महिलांनो जीवनमूल्ये समजून घ्या !

जीवनमूल्ये समजून घ्या !

‘स्त्री’ या शब्दामध्ये ‘स’, ‘त’ आणि ‘र’ ही तीन अक्षरे आहेत. ‘स’ हे अक्षर सत्त्व गुणाचे, तसेच क्षमा, दया आणि आज्ञापालन ही लक्षणे असलेले ! ‘त’ हे अक्षर तमोगुणाचे, तसेच पाप, भीती, दयाळूपणा आणि लाजाळूपणा ही लक्षणे असलेले, तर ‘र’ हे अक्षर रजोगुणाचे, तसेच धैर्य, स्वातंत्र्य आणि स्वतःच तारतम्याने निर्णय घेण्याचे लक्षण ! यामुळेच स्त्री सामर्थ्यशाली आहे. ‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. तिला निसर्गाने मातृत्वाचा विशेषाधिकार प्रदान केला आहे. हा अधिकार म्हणजे स्त्रियांना मिळालेली मौल्यवान देणगीच आहे. युगानुयुगे पाहिल्यास हा अधिकार पुरुषांना मिळालेला नाही, हे विदेशी स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. असे असतांना ‘लादलेल्या मातृत्वा’चा आरोप करून गर्भपाताच्या अधिकारासाठी निदर्शने करणार्‍या स्त्रिया म्हणजे स्त्रीजातीला लागलेला कलंकच होय. काही प्रसंगांत ठराविक आठवड्यांनंतर एखाद्या महिलेला गर्भपाताची अनुमती नाकारली गेलीही असेल; पण म्हणून काय ‘तिच्यावर अन्याय झाला’, असे म्हणायचे का ? अशा वेळी कायदे, स्वातंत्र्य हे सर्व बाजूला ठेवून तिच्या आरोग्याच्या दृष्टीने जे हितकारक असेल, तसा निर्णय घेणे उचित ठरते. ‘पुरुषांप्रमाणे महिलांनाही स्वातंत्र्य हवे’, यात चुकीचे असे काहीच नाही; पण त्या स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असायला हव्यात. त्यांचे उल्लंघन झाल्यास तो स्वैराचार ठरतो. स्वैराचार करणार्‍याला मानव नव्हे, तर प्राणी म्हटले जाते. प्राण्यांनाही मानवापेक्षा जास्त कळते. म्हणून तेही कळपाने, समूहाने वावरतात. त्यांची उपजीविका असो किंवा त्यांची होणारी वंशवाढ या वेळीही ते सोयीस्कर विचार आणि कृती करतात. त्यामुळे ‘प्राण्यांकडून शिका !’ असे म्हणण्याची वेळ आज दुर्दैवाने मानवावर ओढवली आहे.

गर्भपाताविषयी अनेक मतमतांतरे असल्याने या विषयातील सर्वच सूत्रांवर येथे चर्चा न करता पाश्‍चात्त्य महिलांच्या मानसिकतेच्या दृष्टीने येथे प्रकर्षाने विचार करावासा वाटतो. गरोदरपणात होणार्‍या वेदना सहन करण्याची क्षमता विदेशी महिलांमध्ये उरलेली नाही, हे त्यांनी केलेल्या मागण्यांवरून लक्षात येते. ही क्षमता संपली म्हणून गर्भपाताचा अधिकार मागायचा ? स्वतःच्या सुखासाठी गर्भातील जिवाला नाकारणे; म्हणजे एका जिवाची हत्या करणेच होय. अशा वेळी यांचा मानवतावादी दृष्टीकोन कुठे जातो बरे ? ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असो किंवा ‘पार्टी कल्चर’ असो, यांचा अंगीकार केल्यानेही गर्भधारणा होते. मग गर्भपातासाठी आग्रही असणार्‍या महिला या पद्धतींना का विरोध करत नाहीत ? अशा पद्धती हद्दपार होण्यासाठी का आंदोलने करत नाहीत ? गर्भपाताच्या मागणीसाठी हाती लोखंडी रॉड आणि हातोडे घेणार्‍या महिलांना सहनशीलता, संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा ही जीवनमूल्ये कधी समजूच शकणार नाहीत. एकूणच काय अशा परिस्थितीमुळे मातृत्वाची भावनाच हरवत चालली आहे. बंधने, संस्कृती आणि धर्म यांचा नाश झाला आहे.

 

हिंदु संस्कृतीची महानता !

अन्य राष्ट्रांप्रमाणे विनाशाकडे वाटचाल न होणार्‍या भारताकडे आज संपूर्ण विश्‍व आदर्श म्हणून पहात आहे. याचे कारण हिंदु संस्कृतीत दडलेले आहे. स्वैराचार, उपभोग यांना थारा न देता खरा आनंद मिळवून देण्यात हिंदु संस्कृतीतील कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यांचेच पुष्कळ मोठे योगदान आहे. अनेक राष्ट्रांतील विविध संस्कृती लोप पावत आहेत; पण जगात केवळ हिंदु संस्कृतीच टिकून आहे. ज्यांना स्वैराचार, अतीस्वातंत्र्य यांचे दुष्परिणाम लक्षात आले आहेत, असे ३० टक्के विदेशी हे भारतीय संस्कृतीचा अंगीकार करून अधःपतित होण्यापासून स्वतःला रोखत आहेत. या भारतीय संस्कृतीत अहिल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता, गार्गी, मैत्रेयी अशा अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या. जिजामाता आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या वीरांगनाही याच भूमीत लढल्या. त्यांच्यातील सद्गुण, त्यांनी जपलेली जीवनमूल्ये, शुद्धता आणि पवित्रता, तसेच चारित्र्य यांमुळे या स्त्रिया सर्वार्थाने आदर्श ठरल्या. त्यांचे अनुकरण करून भारतीय स्त्रिया आज जीवन जगत आहेत. दया, क्षमा, माया, सहनशीलता, प्रेम आणि भक्ती या गुणांचा समुच्चय असणारी भारतीय स्त्री आज ‘स्वामिनी’, ‘सम्राज्ञी’, ‘गृहिणी’, ‘सौदामिनी’, ‘प्रबला’ म्हणूनही संबोधली अन् गौरवली जाते. अशा अष्टपैलू भारतीय स्त्रीची सर विदेशातील स्त्रियांना कशी येणार ? त्यामुळे पाश्‍चात्त्य विचारांप्रमाणे कृती न करता भारतीय संस्कृतीचा अंगीकार करून विदेशी महिलांनी ‘स्त्री’ म्हणून असलेले स्वकर्तव्य पार पाडावे. यातच खरा मानवतेचा उत्कर्ष आहे, अन्यथा विनाश अटळ आहे…!

Leave a Comment