कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा उपयोग – एक शास्त्रीय आधार

यज्ञयागावर आगपाखड करणारे
‘कृत्रिम पावसासाठी यज्ञाचा उपयोग होतो’,
याविषयी कथित पुरो(अधो)गामी काही बोलणार का ?

 

१. पाऊस पडण्यासाठी ग्रामीण भागात अशास्त्रीय कृती केल्या जाणे

शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील. दुष्काळामुळे जनावरांचेही हाल होतील. ती कशी जगवायची ? कि पशूवधगृहात पाठवायची ? असे अनेक प्रश्न उभे रहातात. वर्षात दोन ते अडीच मास पडणारा पाऊस न्यून झाला किंवा तो अधिक झाला, तरी समस्या असतेच. पावसाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. बऱ्याचदा पेरणी होते, पीक उगवून येते आणि पाऊस दडी मारतो. पेरणी वाया जाते.

मोसमी पावसाने दडी मारल्यानंतर पावसासंदर्भातील अनेक अंधश्रद्धांना ऊत येतो. भोळाभाबडा शेतकरी काही वेळा अंधश्रद्धांना बळीही पडतो. पाऊस पडण्यासाठी कोण गाढवांची लग्ने लावतो, तर कोण बेडकांची लग्ने लावतो. काही ठिकाणी कौल लावण्याचीही पद्धत आहे. काळ्या घोड्याला किंवा मेंढीला गावातून हाकतात. ते पळत असतांना जर त्यांनी मूत्र विसर्जन केले, तर पाऊस पडतो, असे मानले जाते. अशा अनेक प्रथा आजही प्रचलित आहेत; कारण पावसाचा अनियमितपणा सर्वांनाच भेडसावतो आहे. त्यामुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेली व्यक्ती मग अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. अशा कृती केल्यामुळे खरंच पाऊस पडतो का ? याला काहीही शास्त्रीय आधार नाही. अशा अनेक अंधश्रद्धा ग्रामीण भागात पहायला मिळतात. यात अनेकांचे बळीही जातात.

 

२. ‘पर्जन्ययाग’ केल्याने पाऊस पडणे

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. यजुर्वेदात ‘कारीरी इष्टी’नामक यज्ञ सांगितला आहे. पुरातन काळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे. याला शास्त्रीय आधारही आहे.

तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १३५

अर्थ : तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. यज्ञामध्ये आंबा, वड, पळस, पिंपळ, जांभूळ, उंबर अशा चिक निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या वापरल्या जात. यामध्ये मीठ, नवसागर टाकले जायचे. याला ‘पर्जन्ययाग’ असे म्हटले जाते. यामुळे पाऊस पडतो.

 

३. पर्जन्ययागामुळे होणारी रासायनिक प्रक्रिया आणि त्यामुळे कृत्रिम पाऊस पडणे

काही वर्षांपूर्वी डॉ. राजा मराठे यांनी ‘वरुणयंत्रा’चा प्रयोग याच शास्त्रीय आधारावर महाराष्ट्रात राबवला होता. ढगाळ वातावरणाच्या काळात हा यज्ञ करून पाऊस पाडण्यात आला. साधे मीठ ८०४ अंश सेल्सिअसला वितळते, तर १ सहस्र ४७५ अंश सेल्सिअसला उकळते. यज्ञामध्ये मीठ टाकल्यानंतर ते वितळते. वितळलेले हे बाष्पीभूत मीठ तीव्र ज्वालेमुळे आकाशात जाते. वातावरणात या मिठाचा मुक्त संचार होतो. उष्ण ढगापर्यंत हे आयर्न पोचल्यानंतर त्या ढगांचे पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडतो. असे हे रासायनिक समीकरण आहे. पूर्वीच्या काळातील यज्ञ हे अशाच रासायनिक अभ्यासावर आधारलेले होते. ‘यज्ञामुळे पाऊस पडतो’, याला असा शास्त्रीय आधार आहे. चीनमध्ये ‘डॉपलर रडार’चा (पाऊस, अतीवृष्टी, गारपीट आणि हवामान यांची खात्रीशीर माहिती अन् अचूक अंदाज देणारी आपत्कालीन यंत्रणा) वापर करून कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. सध्या असे अनेक प्रयोग विकसित केले जात आहेत.

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, ‘इये मराठीचिये नगरी’ संकेतस्थळ (साभार : ‘इये मराठीचिये नगरी’)

Leave a Comment