प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्‍या हिंदु स्त्रिया !

मनाने आणि शरिराने कोमल असणार्‍या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे. अन्यायी महिषासुराला मारणारी श्री दुर्गा, पतीच्या अपमानाने क्षुब्ध होऊन पित्याच्या यज्ञकुंडात बेधडक उडी घेणारी शिवपत्नी दक्षा, यमाच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊन पती सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री, सावित्रीसारखीच पतिव्रता आणि जिची तमिळनाडूत सहस्रो मंदिरे आहेत ती कण्णगी, कृष्णप्रेमात समर्पणाचे उच्च आदर्श प्रस्थापित करणार्‍या राधा आणि मीरा, आपल्या स्त्रीत्वाच्या रक्षणासाठी जळत्या चितेत प्रवेश करणारी पद्मिनी, कर्मवती या राण्या आणि इतर सहस्रो राजपूत स्त्रिया, मेवाडचा वंश वाचवण्यासाठी राजपुत्र उदयसिंह याच्याऐवजी स्वपुत्राचा बळी देणारी स्वामीनिष्ठ पन्नादाई, पाच पातशाह्या आणि स्वराज्याला विरोध असणारे स्वजन यांच्याशी लढून अत्यंत विपरीत अवस्थेत पुत्राकरवी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणार्‍या जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीयपुत्र राजाराम यांना औरंगजेबाच्या मर्जीविरुद्ध आश्रय देणारी केलादची राणी चेन्नमा, १३ व्या शतकातील आंध्रमधील राज्याचा दोन दशके समर्थपणे सांभाळ करणारी रुद्रमाम्बा, अकबरासारख्या बलाढ्य राजाशी दोन हात करणारी गढमंडलची राणी दुर्गावती, पती मल्लसर्ज देसाई यांच्या निधनानंतर राज्य हडप करण्यासाठी आलेल्या इंग्रजांशी दोन हात करणारी कर्नाटकातील कित्तूरची राणी, ‘मेरी झांशी नही दुंगी’ असे म्हणत दत्तकपुत्र बालकाला पाठीशी बांधून इंग्रजांना आपल्या तळपत्या तलवारीचे पाणी दाखवणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पत्नी आणि अतुल पराक्रमी बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री राजकारणनिपुण राधाबाई, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूला कवटाळून हसत फासावर जाणार्‍या बावीस वीरांगना कर्तृत्ववान स्त्रियांची ही विविध रूपे सतत नतमस्तक व्हायला लावणारी आहेत !

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ (संदर्भ : ‘एकता’, मे २०१३)

 

स्त्रियांचा क्षात्रधर्म !

‘कुठे पतीसमवेत थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्नीसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या समवेतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.३.२०१७)

 

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

राणी पद्मावती

‘धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे; किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व होमून टाकण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)

स्त्रियांचा धीरोदत्तपणा !

आपल्या भारतात वैधव्याला स्त्रीजीवनातील मोठा आघात मानला जातो. अनेक विधवा स्त्रियांनीच पुरुषालाही लाज वाटावी असे पराक्रम, राजकारण आणि समाजसेवा करून त्रिकालबाधीत असे आदर्श प्रस्थापित केले आहेत. शिवरायांच्या मातोश्री जिजामाता, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, वीरांगना झाशीची राणी यांना वैधव्य प्राप्त झाले, तरी त्या खचल्या नाहीत. उलट राजकारण, समाजकारण यात त्यांनी उत्तुंग आदर्श प्रस्थापित केले. परिस्थितीशी झगडण्याची शक्ती आणि जिद्द उपजतच स्त्रियांना निसर्गाकडून प्राप्त झाल्याचे दिसते. त्यामुळे भारतात सहस्रो शेतकर्‍यांनी परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्या केल्या; पण त्यांच्या बायकांनी असा अविचार कधी केला नाही. परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिद्दीने उभ्या राहिल्या. समाजामध्ये आजही अशा अनेक माता आहेत, ज्यांनी वैधव्यानंतरही खूचन न जाता घरसंसार समर्थपणे सांभाळला आणि आपल्या मुला-मुलींना शिकवून मोठे केले. मातृत्वाची महती गायली जाते ती उगीच नाही. उगीच नाही समाजाकडून अशा मातृत्वाचे सत्कार होत !

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ
(साभार : ‘एकता’, मे २०१३)

सर्व मुले लढाईत मारली जाऊनही ‘देशाला अर्पण
करण्यास मुलगा नाही’, याची खंत वाटणारी वीरमाता !

एका मातेचे पाचही पुत्र पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत मृत्यूमुखी पडले. तिचे शेजारी आणि देशाचे नेते तिच्या सांत्वनासाठी आले. त्या वेळी रडत रडत ती त्यांना म्हणाली, ‘‘लढाईमध्ये माझ्या पाचही मुलांचा मृत्यू झाला, याचे मला दुःख वाटत नाही; मात्र देशासाठी आणखी एक मुलगा अर्पण करू शकत नाही, याचे मला दुःख आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment