प्रदोष व्रत

प्रदोषकाळाचे महत्त्व, तसेच प्रदोषकाळात काय करावे आणि काय करू नये, याविषयीचे विवेचन खालील लेखातून समजून घेऊया.

 शिवपूजा
शिवपूजा

 

१. तिथी

प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात ‘प्रदोषो रजनीमुखम् ।’

 

२. देवता

प्रदोष हे व्रत शिव या देवतेचे आहे.

 

३. प्रदोष व्रत करण्याची पद्धत

या दिवशी दिवसभर उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे. प्रदोषाच्या दुसर्‍या दिवशी श्रीविष्णुपूजन आवर्जून करावे. या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा.

 

४. निषेध

प्रदोषकाळात वेदाध्ययन करू नये, असे सांगितले आहे; कारण हे रात्रकालातील व्रत आहे, तर वेदाध्ययन हे सूर्य असतांना करावयाचे असते. हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्षे अवधीचे असते. कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला, तर तो विशेष फलदायी मानतात.

सोमप्रदोष

भौमप्रदोष

शनिप्रदोष

पक्षप्रदोष

१. वार सोमवार मंगळवार शनिवार प्रत्येक पंधरवड्याची त्रयोदशी
२. हेतू कुलदेवतेचा प्रकोप दूर करणे आणि साधना योग्यरित्या व्हावी धनलाभ गुणवान संतान प्राप्ती आणि गर्भातील बालकाच्या अडचणी दूर करणे सोम, भौम शनि प्रदोषातील सर्व

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

 

१. अर्थ

जिवाला गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे रात्रकालातील व्रत.

 

२. कालावधी

३ – १२ वर्षे किंवा आजन्म.

 

३. व्रत आरंभण्याचा उपयुक्त कालावधी

उत्तरायणाचा आरंभ झाल्यावर प्रदोष व्रत करणे अधिक फलदायी ठरते.

 

४. प्रदोष व्रताचे महत्त्व

४ अ. त्रयोदशी संपून चतुर्दशी प्रारंभ होणे

हे व्रत त्रयोदशीच्या समाप्तीच्या कालावधीत करावयाचे असते. त्यानंतर लगेच चतुर्दशी तिथी प्रारंभ होते. त्रयोदशी या तिथीचा स्वामी कामदेव आहे, तर चर्तुदशी या तिथीचा स्वामी शिव आहे. सत्ययुगात शिवाने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले होते. त्यामुळे कामदेवावरही शिवाचेच अधिपत्य आहे. अशा प्रकारे त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींवर शिवाचे अधिपत्य असून या कालावधीत केलेल्या प्रदोष व्रतामुळे शिवशंकर उपासकावर लवकर प्रसन्न होतात.

४ आ. संधीकालीन उपासना

शुद्ध आणि कृष्ण पक्षाच्या दोन्ही त्रयोदशींना सूर्य मावळल्यानंतर तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’ म्हणतात. सायंकाळी केलेल्या प्रदोष व्रतामुळे संधीकालात केलेल्या शिवोपासनेचे फळ उपासकाला मिळते.

४ इ. शिवोपासनेसाठी पूरक काळ

‘प्रदोष’ शिवोपसनेसाठी पूरक काळ असल्याने प्रदोष समयी केलेल्या शिवोपासनेमुळे शतपट फलप्राप्त होते.

 

५. प्रदोष व्रताचे लाभ

प्रदोष व्रत केल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आनंदाची प्राप्ती होते.

५ अ. शारीरिक

विविध प्रकारचे त्वचा रोग, ज्वर, वेदना आणि विविध शारीरिक व्याधी अन् दुर्धर रोग दूर होतात.

५ आ. मानसिक

चिडचिड, त्रागा, मन:स्ताप, निराशा, संशयी वृत्ती आणि भय यांचा नाश होतो अन् समाधान लाभते.

५ इ. बौद्धिक

बुद्धीची प्रगल्भता वाढून स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढते.

५ ई. आर्थिक

दारिद्य्र दूर होऊन धनप्राप्ती होते.

५ उ. सामाजिक

कुटुंब आणि समाज यांतील व्यक्तींशी संबंध सुधारून कौटुंबिक सुख लाभते अन् समाजिक प्रतिष्ठा मिळते.

५ ऊ. आध्यात्मिक

५ ऊ १. विविध बाधा दूर होणे

पूर्वजांचे लिंगदेह, भूत, पिशाच, राक्षस, हडळ, मांत्रिक यांचे त्रास, तसेच वेताळ, सातआसरा आदी क्षुद्रदेवतांचा कोप दूर होऊन शिवाची कृपा प्राप्त होते.

५ ऊ २. शिवकृपेने पापक्षालन होणे

प्रदोष व्रताच्या विधीमुळे उपासकाला पापक्षालनासाठी आवश्यक असणारी शिवाची कृपा अल्पावधीत लाभते आणि त्याचे पापक्षालन शीघ्रतेने होते.

५ ऊ ३. प्रारब्धाची तीव्रता ऊणावून प्रारब्ध सौम्य होणे

तीव्र प्रारब्धभोग भोगणार्‍या शिवोपासकाने श्रद्धेने प्रदोष व्रत केले, तर त्याचे प्रारब्ध उणावून ते सौम्य होते.

५ ऊ ४. पुण्य लाभून सुखप्राप्ती होणे

प्रदोष व्रत एकदा केल्याने शिवाच्या सगुण तत्त्वाची उपासना होऊन उपासकाला शिवतत्त्वाचा लाभ होऊन पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे शिवोपासकाला जीवनात सुखाची प्राप्ती होते.

५ ऊ ५. पुण्यसंचय होऊन मृत्यूत्तर सद्गती लाभणे

सातत्याने अनेक वर्षे प्रदोष व्रत केल्यामुळे शिवोपासकाचा पुण्यसंचय होऊन त्याला मृत्यूनंतर सद्गती मिळते.

५ ऊ ६. विविध प्रकारच्या मुक्ती मिळणे

आजन्म प्रदोष व्रत केल्यामुळे मिळणार्‍या पुण्यबळाच्या आधारे शिवोपासकाला मृत्यूत्तर सलोक, समीप किंवा सरूप मुक्ती मिळते.

५ ऊ ७. अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे शिवोपासकाची निर्गुणाकडे वाटचाल होऊन त्याला मोक्षप्राप्ती होणे

अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते. अशा प्रकारे अनेक जन्म प्रदोष व्रताचे पालन (शिवोपासना) केल्यामुळे किंवा उच्च लोकात गेल्यावर जिवाची वाटचाल निर्गुणाकडे होऊन त्याला सायुज्य मुक्ती मिळते किंवा मोक्षप्राप्ती होते.

 

६. प्रदोष व्रताचे प्रकार

६अ. कालावधीनुसार प्रदोष व्रताचे प्रकार

प्रदोष व्रत नियमितपणे ३ – १२ वर्षे करतात. काही जण हे व्रत आजन्म करतात. विशिष्ट कालावधीसाठी प्रदोष व्रत करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

 

७. अनुभूती

७ अ. प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन केल्यानंतर चांगल्या अनुभूती येणे

प्रदोषाच्या कालावधीत शिवपूजन करत असतांना ‘पूजेतील उपचार शिव आनंदाने स्वीकारतो’, असे आम्हाला जाणवते. नंदीच्या कानात मला होणारे त्रास सांगत असतांना तो सजीव असल्याप्रमाणे भासून त्याची हालचाल होतांना जाणवते. प्रदोष व्रत करतांना आम्हाला आनंद जाणवतो आणि शब्दातीत शांतीची अनुभूती येते. प्रदोष व्रताच्या पूजेचा परिणाम पुढील २ – ३ दिवस टिकून रहातो आणि मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांची तीव्रता पुढील २ – ३ दिवस उणावून माझे मन सकारात्मक होते. या व्रतामुळे मला होणारे शारीरिक त्रास १० टक्के, मानसिक त्रास २० टक्के आणि आध्यात्मिक त्रास ३० – ३५ टक्के इतके न्यून होतात. महर्षि अगस्तींच्या कृपेमुळे आम्हाला प्रदोष व्रताचे महत्त्व समजले आणि शिवोपासनेतील आनंद अनुभवण्यास मिळाला, यासाठी आम्ही महर्षि अगस्ती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०१७, रात्री ११.०३)

१.. भस्म आणि कापूर

‘भस्म आणि कापूर यांच्यामध्ये लयाशी संबंधित शक्ती कार्यरत असल्यामुळे त्यांचा संबंध शिवाशी आहे. त्यामुळे शिवोपासनेत भस्म आणि कापूर यांचा वापर केला जातो.

२. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे तीन पट्टे लावल्यामुळे होणारा परिणाम

उत्पत्ती आणि स्थिती यांच्याशी संबंधित सूक्ष्म लहरी उभ्या असतात. त्यामुळे या लहरींचे प्रतीक म्हणून ब्रह्मोपासक किंवा विष्णूचे उपासक कपाळाला चंदनाचे उभे गंध किंवा कुंकवाचा उभा टिळा लावतात. लयाशी संबंधित लहरी भूमीला समांतर आडव्या असतात. त्यामुळे लयाशी संबंधित कार्य करणारा शिव सर्वांगाला भस्माचे तीन आडवे पट्टे लावतो. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे आडवे पट्टे लावल्यामुळे त्यांच्याकडे वायू आणि आकाश या स्तरांवरील निर्गुण शिवतत्त्व लवकर आकृष्ट होते अन् मूर्ती किंवा शिवपिंडी शिवाच्या लयकारी शक्तीने लवकर भारित होतात. शिवाची मूर्ती किंवा शिवपिंडी यांना भस्माचे पट्टे लावल्यामुळे मूर्ती किंवा पिंडी यांमध्ये जागृत झालेले शिवतत्त्व वातावरणातील वायूतत्त्वात लवकर मिसळते आणि शिवतत्त्वाच्या लहरींचे वहन वायूद्वारे होऊन शिवलहरी दूरपर्यंत पोहचतात.’

३. शिवपिंडीला भस्मलेपन केल्यामुळे होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

शिवपिंडीत शिवाची निर्गुण शक्ती आणि तत्त्व कार्यरत असते. शिवाच्या पिंडीतील निर्गुण तत्त्व आणि शक्ती यांचा लाभ वातावरण अन् भाविक यांना होण्यासाठी शिवपिंडीला भस्म लावण्याची पद्धत आहे. शिवपिंडीला भस्मलेपन केल्यामुळे शिवपिंडीमध्ये असणारे शिवतत्त्व हे तेज, वायू आणि आकाश या स्तरांवर कार्यरत होऊन त्याचे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण चालू होते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०१८ रात्री १०.२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment