परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !

एका जिज्ञासूने विचारलेला प्रश्‍न

मी एका अन्य पंथीय मुलीशी विवाह केला आहे. आम्हाला घरून विरोध आहे. आम्ही घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण घरचे पत्नीला आणि तिने स्पर्श केलेल्या अन्नाला स्वीकारण्यास सिद्ध नाहीत. माझे कुटुंबीय हिंदु चालीरिती आणि जातीव्यवस्था मानतात.

हिंदू धर्म जाणणार्‍या आमच्या येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीने माझ्या कुटुंबियांना सांगितले, ‘‘आमच्याशी बोलू नका आणि कुठलाही संबंध ठेवू नका; कारण धर्म हा मानवनिर्मित नसून देवाने तो व्यक्तीला जन्मतःच दिलेला आहे. तो प्रयत्न करूनही बदलू शकत नाही.’’ परपंथियाशी विवाह हे पाप असल्याचे सांगून त्या व्यक्तीने मुलीला नाममंत्र देण्यास नकार दर्शवला आहे. मुलगी हिंदु धर्म स्वीकारण्यास सिद्ध आहे; परंतु त्या प्रतिष्ठित व्यक्तीने त्यास नकार दिल्याने माझे आई-वडील काही ऐकून घेण्यास सिद्ध नाहीत. याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. – एक जिज्ञासू, कोलकता, बंगाल. (१३.१.२०१७)

उत्तर

१. धर्माच्या व्याख्या

अ. अंतिम सत्याची जाणीव करून देणारा मार्ग, म्हणजे धर्म.

आ. मनुष्याला भगवंताकडे जाण्याची वाट दाखवतो, तो धर्म.

इ. मनुष्याला जीवनात आनंदी रहायला शिकवतो, तो धर्म.

ई. जीवनाचे सार्थक घडवण्याचा मार्ग दाखवतो, तो धर्म.

उ. उत्पत्ती नाही आणि अंतही नाही, असे शाश्‍वत सत्य, म्हणजे धर्म.

ऊ. मनुष्याची परमेश्‍वरापर्यंत जाण्याची शिडी, म्हणजे धर्म.

ए. ‘व्यवहार आणि साधना यांमध्ये उत्तम आचरण कसे असावे’, हे शिकवतो तो धर्म.

ऐ. जीवनाचे मर्म जाणायला शिकवतो, तो धर्म.

ओ. मनुष्याच्या जीवनाची व्यावहारिक आणि आध्यात्मिक वाटचाल योग्य तर्‍हेने व्हावी, यासाठीचे                 लिखित आणि अलिखित नियम, म्हणजे धर्म.

२. सनातन हिंदु धर्माचे स्वरूप

सृष्टीच्या उत्पत्तीनंतर आदर्श जीवन जगण्याच्या मार्गाला ‘धर्म’ असे संबोधन प्राप्त झाले. ऋषींना ‘धर्म हा ईश्‍वरनिर्मित असून तो चिरंतन आहे’, हे समजल्याने त्याला ते ‘सनातन धर्म’ असे म्हणू लागले. कालांतराने ‘सनातन हिंदु धर्म’ हे नाव उदयास आले.

पृथ्वीवर ‘सनातन हिंदु धर्म’ हा एकमेव धर्म असून तो परमेश्‍वरनिर्मित आहे. परमेश्‍वरप्राप्तीचे अन्य मार्ग हे धर्म नसून पंथ आहेत. त्याला शास्त्रीय आधार अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे त्या पंथांना उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे.

३. पंथ

‘विशिष्ट विचारांची अपरिपक्व अवस्था म्हणजे पंथ. पंथांमध्ये सनातन धर्मातील अनंत सूक्ष्म मूल्यांचा पुष्कळ अभाव असल्याने पंथाला ‘अपरिपक्व’, असे संबोधले जाते.

४. मूळ सनातन धर्म एकमेव असून पंथ
आणि त्यांच्या अनुयायांची निर्मिती होण्यामागील कारणे

४ अ. धर्मनिंदा

मनुष्याचे पूर्वी लक्षावधी जन्म झाले आहेत. कालांतराने व्यक्तीचे साधनेचे प्रमाण न्यून (कमी) होत गेले. अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.

४ आ. धर्महानी

काही जन्मांत व्यक्तीच्या अयोग्य वर्तनाने मोठ्या प्रमाणात धर्महानी झालेली असते. त्याचे पातक लागल्याने त्याला पुढील जन्मात हिंदु धर्मात स्थान न मिळता अन्य पंथात जन्म प्राप्त होतो.

४ इ. अधर्माचरण

काही जन्मांत व्यक्तीने धर्माचा आधार घेऊन चुकीचे आचरण केलेले असते. धर्मद्रोह करण्याच्या परिणामस्वरूप व्यक्तीला अन्य पंथामध्ये स्थान मिळते.

५. पंथांच्या निर्मितीचा दुष्परिणाम

मनुष्याला आनंद आणि व्यावहारिक जीवन जगण्याचा मार्ग सापडावा, यासाठी सनातन धर्माची निर्मिती झालेली आहे. हिंदु धर्मावर अन्य पंथियांची विविध पद्धतीने आक्रमणे होऊन ते स्वतःचे वर्चस्व निर्माण करू लागले. त्यामुळे बहुसंख्य समाज मूळ धर्मापासून दूर गेला, तसेच हे पंथ मानवनिर्मित असून  त्यांचे बहुतांश विचार हे विघातक असल्याने अशुद्धता निर्माण होऊ लागली.

६. अन्य पंथातील व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश घ्यावासा वाटण्यामागील शास्त्र

व्यक्तीच्या मागील जन्मांतील पापकर्मांमुळे त्याला विशिष्ट पंथात जन्म घ्यावासा वाटतो. व्यक्तीचे पूर्वीच्या जन्मांतील पापकर्म भोगून संपते, तेव्हा त्याला हिंदु धर्मात, म्हणजे स्वधर्मात प्रवेश घ्यावासा वाटतो. ‘स्वधर्मात प्रवेश घ्यावासा वाटणे’, हे व्यक्तीचे प्रारब्ध अनुकूल होत असल्याचे लक्षण आहे.

७. हिंदु धर्मात प्रवेश करण्यापूर्वी धार्मिक विधींद्वारे शुद्धीकरणाचे महत्त्व

७ अ. अन्य पंथातील चुकीच्या विचारसरणीने चित्तात आलेली
मलीनता हिंदु धर्मातील शुद्धीकरणासारख्या धार्मिक विधींनी दूर होणे

प्रत्येक जीव हा परमेश्‍वरनिर्मित असून त्याचे बीज शुद्धच आहे; परंतु अन्य पंथातील चुकीच्या विचारसरणीने चित्तात मलीनता निर्माण झाल्याने अन्य पंथात गेलेल्या जीवात दोष निर्माण झालेला असतो, तसेच स्वधर्म सोडून अन्य पंथात गेल्याचे पातकही लागलेले असते. शुद्धीकरणासारख्या धार्मिक विधींनी हा दोष दूर होऊन संबंधित जीव शुद्ध होऊन तो हिंदु धर्मात येण्यास पात्र बनतो.

८. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

८ अ. हिंदु धर्मशास्त्रातून भगवंताची प्रीती आणि क्षमाशीलता व्यक्त होणे

भगवंतात प्रीती आणि क्षमाशीलता हे गुण आहेत. ‘हे गुण त्याने निर्माण केलेल्या धर्मात अंतर्भूत नाहीत, असे कसे होईल ?’ भगवंताच्या या गुणांमुळे हिंदु धर्मात मनुष्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी प्रायश्‍चित्त कर्म सांगितले आहेत. प्रायश्‍चित्त कर्माने व्यक्ती दोषमुक्त होतो. भगवंत अशा व्यक्तीला क्षमा करतो, तसेच त्यावर कृपा करून त्याला पुढील मार्ग दाखवतो.

९. अन्य पंथातून हिंदु धर्मात प्रवेश घेऊ
इच्छिणार्‍याला साहाय्य करणे, हे सर्वात मोठे धर्मकार्य असणे

स्वधर्मात प्रवेश करण्याची इच्छा, म्हणजे व्यक्तीला खर्‍या जीवनाचा मार्ग सापडणे होय. धार्मिक विधींच्या शुद्धीद्वारे स्वधर्मात प्रवेश केल्याने संबंधित व्यक्तीला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच त्यासाठी साहाय्य करणार्‍या व्यक्तींनाही धर्मकार्य केल्याचे फळ मिळते; कारण हिंदु धर्माच्या निर्मितीचा उद्देशच समाजहित आहे. हे हित या गोष्टींनी साध्य होणार असते.

१०. हिंदु धर्मात कट्टर आणि एकांगी विचारांना स्थान नसणे

ऋषींनी विविध धर्मग्रंथ लिहिले. त्यांच्या या कार्यामुळे ‘सनातन धर्म’ पृथ्वीवर व्यक्त झाला. धर्मग्रंथात देवाला अपेक्षित शास्त्र विशद करण्यात आले; परंतु तसे करतांना त्यात अमानवी कट्टरता कुठेच नाही; कारण धर्मग्रंथातील प्रत्येक शास्त्र मानवी मर्यादा लक्षात घेऊन सांगितलेले आहे.

हिंदु धर्मशास्त्र हे भगवंताचे मनुष्यावरील प्रेम आणि क्षमाशीलता या गुणांचा आविष्कार दर्शवते. शास्त्राचे पालन करतांना येणार्‍या अनेक अडचणींचा विचार धर्मात केला आहे. त्यानुरूप मनुष्याला विविध पर्याय दिलेले आहेत. मनुष्याकडून चूक झाल्यास त्याला दंड अथवा प्रायश्‍चित्तही सांगितले आहेत. ‘या सर्वांचा केंद्रबिंदू मनुष्याचे कल्याण व्हावे’, हा आहे. त्यामुळे ‘अन्य पंथातून स्वधर्मात प्रवेशाची अनुमती न देणे किंवा अशा व्यक्तींशी संबंध ठेवू नये’, अशा प्रकारच्या एकांगी आणि अमानवी कट्टरतेला हिंदु धर्मात स्थान नाही.

११. अन्य पंथातून हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छिणार्‍यांनी लक्षात घ्यावयाचे सूत्र

हिंदु धर्मात सांगिलेल्या शुद्धीकरणासंबंधीचे विधी करून निःसंकोचपणे हिंदु धर्मात प्रवेश घ्यावा आणि हिंदु धर्माचे आचरण करून जीवनातील खरा आनंद प्राप्त करावा.

१२. अन्य पंथातून हिंदु धर्मात प्रवेश करण्यासंबंधी हिंदु कुटुंबियांनी ठेवावयाचा दृष्टीकोन !

अन्य पंथातील व्यक्तीने हिंदु धर्मात प्रवेश केल्याने त्याच्या जीवनाचे खर्‍या अर्थाने कल्याण होणार आहे. ‘व्यक्ती आता स्वधर्मात, म्हणजे स्वगृही आली आहे’, हे लक्षात घेऊन तिच्याशी आपलेपणाने आणि प्रेमाने वागावे. हाच संबंधित कुटुंबियांचा खरा धर्म आहे.

१३. अन्य पंथातून हिंदु धर्मात प्रवेश करतांना विरोध होत असल्यास ठेवावयाचा दृष्टीकोन !

अन्य पंथातून हिंदु धर्मात प्रवेश करणे आणि अशा व्यक्तीला साहाय्य करणे यांमध्ये स्वकियांचा विरोध होत असल्यास अशा प्रसंगांना तोंड देणे हा धर्माचरणाचाच एक भाग समजावा. अशांच्या पाठीमागे सर्वशक्तीमान ईश्‍वर असतो.

१४. परपंथातून हिंदु धर्मात आलेल्याचे क्षमाशीलतेने आणि प्रेमाने स्वीकार करण्यास शिकवतो,         तो सनातन हिंदु धर्म.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment