पुण्यनदी गोदावरी

गोदावरी नदी भारतातील प्रमुख नद्यांमधील एक नदी आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्र राज्यात झाला आहे. पुण्यनदी गोदावरी म्हणजे हिंदु संस्कृतीचा एक ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा ! या पुण्यसलिलेच्या तिरावर सनातन धर्मसंस्कृतीचा विकास झाला. येथेच यज्ञवेत्त्या ऋषिमुनींनी वास्तव्य केले आणि श्रीरामचंद्रांनी सीतेसह १२ वर्षे निवास केला. गोदावरीचा इतिहास हा उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संस्कृतींच्या संगमाचा इतिहास आहे.

 

१. ‘गोदावरी’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. ‘गां स्वर्गं ददाति स्नानेन इति गोदा ।

तासु वरी श्रेष्ठा गोदावरी ।’ (शब्दकल्पद्रुम)

अर्थ : जिच्या स्नानाने स्वर्ग प्राप्त होतो, तिला ‘गोदा’ असे म्हणतात. अशा स्वर्ग प्राप्त करून देणार्‍या नद्यांमध्ये जी श्रेष्ठ आहे, ती गोदावरी.

आ. गौतमस्य गवे जीवनं ददाति इति गोदा ।

अर्थ : गौतमऋषींच्या गायीस (गौतमऋषींच्या स्पर्शाने मृत झालेल्या गायीस) जीवन देणारी, ती ‘गोदा’ (गोदावरी) होय.

 

२. गोदावरीचे भूलोकातील अवतरण

२ अ. गौतमऋषींनी घोर तपश्‍चर्या करून गोदावरीला
भूलोकी आणणे आणि शिवाच्या आशीर्वादाने ती महातीर्थ बनणे

‘सत्ययुगात एकदा पृथ्वीवर सलग बारा वर्षे अनावृष्टी झाली. तेव्हा पर्जन्यवृष्टीसाठी गौतमऋषींनी एक वर्ष तपश्‍चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. श्री गणेशाने आशीर्वाद दिल्यानंतर गौतमऋषींच्या आश्रमापुरते अनावृष्टीचे संकट टळून धान्य विपुल मिळू लागले. या धान्याच्या साहाय्याने गौतमऋषींनी नाना देशांतील ऋषिमुनींचे पोषण केले. कालांतराने गौतमऋषींकडे आश्रयाला असलेल्या काही विद्वेषी ब्राह्मणांनी एक मायानिर्मित गाय गौतमांच्या आश्रमात सोडली. ही मायावी गाय आश्रमातील हविर्द्रव्य खात असतांना गौतमऋषींनी केवळ तिला स्पर्श केला असता ती मृत झाली. हे पहाताच सर्व ब्राह्मणांनी ‘गौतमांस गोहत्येचे पाप लागले असून त्यांच्या घरी भोजन नको’, असे म्हणत गौतमऋषींचा आश्रम सोडला. मग गौतमऋषींनी पापमुक्तीसाठी घोर तप केले अन् स्वर्गातून गंगेला आणण्याकरता भगवान शंकरास साकडे घातले. त्यानुसार गंगा भगवान शिवाच्या जटेत आली (टीप). तेव्हा गौतमऋषींनी प्रार्थना केली, ‘हे जगदीश्‍वरा, समस्त लोकांना पवित्र करणार्‍या या देवीला आपण ब्रह्मगिरीवर सोडावे. हिच्यात स्नान करून लोक स्वतःची पापे धुऊन टाकतील. हिच्या तटावर एक योजनपर्यंत रहाणारे तिच्यात स्नान न करताही मुक्ती मिळवतील.’ त्यावर भगवान शंकराने गौतमऋषींना आशीर्वाद देत गोदावरीस भूलोकी केले.’ (ब्रह्मपुराण)

टीप – भगवान शंकराच्या जटेत सामावलेल्या जलाचे दोन भाग म्हणजे ‘गोदावरी’ आणि ‘गंगा’ : ‘भगवान शंकराच्या जटेत सामावलेल्या जलाचे दोन भाग झाले. त्यांतील एक भाग म्हणजे ‘गोदावरी’, तर दुसरा भाग म्हणजे बलवान क्षत्रिय राजा भगीरथ याने कठोर तपश्‍चर्या करून पृथ्वीवर आणलेली ‘गंगा’ नदी होय.’ (ब्रह्मपुराण)

२ आ. गोदावरीचे उगमक्षेत्र आणि तिचा होण्याचा काळ

समुद्रमंथनाचा काळ आणि गोदावरीचा जन्मकाळ हा एकच होय.

कृते लक्षद्वयातीते मान्धातरि शके सति ।
कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पतौ ॥
माघशुक्लदशम्यां च मध्याह्ने सौम्यवासरे ।
गङ्गा समागता भूमौ गौतम सति ॥
महापापादियुक्तानां जनानां पावनाय च ।
औदुम्बरतरोर्मूले ययौ तदा ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : कृत(सत्य)युगाची दोन लाख वर्षे झाल्यानंतर, मांधात हा पृथ्वीचा सार्वभौम राजा असतांना, श्रीविष्णूचा कूर्मावतार असतांना, (धाता नाम संवत्सरी,) सिंह राशीत गुरु, माघ मास, शुक्ल पक्ष, दशमी दिनी, बुधवारी, दिवस दोन आला असतांना (दुपारी १२ वाजता), गौतमऋषींच्या (त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर) औदुंबर वृक्षाच्या मुळाशी गोदावरी प्रगटली.

 

३. गोदावरीची काही नावे

३ अ. गंगा किंवा दक्षिण गंगा

गोदावरी ही मुळात साक्षात् शिवाच्या जटेतून पृथ्वीवर अवतीर्ण झालेली गंगाच असल्यामुळे तिला ‘गंगा’ असे म्हणतात. ती भारताच्या दक्षिण भागात प्रकट झाल्यामुळे तिला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हणतात.

३ आ. गौतमी

महर्षि गौतम यांनी गोदावरीला पृथ्वीवर आणले; म्हणून तिला ‘गौतमी’ असे म्हणतात. ब्रह्मपुराणात ‘विंध्य पर्वताच्या पलीकडील (भारताच्या दक्षिण भागातील) गंगा ही ‘गौतमी’ नावाने ओळखली जाते’, असे म्हटले आहे.

३ इ. अन्य नावे

‘भगवान शंकराने गौतमऋषींना गोदावरीची माहेश्‍वरी, वैष्णवी, नंदा, सुनंदा, कामदायिनी, ब्रह्मतेजससमानिता आणि सर्वपापप्रणाशिनी ही नावे सांगितली आहेत. या नावांपेक्षा ‘गोदावरी’ हेच नाव स्वतःला प्रिय असल्याचेही त्याने म्हटले आहे. कण्वऋषींनी गोदावरीची स्तुती करतांना तिला ‘ब्राह्मी’ आणि ‘त्र्यंबका’ या नावांनी संबोधले आहे.’ (ब्रह्मपुराण)

 

४. गोदावरीची वैशिष्ट्ये

४ अ. भौगोलिक वैशिष्ट्ये

४ अ १. आद्य नदी : गोदावरी ही समुद्रवलयांकित पृथ्वीवरील आद्य नदी आहे.  ‘आद्या सा गौतमी गङ्गा द्वितीया जाह्नवी स्मृता ।’, म्हणजे ‘गोदावरी ही आद्य गंगा (नदी) आहे. जाह्नवी (गंगा) ही तिच्यानंतर आली आहे’, असे ‘पुरुषार्थचिंतामणि’ या ग्रंथात म्हटले आहे.

४ अ २. सप्त : गंगासागराला (बंगालच्या उपसागराला) मिळण्यापूर्वी गोदावरी नदीचे सात प्रवाह बनतात. ते वासिष्ठी, वैश्‍वामित्री, वामदेवी, गौतमी, भारद्वाजी, आत्रेयी आणि जामदग्नी असे सात ऋषींच्या नावांनी ओळखले जातात.

४ अ ३. भारतातील द्वितीय क्रमांकाची लांब नदी : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी गोदावरी पूर्व दिशेने दक्षिणवाहिनी होऊन १४६५ कि.मी.चा प्रवास करत आंध्रप्रदेशमध्ये गंगासागराला मिळते. एवढी मोठी लांबी असलेली गोदावरी ही देशातील गंगा नदीनंतर दुसर्‍या क्रमांकाची लांब नदी आहे.

४ आ. भौतिक वैशिष्ट्ये

४ आ १. जीवनदायिनी : गोदावरी ही लोककल्याणाची धारा आहे. ती लाखो वर्षे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पाँडीचेरी या राज्यांचा भूभाग समृद्ध करत आहे.

४ आ २. आरोग्यदायिनी : गोदावरीचे जल हे आरोग्यास लाभदायक आहे.

पित्तार्तिरक्तार्तिसमीरहारि पथ्यं परं दीपनपापहारि ।
कुष्ठादिदुष्टामयदोषहारि गोदावरीवारि तृषानिवारि ॥

– राजनिघंटु, वर्ग १४, श्‍लोक ३२

अर्थ : गोदावरी नदीचे पाणी पित्त, रक्त, वात यांच्याशी संबंधित व्याधी दूर करणारे, भूक वाढवणारे, पापांचे हरण करणारे, पापांमुळे उत्पन्न होणारे त्वचाविकारांसारखे विकार दूर करणारे आणि तहान भागवणारे आहे.

४ इ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

४ इ १. पवित्रतम : गोदावरी ही धर्मशास्त्रात सांगितलेल्या सात पवित्र नद्यांपैकी एक आहे. यासाठीच प्रतिदिन स्नानापूर्वी पुढील श्‍लोक म्हणून गोदावरीसह पवित्र नद्यांना आवाहन केले जाते.

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥

– नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्‍लोक ३३

अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू आणि कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

४ इ २. ‘सप्तगंगां’पैकी एक : भारतात ८४ गंगातत्त्वदर्शक नद्या आहेत. त्यांतील गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू आणि नर्मदा या नद्यांना ‘सप्तगंगा’ म्हणून ओळखले जाते.

४ इ ३. पापविनाशिनी : 

गोदावरी भीमरथी कृष्णवेण्यादिकास्तथा ।
सह्मपादोद्भवा नद्य: स्मृता: पापभयापहा: ॥ – विष्णुपुराणदेवतांची उपासना : शक्ति – खंड ८

अर्थ : गोदावरी, भीमरथी, कृष्णवेणी आदी सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणार्‍या नद्या पाप आणि भय यांना पळवून लावणार्‍या आहेत.

४ इ ४. पुण्यदायिनी : दक्षिणवाहिनी गोदावरी पुण्यकारक आहे.

कालिन्दी पश्‍चिमा पुण्या गङ्गा चोत्तरवाहिनी ।
विशेषा दुर्लभा ज्ञेया गोदा दक्षिणवाहिनी ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : पश्‍चिमेला जाणारी कालिंदी (यमुना), उत्तरेला जाणारी गंगा आणि दक्षिणेला जाणारी गोदावरी विशेषत्वाने दुर्लभ अन् पुण्यदायी आहेत.

४ इ ५. मोक्षदायिनी : कुरुक्षेत्री दानाचे, नर्मदातिरी तपाचे आणि गंगातिरी मरण येण्याचे पुण्य मोठे असते; पण गोदावरीच्या तिरी या तिन्ही गोष्टी मोक्ष ठरतात.

या गतिर्योगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसाम् ।
सा गतिः सर्वजन्तूनां गौतमीतीरवासिनाम् ॥

– श्री गुरुचरित्र, अध्याय १३, श्‍लोक ६८

अर्थ : मृत्यूनंतर ऊर्ध्वरेता (पूर्ण ब्रह्मचारी) मुनींना जी गती होते, तीच गती गोदावरीच्या तिरावर वास करणार्‍या सर्व जिवांना होते, म्हणजेच गोदावरीच्या तिरावर वास करणारे जीव मृत्यूनंतर मोक्षाला जातात.

४ इ ६. सर्वतीर्थमयी

अ. ‘ब्रह्मदेवाने गौतमीचे माहात्म्य सांगतांना म्हटले आहे, ‘भगवती गोदावरी सर्वतीर्थमयी आहे. त्रिलोकांत गोदावरीसारखे तीर्थ नाही.

 

५. गोदावरीचे महत्त्व

५ अ. तीर्थश्राद्धासाठी उपयुक्त

कूर्मपुराणानुसार भारतवर्षातील विभिन्न नद्यांची मोठी सूची दिली असून अंती ‘श्राद्धासाठी गोदावरी विशेष महत्त्वपूर्ण आहे’, असे म्हटले आहे.

मूलमध्यावसानेषु गोदा लभ्या कलौ युगे ।
मुण्डनं तत्र कुर्यात् वै तीर्थश्राद्धं विशेषतः ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : कलियुगामध्ये गोदावरीचा उगम (त्र्यंबकेश्‍वर), मध्यभाग (नांदेड), तसेच शेवट (राजमहेंद्री) या ठिकाणी जाऊन मुंडण आणि तीर्थश्राद्ध करावे.

गोदावरीशी संबंधित सण आणि उत्सव

१. गोदावरी जन्मोत्सव

प्रतिवर्षी माघ शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस गोदावरी नदीच्या तिरावरील तीर्थक्षेत्री ‘श्री गोदावरी जन्मोत्सव’ साजरा केला जातो.

२. मकरसंक्रांती

‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. या काळात गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रांवर स्नान करणार्‍यास महापण्य लाभते.’ (घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक क्रमांक १०, गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाड्मय

३. कार्तिक पौर्णिमा

सर्व मासांत पुण्य तीर्थस्नान करणे पुण्यदायक असते. स्कंद पुराणात गंगा, गोदावरी आदी नद्यांची सूची दिली असून या नद्यांमध्ये कार्तिक मासांत स्नान करणे दुर्लभ असल्याचे म्हटले आहे. कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत (पंढरपूर यात्रेच्या काळात) श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील स्थानिक महिला कुशावर्त तीर्थावर ‘कार्तिकस्नान’ करून श्री गंगागोदावरीचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात, अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

४. इतर पुण्यकाळ

या व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशी, महाशिवरात्र, वामन द्वादशी अन् वसंत पंचमी हे दिवस आणि पर्वकाल, म्हणजेच एकादशी, अमावास्या, तसेच चंद्रग्रहणे, व्यतिपात, वैधृति आदी योग गोदावरीत स्नानासाठी पुण्यकाळ म्हणून समजले जातात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘गोदावरी माहात्म्य’

Leave a Comment