यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

Article also available in :

यज्ञ (प्रतीकात्मक छायाचित्र)

उज्जैन (मध्यप्रदेश) – यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा या दोन ठिकाणी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून यज्ञाचा मनुष्य आणि परिसर यांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले.

या वेळी जबलपूर येथून आलेले प्रकाश मूरजानी, उज्जैनच्या यज्ञाचार्य माधुरी सोलंकी, याज्ञिकशास्त्राच्या संशोधक नीति टंडन यांनी प्रतिदिन यज्ञयाग होणारे शक्तीपीठ, तसेच दाट लोकवस्ती, वाहतूक, आवाज आणि अन्य प्रकारचे प्रदूषण असणारी धर्मशाळा या दोनही ठिकाणी त्यांच्याकडील आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने परीक्षण केले.

 

१. यज्ञशाळा आणि गोशाळा हे सर्वांत सकारात्मक !

‘ऑरा स्कॅनर’च्या साहाय्याने परीक्षण करताना कार्यकर्ते

शक्तीपिठामध्ये ‘ऑरा स्कॅनर’च्या साहाय्याने सर्वप्रथम वातावरणाचे परीक्षण करण्यात आले. हे यंत्र कोणत्याही वस्तूची प्रभावळ म्हणजेच ‘ऑरा’चे मापन करू शकते. तेव्हा यज्ञशाळा आणि गोशाळा येथे सर्वाधिक प्रभावळ (ऑरा) आढळून आली. अन्य ठिकाणच्या परीक्षणांमध्ये ही प्रभावळ अत्यल्प होती.  शक्तीपिठाच्या ठिकाणी प्रतिदिन यज्ञयाग होतात. त्यामुळे तेथील प्रभावळ अधिक असल्याचे लक्षात आले. गोशाळेच्या ठिकाणी केलेल्या परीक्षणामध्ये ‘ऑरा यंत्रा’चा संकेतांक ३६० अंश दिसून आला. यावरून गोशाळेच्या परिसरात सर्वाधिक सकारात्मक वातावरण असते, हे समोर झाले. (यातून हिंदूंना पूज्य असणार्‍या गायीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते ! ‘गायीमध्ये ३३ कोटी देवता असतात’, या हिंदूंच्या श्रद्धेला विज्ञानानेही होकारच दिल्याचे यातून स्पष्ट होते. – संपादक)

 

२. यज्ञामुळे मनुष्याचा तणाव न्यून होणे !

संशोधनाचा एक भाग म्हणून धर्मशाळा आणि शक्तिपीठ या दोन्ही ठिकाणी यज्ञ करण्यात आले. ‘हॅपीनेस इंडेक्स मीटर’ नावाच्या यंत्राच्या साहाय्याने यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर तेथे उपस्थित लोकांच्या तणावाची पातळी मोजण्यात आली. या यंत्राच्या साहाय्याने मनाची शांती आणि स्थिरता या स्थितींचे मापन केले जाते. यज्ञापूर्वी ज्या लोकांच्या तणावाची पातळी अधिक होती, त्यांच्या तणावाच्या पातळीमध्ये यज्ञानंतर घट झाल्याचे दिसून आले. धर्मशाळेच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगात १० पैकी ९ जणांच्या तणावाची पातळी न्यून झाल्याचे आढळून आले. यावरून यज्ञ केल्याने लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो, हे सिद्ध झाले.

 

३. यज्ञामुळे प्रदूषणाची पातळी न्यून होणे !

धर्मशाळेच्या परिसरात यज्ञापूर्वी प्रदूषण अधिक प्रमाणात होते. ‘एअर वेदा’ या यंत्राच्या साहाय्याने ‘पीएम् २.५’, ‘पीएम् १०’ आणि ‘कार्बन डायऑक्साईड’ या घातक वायूंची पातळी यज्ञापूर्वी अन् यज्ञानंतर मोजण्यात आली. दोनही ठिकाणी यज्ञानंतर या तिन्ही गोष्टींची पातळी न्यून झाल्याचे लक्षात आले. यावरून यज्ञामुळे प्रदूषण न्यून होत असल्याचे सिद्ध झाले. ‘एअर वेदा’ हे यंत्र हवेतील विविध वायू घटकांचे मोजमापन करू शकते.

 

४. यज्ञामुळे वातावरणातील घनत्व न्यून होणे

धर्मशाळेेच्या ज्या खोलीत प्रयोग करण्यात आले, तेथे यज्ञापूर्वी प्रदूषणाचे घनत्व अधिक होते. यज्ञाच्या वेळी ते वाढले आणि यज्ञाच्या एका घंट्यानंतर ते जलद गतीने न्यून झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment