श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

१. श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?

श्री गणेशचतुर्थीचे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.

२. प्रतिवर्षी वेगवेगळ्या भावाच्या घरी गणपती बसवणे योग्य आहे का ?

द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती विभक्त असेल, तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे गणपति बसवणे योग्य आहे, असे शास्त्रात सांगितले आहे; मात्र काही कुटुंबांत कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे. अशा ठिकाणी गणपति प्रतिवर्षी वेगवेगळ्या भावाच्या घरी बसवतात, असे आढळते. हे योग्य कि अयोग्य ?

(परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले : कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेली एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा मोडायची नसेल, तर ज्या भावामध्ये गणपतीविषयी अधिक भक्तीभाव असेल, त्याच्याच घरी गणपति बसवणे योग्य आहे.

३. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ?

पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे –

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात सर्वाधिक शक्ती येईल. अधिक शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात; म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज आणि तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्तीला शक्य नसते.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ गणपति)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात