केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य होणे ! – संत ज्ञानेश्‍वर

संत ज्ञानेश्‍वर

आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्‍वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्‍वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेल्या पुढील संवादाच्या वेळी या दोघांचे वय अतिशय लहान होते. ज्या वयात लहान मुले भातुकलीचा खेळ खेळतात, त्या वयात ही उन्नत संतद्वयी उच्च आध्यात्मिक विषयांवर चर्चा करतांना पाहून त्यांच्या उच्च अवस्थेची जाणीव होते. यातून ‘गुरु आपल्या शिष्याला शिकवतांना सर्वसाधारण गोष्टीतून किती उच्च कोटीचे ज्ञान देतात’, हेही लक्षात येते. ‘गणपति’ या सगुण ब्रह्माविषयीचे ज्ञान आणि गुरुकृपेविना ईश्‍वरप्राप्ती होऊ शकत नाही, याविषयीचा हा संवाद आहे.

प.पू. परशराम पांडे

 

१. निर्गुण म्हणजे क्षय न होणारे रेणूरूपी
सूक्ष्म अक्षर असून निर्गुणाचे फारच सूक्ष्म अस्तित्व सगुण ब्रह्मस्वरूपात
(गणपतीच्या स्वरूपात) कार्य करत असणे आणि दृश्य सगुण स्वरूपाचे सारत्व निर्गुणच असणे

संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,

ज्ञानेश्‍वर म्हणे । ऐक मुक्ताबाई ।
सांगेल तू पाही । गुरुमुखें ॥ १ ॥

निर्गुणाचा बुंद । सगुणी उतरला ।
कर्दम (चिखल) तो झाला । एका एकीं ॥ २ ॥

स्थापिलासे गोळा । सगुणाचा सार ।
तयाचा आधार । एक आहे ॥ ३ ॥

मूळद्वारी मुळीं । स्थापिला गणपति ।
तया पाशी वस्ती । निर्गुणाची ॥ ४ ॥

निर्गुण म्हणजे काय । रेणूं ते अक्षर ।
म्हणे ज्ञानेश्‍वर । मुक्ताबाई ॥ ५ ॥

अर्थ : ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ‘‘हे मुक्ताबाई, ऐक. तुला मी आता गुरुमुखातून ‘गणपति’ या सगुण ब्रह्माविषयीचे ज्ञान सांगतो. निर्गुणाचे सूक्ष्म रूप सगुणातून कार्य करत आहे; कारण हे निर्गुण सर्व महाकाशांत व्याप्त आहे. त्यामानाने जे दृश्य विश्‍व आहे, ते फारच अल्प आहे. तेव्हा त्याला गतीमान करण्यासाठी या निर्गुणाचे फारच सूक्ष्म अस्तित्व या सगुण स्वरूपात कार्य करत आहे. या निर्गुणामुळे त्या सगुणामध्ये कर्दम (चिखल) झाला आहे. सगुण आणि निर्गुण एकरूप झाले. आता ‘त्यात सगुण कोणते आणि निर्गुण कोणते ?’, हे तुला सांगता येणार नाही. वास्तविक ते सर्व निर्गुणच आहे. ‘त्याचा आधार निर्गुणच आहे’, असे दिसेल. जे सगुण दिसते, त्याचे सारत्व निर्गुणच आहे. सगुण स्वरूपाच्या मूल स्वरूपात, मूलाधार तत्त्वात गणपतीची स्थापना झाली आहे; परंतु ‘त्याच्यापाशी कोण रहातो ?’, असे म्हणशील, तर त्याच्याजवळ निर्गुणाविना काहीच नाही. अगं, निर्गुण म्हणजे काय ? तर क्षय न होणारे ते रेणू (रज, कण) रूपी सूक्ष्म असे अक्षरच आहे.’

विवेचन : संत ज्ञानेश्‍वर आणि संत मुक्ताबाई ही जरी भावंडे असली, तरी संत ज्ञानेश्‍वर आध्यात्मिक स्तरावर ब्रह्माविषयीच्या ज्ञानाचे संत मुक्ताबाई यांना प्रबोधन करतांना म्हणतात, ‘‘तू आता गुरुमुखातून ऐक.’’ असे म्हणणे विशेष आहे.

सर्वत्र ब्रह्मांडाच्या पोकळीमध्ये चैतन्याविना (निर्गुण तत्त्वाविना) काहीच नाही. जे सगुण स्वरूपातून दिसते, तेसुद्धा त्या निर्गुणाचेच सूक्ष्म रूप असून त्याचे सारत्वच आहे, तसेच त्या सगुणाच्या मूलाधार तत्त्वात गणपति तत्त्व स्थित असून तेही निर्गुणच आहे. ते सत्य, शाश्‍वत आणि चैतन्यमय आहे.

 

२. मायेची उत्पत्ती कशी झाली ?
आणि मायेचा पसारा जाणण्यासाठी कोणता आधार आहे ?

मुक्ताबाई म्हणते,

मूळद्वारी दादा । स्थापिला गणपति ।
माया ही उत्पत्ति । कैशी झाली ॥ १ ॥

मायेचा बंबाळ । जाये एकसरा ।
इच्याही आधारा । सांगा दादा ॥ २ ॥

ब्रह्मांड व्यापिले । आकाश कवळिलें ।
सर्व काही व्यापिले । मायेचें ॥ ३ ॥

माया कैशी दादा । सांगता निर्गुण ।
मुक्ताबाई म्हणे । भिन्न पडे ॥ ४ ॥

अर्थ : त्यावर मुक्ताबाई म्हणते, ‘‘अरे दादा, तू म्हणतोस की, मूळद्वारी (मूलाधारचक्र स्थानी) गणपतीची स्थापना झाली, तर मग मायेची उत्पत्ती कशी झाली ? ‘हा सर्व मायेचा पसारा जाणण्यासाठी याला काय आधार आहे ?’, हे सांग. या मायेने हे सर्व ब्रह्मांड व्यापलेले दिसते. तेव्हा ही माया आणि निर्गुण यांच्यातील भिन्नत्व स्पष्ट कर.

विवेचन : संत ज्ञानेश्‍वर पहिल्या कडव्यात सांगतांना म्हणतात, ‘‘सर्वत्र चैतन्य आहे आणि सगुणाच्या मूळ स्वरूपात गणपति आहे, जो निर्गुणच आहे. असे असतांना माया आणि निर्गुण यांच्यातील भेद न कळल्याने संत मुक्ताबाई त्याविषयीचे स्पष्टीकरण विचारतात.

 

३. रेणूरूपी अव्यक्त आणि नित्य स्वरूपात भासणारे अणूस्वरूप,
हे माया म्हणून प्रतिभासित होणे आणि त्या मायेपासूनच देहसुद्धा निर्माण होणे

रेणू ते निरंजन । अणू तोचि माया ।
माया वचनीं । देह निपजला ॥ १ ॥

नाही अक्षराचा । आधार मेरुशी ।
हे तो नाभिपाशी । स्थापियेलें ॥ २ ॥

दोहों मधोनिया । निघाले वचन ।
वेदांचे जन्मस्थान । तेंच बाई ॥ ३ ॥

दहा पवनाचा । एक झाला मेळा ।
रेणूचा जिव्हाळा । सर्वांशी हा ॥ ४ ॥

सवार्र्ंहूनि वेगळा । रेणू तो अचल ।
म्हणे ज्ञानेश्‍वर । मुक्ताबाई ॥ ५ ॥

अर्थ : संत ज्ञानेश्‍वर महाराज मुक्ताबाईला म्हणतात, ‘‘रेणूरूपी अव्यक्त, नित्य स्वरूपात भासणारे अणूस्वरूप माया म्हणून प्रतिभासित होते. देहसुद्धा त्या मायेपासूनच निर्माण झाला आहे. अगं, या अक्षराचा आधार सुषुम्ना नाडीरूपी मेरूशी नाही, तर नाभीजवळ परा स्वरूपातून त्याची उत्पत्ती आहे. ही परा वाचा नाभीपासून मेरुदंडाद्वारे निघून मुखाद्वारे वैखरी म्हणून दिसते; म्हणूनच वेदांचे जन्मस्थान ही परावाणी नाभीस्थळी आहे, हे तू जाण. दशप्राणांची एकत्रता या सर्वांना रेणूरूपी निर्गुणाचाच आधार आहे, जिव्हाळा आहे; परंतु रेणूमात्र तो या सर्वांहून वेगळा आणि अचल असाच आहे.’’

विवेचन : रेणू स्वरूपात असलेल्या निर्गुण चैतन्यापासूनच अणूस्वरूप अशी माया वाढत वाढत दृष्टीपथास येेते. आपला देहसुद्धा या मायेपासूनच निर्माण झालेला आहे. या देहामध्ये या चार वाणी (परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी) आहेत. त्यांतील परावाणी ही वैखरीत वेदांद्वारे प्रगट होते, तसेच प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे पंचप्राण अन् त्यांचे उपप्राण असे दहा प्राण हेसुद्धा निर्गुणरूपी चैतन्याद्वारेच कार्य करतात; परंतु या सर्वांचे रेणूरूपी मूळ जे निर्गुण, ते मात्र अचल आणि त्याच्यापासून निराळे आहे.

 

४. अधोमुखी असलेल्या कुंडलिनीला योगाद्वारे जागृत करून
आपल्या नियंत्रणात घेणार्‍या योग्यांना त्या रेणूचे (आत्म्याचे)
दर्शन होते कि नाही ? हे कळल्यास मानवी जनांना जन्म-मृत्यूच्या
चौर्‍यांशी योनींद्वारे घालाव्या लागणार्‍या येरझार्‍या बंद होतील !

सर्वांहूनी वेगळा । हाती कैसा येई ।
म्हणे मुक्ताबाई । सांग दादा ॥ १ ॥

दहा पवनांचा खेळ । योगी खेळती ।
ओढोनियां नेती । ब्रह्मांडात ॥ २ ॥

कुंडलिनी निवटोनि । करिती आकर्षण ।
रेणूचे दर्शन । झाले की नाहीं ॥ ३ ॥

म्हणे मुक्ताबाई । सांग ज्ञानेश्‍वरा ।
चुके येरझारा । चौरांशिंचीं ॥ ४ ॥

अर्थ : संत मुक्ताबाई म्हणते, ‘‘अरे दादा, तू म्हणतोस की, तो (रेणू) याहून वेगळा आहे, अचल आहे, तर मग आमच्या हाती तो कसा येईल ? योगी लोक असतात, ते आपल्या यौगिक क्रियांद्वारे शरिरात हे दश पवन खेळवून आपला प्राण ब्रह्मांडात नेऊन बसवतात. कुंडलिनी, जी अधोमुखी आहे, तिला जागृत करून आपल्या नियंत्रणात घेतात. अशा योग्यांना तरी त्या रेणूचे (आत्म्याचे) दर्शन झाले आहे कि नाही ? हे तू सांगितल्यास मानवी जनांना जन्म-मृत्यूच्या चौर्‍यांशी योनींद्वारे येरझार्‍या घालाव्या लागतात, त्या बंद होतील.’’

विवेचन : या सर्व मायेचे रेणूरूपी निर्गुण असे मूलतत्त्व शोधण्यासाठी योगीजन यौगिक प्रक्रिया करून पंचप्राणांद्वारे मूलाधारमध्ये अधोमुखी स्थित असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून ती ऊर्ध्वमुखी करतात आणि तिला नियंत्रणात घेऊन तिला सहस्रार चक्रामध्ये स्थित करतात. अशा योग्यांनासुद्धा अशा क्रियेद्वारे आत्मदर्शन होत असेल, तर मनुष्याला अशा क्रियेद्वारे आत्मदर्शन होऊन तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटू शकेल, याविषयीचा प्रश्‍न संत मुक्ताबाईंनी संत ज्ञानेश्‍वरांना विचारला आहे.

 

५. आत्म्याला शोधण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी कोणत्याही योगक्रियेची
आवश्यकता नसून वायूचा कोंडमारा करण्याची आणि कुंडलिनी
जागृत करण्याचीही आवश्यकता नसणे, उलट हे केवळ गुरुकृपेने साध्य होणे

कुंडलिनी निवटोनी । कोंडीती पवन । त्या रेणूचे दर्शन । घडले नाही ॥ १ ॥

न लगे आसन । कोंडीती पवन । करावें साधन । गुरुकृपें ॥ २ ॥

गुरुकृपेविण । न ये तो हातासी । पाहतां रेणूशी । अंत नाही ॥ ३ ॥

ब्रह्मांडी रेणू । नांदे सदोदीत । सोहं त्याचा आंत । जात असे ॥ ४ ॥

दहा पवनी वेगळा । सोहं तो अचळ । रेणु त्याचा खेळ । सदोदित ॥ ५ ॥

ज्ञानदेव म्हणे । ऐक मुक्ताबाई । गुरुकृपें सोई । कळो येई ॥ ६ ॥

अर्थ : संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ‘‘योगी कुंडलिनी जागृत करण्यासाठी या पवनाला कोंडतात. प्राण वरून नाभीपर्यंत आणतात आणि गुदद्वारातून अपान वायूला नाभीपर्यंत आणून त्याच्या प्रभावाने आपली कुंडलिनी जागृत करतात. त्यामुळे कुंडलिनीचे अधोमुख ऊर्ध्वमुख होते. ती सळसळ करत (सुषुम्ना नाडीद्वारा) ब्रह्मांडात जाते आणि आनंद देते; परंतु एवढे होऊनही त्यांना त्या आत्म्याचे दर्शन होत नाही.

वास्तविक आत्म्याला शोधण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी कोणत्याही योगक्रियेची आवश्यकता नाही. वायूचा कोंडमारा करून आणि कुंडलिनी जागृत करण्याचीही आवश्यकता नाही. उलट हे केवळ गुरुकृपेने साध्य होते. आत्मा गुरुकृपेविना मिळणे शक्य नाही. तसे पाहिले, तर तो आत्मा ‘अणोरणीयान् महतो महीयान् ।’ म्हणजे ‘अणूहूनही लहान आणि महानाहूनही महान’ असा आहे. तो सूक्ष्माहून अति सूक्ष्म आणि महानाहून महान आहे. त्याला अंत नाही. तो या सर्व ब्रह्मांडात रेणूद्वारे नेहमी आहे. तोच शरिरात ‘सोहं’द्वारे कार्य करतो. दहा पवनांच्या म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंच प्राण आणि त्यांचे पाच उपप्राण यांच्यापेक्षा वेगळा असा तो आत्मा अचल आहे. त्याच्या अस्तित्वानेच हा सर्व खेळ, जो दिसत आहे, तो चालू आहे.’’ शेवटी ज्ञानेश्‍वर महाराज मुक्ताबाईला सांगतात, ‘‘हे मुक्ताबाई, हे सर्व तुला गुरुकृपेनेच कळून येईल.’’

विवेचन : योगीजन योगक्रियेद्वारे मूलाधारचक्राच्या ठिकाणी अर्धामुखी असलेल्या कुंडलिनीला प्राण आणि अपानद्वारे जागृत करून सुषुम्ना नाडीद्वारे सहस्रारमध्ये स्थित करतात. केवळ या क्रियेमुळे आत्म्याचे दर्शन होत नाही. गुरुकृपेविना ते शक्यही नाही. त्यासाठी भाव पाहिजे. याउलट योगक्रियेद्वारे मिळालेली ऋद्धिसिद्धि ही उपाधीच होते. (अहंकार वाढतो.) यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे. भाव जागृत ठेवून भगवंताच्या ठिकाणी मन अनुसंधानित ठेवल्यास गुरुकृपेद्वारे सत्य कळून आत्मदर्शन होते. यावरून गुरुकृपेची महती लक्षात येते.’

(साभार : श्री गणेश अध्यात्म दर्शन, पृ. क्र. २०१ ते २०३)

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी स्वतः योगी असूनही आपले वडील बंधू निवृत्तीनाथांना आपले गुरु केले. त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला महत्त्व दिले. गुरूंच्या सेवेत राहून त्यांनी गुरूंचे महत्त्व विशद केलेे. संत मुक्ताबाईसुद्धा उच्च अवस्थेला पोेचलेल्या असल्याने वर कथित केलेल्या संवादातून आमच्यासारख्या सामान्यांना भगवंताने निर्मिलेल्या जगताची सत्य स्थिती कळली. तसेच गुरुमहात्म्य कळून त्याद्वारे प्रत्येक मानवाला ईश्‍वरप्राप्ती होऊ शकते, हे कळले.

तसेच संत ज्ञानेश्‍वरांनी पसायदानमध्ये त्यांची इच्छा पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे. ‘दुष्ट जनांची प्रवृत्ती पालटून ते सत्प्रवृत्त व्हावेत आणि संतांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊन सर्वत्र चैतन्याचे निर्माण होऊन सर्वांना आनंद मिळावा; सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करत रहावे.’ आज सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने संत ज्ञानेश्‍वरांची इच्छा पूर्णत्वास येतांना दिसत आहे.

‘हे भगवंता, हे करुणाकरा (परात्पर गुरु डॉ. आठवले), ‘आम्हा प्राणीमात्र जिवांच्या उद्धारासाठी या भूतलावर तू अवतरला आहेस. आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहे. कोट्यवधी वर्षांपासून चालत आलेली ही गुरुशिष्य परंपरा पुढेही अशीच अखंड चालू राहो आणि सर्वांना त्याचा लाभ होवो’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना !’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.७.२०१५)

Leave a Comment