होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई !

Article also available in :

१. मुक्ताबाई यांचा जन्म

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे समाधी घेतली. मुक्ताबाई यांचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय. संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं तरी सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले.

 

२. गुरुपरंपरा

मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ – गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ – गहिनीनाथ – निवृत्तीनाथ – मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे. या महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरादि चार भावंडांत संत मुक्ताबाई आपल्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. चौदाशे वर्षे जिवंत राहून गर्व करणाऱ्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

संत मुक्ताबाई

चवदाशें वर्षें शरीर केलें जतन ।  नाहीं अज्ञानपण गेलें माझें ।।
अहंकारें माझें बुडविलें घर ।  जालों सेवा थोर स्वामीसंगे ।।
अभिमानें आलों श्रीआळंकापुरीं । अज्ञान केलें दुरी मुक्ताईनें ।।

अशी चांगदेवांची स्वीकृती आहे. समाजाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून संत ज्ञानेश्वर खिन्न झाले आणि खोलीत बसून त्यांनी खोलीचे दार (ताटी) लावून घेतले. तेव्हा ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणून मुक्ताबाईने म्हटलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत.

आपले अवतारकृत्य संपवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव समाधीस्त झाले होते. ‘फुटलासे मेळा तापसांचा’ म्हणून मुक्ताई खिन्न झाल्या होत्या.

मुक्ताई उदासी जाली असे फार ।
आत्मा हें शरीर रक्षूं नये ।।

असे विचार तिच्या मनात येऊ लागले. वैशाखाचा मास असल्यामुळे ऊन रखरख करत होते. तापी तीरावर वैष्णवांचा मोठा समुदाय जमला होता. एदलाबादेहून दोन मैलांवर असणाऱ्या माणेगांव येथे एकांतांत संत निवृत्ती महाराज यांनी गंगाधारेजवळ मुक्ताईंना तिच्या ब्रह्मभावाचे स्मरण दिले.

अंतर बाहेर स्वामीचें स्वरूप ।
स्वयें नंदादीप उजळिला ।।

असे म्हणून स्वरूपाकार स्थितीत आकाश गर्जून विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि संत मुक्ताबाई सहजस्वरूपी मिळून गेल्या.

एक प्रहर जाला प्रकाश त्रिभुवनीं ।
जेव्हां निरंजनीं गुप्त जाली ।।

वैशाख कृष्ण १० या तिथीला संत मुक्ताबाई अंतर्धान पावल्या.

होती ऐसी, नाहीं जाली मुक्ताई ।
संत तया ठायीं स्फुंदताती ।।

अशी अवस्था सर्वांचीच झाली. संत मुक्ताबाई जेथून अंतर्धान पावल्या तेथून जवळच त्यांचे मंदिर बांधले आहे.’

(साभार : ‘दिनविशेष’)

Leave a Comment