गंगा नदी आणि तिचे माहात्म्य

गंगेचे महत्त्व

 

१. गंगेचे महत्त्व

धार्मिकदृष्ट्या इतिहासाच्या उषःकालापासून कोटी कोटी हिंदू भाविकांना मोक्ष प्रदान करणारी गंगा, हे विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे स्थान गीतेचे आहे, तेच स्थान धार्मिक क्षेत्रात गंगेचे आहे. प्रस्तुत लेखात ‘गंगे’विषयी धर्मग्रंथांनी तसेच ऋषीमुनी, साधू-संत यांनी केलेली स्तुती यांबरोबरच गंगोदकाचे हिंदूंच्या जीवनातील स्थान आणि गंगाजलाचे महत्त्व यांविषयी माहिती देण्यात आली आहे.

१ अ. धर्मग्रंथांनी वर्णिलेली गंगेची महती

१ अ १. ऋग्वेद

यातील प्रसिद्ध नदीसूक्तात सर्वप्रथम गंगेचे आवाहन आणि स्तुती केली आहे.

१ अ २. पद्मपुराण

विष्णु सर्व देवांचे प्रतिनिधित्व करतो आणि गंगा विष्णूचे ! यामध्ये गंगेची महती वर्णितांना म्हटले आहे की, पिता, पती, मित्र आणि नातेवाईक हे व्यभिचारी, पतित, दुष्ट, चांडाळ आणि गुरुघाती झाले असल्यास अनुक्रमे पुत्र, पत्नी, मित्र आणि नातेवाईक त्यांचा त्याग करतात; पण गंगा त्यांना कधीही त्यागत नाही.

१ अ ३. महाभारत

‘देवतांना अमृत, तसे मनुष्यांसाठी गंगाजल (अमृत) आहे.’

१ अ ४. श्रीमद्भगवद्गीता

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला (अध्याय १०, श्लोक ३१ मध्ये) विभूतीयोग सांगतांना ‘स्रोतसामस्मि जाह्नवी ।’, अर्थात् ‘सर्व प्रवाहांत मी गंगा आहे’, असे सांगितले.

१ अ ५. श्रीमद्भागवत

‘श्रीमद्भागवत महापुराणा’त गंगा राजा भगीरथाला प्रश्‍न विचारते.

किं चाहं न भुवं यास्ये नरा मय्यामृजन्त्यघम् ।
मृजामि तदघं कुत्र राजंस्तत्र विचिन्त्यताम् ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ९, अध्याय ९, श्‍लोक ५

अर्थ : गंगा राजा भगीरथाला म्हणते, ‘‘लोक माझ्याकडे येऊन आपली पापे धुतील; म्हणून मी पृथ्वीवर येणार नाही; कारण मग माझ्याकडे आलेले पाप मी कुठे धुणार ? भगीरथा, तू या विषयावरविचार कर.’’

हा प्रश्‍न महत्त्वाचा होता; पण महाराज भगीरथानेही याचे गूढ भाषेत प्रत्युत्तर दिले.

साधवो न्यासिनः शान्ता ब्रह्मिष्ठा लोकपावनाः ।
हरन्त्यघं तेऽङ्गसङ्गात् तेष्वास्ते ह्यघभिद्धरिः ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ९, अध्याय ९, श्‍लोक ६

अर्थ : सदाचारसंपन्न, शांत चित्ताचे, ब्रह्मज्ञानी असे सत्पुरुष त्रैलोक्याला पवित्र करणारे असतात. ते (स्नान करतांना) आपल्या शरीरस्पर्शाने तुझ्यातील पाप नष्ट करतील; कारण त्यांच्या हृदयात नेहमीच पापांचा नाश करणारा भगवान विष्णु वास करतो.

१ अ ६. श्रीरामचरितमानस

श्रीरामचरितमानसमध्ये म्हटले आहे,

गंग सकल मुद मंगल मूला ।
सब सुख करनि हरनि सब सूला ॥ – रामचरितमानस, अयोध्याकाण्ड, श्‍लोक ८६

अर्थ : गंगा ही समस्त आनंद आणि मंगल यांचे मूळ आहे. ती सर्व सुखे देणारी आणि सगळ्या त्रासांचे हरण करणारी आहे.

धन्य देस सो जहँ सुरसरी । – रामचरितमानस, उत्तरकाण्ड, श्‍लोक १२६

अर्थ : हा भारत देश यासाठी धन्यवादास पात्र आहे की, या देशात गंगेसारख्या पावन देवनदीचानिवास आहे.

१ आ. सर्व संप्रदायांना वंद्य

भारतात सकल संत, आचार्य आणि महापुरुष, तसेच सर्व संप्रदाय यांनी गंगाजलाचे पावित्र्य मान्य केले आहे. शंकराने गंगा मस्तकी धारण केल्यामुळे शैवांना आणि विष्णूच्या चरणकमलापासून गंगा उत्पन्न झाल्यामुळे वैष्णवांना ती परमपावन वाटते. शाक्तांनीही गंगेला आदिशक्तीचे एक रूप मानून तिची आराधना केलेली आहे.

१ इ. महापुरुषांनी केलेली गंगास्तुती

१ इ १. वाल्मीकिऋषि

यांनी रचलेले ‘गंगाष्टक’ हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. भाविक संस्कृतज्ञ लोक स्नानाच्या वेळी त्याचा पाठ करतात. त्या वेळी त्यांची ‘स्वतःला गंगास्नान घडले’, अशी श्रद्धा असते.

१ इ २. आद्यशंकराचार्य

यांनी गंगास्तोत्र रचले. त्यात ते म्हणतात –

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः
अथवा श्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ।। (श्लोक ११)

अर्थ : हे गंगे, तुझ्यापासून दूर जाऊन कुलीन राजा बनण्यापेक्षा तुझ्या या पाण्यातील कासव अथवा मासा होणे किंवा तुझ्या तिरावर रहाणारा सरपटणारा क्षुद्र प्राणी अथवा दीन-दुबळा चांडाळ होणे, हे कधीही श्रेष्ठ आहे.

१ इ ३. गोस्वामी तुलसीदास

यांनी त्यांच्या ‘कवितावली’च्या उत्तरकाण्डात तीन छंदांमध्ये ‘श्रीगंगामाहात्म्य’ वर्णिले आहे. त्यात प्रामुख्याने गंगादर्शन, गंगास्नान, गंगाजलसेवन इत्यादींचे महत्त्व सांगितले आहे.

१ इ ४. पंडितराज जगन्नाथ (वर्ष १५९० ते १६६५)

यांनी ‘गंगालहरी’ (‘पीयूषलहरी’) हे ५२ श्लोकांचे काव्य लिहिले. त्यात गंगेच्या लोकोत्तर अशा विविध गुणांचे वर्णन आणि स्वतःच्या उद्धाराविषयी कळकळीची प्रार्थना केली आहे.

१ इ ४ अ. पंडितराज जगन्नाथ यांना उद्धरणारे ‘गंगालहरी’ काव्य !

‘पंडितराज जगन्नाथ उत्तरायुष्यात काशीला आले. त्यांनी लवंगी या यवनकन्येशी विवाह केला. त्यामुळे त्यांना काशीतील पंडितांनी बहिष्कृत केले. त्यांची विलक्षण ओढाताण झाली आणि ते गंगाघाटावर पोहोचले. त्यांना तेथे तापाने फणफणलेल्या अवस्थेत भोवळ आली. काही वेळाने सावध झाल्यावर त्यांनी आत्मकल्याणाकरता आर्द्र अंतःकरणाने गंगेची आळवणी करण्यास प्रारंभ केला. त्यांनी एक श्लोक पूर्ण केला आणि गंगेचे पाणी वरच्या पायरीवर आले. अशा प्रकारे प्रत्येक श्लोकाला गंगा नदी प्रसन्न होऊन तिचे पाणी एकेक पायरी वर वर चढू लागले. बावन्नावा शेवटचा श्लोक म्हटल्यानंतर बावन्नावी पायरी चढून गंगेने जगन्नाथ आणि त्याची पत्नी लवंगी यांना स्वतःच्या पोटात घेतले. जगन्नाथ पंडित तरून गेला. त्याच्या या ‘गंगालहरीं’नी शतशः भक्तांना तारून नेले.’

१ इ ४ आ. ‘गंगालहरी’ काव्यातील काही प्रार्थना

१. ‘हे गंगे, जगातील यच्चयावत् पापी एक झाले आहेत आणि त्यांनी पापांची पराकाष्ठा सांडली, सगळी शिगेची पापे एकवटली; तरीही ती पापे क्षणात् नष्ट करण्याची क्षमता तुझे स्नानपान अन् चिंतन यांमध्ये आहे’, असे शास्त्रकार सांगतात. ते मला कळत नाही; मात्र ‘ते काहीतरी लिहितात’, असेही शक्य नाही.

२. मी महान पापी आहे ! पृथ्वीवर माझ्या पापाला तोड नाही; मग माझा उद्धार करून दाखवलास, तर त्यातच तुझी प्रतिष्ठा आहे ! तरच तुझे नीर (गंगाजल) खरे होईल ! तसे घडले नाही, तर मी जिंकीन आणि तू हरशील !

३. तुझ्या पावन करण्याच्या क्षमतेपेक्षा माझी पापशक्ती अधिक आहे. मी तुझ्यापेक्षा अधिक शक्तीमान आहे. माझ्यात पुरेपूर दुर्गुण आहेत, हे खरे आहे. सत्ता, संपत्ती, विद्वत्ताच नव्हे, तर चारित्र्य, सद्गुण, असा कसलाच आधार मला घेता यायचा नाही. मी पूर्ण निराश्रय आहे आणि म्हणूनच क्षणाक्षणाने तुझ्या प्रेमाची चव चढतीवाढती आहे. गंगा भगवती, तुझी कृपादृष्टी मी क्षणाक्षणाला अनुभवत आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

२. हिंदु जीवनदर्शनातील गंगोदकाचे स्थान

२ अ. दैनंदिन जीवन – नित्य स्नानाच्या वेळी स्मरण

नित्य स्नान करतांना गंगेसह पवित्र नद्यांचे स्मरण केले जाते. गंगोदकाने स्नान करणे बहुतेकांना अशक्य असल्याने महाराष्ट्रात पूर्वी तांब्यापासून किंवा पितळेपासून बनवलेल्या आणि पसरट तोंड असलेल्या ‘गंगाळ’ नावाच्या भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्याने स्नान करत.

२ आ. धार्मिक जीवन

२ आ १. जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा असते.

२ आ २. यात्रेकरू हरिद्वार, प्रयाग (अलाहाबाद) इत्यादी तीर्थांहून गंगाजल घरी आणून त्याची पूजा करतात. तसेच आप्तेष्टांना बोलावून त्यांना ते तीर्थ देतात.

२ आ ३. धार्मिक चालीरिती

अ. स्थानशुद्धीसाठी गंगाजल वापरतात. जलशुद्धीसाठीही नवीन खोदलेल्या विहिरीत गंगाजल घालतात.

आ. गंगाजल हातात घेऊन शपथ घेतात.

इ. नवविवाहित जोडप्यावरही गंगाजलाचा अभिषेक करतात.

२ इ. मृत्यूप्रसंगी आणि मृत्यूनंतर करावयाचे क्रियाकर्म

२ इ १. मृत्यूप्रसंगी मुखात गंगाजल घालणे

मृत्यूनंतर सद्गती मिळावी, यासाठी मृत्यूप्रसंगी व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात आणि मृत्यूप्रसंगी तसे शक्य न झाल्यास मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात; म्हणून घरोघरी गंगाजल ठेवलेले असते. (ते नसल्यास तुळस घातलेले पाणी वापरतात.)

२ इ २. मृतदेहावर अग्निसंस्कार करणे

‘गंगातिरावर ज्या मृत व्यक्तींचे दहन होते, ते मृतात्मे स्वर्गाला जातात, असे म्हटले जाते; म्हणून पुष्कळ लांबून भाविक लोक अग्निदहनासाठी मृत व्यक्तींना येथे आणतात.

२ इ ३. अस्थीविसर्जन

गंगेत अस्थींचे विसर्जन करणे, हा एक महत्त्वाचा अंत्यविधी आहे. ‘गंगेत विसर्जित केलेल्या अस्थी जितकी वर्षे गंगेत रहातात, तितकी वर्षे त्या मृतात्म्याला स्वर्गात निवास करता येतो’, असे पद्मपुराण, नारदीय पुराण, स्कंदपुराण आणि अग्निपुराण, तसेच महाभारत यांमध्ये सांगितले आहे.

२ इ ४. श्राद्ध

पितरांचा उद्धार होण्यासाठी त्यांचे गंगातिरावर श्राद्ध केले जाते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गंगामाहात्म्य (आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)’

 

३. गंगा नदीच्या जलात जंतूंना मारण्याची शक्ती अधिक असणे

रुरकी विद्यापिठात गंगाजलावर काही प्रयोग करण्यात आले. त्यांतून हा निष्कर्ष निघाला की, गंगाजलात जंतूंना मारण्याची शक्ती इतर नद्यांच्या जलाहून अधिक आहे.

आपल्या वैद्यकशास्त्राने सुधातुल्य अशा गंगाजलाविषयी असे लिहिले आहे,

स्वादुपाकरसं शीतं द्विदोषशमनं तथा ।
पवित्रमपि पथ्यं च गङ्गावारि मनोहरम् ॥

अर्थ : गंगेचे पाणी हे चवीला गोड असते, तसेच पोटात जठराग्नीच्या संस्कारानेही ते गोडच रहाते. ते शीतल, तसेच शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दोषांचे शमन करणारे आहे. असे हे मनोहर गंगाजल पवित्रही आहे आणि पथ्यकरही आहे.

Leave a Comment