युवती आणि महिला यांची सद्य:स्थिती !

कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय होणे

‘शील आणि धर्म विसरलेल्या या मुलींकडून धर्माची, तसेच हिंदुत्वाची विटंबना होत आहे. यामुळे राष्ट्र परिणामी देशही रसातळाला निघाला आहे. कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय झाले आहे.’

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून (५.४.२०११), दुपारी ३.१५)

 

संस्कृतीहीन पाश्चात्त्य स्त्रिया आणि राष्ट्रे !

‘पाश्चात्त्य स्त्रियांनी जगाला असभ्यता, अश्लीलता आणि चारित्र्यहिनता दिली. याउलट हिंदु स्त्रियांनी जगाला सभ्यता, सुसंस्कृतता आणि धर्मशीलता दिली. एवढेच नव्हे, तर जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या विरांगनांनी जगाला पराक्रम आणि राजधर्मही शिकवला. स्त्री म्हणजे राष्ट्राच्या संस्कृतीचा जणू आरसा ! ज्या पाश्चात्त्य राष्ट्रांच्या स्त्रियांची अशी केविलवाणी स्थिती आहे, त्या पाश्चात्त्यांच्या तथाकथित संस्कृतीचे अंधानुकरण करायला आम्हाला लाज कशी वाटत नाही ?’

– पू. संदीप आळशी

स्त्रिया स्त्रीधर्म विसरल्या आहेत !

‘काय दिवस आले आहेत ? स्त्रिया आपले सौंदर्य जाईल; म्हणून कोवळ्या जन्म दिलेल्या बालकाला दूध पाजत नाहीत. सध्या हे पाप चालू आहे. देवाने निर्माण केलेले मुलासाठी त्याच वेळी सिद्ध झालेले दूध त्या पाजत नाहीत. मग मुले आईवर प्रेम कशी करणार ? सध्या ही काही ठिकाणी नवरुढी (‘फॅशन’) आली आहे. ‘फॅशन’ असावी; परंतु फाजिल नसावी. लग्न झाले आहे, हे दिसू नये; म्हणून स्त्रिया पंजाबी किंवा पाश्चात्त्य पोशाख वापरतात. मंगळसूत्र घरी काढून नोकरीला जातात. कुंकू लहान हिरकुटाने लावतात. ते दिसतही नाही. आमच्या हिंदु धर्मात पूर्वी कुंकवाला मोठा मान होता. बाईच्या कपाळाला चंद्रासारखे गोल मोठे कुंकू असावे. त्यामुळे ‘नवर्‍याचे आयुष्य वाढते’, असे म्हणत असत. सध्या टिकल्या लावतात. एक म्हातारी म्हणते, ‘टिकल्या लावून टिकशील काय ग बाय ?’ हिंदु स्त्रियांनी आपला स्वधर्म पाळावा. पाश्चात्त्य परदेशी संस्कृतीच्या मागे धावू नये.’

– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

 

सध्याच्या स्त्रियांमधील ढासळलेली नैतिकता !

स्त्रिया या पुरुषापेक्षा अधिक नैतिक असतात यात वाद नाही; पण आता स्त्रियांमधील ही नैतिकता हळूहळू न्यून होत जात असल्याचे विदारक आणि मन विषण्ण करणारे दृश्य दिसू लागले आहे. सार्वजनिक स्थळी प्रियकरासमवेत निर्लज्जपणे प्रेमालाप करणे, विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, ‘बॉयफ्रेंड’सह निर्धास्तपणे वावरणे, त्यांच्यासमवेत रात्री-बेरात्री फिरणे, ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये रहाणे, आई-बापांना अंधारात ठेवून प्रेमाचे रंग उधळणे, त्यासाठी घरातून पळूनही जाण्यास मागे-पुढे न पहाणे, हे प्रकार युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पतीपासून अपत्य असतांनाही प्रियकरासमवेत पळून जाणे, प्रसंगी प्रियकराच्या साहाय्याने पतीचा खूनही करणे यांचे समाजातील वाढते प्रमाण पाहून, तर स्त्रिया आपल्या जन्मजात असलेल्या नैतिकतेशी जाणीवपूर्वक फारकत घेत असल्याचे दिसून येत आहे.

आता पुरुषाप्रमाणे अधिकारपदावर असणार्‍या महिलाही लाच घेऊ लागल्या आहेत. लाच घेतांना अनेक महिला पकडल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा स्त्रियांकडून आपल्या मुलावर सुसंस्कार होण्याची काय अपेक्षा करावी ? भारतीय युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही वाढत असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. विशेषतः उच्चवर्गीय महिला, नोकरदार महिला, अतीश्रीमंत घरातील मुली यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक आढळून आले आहे. पब किंवा रेव्ह पार्टी यांवर धाडी पडल्यानंतर त्यात अंगावर तोकडे वस्त्र आणि मद्य अथवा अमली पदार्थांच्या धुंदीत बेधुंद नाचणार्‍या मुलींचे प्रमाण मुलांइतकेच आढळून येते. नवरुढी, कुसंगत, अतीपैसा, संस्कार आणि प्रेम यांच्या अभावामुळे आलेले नैराश्य इत्यादी अनेक कारणे स्त्रियांच्या या व्यसनाधिनतेच्या मागे आहेत.

भारतीय स्त्रियांच्या अधःपतनाची ही कथा न संपणारी आहे; पण तिच्या या अधःपतनाकडे पाहून ‘कोण होतीस तू, काय झालीस तू ?’ असा प्रश्न साहजिकपणे मनात उभा रहातो आणि संवेदनशील मने अस्वस्थ होतात.’

 

तेजस्विनीकडून देहस्विनीकडे – भारतीय स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास !

चित्रपट किंवा विज्ञापने यांतून न्यूनतम कपड्यात वावरण्यात यांना लज्जा वाटेनाशी झाली आहे. स्त्रीदेहाचा बाजार मांडला आहे. या बाजारातून त्यांना पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळत असल्यामुळे आणि समाजही आपला विवेक गमावून वरील सर्व गोष्टींचे दान तिच्या पदरात मुक्तपणे टाकत असल्यामुळे चित्रपट, ‘मॉडेलिंग’, विज्ञापन, ‘रिॲलीटी शो’ या माध्यमांतून पडद्यावर झळकणार्‍या स्त्रिया बेलगाम होत चालल्या आहेत. अश्लील, उत्तान आयटम साँग आणि विज्ञापने करण्यामध्ये नट्यांची जणू स्पर्धा लागली आहे. स्त्रियांची ही पैसा आणि प्रसिद्धीची हाव पाहून त्यासाठी अंगावरील कपडे कुठल्याही मर्यादेपर्यंत न्यून करण्याची, उतरवण्याची सिद्धता पाहून निर्मातेही त्यांना अधिकाधिक विवस्त्र करून कामोत्तेजक स्वरूपात पडद्यावर साकार करू लागले आहेत. स्त्री देहाचा बाजार मांडून स्वतःचा गल्ला भरणे, समाजाला लैंगिकतेच्या खाईत लोटणे यामध्ये निर्मात्यांना ना जनाची ना मनाची लाज आहे. स्त्रियांच्या या विवस्त्रतेचे आणि पडद्यावर कामोत्तेजक दृश्य साकार करण्याच्या वृत्तीचे परिणामस्वरूप म्हणजे समाजात लैंगिक उत्तेजना वाढली आहे. त्या अनुषंगाने छेडछाड, प्रेमप्रकरणे, घरून पळून जाणे, विवाहापूर्वी शरीर संबंधास प्रवृत्त होणे, अश्लील चित्रफिती पहाणे आणि सिद्ध करणे, बलात्कार यांचे प्रमाणही वाढले आहे. समाजात वाढलेल्या या कामोत्तेजनामुळे लहान मुली, निष्पाप स्त्रिया प्रतिदिन शेकडोंच्या संख्येत ‘बलात्कार’ या घृणास्पद प्रकाराला बळी पडू लागल्या आहेत. प्रतिदिन होणारी बलात्काराची प्रकरणे ऐकून भारत हा भ्रष्टाचाराप्रमाणे बलात्कार्‍यांचा देश म्हणून जगात कुप्रसिद्ध होतो कि काय, असे वाटू लागले आहे. सिनेनट्या, ‘रिॲलिटी शो’ आणि विज्ञापनांत काम करणार्‍या स्त्रियांच्या तोकड्या पोशाखाचे अनुकरण फार मोठ्या प्रमाणात समाजातील स्त्रिया आणि तरुणी यांच्याकडून केले जात आहे. त्यांच्या उत्तान पोशाखाविषयी कोणी नापसंती व्यक्त केल्यास अथवा त्यांच्या भल्यासाठी थोडा उपदेश केल्यास त्याच स्त्रिया आणि तरुणी यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात, तीव्रतेने आणि सामूहिकरित्या मोर्चे काढून विरोध होऊ लागला आहे.

 

शिक्षणाने स्त्रिया सुसंस्कृत होतात का ?

मुलीला तिचा पती निवडण्याचा, त्याला विविध प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, यात वाद नाही; परंतु काही मुली विवाहाअगोदरच मुलाला त्याच्या आई-वडिलांपासून विभक्त रहाण्याची अट घालतात, घरात किती ‘कचरा कुंड्या’ (डस्टबिन्स) म्हणजे वृद्ध आई-वडील अथवा नातेवाईक आहेत, अशी विचारणा करतात. एवढा निर्लज्जपणा आणि असंस्कृतपणा या मुलींमध्ये आला कुठून ? तिच्या आई-वडिलांनी त्या मुलीवर कोणतेच सुसंस्कार केलेले नसतात का ? आई-बापांनी ज्या मुलाला अनेक खस्ता खाऊन लहानाचे मोठे केलेले असते, उच्चशिक्षण देण्यासाठी कर्ज काढलेले असते आणि ज्या आई-बापाचे ॠण सात जन्मांतही फेडणे शक्य नसते, त्या मुलाच्या आई-वडिलांविषयी एवढी तुच्छतेची भावना उघडपणे दर्शवणारी मुलगी पुढे काय दिवे लावणार ? जी कुटुंबासाठी झिजू इच्छित नाही, ती समाजासाठी, देशासाठी कोणता त्याग करणार ?

 

दुर्दैवाने ‘आईच’ संस्काराची गंगोत्री राहिली नाही !

अस्वच्छ पाणी स्वच्छ (साफ) करण्याचे काम तुरटी, तर मळलेले कपडे स्वच्छ करण्याचे काम साबण करत असतो; पण तुरटीचं पाणी आणि साबणच कपडे घाण करत असेल, तर मग पाणी आणि कपडे स्वच्छ कोण करणार ? घर आणि त्यातील मुलांवर सुसंस्कार करण्याचे सर्वांधिक दायित्व आईवर असते; पण ही आईच भारतीय संस्कृती, संस्कार, जीवनमूल्य विसरत चालली असेल, तर त्या घरावर, घरातील मुलांवर सुसंस्कार कोण करणार ? दुर्दैवाने आज मुलांवर सर्वप्रथम आणि मूलभू्त सुसंस्कार करणारी घर नावाची पहिली संस्कारकेंद्रे उद्ध्वस्त होत चालली आहेत. आता काही मोजकी घरे सोडल्यास बाकी बहुतांश घरांत मुलांवर देव, धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार करणारी तेजस्वी अन् कणखर आई उरलीच नाही. उलट ती आता आधुनिक ‘मम्मी’ झाली असून, ती स्वतःच गाऊन घालून मुलाला मातृभाषेऐवजी परकीय इंग्रजी भाषा शिकवण्यात, त्याला भारतीय आहाराऐवजी पिझ्झा, बर्गर, मॅगी, पाव, बिस्किट खाऊ घालण्यात धन्यता मानू लागली आहे. मुलांना ‘शुभम् करोती’, ‘रामरक्षा’ शिकवण्याऐवजी स्वतःच दूरदर्शनवरील फालतू मालिका पहाण्यात, गप्पा, पार्ट्या यात रममाण होऊ लागली आहे. मुलांच्या हातात संस्कारक्षम गोष्टीचे पुस्तक देण्याऐवजी दूरदर्शनचा रिमोट, संगणकाचा माऊस किंवा भ्रमणभाष देऊ लागली आहे. कारण आई बनणे अवघड असते, ‘मम्मी’ बनणे मात्र सोपे असते.

आईवरच संस्कार होत नाहीत, ती मुलांवर काय संस्कार करणार ? एक आई सुशिक्षित आणि सुसंस्कारित झाली की, सारे घर सुशिक्षित आणि सुसंस्कारित होत असते, तसेच एक आई बिघडली की, सारे घरही बिघडत असते. आज समाजात ‘लव्ह जिहाद’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सहस्रो हिंदु मुली मुसलमान युवकांसमवेत घरून पळून जात आहेत. याला मुख्यतः हिंदूंची उद्ध्वस्त होत असलेली घर नावाची संस्कार केंद्रे, त्यात रहाणारे आई-वडील उत्तरदायी आहेत. कित्येक ठिकाणी आवश्यक नसतांनाही केवळ हौसेखातर, अधिक पैसा आणि अधिक चैन (ऐश) यासाठी स्त्रिया चाकरी (नोकरी) करतांना दिसतात. त्यामुळे आई-वडील दिवसभर बाहेर, आजी-आजोबा नकोसे झालेले आणि सुसज्ज असणार्‍या घरात मुले-मुली मात्र एकटी. अशा घरामध्ये मुले-मुली मात्र मित्रासमवेत काय करतात, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल यावर काय पहातात, काय बोलतात यावर नियंत्रण अथवा बंधन कोण ठेवणार ? सायंकाळी आई-वडील थकून घरी येणार, अशा परिस्थितीत ते मुलांना आपला वेळ काय देणार ?

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ (साभार : ‘एकता’, मे २०१३)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment