चिरंतन आणि अविनाशी सनातन !

Article also available in :

गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहे.

तमिळनाडूमधील ‘द्रमुक’ पक्षाचे (द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ) क्रीडामंत्री तथा मुख्यमंत्री पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन निर्मूलन परिषदे’त ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांसारखा असून त्याचे उच्चाटन व्हायला हवे’, असे अकलेचे तारे तोडले. त्यानंतर द्रमुक पक्षाचे तमिळनाडूतील खासदार ए.के. राजा, काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी, अभिनेते कमल हसन, अभिनेते प्रकाश राज यांच्यासम महानुभवी मंडळींनी उदयनिधी यांची ‘री’ ओढली. खरे तर हे ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) केल्यामुळे उदयनिधी आणि तत्सम मंडळी यांना गजाआड करायला हवे होते; पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अर्थात् सनातन धर्मात ‘कर्मसिद्धांत’ आहे. त्यामुळे केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधीतरी भोगावेच लागणार आहे !

१. सनातन हे अविनाशी तत्त्व !

‘सना आतनोति इति सनातनः ।’ अशी ‘सनातन’ या शब्दाची व्युत्पत्ती आहे. सना म्हणजे शाश्वत आणि आतनोति म्हणजे प्राप्ती करून देते. ‘सनातन’ म्हणजे शाश्वताची प्राप्ती करून देते ते ! ‘सनातनो नित्य नूतन:’ म्हणजे जो शाश्वत, अनादि असूनही नित्य नूतन, म्हणजेच कधी जुनेपुराणे होत नाही, त्याला ‘सनातन’ म्हणतात. सनातन हे अविनाशी तत्त्व आहे. महाभारताच्या ‘शांती पर्वा’त अध्याय ६४ मध्ये म्हटले आहे की, अनादि काळी ईश्वराने सृष्टीची उत्पत्ती केली, तेव्हाच धर्माचीही निर्मिती केली. अनादि आणि अनंत अशा धर्माला संपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सनातन संपू शकत नाही; कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम धर्माला लागू होऊ शकत नाही. युगानुयुगे सूर आणि असुर संग्राम चालू आहे अन् यात अंतिम विजय सत्याचा अर्थात् सनातन धर्माचा होतो, हा इतिहास आहे. हेच शाश्वत सत्य आहे. त्यामुळे आगामी काळात सनातन धर्माचे उच्चाटन होईल कि सनातनविरोधी द्रमुकचे ? याचे उत्तर काळच देईल.

२. हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहे !

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

स्टॅलिन यांचे वक्तव्य येताच धर्मविद्वेषी पिलावळीने लागोपाठ हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्ये केली. काही वर्षांपूर्वी ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, ‘देवाला रिटायर्ड करा’, अशी वक्तव्ये करण्यात आली होती. ही वक्तव्ये, म्हणजे हिंदु धर्माच्या विरोधात चालणार्‍या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग आहे. जी भाषा मोगल आक्रमकांची होती, तीच भाषा आज स्टॅलिन आणि ओवैसी यांची आहे. सनातन हिंदु धर्माला विरोध करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी आज कोरोना महामारीनंतर जगभरात हिंदु धर्माविषयी आकर्षण वाढत आहे. सनातन जीवनशैली अंगीकारणार्‍यांचेही प्रमाण वाढत आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयाची वेळ हळूहळू जवळ येते, तसतसा वातावरणातील अंधकार न्यून होतो, तसे हे आहे. उदयनिधी किंवा ए. राजा यांनी कितीही थयथयाट केला, तरी आज जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे ‘डिसमेंटलिंग’ (उच्चाटन) नाही, तर हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहे, हे वास्तव आहे.

नुकतीच भारतात ‘जी-२०’ परिषदेची शिखर बैठक झाली. त्या वेळी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ‘मी हिंदु आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे’, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. या परिषदेला आमंत्रित अनेक विदेशी महिलांनी साडी हा पारंपरिक हिंदु पोषाख परिधान केला होता. अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्षापदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले भारतीय वंशाचे रामास्वामी यांनीही हिंदु धर्माविषयी श्रद्धा प्रगट केली आहे. हिंदु धर्ममूल्यांप्रमाणे ते त्यांचे दैनंदिन आचरण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याच मासात अमेरिकेतील लुईसव्हिले या शहराच्या महापौरांनी ३ सप्टेंबर हा दिवस ‘सनातन धर्म दिवस’ म्हणून घोषित केला. विदेशातील लोक हिंदु धर्माचे अनुसरण करत आहेत, तसे भारतातील आस्तिकताही वाढत आहे. वर्ष २०१९-२०२० मध्ये भारतात केलेल्या संशोधनावर आधारित ‘प्यु रिसर्च सेंटर’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यामध्ये असे आढळून आले आहे, ‘८० टक्के हिंदू देवावर विश्वास ठेवतात. ५५ टक्के हिंदु घरात नियमित पूजा करतात.’ योग, आयुर्वेद आणि संस्कृत भाषा यांविषयीही जगभरात आकर्षण वाढत आहे.

३. तमिळनाडूतील मंदिरे सरकारमुक्त करा !

उदयनिधी स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात आणि सनातन धर्माला नावे ठेवतात. कदाचित् हिंदु धर्माचा प्रभाव सर्वत्र वाढत असल्यानेच उदयनिधी यांची अस्वस्थता वाढत असेल. सनातन धर्म समाजाचा प्रतिनिधी म्हणून उदयनिधींना एकच सांगावेसे वाटते. उदयनिधींना म्हणजेच तमिळनाडूमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला सनातन धर्म मान्य नसल्याने आता त्यांनी तेथील सनातन धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिरांवरील हक्कही सोडायला हवा. त्यांनी तमिळनाडूमधील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केली पाहिजे.

४. ‘हेट स्पीच’वर (द्वेषयुक्त भाषणावर) कारवाई कोण करणार ?

आमच्या देशामध्ये दुर्दैवाने सनातन धर्माला नावे ठेवा किंवा ‘सनातन धर्मियांचे उच्चाटन करा’, अथवा सनातन धर्माच्या उच्चाटनासाठी ‘सर तन से जुदा’च्या (डोके शरिरापासून वेगळे करणे) खुलेआम घोषणा द्या, कुणावरही ‘हेट स्पीच’च्या संदर्भात पोलीस कारवाई होत नाही वा न्यायालयाच्या सर्वोच्च संस्था ‘स्युमोटो’ (स्वतःहून याचिका प्रविष्ट करणे) कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. ‘सेक्युलॅरिझम’चा (निधर्मीपणाचा) उपदेश देणार्‍या उदारमतवाद्यांना एक प्रश्न आहे की, हिंदु धर्माविरोधात विखारी वक्तव्य करणार्‍यांमुळे भारतातील ‘सेक्युलॅरिझम’ धोक्यात कसा येत नाही ? ‘We the people’…, म्हणजे ‘आम्ही नागरिक’ भारतीय राज्यघटनेचे मूळ प्राधान्य असतांना अर्थात् बहुसंख्य हिंदु समाज हा सनातनी असतांना, भारताची राज्यघटना धोक्यात कशी येत नाही ? खरे तर उदयनिधी यांचे वक्तव्य, म्हणजे एकप्रकारे सनातन धर्मीय हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठीचे प्रक्षोभक वक्तव्य आहे; पण ‘उदयनिधींच्या या ‘हेट स्पीच’वर कारवाई कोण करणार ?’, हाच प्रश्न सनातनी समाजाच्या मनात ‘आ’वासून उभा आहे. राहिला प्रश्न सनातन धर्म उच्चाटनाचा, तर सनातन धर्म चिरंतन आहे, अविनाशी आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत’, तसे कुणाच्याही विद्वेषाने सनातन धर्म संपणार नाही, ही आमची धर्मश्रद्धा आहे !

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (१३.९.२०२३)

Leave a Comment