‘यज्ञसंस्कृती’चे पुनरुज्जीवन करणारे मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

Article also available in :

‘इहलोकात, म्हणजे पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठीच श्रीमन्नारायणा, तू जन्म घेतलास. ‘भगवान सदाशिवाकडून ज्ञान, तर जनार्दनाकडून मोक्ष प्राप्त होतो’, या उक्तीप्रमाणे हे श्रीमन्नारायणा, तुला साधकांना मोक्षाला नेण्याची इतकी तळमळ आहे की, मानवाला अध्यात्माचे ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी या घोर कलियुगात तू ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ स्थापन केलेस. ‘गुरुकृपायोगा’त ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या सर्वच साधनामार्गांचा अंतर्भाव होतो. साधकांमध्ये परिपूर्णता येण्यासाठी नाम, यज्ञ, ध्यान, ज्ञान या सर्वच साधनांचे व्यापक आणि सखोल ज्ञान गुरुदेवा, तुम्ही या कलियुगातही देत आहात. तुम्ही साधकांना तात्त्विक आणि प्रायोगिक अशी दोन्ही अंगे शिकवून कलियुगातही साधकांची चारही युगांची साधना करून घेत आहात अन् त्यांना पूर्णत्वाला नेत आहात. त्यासाठी सनातन धर्माचे महत्त्वाचे आणि अविभाज्य अंग असलेल्या ‘यज्ञसंस्कृती’चे तुम्ही पुनरुज्जीवन करत आहात. यासाठी अखिल मानवजात तुमची ऋणी असून आम्ही साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
यज्ञाचा संकल्प करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. लोप पावलेली यज्ञसंस्कृती

यज्ञसमाप्तीनंतर दर्शन घेतांना मध्यभागी १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्, प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) माई (लक्ष्मी) नाईक (वर्ष २०१६)

 

२. यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन

सनातन संस्थेच्या वतीने नोव्हेंबर २०१९ पर्यंत २२० यज्ञ करण्यात आले. हे सर्व यज्ञ पहाण्याचे आणि यज्ञस्थळी नामजप करायला बसण्याचे भाग्य रामनाथी आश्रमातील साधकांना प्राप्त झाले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, काही संत आणि पुरोहित साधक यांना यज्ञ करण्याचे भाग्य लाभले. यातून साधकांना यज्ञाविषयी नवीन अमूल्य असे तात्त्विक अन् प्रायोगिक (अनुभवजन्य) ज्ञान मिळाले. त्यांना यज्ञाचे लाभ आणि परिणाम अनुभवता आले. ‘आपण जे वाचतो, ते आपण विसरू शकतो; पण आपण जे पहातो किंवा अनुभवतो, ते आपल्या कायमचे स्मरणात रहाते’, या न्यायाने साधकांना या यज्ञ-यागांचे कधीच विस्मरण होणार नाही.

 

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. संकल्पाचे महत्त्व

यज्ञाचा संकल्प, म्हणजे उद्देश किंवा हेतू यांचा उच्चार करणे महत्त्वाचे असते. यज्ञाने देवता प्रसन्न होऊन आपला संकल्प सिद्धीस नेते. त्यामुळे आपले कार्य तडीस जाते किंवा पूर्ण होते. सनातन संस्थेच्या वतीने केलेले सर्व यज्ञ लोककल्याणाच्या हेतूने केले गेले. यज्ञाचे संकल्प ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांच्याकडून चांगली साधना व्हावी’, असे समष्टी कल्याणाचे होते.

३ आ. पूर्णाहुतीचे महत्त्व

प्रत्येक यज्ञात नकळतपणे काही अपूर्ण राहिले असेल, तर यज्ञ पूर्णत्वाला नेण्यासाठी त्या त्या देवतेला ‘पूर्णाहुती’ देतात. त्या वेळी श्रीफळ अर्पण करतात आणि यज्ञकुंडात तुपाची धार सोडतात.

३ इ. विष्णूचे त्रिवार स्मरण करण्याचे महत्त्व

यज्ञात काही त्रुटी राहिल्या असल्यास यज्ञ पूर्ण झाल्यावर देवाने आपल्याला क्षमा करावी आणि त्रुटी दूर होऊन यज्ञ पूर्णत्वाला जावा, यासाठी सर्वांनी विष्णूचे त्रिवार स्मरण करायचे असते.

३ ई. गुरुचरणी अर्पण करण्याचे महत्त्व

शेवटी सर्व कर्म ‘इदं न मम।’ म्हणजे ‘हे माझे नाही’, ते ईश्‍वरानेच केले; म्हणून त्याच्या चरणी ‘ब्रह्मार्पणमस्तु ।’ म्हणजे ‘हे सर्व ब्रह्मार्पण होवो’, असे म्हणून गुरुचरणी अर्पण करायचे असते, म्हणजे कर्मफलाचा त्याग करायचा असतो.

३ उ. गुरुकृपेचे महत्त्व

यज्ञात कितीही विघ्ने आली, तरी गुरुकृपेने त्यांचे निवारण झाले. महारुद्रयाग करतांना सूक्ष्मातून पुष्कळ विघ्ने आली. यज्ञस्थळी दाब वाढून सहस्रारचक्र ते अनाहतचक्रापर्यंत पुष्कळ दाब जाणवत होता. पुरोहितांना काही सुचत नव्हते. पुरोहितांना मंत्र म्हणणे अवघड जात होते. त्यानंतर पू. मुकुल गाडगीळकाकांनी नामजप केला. यज्ञस्थळी (आकाशतत्त्वाचे उपाय होण्यासाठी) सात खोके ठेवले. त्यांनी मंत्रजप केला. कर्नाटकातील विनय गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार दत्तगुरु आणि काळभैरव देवता यांना प्रत्येकी २ नारळ ठेवून प्रार्थना केली. त्यानंतर वातावरणातील दाब दूर झाला. वातावरणातील चैतन्य वाढले आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.

 

सनातनच्या आश्रमात पार पडलेले काही वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ आणि विधी

साग्निचित् अश्‍वमेध महासोमयाग : बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी वर्ष २०१२ मध्ये साग्निचित् अश्‍वमेध महासोमयाग केला. त्या वेळी १. परात्पर गुरु डॉ. आठवले, २. प.पू. नाना (नारायण) काळेगुरुजी, ३. वाजपेययाजी रघुनाथ काळेगुरुजी (वर्ष २०१२)
उच्छिष्ट गणपति यज्ञ : तंजावूर (तमिळनाडू) येथील १. प.पू. रामभाऊस्वामी यांनी ४९ वर्षे जलत्याग आणि योगसाधना करून तेजतत्त्वावर प्रभुत्व मिळवले आहे. त्यामुळे प्रज्वलित यज्ञकुंडात प्रवेश करूनही त्यांच्या शरिराला अपाय होत नाही. बाजूला कृतज्ञताभावातील २. परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २०१६)

 

सद्गुरूंची भावावस्था !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीचे आवाहन करून श्री यंत्रावर कुंकुमार्चन करण्यात आले. त्या वेळी भावावस्थेतील डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

 

ईश्‍वरप्राप्तीसाठी पौरोहित्य !

यज्ञात आहुती देतांना सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. चैतन्य दीक्षित, पाठशाळेचे संचालक ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी आणि श्री. सिद्धेश करंदीकर ! हे यज्ञ करतांना पुरोहित केवळ कर्म न करता ‘ईश्ववरप्राप्तीसाठी पौरोहित्य’ या भावाने सेवा अधिकाधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ! त्यांना वेळोवेळी सद्गुरूंचे अमूल्य मार्गदर्शन लाभते !
विष्णुयागाची पूर्णाहुती देतांना डावीकडून श्री. ईशान जोशी, श्री. अमर जोशी, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून यागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी दैवी द्रव्य स्रवले. ते अमूल्य चरणतीर्थ संग्रहित करण्यासाठी त्यांच्या पावलांखाली ताट ठेवण्यात आले होते.

अ. ईश्‍वरेच्छेने आणि उन्नतांच्या मार्गदर्शनानुसार केलेले यज्ञ

हे सर्व यज्ञयाग महर्षींच्या आज्ञेने, परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने अन् अधिकारी व्यक्ती आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार झाले. त्यामुळे ते परिपूर्ण आणि परिणामकारक ठरले, उदा. पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या वेळी प.पू. दास महाराज यांचे, अश्‍वमेध यज्ञाच्या वेळी अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे, उच्छिष्ट गणेशयागाच्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी यांचे, तर पंचमहाभूतांच्या देवतांसाठी केलेल्या यज्ञाच्या वेळी प.पू. आबा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभून हे यज्ञ दिव्य लोकात होत असल्याचे अनेक साधकांनी अनुभवले. ‘विविध राज्यांतील (महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यांतील) संतांच्या मार्गदर्शनानुसार झालेले हे यज्ञ पहातांना हे सर्व संत म्हणजे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या यज्ञशाळेतील प्राध्यापक आहेत’, असा विचार येऊन मला आनंद झाला.

आ. सनातन वैदिक धर्मात अनेक देवता असण्यामागील परिपूर्ण शास्त्रीय आणि प्रगल्भ दृष्टीकोन समजणे

रामनाथी आश्रमात विविध देवतांसाठी यज्ञ झाले. श्री महासुदर्शनयाग, श्री बगलामुखी यज्ञ, महाचंडी याग, महारुद्रयाग, श्री त्रिपुरसुंदरीललिताअम्बा यज्ञ, श्री राजमातंगी देवी याग, पंचमहाभूततत्त्व याग, ऋषीयाग, गरुडपंचाक्षरी यज्ञ, पितृयज्ञ, श्री अर्कगणपति यज्ञ, श्री धन्वंतरि यज्ञ, पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ, श्री उग्रप्रत्यंगिरा याग, अश्‍वमेध यज्ञ, असे अनेक यज्ञ साधकांनी पाहिले आणि अनुभवले.

इ. प्रत्येक देवतेचे कार्य वेगळे असणे

१. रुद्र : अमंगलाचा (अशिवाचा) संहार (लयाची देवता)

२. वरुण : पर्जन्याची देवता इत्यादी.

३. एका देवतेच्या विविध मुखांचे कार्यही वेगवेगळे आहे, उदा. हनुमंताच्या ५ मुखांचे कार्य पुढीलप्रमाणे आहे

३ अ. कपि : शत्रूसंहार

३ आ. नरसिंहमुख : भूतप्रेतसंमंध यांची बाधा आणि ब्रह्महत्येचे पाप निवारण करणे

३ इ. गरुडमुख : विषबाधा निवारण

३ ई. वराहमुख : पुत्र-पौत्र (वंशवृद्धी) आणि संपत्ती प्रदान करणे

३ उ. हयग्रीवमुख : वेदविद्या आणि धर्मप्रचार.

यज्ञामुळे या कार्याची जाणीव झाली. सनातन वैदिक धर्मात अनेक देवता असण्यामागील परिपूर्ण शास्त्रीय दृष्टीकोन समजतो.

 

सनातन संस्थेच्या साधकांनी केलेल्या यज्ञांची वैशिष्ट्ये

यज्ञस्थळी रेखाटण्यात आलेली हनुमान तत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी

१. देवाने साधकांकडून द्वापर युगातील साधना करून घेणे

विविध देवता, त्यांचे कार्य, त्यांचा गायत्रीमंत्र, देवतांचे बीजमंत्र, हविर्द्रव्ये, हवनांची संख्या, हवन आणि ध्यान यांचा मंत्र, यज्ञकुंडांचे प्रकार, देवाच्या पूजेची अंगे (षोडषोपचार पूजा) मांडणी, फुलांची सजावट, रांगोळ्या, पुरोहित वर्ग आणि यजमानांच्या वस्त्रांचे (सुती किंवा रेशमी सोवळ्यांचे) रंग या सर्व गोष्टींचे प्रायोगिक (प्रत्यक्ष) ज्ञान देऊन देवाने साधकांना शिकवले, घडवले आणि सर्वांकडून द्वापरयुगातील साधना करून घेतली. ‘हे सर्व पहात असतांना आपण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आरंभीचे विद्यार्थी असून आपली पहिली तुकडी आहे’, असा विचार येऊन मला पुष्कळ आनंद झाला. ‘पुढे सहस्रो वर्षे या यज्ञांच्या ध्वनीचित्र-चकती (सीडी) यज्ञशाळेत शिकणारे विद्यार्थी पहातील; पण ते यज्ञ आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत’, हा आनंद काही आगळा वेगळाच आहे.

२. यज्ञस्थळ आणि यज्ञस्थळी नामजप करायला बसलेले साधक यांच्यातील दुवा असलेले निवेदक

श्री. निषाद देशमुख, श्री. विनायक शानभाग आणि काही वेळा श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी ‘यज्ञस्थळी झालेली सूक्ष्मातील आक्रमणे, आलेल्या दैवी अनुभूती, वातावरणात झालेले पालट, शुभशकून, जाणवलेले त्रास, श्‍लोकांचे भावार्थ, काही पौराणिक संदर्भ, यज्ञ का आणि कुणी करायला सांगितला ?’ आदी सूत्रांवर निवेदन केले. निवेदक नसते, तर यज्ञाच्या संदर्भातील बरीच सूत्रे न कळल्याने ते कंटाळवाणे होऊ शकले असते. निवेदनामुळे साधकांना यज्ञाच्या संदर्भातील अनेक सूत्रांचे सहज आकलन होऊन त्यांत गोडी वाटू लागली. त्यासाठी गुरुदेवा, आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत.

३. ‘यज्ञसंकृती’च्या अमूल्य ठेव्याचे जतन

सनातन संस्थेची प्रत्येक कृती विश्‍वकल्याणासाठी धर्मसंस्थापना, तसेच जिवांचा उद्धार, म्हणजे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा उद्धार, या हेतूने केली जाते. त्यामुळे हा सर्व अमूल्य ठेवा ध्वनीचित्र-चकतीच्या (सी.डी.) रूपाने पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी जतन करून ठेवला आहे, तसेच आजच्या पिढीला कळावे; म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रातूनही यज्ञांचा सचित्र अन् विस्तृत वृत्तांत देण्यात आला.

४. यज्ञ पूर्ण झाल्यावर सर्वांना यज्ञस्थळी जाऊन यज्ञकुंड आणि देवता यांचे दर्शन घेता येणे

यज्ञ पूर्ण झाल्यावर सर्वांना यज्ञस्थळी जाऊन यज्ञकुंड आणि देवता यांचे दर्शन घेता येते. सनातन संस्थेत सर्वांनाच सर्व ज्ञान मुक्त हस्ते दिले जाते. येथे काहीही हातचे राखून ठेवत नाहीत. प्रत्येकाला याचा अनुभव येतोच.

 

यज्ञाचे लाभ

यज्ञाचे सूक्ष्म, तसेच स्थूल या स्तरांवर अनेक लाभ साधक, तसेच समाजातील व्यक्ती यांनाही झाले.

यज्ञीय ज्वाळेमध्ये दिसलेला ‘ॐ’

अ. तपश्‍चर्या (साधना) होणे

पुरोहित वर्ग, यज्ञकर्ते (यजमान) ध्वनीचित्रीकरण करणारे साधक आणि निवेदक यांची तपश्‍चर्या झाली.

आ. देवाने सर्व साधकांची क्षमता वाढवणे

पुरोहित वर्ग आणि यज्ञकर्ते साधक, संत आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पूजा, तसेच हवन करण्यासाठी कधी कधी ७ – ८ घंटे भूमीवर आसन घालून त्यावर मांडी घालून बसावे लागे. पुरोहित साधकांना मोठ्या स्वरात जलद गतीने सतत मंत्र म्हणावे लागायचे. यज्ञाच्या वेळी ८ घंटे सतत सेवा करूनही ‘कधी कुणी दमले, थकले किंवा कंटाळले आहेत’, असे जाणवले नाही. ‘यज्ञ झाल्यावर साधक अधिक उत्साही आणि कार्यक्षम झाले आहेत. ते भावावस्थेत, तसेच आनंदी आहेत’, असे जाणवत असे. यज्ञस्थळी नामजप करत चैतन्य ग्रहण करण्यासाठी बसलेले रुग्णाइत साधकही ७ – ८ घंटे आसंदीत बसून रहायचे.‘असे यज्ञ पुन्हा पहायला मिळणार नाहीत’, या श्रद्धेने देवाने सर्वांची क्षमता वाढवली.

इ. तेज वाढणे

‘यज्ञाच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू श्रीसूक्तात वर्णन केलेल्या महालक्ष्मीप्रमाणे सुवर्ण कांतीने आणि चैतन्याने झळाळत. तेव्हा साधकांचे डोळे दिपून जात असत.

ई. निरीक्षणक्षमता वाढणे

यज्ञातील धुराची दिशा, रंग, प्रमाण; अग्नीच्या ज्वालांचा रंग पिवळसर, लाल कि निळा आहे ? अग्नी प्रदिप्त आहे कि मंद आहे ? देवीच्या गळ्यातील पुष्पहाराची लांबी वाढली असून तो टवटवीत आहे, देवीच्या मुकुटावरचे फूल पडले आहे, वरुणदेवतेचा आशीर्वाद म्हणून पाऊस पडू लागला आहे इत्यादी गोष्टींविषयी कुणी न सांगताच सर्वांचे तसे निरीक्षण होऊ लागले.

उ. सूक्ष्मातील काही प्रमाणात जाणणे

‘चांगली स्पंदने जाणवतात. डोक्यावर दाब जाणवतो. हलकेपणा जाणवतो. चैतन्य जाणवते. त्रास होतो’, असे वातावरणातील पालट आणि संत पूर्णाहुतीसाठी आल्यावर चैतन्य अन् आनंद यांनी भारित झालेले वातावरण साधकांना ओळखता येऊ लागले.

ऊ. शुभशकुन-अपशकुन यांविषयी थोडा अभ्यास होऊन देवावरची श्रद्धा वाढणे

‘देवाच्या मूर्तीवरील फूल पडणे, देवतेच्या मूर्तीचे तेज वाढणे, पाऊस पडणे, सुगंध येणे, यज्ञस्थळी फुलपाखरे येणे हे सर्व शुभशकुन आहेत. याउलट देवाला ठेवलेल्या नारळाला तडे जाणे, दुर्गंध सुटणे, फुले कोमेजणे, यज्ञाचा अग्नी मंदावणे, हे अपशकुन आहेत’, असा अभ्यास झाला.

ए. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवी गुणांचे झालेले दर्शन

सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) अंजलीताई यांची यज्ञ आणि पूजा यांच्याशी असलेली एकरूपता (तन्मयता), सतत वर्तमानकाळात रहाण्याचे त्यांचे कौशल्य, त्यांचे दायित्व, मनाची स्थिरता, आज्ञापालन, भावावस्था; ईश्‍वराची शक्ती, आनंद आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता, त्यांत झालेली वाढ, त्यांचे तेज, तप, उत्साह आणि अथक कष्ट करूनही त्या कमळासारख्या टवटवीत असणे, आदी गुणांचे दर्शन साधकांना घडले. यज्ञाच्या वेळी सद्गुरुद्वयींचे महालक्ष्मीचे सौंदर्य, त्यांचे दैवी गुण आणि त्यांच्यात होणारे पालट प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य रामनाथी आश्रमातील साधकांना लाभले.

ऐ. वातावरणाची शुद्धी होणे

यज्ञामुळे वातावरणातील काळी शक्ती नष्ट झाल्यानेे वातावरणाची शुद्धी झाली.

ओ. प्रभावळीत वाढ होणे

‘यु.ए.एस्’ या उपकरणाने वस्तूंचे परीक्षण केल्यावर वस्तूंच्या प्रभावळीत वाढ झालेली आढळली.

औ. वातावरणातील सात्त्विकता वाढणे

वातावरणातील सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांत वाढ होऊन साधकांचे त्रास न्यून झाले.

अं. संस्कृतचा परिचय होणे

साधकांना देवभाषा संस्कृतचा परिचय होऊन त्यांना आध्यात्मिक लाभ झाला. काही बालसाधकांना श्‍लोक आणि आरत्या पाठ होऊन ते म्हणू लागले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment