‘हे विश्‍वचि माझे घर ।’ असे उदात्त चिंतन हिंदु धर्मानेच जगाला दिले आहे ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था

मंगळुरू (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘One Humanity Many Paths’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग

प्रवचन घेतांना सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै, मागे बसलेले अन्य धर्मीय मान्यवर

मंगळुरू (कर्नाटक) – येथील बोंदेल येथे असलेल्या ‘महात्मा गांधी सेंटिनरी पी.यू. कॉलेज’मध्ये ‘One Humanity Many Paths’ (एक मानवता अनेक मार्ग) असा विशेष कार्यक्रम १२ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु धर्माच्या प्रतिनिधी म्हणून सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांना आमंत्रित करण्यात आले होते. बोंदेल चर्चचे फादर गोन्सालविस हे ख्रिस्ती धर्माचे, तर शमशाद हे इस्लामचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.सौ. लक्ष्मी पै उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाल्या, ‘‘सनातन हिंदु धर्म हा अनादि अनंत आहे. ‘हे विश्‍वचि माझे घर ।’, असा उदात्त विचार हिंदु धर्मानेच विश्‍वाला दिला आहे. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चिद् दुःखमाप्नुयात् ॥’ (अर्थ : हे भगवंता, सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.), अशी प्राचीन भारतीय ऋषि-मुनींची प्रार्थना आहे. पुण्यभूमी भारत सर्व धर्मांना आश्रय देणारे स्थान राहिले आहे. प्रत्येकाने धर्माचरण करून सात्त्विक समाज घडविणे, ही काळाची आवश्यकता आहे.’’

ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या प्रतिनिधींनीही या वेळी आपले विचार मांडले. अनुमाने ४०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Leave a Comment