून बाहेर आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी ‘आबा संत आहेत’, असे सांगितले. खरेतर या वेळी पू. आबा प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांना भेटले; पण परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्टी सूक्ष्म रूपाने पू. आबांवर अनेक जन्मांपासून होती.

 

१८. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रथम भेटीनंतर पू. आबांच्या संदर्भात जाणवलेले पालट

१८ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे सांगणे

पू. आबा त्यांच्या संप्रदायाच्या ‘कलंकी केशव’ अवतारी कार्याविषयी सांगतात. परात्पर गुरु डॉक्टरांना ते कार्य आवडले. पू. आबांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य श्रीविष्णूच्या दशावतारांप्रमाणेच आहे’, असे पू. आबांच्या लक्षात आले. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे पू. आबा भेटीनंतर म्हणू लागले.

१८ आ. पू. आबांचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप चालू झाला.

१८ इ. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यापासून त्यांचा उत्साह वाढला. त्यांच्या तोंडवळ्यावरील भाव आणि चैतन्य यांत वाढ झाली.

१८ ई. पुराणातील कथा सांगणार्‍या पू. आबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर अध्यात्माविषयी बोलणे : पू. आबा आतापर्यंत पुराणातील कथा सांगत होते; पण परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘हा देह नाशवंत आहे. भगवंताने हा देह साधना करण्यासाठी दिला आहे. जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत ‘त्याची सेवा करणे, म्हणजे प्रतिदिन अंघोळ करणे, जेवणे, इतर सगळ्या गोष्टी करणे’, हे सर्व साधना म्हणून नियमित करणे आणि देहाची काळजी घेणे’ हीसुद्धा सेवाच आहे.’’

 

१९. पू. आबांविषयी जाणवलेली अन्य सूत्रे

अ. ‘पू. आबांची साधना भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांनुसार चालू आहे’, असे वाटते. त्यांच्याकडून घडणारे कर्म योग्यच असते.

आ. पू. आबांकडे पाहिल्यावर त्यांच्यातील भाव जाणवतो. त्यांचा तोंडवळा निरागस वाटतो.

इ. त्यांच्या त्वचेवर चैतन्याचे वलय असल्यासारखे जाणवते.

ई. ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटते.

उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार पू. आबा नामजप करतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे.’

– श्री. शंकर नरुटे (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२)

 

२०. उतारवयातही उत्तम आरोग्याची दैवी देणगी लाभलेले पू. राजाराम नरुटे (वय ९० वर्षे) !

१. ‘पू. आबा ९० वर्षांचे आहेत. या वयातही त्यांची प्रकृती चांगली आहे.

२० अ. सतत कार्यरत असणे

पू. आबा कधीही झोपून रहात नाहीत. ते सतत काहीतरी करत रहातात. आम्हाला ते नेहमी सांगत, ‘‘शरिराला व्यायाम मिळाला पाहिजे.’’ त्याप्रमाणे ते स्वतः करतात; म्हणून त्यांची शारीरिक स्थिती चांगली आहे.

२० आ. डोळ्यांनी व्यवस्थित दिसणे आणि कानांनी नीट ऐकू येणे

पू. आबांना अजूनही डोळ्यांनी चांगले दिसते. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे किंवा अन्यही वाचन सहजतेने करू शकतात. त्यांना कानांनीही नीट ऐकू येते. कुणी हळू आवाजात बोलले, तरी त्यांना सहज ऐकू येते.

२० इ. दात नसतांनाही हिरड्यांनी व्यवस्थित खाता येणे

पू. आबांचे ३० वर्षांपूर्वीच सर्व दात काढले आहेत, तरीही ते नेहमीचे जेवण व्यवस्थित जेवतात. दात नसणार्‍या व्यक्तीला पदार्थ मऊ करून द्यावे लागतात; पण पू. आबांचे तसे नसते. पू. आबा जे आहे, ते खातात. त्यांच्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्यांच्या हिरड्याही मजबूत झाल्या आहेत आणि त्या दातांचे काम करतात.

२० ई. पू. आबांनी काठीचा आधार न घेणे आणि आयुष्यभर पायांत पादत्राणे न घातल्याने त्यांचे पाय घट्ट होणे

पू. आबा काठीचा किंवा ‘वॉकर’चा आधार घेत नाहीत. त्यांनी कधीच पायांत पादत्राणे घातली नाहीत. ते शेतात जातांनाही पादत्राणांचा वापर करत नाहीत. त्यांचे पाय माती आणि खड्डे यांतून चालून इतके घट्ट झाले आहेत की, त्यांच्या पायांत एखादा काटा मोडणे कठीण जाते. यातून त्यांची ‘जिद्द आणि चिकाटी’, हे गुण दिसून येतात. पू. आबा ‘आहे त्या स्थितीत देवाने दिलेल्या अवयवांचा वापर करून त्यांची क्षमता वाढवतात; म्हणून त्यांना बाह्य गोष्टींचा आधार लागत नाही’, असे यातून लक्षात येते.’

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment