भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

प्रश्‍न : भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र होता. त्यामुळे ‘देवाचा पुत्र’ या नात्याने त्यालाही आपण ‘देव’ मानू शकतो का ?

उत्तर

भीमाला ‘देव’ मानणे, हे पुढील कारणांमुळे अयोग्य ठरते.

१. भिमात वायुतत्त्वाचे प्रमाण अधिक असणे

‘भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र होता’, याचा भावार्थ आहे, ‘भिमात वायुतत्त्व अधिक प्रमाणात होते.’

२. ‘लीला (चमत्कार) करणे’, या
देवतांच्या वैशिष्ट्याचा भीमामध्ये अभाव असणे

‘लीला (चमत्कार) करणे’, हे देवतांचे एक वैशिष्ट्य आहे. अनादी काळापासून देवता लीला करत आल्या आहेत, उदा. गौतमऋषींच्या शापामुळे शिळा बनलेली अहिल्या प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुन्हा मानवरूपात आली. द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्याचे पिता वसुदेव त्याला घेऊन यमुना नदी पार करण्यासाठी नदीत उतरले, तेव्हा त्या बाळकृष्णाच्या पदस्पर्शाने नदी दुभंगली आणि तिने वसुदेव यांना जाण्यासाठी वाट करून दिली. या पार्श्‍वभूमीवर भीमाचा विचार करता त्याने त्याच्या जीवनामध्ये अतुलनीय असे अनेक पराक्रम केले; परंतु श्रीराम, श्रीकृष्ण आदी देवतांसारख्या लीला केल्याचे दिसत नाही.

३. देवतांच्या पृथ्वीवरील पुत्रांमध्ये देवतांच्या
तत्त्वांचे प्रमाण पुष्कळ अल्प असल्यामुळे ते ‘देवता’ नसणे

देवता या मुळात मानवाप्रमाणे देहधारी नसून ती तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे अस्तित्व अनंत काळ असते. त्यामुळे कोणत्याही काळात भक्तांनी देवतांची उपासना केल्यास त्यांना अनुभूती येतात. त्या तुलनेत पृथ्वीवर (भूलोकात) जन्मलेल्या कुश-लव, भीम आदी देवतांच्या पुत्रांमध्ये त्या त्या देवतेच्या तत्त्वाचे प्रमाण पुष्कळ अल्प आणि मनुष्यत्व अधिक असल्याचे आढळते. परिणामी मनुष्याला असलेले उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे नियम देवतांच्या या पुत्रांनाही लागू होतात. यास्तव देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment