मनुष्याच्या तमोगुणी समष्टी कर्मामुळे यज्ञकर्माचा समाजाला अपेक्षित लाभ होत नाही, यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

मनुष्याच्या चांगल्या किंवा दूषित समष्टी कर्मामुळे अनुक्रमे पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळतो किंवा कोप ओढवतो. त्यानुसारच पर्जन्यवृष्टी होत असते आणि सध्या मनुष्याने स्वतःच्या कर्माने आपत्काल ओढवून घेतला असल्याने तोच त्रासदायक शक्तींच्या आकारातील ढगांच्या रूपाने आपल्याला दिसत असतो.

 

१. मनुष्याच्या समष्टी कर्माचा वातावरणावर इष्ट-अनिष्ट परिणाम होणे

खरंच, मनुष्याच्या समष्टी कर्माचा वातावरणावर इष्ट-अनिष्ट परिणाम होत असतो. विदेशातील लोकांचे कर्म सर्वसाधारणपणे तमोगुणी असल्याने वातावरणही तेवढ्याच प्रमाणात तामसिक बनत असते.

 

२. वातावरण शुद्धतेसाठी यज्ञकर्म आवश्यक असणे

वातावरण शुद्धतेसाठीच यज्ञकर्मांचे प्रयोजन केलेले आहे. यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते. तेव्हा जनता जनार्दनच समाजाचे हित पहात असतो, जपत असतो. यज्ञकर्मामुळे निर्माण झालेली वातावरणातील दैवी स्पंदने एखाद्या माऊलीसारखी ‘समाज’ नावाच्या बाळाला सांभाळत असतात.

 

३. वातावरणातील दैवी स्पंदनांच्या प्रभावामुळे पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळणे शक्य होणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

वातावरणातील या दैवी स्पंदनांच्या अनुकूलतेमुळेच मनुष्याला पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य झाल्याने वरुणदेवता आणि अग्निदेवता यांचेही आवश्यक ते पाठबळ प्राप्त होते. वरुणदेवतेच्या आशीर्वादामुळे वेळेवर पर्जन्यवृष्टी होते. तसेच अग्निदेवतेच्या आशीर्वादामुळे मनुष्याचे आरोग्य निकोप रहाते. अग्निदेवतेचा आशीर्वाद वेळोवेळी वातावरणातील दूषित विषजंतूंना नष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतो. त्यामुळे वातावरणात साथीचे रोग पसरणे किंवा गंभीर रोगांचा प्रादुर्भाव होणे, असे घडत नाही. यामुळेच मनुष्याचे कर्म योग्य हवे.

 

४. दूषित समष्टी कर्माच्या प्रभावामुळे पंचमहाभूतांचा कोप ओढवणे

दूषित समष्टी कर्माच्या प्रभावामुळे पंचमहाभूतांचा कोप ओढवून घेण्यास मनुष्य कारणीभूत ठरतो. यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी, रोगराई, पृथ्वीतत्त्वाच्या कोपामुळे भूकंप अशा आपत्ती ओढवतात.

 

५. यज्ञाने वातावरणातील दूषित स्पंदने नष्ट झाली,
तरी हे दैवी वातावरण आपल्या भावपूर्ण आचरणाने टिकवणेही मनुष्याच्याच हातात असणे

यज्ञाने वातावरणातील दूषित स्पंदने नष्ट झाली, तरी हे दैवी वातावरण आपल्या भावपूर्ण आचरणाने टिकवणेही मनुष्याच्याच हातात असते, नाहीतर ‘दैव देते आणि कर्म नेते’, अशी मनुष्याची अवस्था होते. त्यामुळे यज्ञाचा वातावरणावर झालेला परिणाम तात्कालिकच ठरतो.

 

६. पूर्वीच्या काळी माणसांचे कर्मच जणुकाही यज्ञासारखे
असल्याने आणि सर्व जणच धर्माधिष्ठित असल्याने पाऊस वेळेवर पडणे

पूर्वीच्या काळी माणसांचे कर्मच जणूकाही यज्ञासारखे असल्याने आणि सर्व जणच धर्माधिष्ठित असल्याने पाऊस वेळेवर पडत होता; परंतु आता मात्र मानव धर्माचरणाला मुकल्याने मानवावर सर्वाधिक आपत्ती ओढवतांना दिसत आहेत.

७. ज्या राज्यात सर्वाधिक रज-तम असते, तेथील
आकाशात जमा झालेल्या ढगांचे आकारही त्रासदायक शक्तींसारखेच दिसणे

ज्या राज्यात सर्वाधिक रज-तम असते, तेथील आकाशात जमा झालेल्या ढगांचे आकारही त्रासदायक शक्तींसारखेच दिसतात. जसे कर्म, तसे प्रतिबिंब असते. आपल्या समष्टी कर्माचे प्रतिबिंब या विशालकाय असणार्‍या आकाशात उठत असते. सध्या आकाशात त्रासदायक शक्तींसारखेच ढग दिसण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आपल्या लक्षात येईल. (परात्पर गुरु डॉक्टरांनी एका मासिकातील त्रासदायक शक्तींसारखे आकार तयार झालेल्या ढगांची छायाचित्रे मला दाखवली होती. – (सद्गुरु) सौ. गाडगीळ)

 

८. मनुष्याने स्वतःच्याच कर्माने ओढवून घेतलेला आपत्काल त्याला आपल्या
डोक्यावरच निर्माण झालेल्या त्रासदायक शक्तींच्या आकारातील ढगांच्या रूपाने दिसणे

यातूनच कळते की, मनुष्याने स्वतःच्याच कर्माने आपत्काल ओढवून घेतला आहे. आपल्या डोक्यावरच त्रासदायक शक्तींच्या आकारातील ढगांच्या रूपाने आपल्याला तो दिसत आहे. ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः ।’ या नियमाप्रमाणे मनुष्य अंदाधुंदपणे वागत चालला आहे. याचा अनिष्ट परिणाम वातावरणावर होऊन एकप्रकारे पंचमहाभूतांच्या कोपालाच आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

 

९. वातावरणातील यज्ञाची दैवी स्पंदने टिकवण्यासाठी मनुष्यकर्मही सात्त्विक हवे !

पंचमहाभूतांचा कोप टाळायचा असेल, तर मनुष्याने धर्माचरण करणे आवश्यक आहे. तरच यज्ञकर्माचा १०० टक्के लाभ होऊ शकतो. निवळ ‘यज्ञ केले आणि समाजहित साधले’, असे होऊ शकत नाही; कारण यज्ञाची दैवी स्पंदने टिकवण्यासाठीची सात्त्विकता तरी मनुष्यकर्मात निर्माण व्हायला हवी, तरच आपत्ती येण्यापासून मनुष्य वाचू शकतो.

 

१०. पंचमहाभूतांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागणार असल्याची सध्या चिन्हे असणे

‘यज्ञ सर्व साधून देतो आणि आपण आपल्या कर्माने घालवतो’, असे सध्या चालू आहे. हे पालटण्यासाठी मुळावरच घाव घालणे आवश्यक आहे, म्हणजेच मनुष्याची वाईट वृत्ती पालटून त्याला साधनेला लावणे आवश्यक आहे, नाहीतर पंचमहाभूतांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागणार आहे. यात संदेह नाही.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२.६.२०१७, सायं. ५.३६)       

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment