नामजपाविषयी शंकानिरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही, तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. ‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

नाम’ हा साधनेचा पाया आहे. श्रीकृष्णाने महाभारतात सांगितले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’ अर्थात् कलियुगात मी सर्व यज्ञांत जपयज्ञामध्ये आहे. यातून कलियुगातील नामाचे महत्त्व अधोरेखित होते. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.

 

प्रश्न : पूर्वीपासून माझे नाम चालू आहे; पण कुलदेवतेचे नाही. आता आपल्या संस्थेकडून कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व पटले; पण पूर्वीचे नाम चालू आहे. ते सोडून कुलदेवतेचे करावे का ?

उत्तर : आपल्याला योग्य साधना कळली की ती लगेच कृतीत आणली पाहिजे. नाही तर अयोग्य साधना करण्यात आपली साधनेतली वर्षे वाया जातात. कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व लक्षात येण्यापूर्वी आपण आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करत होता. संस्थेच्या संपर्कात येऊन योग्य साधना कळणे, ही कुलदेवतेचीच कृपा होय. आता कुलदेवतेचा नामजप अधिकाधिक करणे हेच ध्येय असले पाहिजे. तसे करतांना पूर्वीचा नामजप आपणहून मधून मधून होत असेल, तर ते गैर नाही. कुलदेवतेच्या नामाचा निश्चय झाल्यामुळे पूर्वीचा नामजप हळूहळू कमी होत कुलदेवतेचा जप सुरू होर्इल. अशा अनुभूती अनेक जिज्ञासूंनी घेतल्या आहेत. अध्यात्मात आग्रह असा काही नसतो, सांगणं हे सत्संग घेणार्‍याचे कर्तव्य, करणं-न-करणं शेवटी तुमच्यावरती आहे.

तुमच्यातला आणि माझ्यातला मुख्य फरक आहे तो हाच- मी (प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले) गुरूंकडे फार उशिरा म्हणजे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी आलो. तोपर्यंत मी अध्यात्मातही नव्हतो. ‘देव इत्यादी काही नाही’ अशीच विचारसरणी होती. माझे ऑस्ट्रेलिया ते अमेरिका येथपर्यंत जगात नाव होते, मान होता; पण मला माझ्या विषयाची म्हणजे संमोहन उपचाराची मर्यादा कळली. माझ्यापेक्षा संत पुष्कळ काही करू शकतात, हे मला कळले. शिकण्याची वृत्ती होती. संतांकडे गेलो. ते म्हणाले, ‘‘तुमची शिकण्याची पद्धत उपयोगाची नाही. आमच्या पद्धतीने शिका. नाम घ्या. सेवा करा. त्याग करा.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. करतो ना !’’ नाम घेतले, सेवेला महाराज, गुरु, संत कुठे असतील, तेथे जायचो. त्याग म्हणून माझे चिकित्सालय गुरूंना अर्पण केले. ऐकल्यावर लगेचच केले; म्हणून पाच वर्षांत मी गुरूंचा सर्वांत जवळचा होऊ शकलो.

‘मी करू का ?’, ‘मला बुद्धीला पटते’, ‘अजून करू कि नको ?’ अशा शंका आल्या, तर मग अनेक वर्षे जातील.

 

प्रश्न : मी अक्कलकोट स्वामींचे नामस्मरण करत होते. सत्संगात येऊ लागल्यापासून कुलदेवतेचे नामस्मरण करते. कोणती साधना चालू ठेवल्यास आध्यात्मिक प्रगती होईल ? कारण ‘अनेकातून एकात या’ असे सत्संगात सांगितले जाते.

उत्तर : संतांचा जप करू नये. आपला जो सहस्त्रो वर्षांचा इतिहास आहे, त्यात प्रचंड सामर्थ्य असलेले ऋषीमुनी होऊन गेले. कोणीही ‘आमच्या नावाचा जप करा’, असे सांगितलेले नाही. कोणाच्या मनात असा विचारही कधी आला नाही. तुकोबांनी कधी ज्ञानोबांचा जप करण्यास सांगितले नाही. नंतरच्या संतांनीही तुकोबांचा किंवा रामदासांचा जप करण्यास सांगितले नाही. ‘आपल्या नामाचा जप कोणी करतो’, हे रामदासांना कळले असते, तर त्यांनी त्याला थप्पड मारून सांगितले असते, ‘माझ्या नावाचा काय जप करतोस, रामाचा जप कर !’ आपल्याकडे कुठेही अशी परंपराच नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या काळातील संतांची देवळेही कुठे दिसणार नाहीत. सध्या मात्र साईबाबांची, गजानन महाराजांची मंदिरे बांधण्याची टूमच (फॅशनच) निघाली आहे. संत, अवतार आणि परमेश्वर यांच्यात पुष्कळ भेद आहे. प्रत्येक संतांना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम आहे. साईबाबा निर्माण झाले. ज्याला अशी निर्मिती आहे, उत्पत्ती आहे, त्याला स्थिती आहे. काही काळ साईबाबा असणार आहेत आणि कालांतराने साईबाबांचा लय होणार आहे. २००-३०० वर्षांनंतर साईबाबा असे काही उरणार नाही. गजानन महाराज उरणार नाहीत, अक्कलकोट स्वामी असेही काही उरणार नाही. आपल्या सहस्त्रो वर्षांच्या इतिहासात अशा सामर्थ्याचे कितीतरी संत होऊन गेले. ते सर्व नष्ट होऊन गेले, हेही नष्ट होतील; मात्र राम-कृष्ण हे जे अवतार आहेत, तसेच शंकर, विष्णु, गणपति हे जे सर्व देव आहेत, ते अनादी काळापासून आहेत आणि अनंत काळापर्यंत असणार आहेत.

एका सत्संगात साधकांना सांगितले की, दोन मिनिटे या नावाचा जप करा आणि काय वाटते, त्याची अनुभूती घ्या. त्यानंतर त्यांना सांगितले, आता या नावाचा दोन मिनिटे जप करा आणि काय अनुभूती येते, ते पहा. दोन्ही नावे त्यांनी कधीही ऐकलेली नव्हती. त्यामुळे मानसशास्त्राचा काही संबंध आला नव्हता. सर्व जण म्हणाले की, पहिल्या नावाचा दोन मिनिटे जप करतांना आम्हाला चांगले वाटले आणि दुसरे नाव दोन, चार, दहा, वीस वेळा घेतले आणि नकोसे झाले. पहिले जे नाव होते, ते देवतेचे होते आणि दुसरे नाव सध्याच्या काळातले-विदर्भात एक मोठे संत होऊन गेले, त्यांचे होते. संतांच्या नावामुळे त्रास झाला. असे का झाले ? तर संत काहीतरी कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलेले असतात. कार्य करायला त्यांना शक्ती लागते. संतांची कार्यरत शक्ती पुष्कळ जास्त असते. ती शक्ती आपल्याला सहन होत नाही. ईश्वर-देव तेसुद्धा कार्य करतात; परंतु त्यांची शक्ती कार्यापुरती म्हणजे क्षणिक असते. ते शिवस्वरूपात जातात. त्यामुळे त्यांची शक्ती नष्ट झालेली असते. संतांची शक्ती सहन करता येत नाही. ईश्वराचे असे कधी होत नाही.

 

प्रश्न : ‘गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात’, असे म्हणतात. तर ३३ कोटी देवांमध्ये कुलदैवत येते का ? कुलदैवत त्यात असेल, तर गायीचा जप करावा का ?

उत्तर : अर्थात हा विनोदाचा भाग सोडला, तरी पूर्वीच्या काळात काय करायचे, तो अगदी पुराणपूर्व काळातला थोडासा काळ आहे. आपण गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती आणतो ना; तर ते स्वतःच गणपतीची कणकेची इत्यादी छोटीशी मूर्ती बनवायचे आणि पूजा झाली, तिच्यात गणपतीची सर्व पवित्रके आवाहन करून आली की, गणपतीची मूर्ती खाऊन टाकायचे. झाले विसर्जन ! इतके ते हुशार होते. आपल्या ऋषीमुनींनी निरनिराळे एवढे प्रयोग केलेले आहेत आणि आपल्याला सत्य काय आहे, ते सांगून ठेवले आहे. आता जे सूत्र आहे की, गायीच्या पोटात ३३ कोटी देव आहेत.

कोटी शब्दाचे आठ-नऊ निरनिराळे अर्थ आहेत. संस्कृत उत्पत्तीकोषाप्रमाणे कोटी हा शब्द कोटपासून आलेला आहे. कोटचा एक अर्थ आहे नग्न. देवांना आपल्याप्रमाणे शरीर नसते. ते वायूरूप असतात. आपल्या डोळ्यांना चांगले दिसावे म्हणून आपण त्यांना कपडे, साज-शृंगार, मुकुट इत्यादी परिधान करत असतो. कोटचा दुसरा एक अर्थ ‘प्रकाशमान’ असा आहे. तिसरा त्याचा अर्थ आहे, दिशांत रहाणारे ‘दिशोत्भव’. दोन दिशा ज्या ठिकाणी जोडल्या जातात, त्या ठिकाणी त्या शक्ती निर्माण होतात. असे आठ-नऊ निरनिराळे अर्थ आहेत. येथे कोटी हा शब्द संख्यावाचक नाही.

सात प्रमुख तत्त्वे आहेत. ती ग्रहण करण्याची क्षमता कुलदेवतेच्या नामात आहे. तिचे नाम आपण घेतले की, आपल्यात जे तत्त्व न्यून असेल, ते वाढायला साहाय्य होते, उदा. शिवतत्त्व न्यून असेल, तर ते वाढू लागते. विष्णुतत्त्व न्यून असेल, तर ते वाढू लागते. प्राण्यात गाय हा एक असा प्राणी आहे, ज्याच्यात सर्व देवदेवतांची स्पंदने, पवित्रके आकृष्ट होऊ शकतात. जसे निरनिराळ्या देवतेचे निरनिराळे वाहन आहे, उदा. सरस्वतीचे मोर वाहन आहे, तर गणपतीचे उंदीर. याचाच अर्थ मोरात सरस्वतीचे, तर उंदरामध्ये गणेशतत्त्व आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत अधिक आहे. ‘गाय’ सर्वच देवतांचे तत्त्व घेऊ शकते; म्हणून आपण तिचे दूध घेतो. तिच्या दुधातून आपली क्षमता वाढते.

एकदा मुंबई येथील अभ्यासवर्गात आम्ही एक सूक्ष्मातील प्रयोग घेतला होता. बाहेरून सारखे दिसणारे चार डबे ठेवले होते. एकात फळे ठेवली होती, दुसर्‍यात साबुदाण्याची खिचडी आणि तिसर्‍यात पोळी-भात इत्यादी नेहमीचे अन्न ठेवले होते आणि चवथ्यात मासे ठेवले होते. ज्या साधकांची साधना दोन-दोन वर्षे झाली होती, त्यांनी अचूक ओळखले. एका डब्याकडे ‘पाहू नये’, असे वाटते. उघडून पाहिले, तर त्यात मासे होते. दोन डब्यांकडे पाहून बर्‍याच जणांना प्रसन्न वाटले, ज्यांमध्ये साबुदाण्याची खिचडी इत्यादी उपवासाचे पदार्थ आणि फळे होती. हे सर्व बुद्धीने कळणार नाही, साधना वाढली की, या सर्व शास्त्राची अनुभूती आपल्यालाच अनुभवता येते.

 

प्रश्न : नामस्मरण करतांना मनात अनेक विचारांची शृंखला असते आणि मनाचा फार गोंधळ होतो. अशा वेळी काय करावे ?

उत्तर : प्रथम म्हणजे ३० प्रतिशत पातळीला आपण जेव्हा नाम घ्यायला आरंभ करतो, तेव्हा ७० प्रतिशत इतर विचार मनात येणारच आहेत. जो नाम घेत नाही, त्याने जपमाळेने नाम घेण्याचा प्रयत्न केल्यास दोन-तीन मणी ओढल्यावर एक निराळाच विचार मनात घासून गेल्याचे त्याच्या लक्षात येईल. पुढे असाच सराव करत राहिल्यास विचार येण्याचे प्रमाण हळूहळू न्यून होऊ लागते. नामात विचार न येणे, मन एकाग्र होणे, हे आपले साध्य आहे, साधन नाही. नामाचे पुनःपुन्हा प्रयत्न करणे, हे साधन आहे. ३० सेकंद (पाव माळ) मन एकाग्र करता आले, तर समजायचे आपल्याला धारणा जमायला लागली. मनात एकही विचार न करता संपूर्ण माळ करता आली, तर त्याला ‘ध्यान लागले’, असे म्हणता येईल. इतके हे कठीण आहे.

नाम होत नाही; म्हणून प्रयत्न करत रहाण्यापेक्षा सत्संगाला जायला हवे. सत्संगामध्ये अनेक सात्त्विक माणसे एकत्र आलेली असतात. अनेकांची एकत्रित सात्त्विकता कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पुष्कळ जास्त असते. त्यामुळे एकत्रित सात्त्विकतेचा आपल्या मनावर परिणाम होतो. सत्संगाहून घरी जातांना थोडीफार सात्त्विकता आपण घरी घेऊन जात असतो. त्याचा लाभ आपले नामस्मरण वाढण्यावर होतो.

नाम ही मनाची साधना आहे. ती होत नाही, तर तनाची साधना म्हणजे सेवा करावी, उदा. मंदिर झाडणे, आश्रम झाडणे, तेथील वीज-तार जोडणीचे किंवा रंग लावण्याचे काही काम जमत असेल, तर ते करावे इत्यादी. त्या ठिकाणी जे आवश्यक आहे, ते करत जायचे. ती सत्सेवा म्हणजे साधनाच झाली. ती करता करता नाम घेऊ शकतो.

बहुतेकांना प्रथम पूजा-पाठ, देवळात जाणे, पोथी वाचणे एवढीच साधना जमू शकते. साधनेची जरा आवड असते, त्यांनी साधनेला येथून आरंभ करावा. देवपूजा करतांना ती मन लावून करावी. देवाला वाटले पाहिजे की, आज माझी खरंच किती प्रेमाने पूजा केली. नाहीतर आपले उरकून टाकायचे म्हणून देवांना घार्इघार्इने ताम्हनात घेतले, पटपट पाणी ओतले, मध्येच कोणाशीतरी बोलतोय, मुलांना काहीतरी सांगतोय हे योग्य नाही. देवपूजा करायची, तर ती एकाग्र चित्ताने करायला हवी. तुम्हाला गुरु असतील आणि त्यांना तुम्ही आंघोळ घालताय, त्या वेळी इकडे तिकडे लक्ष जाणार नाही. ज्या भावाने आपण गुरूंकडे पाहू, त्या भावाने त्या देवतेच्या मूर्तीकडे पहायला हवे. पोथी वाचणे, देवळात जाणे याविषयीही हाच नियम आहे. जैन लोक नामस्मरण करण्यासाठी मंदिरात जातात. घरापेक्षा मंदिर जास्त सात्त्विक असते. ज्यांना सत्संग मिळू शकत नाही, त्यांनी देवळात तरी जाऊन दोन-तीन माळा जप करावा. दोन-तीन वर्षांनी पूजेत मनाला चांगले वाटायला लागले, पूजा करतांना अष्टसात्त्विक भाव जागृत व्हायला लागला, आनंद मिळू लागला की, समजावे आपला पूजेचा टप्पा झाला. मग नामजप निश्चितपणे होऊ शकेल. असे टप्प्याटप्प्याने पुढे जायचे.

 

प्रश्न : मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्या वेळी मन एकाग्र न होता, मनामध्ये इतर विचार येतात. त्याकरिता काय करावे ?

उत्तर : मन एकाग्र होणे हे आपले साध्य आहे. साधन नाही. ज्या वेळी मन एकाग्र व्हायला लागेल, त्या वेळी तुम्ही संत झालात ! मन एकाग्र होण्यासाठी मनाची आसक्ती, म्हणजे ज्याच्या संदर्भात मनात विचार येतात, जसे ‘माझा मुलगा’, ‘माझी बायको’, ‘माझा धंदा’, ‘माझी समाजसेवा’ इत्यादी सर्वच आपण सोडून दिले, तर मनात विचार येणार नाहीत. आफ्रिकेत काय चालले आहे, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत काय चालले आहे, असे विचार आपल्या मनात येत नाहीत; कारण आपला या गोष्टींशी संबंध नाही. एकेक पाश तोडत चाललो की, नामस्मरण नीट होते.

प्रथम आपल्याला पाश तोडता येत नाही; म्हणून नामाच्या जोडीला थोडीतरी सेवा करावी. थोडातरी त्याग करावा. हे करता करता आपल्या लक्षात यायला लागते की, जेवढी आपण सेवा करतो, जेवढा आपण त्याग करतो, तेवढा आनंदही मिळू लागतो. आपल्याकडे अधिकोषात (बँकेत) पैसे आहेत; म्हणून आपल्याला जेवढे सुख मिळते, त्याच्याहून अधिक आनंद ‘आमच्याकडे काही नाही’, ‘आम्ही सर्व अर्पण करून टाकले’, असे झाल्यावर मिळतो. मी स्वतः अनुभवले आहे. माझे चिकित्सालय होते, तेव्हा माझी पुष्कळ ‘प्रॅक्टीस’ होती. महिन्याला २० – २५ सहस्त्र रुपये मिळत होते. पैशांपेक्षा संशोधनामध्ये अधिक रूची होती. ख्रिस्ताब्द १९८५ – १९८६ मध्ये तीन चार घंट्यांत एवढे मिळवायचो; पण ज्या वेळेला चिकित्सालय गुरूंना अर्पण केले, तेव्हा आता ते देतील, त्या पैशावर संसार करायला पाहिजे, असे वाटू लागले. गुरूंकडे जास्तीतजास्त जाणे होऊ लागले. मग २५ सहस्त्रांची ‘प्रॅक्टीस’ दहा सहस्र-दोन सहस्र रुपयांवर आली. अधिकोषातले सर्व पैसे संपत चालले. अधिकोषात पैसे नाहीत. हे झाल्यावर गुरूंनी दाखवून दिले की, अधिकोषात एक पैसाही नसतांना तुझे सर्व पूर्वीसारखेच चालले आहे. मोटार आहे, छपाईचा व्यय वाढला आहे, गावोगावी जाणे होत आहे, व्यय वाढत आहे; परंतु गुरु काही न्यून पडू देत नाहीत. तुम्ही जर पैसे तुमच्याकडेच ठेवलेत, तर देव तुम्हाला कशासाठी साहाय्य करील ? तुमचा तुमच्या अधिकोषातल्या खात्यावर जास्त विश्वास आहे, परमेश्वरावर नाही. देव म्हणेल, ‘तुझे अधिकोषातील खाते आणि तू.’ तुम्ही सर्व अर्पण करा, मग त्याचा (देवाचा) जो अधिकोष आहे, तो देव सर्व उघडा करून देईल.

नाम होत नाही, तर सत्संगात येत चला. तुम्ही नुसते घरी बसलात, तर नाम घेणे कठीण जाईल. वास्तूमध्ये सर्व विचार असतात. घरची सर्व माणसे समोर दिसत असतात. त्यांच्याविषयी विचार येणार.

जैन लोकांची एक चांगली पद्धत आहे. प्रतिदिन सकाळी ते डबी घेतात. त्यात त्यांची जपमाळ असते. मंदिरात जातात आणि तिकडे नामस्मरण करतात. एकतर घरच्या वातावरणापासून दूर जातात आणि मंदिरात सात्त्विकता असते. जेथे सात्त्विकता आहे, तिथे आपले नामस्मरण चांगले होते. या दोन गोष्टी करून त्याच्या जोडीला सेवा, त्याग यांमध्ये वाढ केली की, नामस्मरण कसे चांगले होते, याची अनुभूती घ्या.

 

प्रश्न : अनेक वर्षे माझ्या मनात एक शंका आहे. मला स्वप्नात एक जप मिळाला. मी नियमितपणे तो जप करत असे. पुढे पुढे मला त्याचा त्रास होत आहे, असे वाटले म्हणून मी आता प्रतिदिन १०८ वेळा जप करतो. अशा प्रकारचा जप करावा कि नाही ?

उत्तर : स्वप्नात मंत्र कळल्यानंतर जागृतावस्थेत तशा स्वरूपाची अनुभूती आली, उदा. एखादे पुस्तक वाचतांना तोच मंत्र वाचला, कोणीतरी भेटले आणि त्यांनी तोच मंत्र सांगितला, तर मग तो स्वप्नदृष्टांत मानायचा. तसे झाले नाही, तर सतत तीन रात्री स्वप्नात तोच मंत्र मिळाला, तर त्याला खरे समजायचे. स्वप्नांविषयी हे दोन नियम लक्षात ठेवावेत.

भुवलोकात असे बरेच आत्मे इकडे-तिकडे भटकत असतात. त्यांना कोणालातरी काहीतरी सांगावेसे वाटते, कोणाचीतरी थट्टा-मस्करी करावीशी वाटते. त्यासाठी ते उगाचच काहीतरी सांगत असतात. त्यांचे ऐकून आपण तो जप करायला लागलो की, त्यांना चांगले वाटते. टवाळखोर मुले जशी एखाद्याला चुकीचा पत्ता सांगून तो त्या दिशेने चालायला लागला की, हसू लागतात, त्याप्रमाणे या आत्म्यांचे असते. या टवाळखोरांपेक्षा भुवलोकात आणखीही एक प्रकारच्या वाईट शक्ती असतात, ज्यांना कोणीही साधना केलेली आवडत नाही. साधना केल्याने आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ. त्या सगळ्या वाईट शक्ती परमेश्वराच्या विरोधात असतात. त्या वाईट शक्ती नेहमी अडचणी आणतात. विकल्प निर्माण करतात. खोटी साधना सांगतात; म्हणून आपण स्वप्नांत सांगितलेल्या गोष्टींवर लगेचच विश्वास ठेवायचा नाही. शास्त्रातील नियमांच्या अनुसार साधना करावी.

 

प्रश्न : स्त्रियांना कुठलीही उपासना करतांना मासिक धर्माची वारंवार अडचण येत असते. एखादा ग्रंथ वाचायचा घेतला किंवा एखादी उपासना करायची ठरवली, तर ती उपासना खंडित होते. नामस्मरण करतांना मासिक धर्माची रूढी पाळली नाही, तरी चालते असे अनेक धार्मिक ग्रंथांत लिहिले आहे, ते कितपत खरे आहे ?

उत्तर : भक्तीमार्गात दोन भाग आहेत, त्यांतील एक म्हणजे कर्मकांड. कांड म्हणजे पेर. ‘उसाचे कांड’ असे आपण म्हणतो ना ! सबंध भक्तीमार्गातला कर्मकांड हा एक छोटासा भाग आहे. त्यामध्ये सर्व नियम इत्यादी पाळावे लागतात. सध्या आपण जो भक्तीमार्ग अनुसरतो, त्यात ‘तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ।।’. प्रत्येक गोष्ट जर परमेश्वराने निर्माण केलेली आहे, तर मासिकपाळीही त्यानेच निर्माण केली आहे. शौचसुद्धा त्यानेच निर्माण केले आहे. नाम घेतांना कोणतीही अडचण येत नाही. नाम कसेही आणि कोठेही घ्यावे.

व्रतांविषयीही मध्येच काही अडचण आली, तर काय करायचे, हे आपल्या धर्मशास्त्रात लिहिलेले आहे, त्या त्या प्रमाणे पुरोहित सांगतात. जसे ‘दुसर्‍या स्त्रीला बसवून करू शकता, जी तुमचे व्रत पूर्णत्त्वाला नेईल’ किंवा ‘हे प्रायश्चित्त घ्यावे’, ‘पुढच्या वेळेला परत आरंभ करा’. काही व्रते आणि उपासना पद्धतीत असेही असते की, झाले ते ठीक आहे. अंतर पडले ना, त्याच्या पुढचा भाग परत चालू करता येईल, म्हणजे त्या त्या प्रमाणात नियमात पालट होत जातो.

 

प्रश्न : घरात महिलांची मासिक अडचण असतांना नाम घ्यावे कि नाही ?

उत्तर : नाम हे भक्तीमार्गातील आहे. भक्तीमार्गात अशी काही बंधने नसतात. जिथे कर्मकांडाचा भाग आहे, तिथे सोवळे-ओवळे, शौच-अशौच हे सर्व पाळावे लागते.

‘तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ।’ असे वचन आहे. तुम्ही जर हरिचे दास असलात, तर सगळ्या दिशा, शौच-अशौच यांचे तुम्हाला बंधन नसते. वामन पंडितांनी म्हटलेच आहे, ‘अहो जाता-येता, उठत-बसता, राजद्वारी, स्मशाने, मैथुने सगळ्या वेळेला सर्वांची लाजलज्जा सोडून नामस्मरण करावे.’

 

प्रश्न : नाम हे गुरूंकडूनच घेतले पाहिजे का ? मी ज्योतिषी असून माझ्याकडे अनेक लोक येतात. त्यांच्या पत्रिका पाहून मी त्यांना अमुक देवतेची उपासना करा, असे सांगते. ज्यांच्या पत्रिका नसतात, त्यांना ‘त्यांच्या आवडत्या देवतेची उपासना करा’, असे सांगते; पण तेवढ्याने त्यांचे समाधान होत नाही. अशा वेळी मी काय करू शकते ?

उत्तर : ‘गुरुमंत्र’ असा शब्द आहे, ‘ज्योतिषमंत्र’ असा नाही. बरेचसे ज्योतिषी अगदी गुरुपदाचा आव आणून लोकांना काहीतरी सांगत असतात. ज्योतिषांचा गृहपिडेच्या संदर्भात अभ्यास असतो. त्यासंदर्भातील उपासना असेल, तर त्यांनी काही सांगणे अगदी योग्य आहे. संस्कृतमध्ये एक चांगले सुभाषित आहे. एखाद्याला काही अडचण आली आणि तो वैद्याकडे गेला, तर तो वैद्य म्हणेल, ‘‘अरे, तुला वात-पित्त-कफ यांतील काहीतरी अडचण असणार !’’ तोच रुग्ण मांत्रिकाकडे गेला, तर मांत्रिकम्हणतो, ‘‘भूतबाधा, करणी काहीतरी झाले असेल.’’ ज्योतिषाकडे गेला, तर ते म्हणतील, ‘‘अमूक एका ग्रहामुळे असे झाले आहे.’’ मग खरे काय समजायचे ? जुन्या काळापासून सगळ्यांनाच हा प्रश्न पडत आला आहे की, अडचण नेमकी कशामुळे निर्माण होते ?

बहुतेक अडचणी या सूक्ष्मातील कारणांमुळे निर्माण झालेल्या असतात. स्थुलातील कारणे फार थोडी असतात. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांना जे कळते, त्या सगळ्याला स्थूल म्हणायचे अन् पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांना जे कळत नाही, त्याला सूक्ष्म म्हणायचे. ६५ ते ७० प्रतिशत गोष्टींची कारणे सूक्ष्मातील असतात. सूक्ष्मातील कारण आपल्याला बुद्धीने कळत नाही. त्यासाठी ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बुद्धीने सूक्ष्मातील माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो; मात्र त्याला मर्यादा येतात. खालील एक-दोन उदाहरणांवरून आपल्याला सूक्ष्मातील कारणे कशी असतात, हे लक्षात येईल.

पुष्कळ प्रयत्न केले, तरी एखाद्याचा धंदा चालत नाही. एखाद्याचे लग्नच जमत नाही. एखाद्याला सारख्या मुलीच होतात किंवा सारखे गर्भपात होतात. अनेक प्रसूतीतज्ञांचा समुपदेश (सल्ला) घेऊनही काही लाभ होत नाही. मानवी प्रयत्नांत कुठेही न्यूनता नाही, तरीही यश येत नाही. अशा वेळेला बुद्धीच्या पलीकडचे काहीतरी असते. बुद्धीच्या पलीकडचे जाणून घ्यायला ज्योतिषशास्त्र थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडते. ज्योतिषी जे जन्मकुंडलीप्रमाणे सांगतात, त्यातील सर्वसाधारणपणे ३० ते ३५ प्रतिशत बरोबर येते. ज्या ज्योतिषांचा पुष्कळ अभ्यास आहे, स्वतःची साधना आहे, त्यांचे सत्यतेचे प्रमाण आणखी वाढत जाते. बाळाचा जन्म होतांना, त्याचे डोके खाली दिसायला लागले आणि ती वेळ लक्षात घेऊन कुंडली मांडली, तर ती ३८ प्रतिशतपर्यंत अचूक येते. त्याच्या आधी म्हणजे जेव्हा गर्भाशयाची आकुंचने प्रथम व्हायला लागतात, तो पहिला सेकंद लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती जवळजवळ ४४ प्रतिशतपर्यंत अचूक येते. आणखी त्याच्या आधी म्हणजे गर्भाशयाची हालचाल होतांना स्त्रीला पहिल्यांदा जेव्हा कळते, तो क्षण लक्षात ठेवून जर जन्मकुंडली मांडली, तर जवळजवळ ४७ ते ४८ प्रतिशत अचूक येते. सगळ्यात अचूक म्हणजे ज्या क्षणाला स्त्रीबीज फलीत होते, तो क्षण कळला, तर कुंडली १०० प्रतिशत अचूक येते; पण ते कळणार कोणाला ? आपल्या शरिरातील कोट्यवधी पेशींतील एका पेशीत काय झाले, ते आपल्याला कळूच शकत नाही. जी स्त्री स्वतःच संतांच्या पातळीला आहे, तिलाच हे कळू शकते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या पत्नींना त्याच क्षणाला समजायचे की, आता गर्भधारणा झाली. सध्या आपल्याला कळत नाही.

आपल्या चांगुलपणाने दुसर्‍यांचे भले व्हावे, या सात्त्विक इच्छेने काहीतरी साहाय्य करत आहात, याचा त्यांना नक्की लाभ होईल.

 

प्रश्न : नामस्मरणाचे महत्त्व पटलेले आहे; पण ‘नामस्मरण होत नाही’, असे सांगितले, तर ‘सेवा होते ना, मग झाले !’, असे सांगितले जाते; पण सेवेला महत्त्व द्यायचे कि नामस्मरणाला ?

उत्तर : आपण प्रत्येक जण निराळे आहोत. नामस्मरण ही मनाची साधना झाली. सेवा ही तनाची साधना झाली. त्याग ही धनाची साधना आहे. आज ना उद्या सर्वच करायचे आहे; पण कशाला आधी आणि कशाला नंतर प्रारंभ करू, असे वाटत असेल, तर तुमची जी प्रकृती आहे, त्याप्रमाणे करा. म्हणजे ज्याला शरिराने सेवा करायला जमते, त्याने त्याला प्रारंभ करावा. नंतर नामाचा प्रयत्न करावा. ज्याला नामस्मरण जमते, त्याने शरिराने सेवा करण्याचा प्रयत्न करावा. शेवटी सर्वच करायचे आहे. कुठून प्रारंभ करायचा, कुठे त्याचा शेवट झाला, त्यामुळे काही बिघडत नाही.

आपली जी प्रकृती असते, म्हणजे काही जणांची आध्यात्मिक पातळी जरा वरची असेल, तर त्यांना मनाची सेवा पटकन जमते. आणखी वरची पातळी असेल, तर त्यांना धनाचा त्याग जमतो. पातळी अल्प असेल, तर शरिराची सेवा जमते; पण प्रत्येक वेळी शरिराची सेवा करतो, म्हणजे पातळी अल्प असते, असे काही नसते. ज्याच्याकडून जी साधना त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असते, देव तसतशी आपल्याकडून ती करवून घेत असतो. मी गुरूंकडे जायचो. प्रथम अध्यात्म समजून घेणे, प्रश्न विचारणे, हे चालायचे. म्हणजे माझी ती सगळी बुद्धी आणि मन यांची साधना होती. मग करता करता गुरूंनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आतून कळतील, असे केले. मला शब्दातून काही विचारायला नको. या अवस्थेला एक-दीड वर्षातच आणले; पण माझा तो बुद्धीचा भाग झाला. शरिराचा भाग झाला नव्हता. गुरूंकडे गेल्यावर त्यांना प्रश्न विचारायचे. एक-दोन घट्यांमध्ये ते उत्तरे द्यायचे. कधी पन्नास प्रश्न असायचे, कधी शंभर प्रश्न असायचे. कधी मला सूत्र कळायचे नाही. मी परत परत विचारायचो की, बाबा मला हे कळले नाही. हे जरा तुम्ही मला निराळ्या भाषेत सांगा. ते निराळ्या भाषेत सांगायचे. त्याचे उदाहरण सांगायचे. सर्व समजावून सांगायचे. एकदा हा बुद्धीचा भाग संपला, मनाचा भाग संपल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘डॉक्टर, तुम्ही आता आश्रमात आला आहात ना, तर इकडचे सर्व दगड, काटेकुटे स्वच्छ करा.’’ नाशिक-पुणे मार्गावरील बाबांच्या कांदळीच्या आश्रमात माझ्या तनाच्या सेवेला प्रारंभ झाला. काही भक्त त्यांच्याकडे आले होते, त्यांना आधी तनाची सेवा करायला सांगितली आणि मग मन, बुद्धी यांची सेवा करून घेतली. म्हणजे आधी काय करायला पाहिजे, नंतर काय करायला पाहिजे, याचा जास्त विचार करू नका. आपल्याला सर्वच करायचे आहे. सर्व साधना ही सत्‌विषयी आहे, हे लक्षात ठेवा, असत्‌विषयी नाही.

पेणला एके ठिकाणी गेलो होतो. आपला सत्संग, व्याख्यान होते. देवळात गेल्यावर पाहिले, तर सगळीकडे जळमटे होती. जळमटे असतील, तर त्या घरात रहायला देवाला तरी आवडेल का ? देवळात देव रहाणार नाही. जेथे कचरा पडला आहे, घाण आहे, तिथे आपल्याला रहायला आवडणार नाही, तर देवालाही मुळीच आवडणार नाही. या सर्व साधना आपल्याला करायच्या आहेत. कुठची आधी कुठची नंतर, हा प्रश्न तसा गौण आहे.

 

प्रश्न : जप करतांना कधी कधी देवाचा एखादाच अवयव दिसतो, उदा. जटा, अंधुकसा तोंडवळा इत्यादी. संपूर्ण मूर्ती दिसत नाही. हे चांगले कि वाईट ?

उत्तर : ही चांगली अनुभूती आहे. साधना करता-करता हळूहळू दर्शने होऊ लागतात. बर्‍याच साधकांना संपूर्ण तोंडवळा दिसत नाही. प्रथम थोडासा भाग दिसतो. आणखी साधना वाढली की, मग दुसरा भाग दिसतो. तिसरा भाग दिसतो. असे होत-होत संपूर्ण दर्शन होते. म्हणजे वाईटाचा प्रश्नच नाही.

 

प्रश्न : दत्ताचा जप केला, तेव्हा शरिरामध्ये पालट होऊ लागला. हलके वाटले. अंगाला थरथर सुटली. थोड्या वेळाने कसलेही भान राहिले नाही. ‘आपल्या शरिरात काही शिल्लक नाही’, असे वाटले; पण कुलदेवतेचा जप केल्यास तसे काही वाटत नाही, तर कोणाचा जप करणे इष्ट ?

उत्तर : ‘भान जाते’, ‘थरथर सुटते’, हे आपल्याला साधनेत नको असते. भान जाऊन कसे चालेल ? साधनेमुळे चित्तावरचे जन्मोजन्मीचे वासना, आवड-निवड, स्वभावदोष, देवाण-घेवाण हिशोब हे सर्व संस्कार पुसले गेले पाहिजेत. त्यासाठीच आपण साधना करतो. शक्तींमुळे शरिराला कंप सुटावा किंवा बेभान होऊन जाणे, हे साधनेत अपेक्षित नाही. दत्ताचा नामजप करतांना हे जे होत आहे, ते त्यांना असणार्‍या पूर्वजांच्या त्रासामुळे. आधीच्या जन्मातील देवाण-घेवाण असल्यामुळे काही पूर्वजांना त्यांच्या वंशजांना छळायचे असते. कुलदेवीच्या नामात अशा प्रकारचा त्रास सहसा होत नाही. त्यामुळे अशांनी दत्ताचासुद्धा नामजप करावा. २ – ३ महिने गेले की, शरिराला जी थरथर सुटते किंवा भान रहात नाही, असे काही होणार नाही.’

 

प्रश्न : ‘दिगंबरा दिगंबरा’ याचा नेमका अर्थ काय ? या जपामध्ये दत्ताचे नाव येत नाही, तरी तोच जप का करतात ? त्याऐवजी ‘दत्त’, ‘जयदत्त’, ‘श्रीदत्त’ या नामांचा जप का करत नाहीत ?

उत्तर : ‘दिगंबरा’ हे दत्ताचेच नाव आहे. श्रीपाद आणि श्रीवल्लभ ही दत्ताच्या अवतारांची नावे आहेत. साईबाबा, गजानन महाराज आणि अक्कलकोट स्वामींचाही काही जण जप करतात. ईश्वराच्या अवताराचा जप करण्यापेक्षा प्रत्यक्ष ईश्वराचा जप केला, तर अधिक लाभ होणार आहे, हे लोकांना ठाऊक नाही; म्हणून सनातनच्या साधकांना गावोगावी जाऊन ‘अध्यात्म’ म्हणजे काय, हे शिकवावे लागते. सर्व अवतार हे अंशात्मक, कलात्मक असतात. ईश्वराचा पाच ते दहा प्रतिशत अंश त्यांच्यामध्ये असतो. त्यांची उपासना करण्यापेक्षा शंभर प्रतिशत जो ईश्वर आहे, त्याची उपासना केली, तर निश्चितच लाभ होईल.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’

2 thoughts on “नामजपाविषयी शंकानिरसन”

  1. लग्न झालेल्या स्त्रीची कुलदेवता कोणती? तिने माहेरच्या कुलदैवताचा जप करावा की सासरच्या?

    Reply
    • नमस्कार

      विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवतेच्या उपासनेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा –
      https://www.sanatan.org/mr/a/663.html

      Reply

Leave a Comment