हिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा !

कु. मधुरा भोसले

हिंदु नारींना आवाहन !

हिंदु नारींनो, आपल्या देशावर आपले (धर्मप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी यांचे) राज्य आल्यासच आपल्या देवा-धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, भाषेचे, अस्मितेचे, आबाल-वृद्धांचे आणि स्त्रियांचे रक्षण अन् पालन होणार आहे, हे परम सत्य जाणा ! स्वतःच्या रक्षणासाठी आतातरी कृतीशील व्हा अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अखंड प्रयत्नरत व्हा !

हिंदु राष्ट्रातील स्त्री ही आदर्श आणि आदरणीय नारी असेल !

हिंदुु राष्ट्रातील स्त्री ही प्रत्येक धर्मपरायण हिंदूसाठी माता आणि भगिनी समान आदरणीय असेल. धर्मद्रोही, वासनांध आणि व्यभिचारी मनुष्याला हिंदु राष्ट्रात कठोर शिक्षा भोगण्यासाठी केवळ कारागृहातच स्थान असेल. हिंदु राष्ट्रातील स्त्री निश्‍चितपणे सुरक्षित, आनंदी आणि उच्चतम आध्यात्मिक स्तराचे जीवन अनुभवू शकेल, यात कसलीच शंका नाही. हे हिंदु नारी, आज जगातील समस्त राष्ट्रांतील स्त्रिया केविलवाण्या होऊन तुझ्याकडे आशेने पहात आहेत. उद्याची नवी पिढी तुला आदर्श मातेच्या रूपात पहाण्यास उत्सुक आहे आणि उद्याचा दिवस तुला आणि केवळ तुलाच आदर्श हिंदु नारी म्हणून पहाण्यास आतूर झालेला आहे.

हिंदु स्त्रियांनो, रडगाणे थांबवून रणरागिणी व्हा आणि
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याचे वैश्‍विक आवाहन स्वीकारा !

हिंदु स्त्रियांनो, हिंदुत्व आणि श्रेष्ठतम हिंदु संस्कृती यांचा अभिमान बाळगा आणि हिंदु नारीची सर्व कर्तव्ये सचोटीने पूर्ण करण्याचा निर्धार करा. राजमाता जिजाबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या हिंदु नारींचे तेज:पुंज आदर्श क्षणोक्षणी मनात जागे ठेवा ! त्यांच्याप्रमाणे धर्माचरण आणि साधना करून स्वत:चे आत्मबल जागृत करा ! रडगाणे थांबवून रणरागिणी बना ! सोशिकतेची लाचारी सोडून बाणेदारपणा अंगीकारा अन् श्री दुर्गादेवीप्रमाणे रणचंडी बनून वासनांध नराधमांचा नाश करा ! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महत् कठीण कार्याचे वैश्‍विक आवाहन २१ व्या शतकातील हिंदु नारीने धर्मश्रद्धेने स्वीकारावे आणि आदिशक्तीच्या बळावर अवश्य स्थापन करून दाखवावे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ।

अर्थ : ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते, अर्थात आदर होतो, त्या ठिकाणी देवता रमतात आणि ज्या ठिकाणी स्त्रियांना यथोचित सन्मान प्राप्त होत नाही, तेथील सर्व कामे निष्फळ होतात.

सध्याच्या युगातील अनेक स्त्रियांना अत्याचार, बलात्कार यांसारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. चित्रपट काय किंवा विज्ञापन काय, त्यात स्त्रीला भोगवादी किंवा शोभीवंत अशा प्रकारचेच स्वरूप दिलेले असते. धर्मपालन न करणे आणि स्वैराचार बोकाळणे, हीच यामागील कारणे आहेत. आधुनिकतेचा डौल मिरवणार्‍या स्त्रीला धर्मपालन करणे म्हणजे खुळचट प्रथा-परंपरा पाळण्यासारखे वाटते. ही बंधने झुगारून देतांना त्यातून होणार्‍या परिणामांची मात्र तिला जाणीव नसते.

स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले अलंकारही तिला त्यातून चैतन्य आणि शक्ती देत असतात; पण सध्याच्या स्त्रीने तर अलंकार परिधान करणेही सोडून दिलेले आहे. विवाहितांसाठी महत्त्वाचा असलेला सौभाग्यालंकारही अनेकजणी घालत नाहीत. त्यामागे ‘स्त्रियांनीच मंगळसूत्र का घालायचे, पुरुष का घालणार नाहीत’, असा उद्दाम विचार अंतर्भूत असतो. शालीन आणि कुलीन स्त्रीच्या मनात असा विचारच येणार नाही. आधुनिक स्त्री काळ, वेळ, सर्व बंधने यांतून मुक्त होऊ पहात असल्याने अलंकारामागील शास्त्रही तिला समजत नाही.

खरे पहाता, स्त्री ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. तिच्यातील सद्गुणांनीच ती भारतीय संस्कृतीचे रक्षण करू शकते. अहल्या, द्रौपदी, तारा, मंदोदरी, सीता, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियांनी नम्रतेसह कर्तव्यनिष्ठेची भावना जोपासून भारतीय संस्कृतीचे जतन केले आहे. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या वीरांगनाही मातृभूमीसाठी लढल्या. आजच्या काळातील स्त्रियांनी पूर्वीच्या या महान स्त्रियांचे अनुकरण करायला हवे. तसे केल्यासच त्यांच्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. सर्वच सूत्रे लक्षात घेऊन स्त्रीने खर्‍या अर्थाने स्वतःतील आत्मशक्ती जागृत करणे आणि देशोद्धारासाठी सिद्ध होणे, हीच काळाची आवश्यकता आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment