नगर येथे हिंदु एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदू एकता दिंडी’ पार पडली !

नगर – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने नुकतीच शहरात ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. पद, पक्ष, संघटना, संप्रदाय हे बाजूला सारून केवळ ‘हिंदू’ म्हणून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले. ‘इस्कॉन’ संप्रदायाचे गिरीवरधारीदास प्रभु यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून आणि नंतर ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पमाळ अर्पण करून गांधी मैदान येथून दिंडीला प्रारंभ झाला. पौरोहित्य सर्वश्री उपेंद्र खिस्ती आणि नरेंद्र खिस्ती यांनी केले.

या दिंडीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात लाठीकाठी, दंडसाखळी, कराटे यांची प्रात्यक्षिके सादर झाली. तसेच राष्ट्रपुरुषांच्या यांच्या वेशभूषा केलेल्या आणि प्रभावी संदेश देणार्‍या बालकांचे पथक सहभागी झाले होते. ही दिंडी अर्बन बँक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळेरोड, चौपाटी कारंजा, प्रवर्धन चौक मार्गे गांधी मैदान येथे दिंडीचा समारोप झाला. शेवटी उपस्थितांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी संबोधित केले.

या दिंडीमध्ये वारकरी पथकाचे दायित्व ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी घेऊन ते स्वतः पूर्णवेळ उपस्थित होते. यामध्ये वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, स्वामी विवेकानंद समिती, महानुभवपंथ, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संप्रदाय, रेणुका भजनीमंडळ सारसरनगर, मळगंगा भजनीमंडळ शेवगाव, महाशिवरात्री उत्सव मंडळ सिव्हिल हडको, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ढोल ताशा आणि लेझीम पथक बाबुर्डी घुमट, ‘होय हिंदूच’ लाठीकाठी पथक अरणगाव, शिवप्रताप मित्रमंडळ जखणगाव, शिवप्रहार प्रतिष्ठान, बजरंग दल, वंदे मातरम् ग्रुप, व्यापारी महासंघ नगर, अखंड तोफखाना मंडळ, धर्मवीर युवा प्रतिष्ठान नालेगाव, हिंदु जनजागृती समितीचे रणरागिणी पथक, ‘ह.भ.प. फलके महाराज नवनाथ वारकरी शिक्षण संस्था निमवगाव वाघा’, प्रथमोपचार पथक, लेझीम पथक, इस्कॉन रथ हे सहभागी झाले होते. याचसमवेत ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी होते.

 

क्षणचित्रे

१. संत, क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष यांच्या वेशभूषेतील बालकांचे अनेकजण कौतुक करत होते.

२. अनेकांनी पालखीचे आणि ध्वजाचे दर्शन घेऊन पूजन केले.

३. रस्त्याच्या दुतर्फा अनेक लोक हात जोडून नमस्कार करत होते.

४. व्यापारी महासंघाने दिंडीसाठी पाणीवाटप केले.

५. दिंडी मार्गावरील दुकानांचे मालक आणि कर्मचारी बाहेर येऊन दिंडी पहात होते.

 

अभिप्राय

सर्वश्री अनंत होशिंग, शशिकांत भांबरे, ऋषिकेश धाडगे – सनातन संस्थेच्या वतीने काढलेल्या ‘हिंदू एकता दिंडी’च्या निमित्ताने नगरमधील वातावरण हिंदुमय झाले असल्याने समस्त हिंदु समाज आनंदित आहे. दिंडी पुष्कळच चांगली झाली.

 

पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत !

फेरीच्या मार्गात नवीपेठ या ठिकाणी ‘श्रीराम पुष्प भांडार’ यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. शाहू महाराज चौक, कापडबाजार या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच नेताजी सुभाष चौकात शिवसेना नगर शहराच्या वतीने दिंडीचे स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली. धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर चौक येथे दिंडीचे पूजन आणि तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांच्या जवळच्या नात्यात विवाह असूनही ते पूर्णवेळ दिंडीत सहभागी झाले होते. ‘विवाहाला पर्याय आहेत; पण दिंडीला नाही. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ या विचाराने त्यांनी दिंडीला महत्त्व दिले.

Leave a Comment