साधनाविषयी शंकानिरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांनी निरसन केले आहे. ‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

अध्यात्मात तात्त्विक माहितीला केवळ २ प्रतिशत महत्त्व असून प्रायोगिक भाग अर्थात् साधनेला ९८ प्रतिशत महत्त्व आहे. साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे यांत दिली आहेत.

 

अ. साधना – प्रायोगिक

प्रश्न : व्यवसायातील अत्यंत महत्त्वाची कामे डोळ्यांसमोर आहेत, ती केलीच पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळी व्यवसायाला विसरून सेवेला महत्त्व दिले, तर कितपत योग्य आहे ?

उत्तर : ज्यांना व्यवसाय महत्त्वाचा वाटतो किंवा विकल्प येत आहेत, त्यांनी पहिल्यांदा व्यवसायच करावा. एखादे सूत्र बुद्धीला कळले की, लगेचच कृतीत आणता आले पाहिजे.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांना गुरु म्हणत, ‘रामजी चला’; तेव्हा ते त्वरित निघत. त्यांनी बायकोची कधी परवा केली नाही की, ती काय म्हणेल ?, असा विचारही केला नाही. प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी (जीजी) काय किंवा रामानंद महाराजांच्या पत्नी (अक्का) काय, त्यांना एकप्रकारे वनवासच होता. हे दोघे नवरे सगळीकडे चाळीस वर्षे फिरले. गावोगावी गेले, त्या वेळी त्यांच्या बायका घरी होत्या. त्यांनी विचार केला असता की, अरे आमची बायको एकटी घरी आहे, कसे होईल ? परंतु त्यांनी असा विचार केला नाही; म्हणून ते ‘महाराज’ झाले.

रामजीदादांचे आणखी एक उदाहरण म्हणजे ते कार्यालयात कधी महिना-महिना जाऊ शकत नव्हते. महाराज म्हणाले, ‘चल’ की, ते निघाले ! एक महिन्यानंतर दौर्‍यावरून आल्यावर त्यांना ठाऊक असायचे की, या महिन्याचे वेतन काही मिळणार नाही. कोणाकडूनतरी ऋणच काढावे लागणार; पण कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी म्हणायचे, ‘‘अहो, तुम्ही वेतन घ्यायला विसरलात.’’ म्हणजे त्या वेळेला दुसरा ‘रामजीदादा’ गुरूंनी निर्माण केलेला असायचा. तो त्यांची सगळी कामे करायचा. हे केवळ पूर्वीच्या काळी झाले होते असे नाही, तर सध्याही घडत आहे. तुमची तेवढी श्रद्धा पाहिजे, गुर्वाज्ञापालन करायची क्षमता पाहिजे.

जे असे असतात की, आमचा व्यवसाय, घरची कामे, आमची कर्तव्ये, असे करत असतात, ते सर्व बहुतेक आयुष्यभर त्याच पातळीला रहातात. ‘ही सगळी माया आहे. यातून मला बाहेर पडायचे आहे. ते जीवनाचे कर्तव्य आहे’, ही जाणीव व्हायला हवी. परमेश्वराची प्राप्ती हे ज्याला कळले, तोच यातून बाहेर पडू शकतो. नाहीतर असे अडकतात.

मी चिपळूणहून सिंधुदुर्गाकडे येत होतो. त्याच परिसरातल्या काही साधकांना मी सहज विचारले की, सिंधुदुर्गमध्ये येता का ? ते म्हणाले, ‘‘आलो असतो.. पण…’’ झालं ! ‘पण’ आला की, सगळा गोंधळ झाला. ‘पण’, ‘परंतु’ चालत नाही. जीव झोकूनच देता आला पाहिजे, तरच काहीतरी साध्य होणार आहे. त्याच्या उलट अलोर्‍याचे दोन साधक समवेत आले. त्यांना विचारले, ‘‘येता का ?’’ ते म्हणाले, ‘‘आम्ही येणारच आहोत.’’ मी विचारले, ‘‘कपडे वगैरे ?’’ ते म्हणाले, ‘‘काही नाही, असेच येतो’’ म्हणजे चार दिवस सिंधुदुर्गात रहायचे आहे, आंघोळीला टॉवेल, अंथरूण-पांघरूण काय ? अर्थात टॉवेल, अंथरूण-पांघरूण इत्यादी जेथे जातो, तेथे मिळेल; पण कपडेतरी आपले पाहिजेत ना, तेही नाही ! म्हणजे हे ज्यांना करता येते, ते काहीतरी साध्य करतात.

 

प्रश्न : साधना जशी व्हायला हवी, तशी होत नाही. काहीतरी अडचणी येतात आणि मधूनच उठावे लागते.

उत्तर : प्रारंभी शारीरिक अडचणी येतातच. एकाच ठिकाणी बसण्याची आपल्याला सवय नसते. नाम घेण्यास प्रारंभ केला, तर कुठे कंड सुटली, मान दुखली, पाठ दुखली असे होतच असते. आपण साधना करू लागलो की, अशा अडचणी येत जातात. त्यांवर मात करण्यासाठी जिद्द असायला हवी. साईबाबांनी सांगितलेच आहे, ‘श्रद्धा आणि सबुरी’. साधनेत सातत्य रहायला हवे.

 

प्रश्न : आपली साधना योग्य मार्गाने होत आहे, म्हणजेच ती निर्दोष आहे अथवा सदोष आहे, हे कसे समजायचे ?

उत्तर : साधना करतांना आपल्या अडचणी हळूहळू दूर व्हायला लागल्या की, साधना योग्य होत आहे, असे समजावे. साधना करतांना आपल्या मनाला मिळणार्‍या आनंदात दिवसागणिक वाढ होत आहे, अशा पुढच्या टप्प्याच्या अनुभूतीयेऊ लागल्या की, समजायचे आपली साधना योग्यरितीने चालू आहे. बहुतेकांविषयी साधनेतील अडचणी दूर होण्यासाठी वेळ लागतो. आपल्याला स्वतःला हे कळू शकत नाही. अशा वेळी आपल्यापेक्षा जे कोणी उन्नत आहेत, त्यांना विचारावे लागते की, आमची साधना योग्य आहे कि नाही ? सनातन संस्थेच्या सत्संगामध्ये केल्या जाणार्‍या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही साधना करत राहिलात, तर ती योग्यच होणार आहे.

एखाद्या मुलाला तो करत असलेला अभ्यास योग्य कि अयोग्य, अशी शंका येत नाही. शाळेतील शिक्षक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास शिकवतात, घरी आई-वडील शिकवतात आणि तो स्वतःही करत असतो. सर्व साधकांची वृत्ती अशीच पाहिजे. अध्यात्मात कोणाचे तरी बोट धरूनच चालावे लागते. ‘मी, माझी साधना, एकटा बसून करतो’, असे ज्याच्या बाबतीत होते, त्याला असे प्रश्न पडतात. जो सत्संगात जातो, त्याने अगदी निःशंक मनाने साधना करावी.

 

प्रश्न : आपल्याकडे येणार्‍या बहुतेक साधकांच्या बोलण्यावरून त्यांना पुष्कळ भटकावे लागते. सहज भेट होत नाही, यामागे वाईट शक्तींचा त्रास आहे कि गुरु परीक्षा घेतात ?

उत्तर : अध्यात्मात नेहमीच भटकावे लागते. आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमवेत मी (प.पू. डॉ. आठवले) २-३ वर्षे इंदूरपासून विशाखापट्टणमपर्यंत ठिकठिकाणी फिरलो. तो साधनेचाच एक भाग असतो. निरनिराळ्या ठिकाणचे साधक कसे रहातात, कसे बोलतात, कसे वागतात, त्यांचे प्रश्न कसे असतात, हे सर्व शिकून घ्यायला हवे ना ! एका छोट्याशा डबक्यात राहिले किंवा विहिरीत राहिले, तर विहीर म्हणजे सागर वाटतो.

गुरु परीक्षा घेतच नाहीत. गुरूंना परीक्षा घ्यायची आवश्यकता नसते. गुरूंना जिथे सर्वच कळते, तिथे परीक्षा घेऊन याची किती सिद्धता आहे, हे पहाण्याची आवश्यकता नाही. मुलांनी किती अभ्यास केला, गणितं सोडवता येतात कि नाही, पाढे पाठ आहेत कि नाहीत, हे शिक्षकांना कोणाकडे पाहून कळत नाही. त्यामुळे शिक्षकांना परीक्षा घेणे आवश्यक आहे; मात्र गुरूंना कळते. ‘हा माझा किती चांगला शिष्य आहे’ हे इतरांना दाखवण्यासाठी ते परीक्षा घेतात.

कल्याणस्वामींची रामदासस्वामींनी परीक्षा घेतली. कल्याणस्वामी ज्या फांदीवर बसला होता, ती खोडाकडील बाजूने कापण्यास सांगितले. तसे केल्यामुळे कल्याणस्वामी विहिरीत पडला. त्यांना ठाऊक होते, हा फांदी कापणार, विहिरीत पडणार, सर्वच ठाऊक होते. शेवटी समर्थांनी कल्याणला झेललेच ना ! त्यांनी विचारले, ‘‘अरे, कसा आहेस ?’’ कल्याण म्हणाला, ‘‘अगदी आनंदात आहे.’’ समर्थ गेल्यानंतर कल्याणस्वामींनी समर्थांचे कार्य पुढेही चालू ठेवले. त्याची योग्यता लोकांना समजावी म्हणून हे सर्व होते.

 

प्रश्न : गुर्वाज्ञेचा भावार्थ कळायला फार वेळ लागतो. कधी कधी सर्व होऊन गेल्यावर कळते. यावर उपाय काय ?

उत्तर : प्रारंभी गुरूंना काय म्हणायचे आहे, ते आपल्याला कळतच नाही. त्यांच्या साध्या-साध्या बोलण्याचा भावार्थही आपल्याला कळत नाही. तो कळावा, यासाठी सनातन संस्थेने ‘बाबांची शिकवण’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यात गुर्वाज्ञेची शेकडो उदाहरणे लिहिलेली आहेत. भजनाच्या ग्रंथातसुद्धा भजनांच्या ओळींचे भावार्थ लिहिलेले आहेत. या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास केल्यावर संतांची भाषा काय असते, त्याचा खरा भावार्थ काय असतो, ते समजून घ्यायची सवय लागेल. एका संतांचे बोलणे कळायला लागले की, सर्व संतांचे बोलणे समजायला लागेल.

 

प्रश्न : साधना सतत होत नाही. साधनेसाठी प्रतिदिन किती वेळ द्यावा ?

उत्तर : आपल्या बुद्धीचा निश्चय झालेला नसल्यामुळे साधनेत सातत्य नसते. ‘निश्चयात्मकः बुद्धी’, आपले मन, चित्त, बुद्धी, अहंकार या प्रत्येकाचे कार्य ठरलेले असते. संकल्प आणि विकल्प निर्माण करणे, हे मनाचे कार्य आहे. विकल्पामुळे साधनेत अडचणी येतात. जेव्हा मनोलय होईल, त्याच वेळी आपले सर्व विकल्प, अडचणी गेलेल्या असतील. तोपर्यंत नाही. मनोलय होण्यासाठी पुन्हा साधना म्हणजे नाम घेणे, सत्संगात जाणे, सत्सेवा करणे, सत्साठी त्याग करणे, हे सर्व करावे लागते. याचे प्रमाण किती असावे, याला काही अर्थ नाही. बुद्धीचा निश्चय करून उत्तम साधक, उत्तम शिष्य बनता आले पाहिजे. ज्या क्षणाला साधनेचे, अध्यात्माचे महत्त्व कळते, त्याच क्षणाला जो सर्वस्वाचा त्याग करतो, तो मुक्तच होतो. त्याला सर्वोत्तम शिष्य म्हटले जाते. बुद्धीचा निश्चय होणे, हेच महत्त्वाचे असते. आपल्या बुद्धीला निश्चिती नसते की, आपण सर्वस्वाचा त्याग केला आणि उद्या देवाने आपल्याला काही साहाय्य नाही केले, तर काय ? भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, डोंगरावरून खाली फेकले, तरी देव वाचवेल ही त्याची श्रद्धा होती; म्हणून देवाने त्याला वाचवले. त्याच्यासाठी देवाला नृसिंह अवतार घेऊन खांबातून प्रकट व्हावे लागले. जेवढी श्रद्धा आहे, त्याप्रमाणात देव प्रकट होणार आहे.

श्रद्धा ही अनुभूतीतून निर्माण होते. अनुभूती साधना केल्यावरच येतात. साधना होण्यासाठी अध्यात्मावर विश्वास बसायला हवा आणि विश्वास हा अध्यात्माच्या अभ्यासातून निर्माण होतो. अध्यात्माचे केवळ वाचन नाही, तर अभ्यासच केला पाहिजे.

 

प्रश्न : आपली अध्यात्मात प्रगती किती झाली आहे किंवा प्रगती होत आहे का ? हे कसे समजायचे ?

उत्तर : आपली अध्यात्मात प्रगती होत आहे का, याविषयी एक चांगली गोष्ट आहे. एका शिष्याने त्याच्या गुरूंना हाच प्रश्न विचारला होता की, माझी अध्यात्मात प्रगती होत आहे, हे मला कसे कळेल आणि माझी प्रगती झाली आहे, हे इतरांना कसे कळेल ? गुरूंनी सांगितले, ‘‘हे बघ, एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा प्रथम तिलाही कळत नाही. काही आठवडे, मास (महिने) गेल्यानंतर तिला जाणीव होते की, आपण गर्भवती झालो. तशाच प्रकारे शिष्याला आतून जाणवायला लागते की, आपण काहीतरी निराळे अनुभवत आहोत. आणखी काही मास गेले की, इतरांनासुद्धा जाणवू लागते की, ही स्त्री गर्भवती आहे. तसे आपल्या प्रगतीची लक्षणे हळूहळू इतरांनाही जाणवू लागतात.’’

मनातील शेकडो विचार न्यून होऊ लागले, स्वप्ने पडायची अल्प झाली किंवा सात्त्विक स्वप्न (संतांची, देवांची) पडू लागली, कोणीतरी स्वप्नावस्थेत काहीतरी शिकवतो आहे, असे व्हायला लागले, ही सर्व प्रगतीची लक्षणे आहेत. स्वप्नावस्थेत शिकवणे नसते, तर ते स्वप्न नसून ती तुर्यावस्था म्हणजे चतुर्थावस्था असते. त्यात कोणीतरी उन्नत शिकवत असतात.

स्वप्न आणि स्वप्नदृष्टांत यात भेद आहे. एखाद्याला काहीतरी सूत्र स्वप्नात शिकवलेले आहे, त्याच किंवा दुसर्‍या दिवशी एखादे पुस्तक वाचायला घेतले आणि नेमके तेच सूत्र वाचनात आले किंवा कीर्तन-प्रवचनाला गेलो आणि नेमके त्याच विषयाचे विवरण झाले किंवा कोणीतरी उन्नत भेटले, त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी नेमके तेच उत्तर दिले की, समजायचे आपल्याला स्वप्न पडले नव्हते, तर स्वप्नदृष्टांत झाला होता.

भक्तीमार्गाने साधना करणार्‍यांचा अष्टसात्त्विकभाव जागृत होऊ लागतो. कोणीतरी संत इत्यादी आले किंवा भक्तीमार्गातील कुठेतरी काहीतरी चालले असले की, उमाळा येणे, डोळ्यांतून अश्रू येणे इत्यादी. अशी बरीच लक्षणे आहेत. प्रत्येकाच्या पातळीप्रमाणे त्याला तशा तशा अनुभूती येतात. इतरांना कसे कळते की, हा उन्नत आहे, याची प्रगती झाली आहे, तर त्याच्याकडे पाहिल्यावर पहाणार्‍याला प्रसन्न वाटते, आनंद होतो किंवा नामस्मरण आपोआप चालू होते किंवा ध्यान लागते.

 

प्रश्न : निरनिराळ्या भागांत एखादा संप्रदाय अधिक प्रमाणात प्रचलित असतो. इतर भागांत तो तितकासा नसतो. मी ज्या संप्रदायाचे नाम घेतो, त्यात सांगितलेली साधना करतो, तसे करणे इतर भागांत त्या संप्रदायाचे लोक नसल्याने शक्य होत नाही. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दुसर्‍या भागात रहायला जाणार्‍या माझ्यासारख्या अनेकांना ही समस्या असते. अशा वेळी आम्ही काय करायचे ? किंवा या अथवा इतर कारणांनी साधना खंडित झाली असेल, तर काय करावे ?

उत्तर : आपण करत असलेल्या साधनेतून अनुभूती येत आहेत, सूक्ष्मातील काहीतरी कळायला लागले आहे, सूक्ष्मातील, तसेच पुढच्या पातळीच्याअनुभूती येऊ लागल्या आहेत, तर साधना पालटायची आवश्यकता नाही. आहे, तीच साधना चालू ठेवावी.

एखाद्याला गुरु जेव्हा गुरुमंत्र देतात, तेव्हा ते त्या मंत्रात चैतन्य घालून देतात. आपण सातत्याने त्या मंत्राचा जप करून त्यातील चैतन्य जागृत ठेवले नाही, तर दोन वर्षांनी त्यातील सर्व चैतन्य संपून जाते. गुरु गुरुमंत्र देतांना त्यात चैतन्य देतात, म्हणजेच त्यामागे ‘हे नाम तू घे तुझी प्रगती होईल’ असा गुरूंचा संकल्प असतो. आपण जर ते घेतलेच नाही, तर त्या नामातील चैतन्य जाते, म्हणजेच गुरूंचा शिष्याच्या प्रगतीविषयीचा जो संकल्प असतो, तो नाहीसा होतो. त्यापेक्षा बराच कालावधी गेला असेल, तर आपल्याला गुरु आहेत, गुरुमंत्र मिळालेला आहे, हे सर्व विसरून जायचे आणि पुन्हा साधनेला आरंभ करायचा.

 

आ. साधना – तात्त्विक

प्रश्न : साधकाला सोळा संस्कार करण्याची आवश्यकता आहे काय ?

उत्तर : व्रतवैकल्ये ही कर्मकांडाचा भाग आहेत. ज्याला नाम घेणे जमत नाही, सेवा जमत नाही, त्याग जमत नाही, त्याने निदान व्रते तरी करावीत. वर्षातून एकदा वटसावित्री करणे, ऋषीपंचमी करणे, हा अतिशय कनिष्ठ भाग आहे. ज्याला प्रतिदिन देवाची पूजा करणे जमत नाही, त्याने वर्षातून दोनचार दिवस तरी व्रते करावीत. ज्याला पूजा जमते, त्याने व्रत करायला नको. ज्याला नाम घेणे जमते, त्याने पूजा करायला नको. ज्याला सेवा, त्याग करणे जमते, त्याने नामही नाही घेतले, तरी चालते. पुढच्या पाचवीच्या वर्गात गेल्यावर आपण चवथीचा अभ्यास करत नाही ना, तसेच हे आहे.

 

प्रश्न : काहींची विविध प्रकारची साधना निष्काम मनाने चालू असते. त्यासह परोपकार, सत्कर्म आदीही अहर्निश चालू असते; तरीसुद्धा त्यांना अनेक विवंचना, काळज्या असतात. अशा वेळी ईश्वराविषयी, साधनेविषयी श्रद्धा ढळते.

उत्तर : खरेतर विविध प्रकारची साधना म्हणजे साधनाच नव्हे. साधना म्हणजे काय, तर नाम, सेवा, त्याग, तन-मन-धन यांची साधना. तीर्थयात्रेला जाणे, एखादी पोथी वाचणे, सोमवार करणे, अशा विविध प्रकारच्या साधनांना साधना म्हणता येणार नाही. साधनेत एकनिष्ठा लागते. एका देवाची भक्ती लागते. असे केल्यास विवंचना रहाणार नाहीत. म्हणजे आजार एक आहे आणि त्यावरील उपचार अर्धवट आहेत किंवा त्यावरील उपचार घेतलेलेच नाहीत, तर आजार तसाच रहाणार.

आपण जन्माला आलो, हाच मोठा आजार आहे. तो घालवण्यासाठी किंवा जन्मातील अडचणी सोडवण्यासाठी योग्य तीच साधना करावी लागते. ‘परोपकार, सत्कर्म’ हे अध्यात्मात येत नाहीत. ते अगदी खालच्या पातळीचे झाले. सर्व परोपकार हे भावनेच्या पोटी केले जातात. भावना संपवून टाकणे, भावना नष्ट करणे, म्हणजे अध्यात्म ! भावना हे सर्व मानसिक पातळीचे आहे. अध्यात्मात त्याच्या पुष्कळ पुढे जायचे असते. तेथे भाव हवा असतो आणि भाव अनेकांविषयी असू शकत नाही.

भावना म्हणजे काय, तर भिकार्‍याविषयी काही वाटले आणि त्याला पैसे दिले. कोणाला नोकरी नाही, तर मी त्याच्यासाठी काहीतरी करतो. या गावात दवाखाना नाही, तर त्याची सोय करतो. या गावातल्या माणसांना चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागते, त्यांच्यासाठी विहीर खणून देतो. इकडे शाळा नाही, तिकडे ग्रंथालय नाही..! या सर्वांचा कधी शेवटच नाही.

या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून साक्षीभावाने पहाता येणे, म्हणजे ‘साधना’. त्याला ‘स्थितप्रज्ञता’ म्हणतात. अशा वेळी जगात काय चालले आहे, त्याचे काही वाटत नाही आणि स्वतःविषयी काही झाले, तरी त्याचेही काही वाटत नाही. अध्यात्मातील तो फार पुढचा टप्पा असतो; पण प्रारंभ कुठेतरी केला पाहिजे. भिकारी पाहिला, की कणव आली, एखाद्याला चाकरी नाही; म्हणून लगेच आपल्याला कीव आली, असे चालणार नाही. ज्याला जीवनात काहीतरी साध्य करायचे आहे, परमेश्वराची म्हणजेच सच्चिदानंदाची प्राप्ती करायची आहे, त्याने सुख-दुःखात गटांगळ्या खाण्यापेक्षा सच्चिदानंदाची अनुभूती घ्यावी. अर्जुनाला केवळ पक्ष्याचा डोळा दिसला आणखी काही दिसले नाही, तसे साधकाला ‘मी नाम घेतो कि नाही’, ‘मी सत्सेवा करतो कि नाही’,‘मी सत्साठी त्याग करतो कि नाही ’, असे सर्व सत्-सत् दिसले पाहिजे. त्याला मायेतील दिसायला लागले, मी परोपकार करतो, कोणाला चाकरी लावून देतो, कोणाला धंद्यासाठी भांडवल देतो, हे सर्व चुकीचे झाले.

परोपकार करणे अध्यात्माच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे नसले, तरी तो छोटा का असेना एक टप्पा आहे. बहुतेक माणसे स्वार्थी असतात. स्वतःचाच विचार करतात. मी माझे कुटुंबीय त्यांच्यासाठी काही पैसे ठेवले पाहिजेत इत्यादी. जे स्वतःचाच विचार करतात, त्यांच्यापेक्षा जो थोडासा परोपकार करतो, तो चांगला. अध्यात्माच्या दिशेने आज ना उद्या, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात कधीतरी तो निश्चितपणे जाऊ शकेल; परंतु जे खरे साधक असतात, त्यांना याच जन्मात काहीतरी साध्य करायचे असते. त्यांनी असल्या परोपकाराच्या भानगडीत पडायचे नाही.

‘सत्कर्म’ म्हणजे ‘सत् कर्म’ ! भिकार्‍याला पैसे देणे, शिक्षणाला पैसे नाहीत त्याला ते देणे, विहीर बांधणे, शाळा बांधणे, दवाखाना काढणे, ही सर्व असत् मधील म्हणजे मायेतील कर्मे आहेत. आपण यांना सत्कर्म म्हणत असलो, तरी अध्यात्माच्या दृष्टीने ही सगळी असत्कर्मे झाली. अध्यात्माच्या दृष्टीने परमेश्वर, ब्रह्म याला ‘सत्’ म्हणतात. ब्रह्म, परमेश्वर सोडून जे काही असेल, ते सगळे असत्, म्हणजेच ‘माया’.

अनेक विवंचना, काळज्या जातील कधी ? जे काही प्रारब्धात आहे, तसे घडणारच आहे. कोणाला चाकरी नसेल, कोणाला मूल नसेल, कोणाचे लग्न होत नसेल, हे सर्वतर असणारच आहे. या सगळ्यांकडे साक्षीभावाने पहाता येत नाही, तो दुःखीच रहाणार.

साधना योग्य असेल, तर परिस्थिती कशीही असली, तरी तो आनंदीच असतो. शेगावचे गजानन महाराज चिखलात, उकिरड्यावर बसलेले असायचे, तरी आनंदावस्था भोगत होते. आपण चांगल्या सोफ्यावर बसलो, तरी आपल्याला काळज्या असतात. आनंद ही आपल्या मनाची, जिवाची अवस्था आहे. विवंचना, काळज्या हे व्यवहारातील माणसे करतात. स्वतःच्या प्रश्नांकडे साक्षीभावाने पहाता आले नाही, तर कितीही साधना केली, तरी सगळे व्यर्थ जाते. तुम्हाला आनंदाची अनुभूती येणार नाही.

एखाद्याने स्वतःच्या मनाने चुकीचे उपचार केले आणि म्हणू लागला, की वैद्यकीय शास्त्रावर माझा विश्वासच नाही, तर त्याला अर्थ नाही. खर्‍या वैद्याकडे जाऊन उपचार घेतल्यावर तो नक्कीच ठीक होईल. अध्यात्मात कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर प्रगती होणारच आहे; कारण ‘अध्यात्मशास्त्र’ इतके परिपूर्ण शास्त्र आहे की, साधना केल्यावर त्याचे फळ मिळालेच पाहिजे.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’

Leave a Comment