महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – ३

Article also available in :

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग २ वाचा…  महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – २

 

१३. पानफुटी (पर्णबीज)

पानफुटी (पर्णबीज)

१३ अ. महत्त्व

मूतखड्यावर हे चांगले औषध आहे. ४ जणांच्या कुटुंबासाठी एखादे झाड असावे.

१३ आ. लागवड

याचे पान मातीत उभे एक चतुर्थांश ते अर्धे पुरावे. यामुळे त्या पानाला नवीन रोपे येतात. पानापासून नवीन रोपे येतात, यासाठी याला पानफुटी किंवा पर्णबीज म्हणतात. बहुतेक जणांकडे हे झाड असते किंवा याची रोपे रोपवाटिकांमध्ये विकत मिळतात.

 

१४. माका

माका

१४ अ. महत्त्व

पोटाचे विकार, खोकला, दमा, तसेच केसांचे विकार यांसाठी हे फार मोठे औषध आहे. महालय पक्षात माका लागतो. त्यामुळे बरेच जण घरी याची लागवड करतात. ४ जणांच्या कुटुंबासाठी ८ ते १० झाडे असावीत.

१४ आ. लागवड

पाऊस पडल्यावर माक्याची रोपे आपोआप उगवतात. रस्त्याच्या बाजूने, काही ठिकाणी (अगदी शहरांतही) नाल्यांच्या किंवा गटारांच्या बाजूला माक्याची रोपे सापडतात. भातशेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे हे तण आहे. पावसाळ्यानंतर पाणी न मिळाल्यास हे तण मरून जाते. त्यामुळे जेव्हा मिळेल, तेव्हा आणून आपल्याजवळ याची लागवड करून ठेवावी. पावसाळ्यानंतर नियमित पाणी द्यावे.

 

१५. जास्वंद

केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदीचा उपयोग होतो. फांद्या लावून झाडे होतात. देशी जास्वंद लावावी. ४ जणांच्या कुटुंबासाठी १ झाड असले, तरी पुरेसे आहे.

 

१६. पुनर्नवा

पुनर्नवा

१६ अ. महत्त्व

मूत्रपिंडे निकामी होत असतील, तर त्यांच्यासाठी हे औषध संजीवनी आहे. मूतखडा, बद्धकोष्ठता, सूज यांवर अतिशय गुणकारी आहे. तुपाची फोडणी देऊन बनवलेली पुनर्नव्याच्या कोवळ्या पानांची भाजी वर्षातून एकदा तरी खावी, असे म्हणतात. याने पोटातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते. घराभोवती जागा असल्यास जास्तीतजास्त लागवड करावी.

१६ आ. ओळख आणि लागवड

पावसाळ्यात ही झाडे आपोआप उगवतात. शहरातही ही वनस्पती नाल्यांच्या किंवा रस्त्याच्या बाजूला आढळते. खोड तांबूस असते. पाने गडद हिरव्या रंगाची असतात. ही वनस्पती पसरणारी आहे. हिला गुलाबी रंगाची फुले येतात. पावसाळ्यानंतर पाणी नसल्यास झाड मरते; पण मूळ जिवंत रहाते. पुन्हा पावसाळ्यात पाणी मिळाल्यावर झाड तरारून येते. त्यामुळे याला ‘पुनर्नवा’ म्हणतात. याची २ ते ४ रोपे लावली, तरी वर्षभरात ती १० ते १२ वर्गमीटर परिसरात पसरतात. या वनस्पतीचे मूळ पुष्कळ खोल असते. त्यामुळे ही वनस्पती सापडल्यास ओढून न काढता खणून काढावी आणि तिची लागवड करावी.

संकलक

श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मार्गदर्शक

डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख निर्देशक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.

भाग ४ वाचा…  महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? भाग – ४

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’, ‘११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ आणि ‘९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’

Leave a Comment