सियाराम बाबा : एक अलौकिक संत !

‘एक विरक्त संन्यासी, सियाराम बाबा ! वय १०५ वर्षे ! मध्यप्रदेशातील खरगौन जवळच्या भट्ट्यान गावामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. बाबांनी १२ वर्षे मौनव्रत धारण केले होते. त्यांनी मौनव्रत सोडले, तेव्हा पहिला शब्द उच्चारला, ‘सियाराम !’ तेव्हापासून गावकरी त्यांना ‘सियाराम बाबा’ या नावाने ओळखतात. बाबांच्या आश्रमामध्ये प्रत्येक दिवशी, विशेषत: गुरुपौर्णिमेला सियाराम बाबांचे पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण जमतात.

 

सियाराम बाबांचा परिचय !

बाबा केवळ लंगोट नेसतात. त्यांनी १० वर्षांपर्यंत खडेश्वरी तपश्चर्या केली आहे. यात तपस्वी झोपण्यापासून सर्व कामे उभ्यानेच करत असतात. बाबा खडेश्वरी साधना करत असतांना नर्मदेला पूर आला होता; परंतु ते त्यांच्या जागेवरून बाजूला झाले नाहीत. तेव्हा पुराचे पाणी बाबांच्या केवळ नाभीपर्यंत पोचू शकले होते. स्थानिकांच्या मते, बाबा तेथे ५० ते ६० वर्षांपूर्वी आले आणि एक झोपडी करून राहू लागले. तेथे त्यांनी हनुमानाची मूर्ती स्थापन केली. त्या ठिकाणी बसून ते प्रतिदिन सकाळ आणि संध्याकाळ रामनामाचा जप आणि रामचरितमानस पठण करायचे.

बाबांचा जन्म मुंबई येथे झाला. तेथे त्यांनी ८ वीपर्यंत शिक्षण घेतले. ते अल्पवयात एका सावकाराकडे कारकून म्हणून काम करू लागले. त्या काळात त्यांना अनेक साधूंचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांच्या मनात वैराग्य आणि श्रीरामाची भक्ती जागृत झाली. त्यानंतर त्यांनी घराचा त्याग केला आणि हिमालयात साधना करण्यासाठी निघून गेले. त्यांनी किती काळ तप केले, तसेच त्यांचे गुरु कोण होते, याविषयी माहिती उपलब्ध नाही आणि त्यांनी ती कुणालाही सांगितली नाही.

 

श्रीरामाची भक्ती आणि नर्मदा परिक्रमा करणार्‍यांची सेवा, हीच बाबांची साधना  !

भट्ट्यान गावातील रामेश्वर बिरले आणि संतोष पटेल यांनी सांगितले की, बाबा प्रतिदिन नर्मदास्नान करतात. ते नर्मदा परिक्रमा करणार्‍यांची स्वत: सेवा करतात. सदाव्रतमध्ये ते प्रत्येकाला डाळ, तांदूळ, तेल, मीठ, तिखट, कापूर, उदबत्ती आणि वात देतात. भक्त आश्रमात येतात, तेव्हा बाबा त्यांना स्वत:च्या हातांनी चहा करून देतात. बाबा नर्मदा परिक्रमा करणार्‍यांसाठी भोजन आणि निवास व्यवस्था अनेक वर्षांपासून अविरतपणे करत आले आहेत. अनेक वेळा नर्मदेच्या पुरामुळे गावातील घरे बुडतात. त्यामुळे गावकरी सुरक्षित उंच ठिकाणी निघून जातात; परंतु बाबा त्यांचा आश्रम आणि मंदिर सोडून कुठेच जात नाहीत. पुराच्या वेळी बाबा मंदिरात बसून रामचरितमानस पठण करत बसतात. पूर ओसरल्यावर गावकरी त्यांना पहाण्यासाठी येतात. तेव्हा ते सांगतात, ‘‘नर्मदामाता आली होती. दर्शन आणि आशीर्वाद देऊन निघून गेली. मातेला काय घाबरायचे, ती तर आई आहे.’’

 

सियाराम बाबा यांच्यासारखे संत हीच सनातन धर्माची खरी शक्ती !

सध्याच्या काळात जेथे बाबा रहातात, ते क्षेत्र पाण्यामध्ये बुडणार आहे. सरकारने त्यांना हानीभरपाई म्हणून २ कोटी ५७ लक्ष रुपये दिले होते. ते सर्व पैसे त्यांनी खरगौनजवळ असलेल्या नांगलवाडीमधील नागदेवतेच्या मंदिरासाठी दान दिले. जेणेकरून तेथे भव्य मंदिर आणि सुविधा व्हाव्यात. भक्तांनी त्यांना लक्षावधी रुपये दान देण्याची इच्छा व्यक्त केली, तरी ते केवळ १० रुपये घेतात आणि ते देणार्‍याचे नाव नोंदवहीत लिहितात. बाबांच्या दर्शनासाठी अनेक विदेशी भक्तही येतात. भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया येथून काही भक्त आले होते, त्यांनी बाबांना अर्पण म्हणून ५०० रुपये दिले. बाबांनी प्रसादासाठी १० रुपये ठेवून घेतले आणि शेष परत केले. मध्यंतरी बाबा आजारी होते. तेव्हा त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता; पण भक्तांनी आधुनिक वैद्यांकडून त्यांना सलाईन लावून घेतले. त्याही स्थितीत बसून बाबा एका हातात सलाईन आणि दुसर्‍या हातात रामचरितमानस घेऊन वाचायचे. सियाराम बाबा यांच्यासारखे अनेक संत आजही आहेत. असे संत हीच सनातन धर्माची खरी शक्ती आहे.

-प्रेषक : श्री. विजय आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment