देवर्षि नारद

Article also available in :

देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानानुसार, आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तीनही लोकी भ्रमण करून नारदमुनी देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट संवाद साधत असत.

नारदमुनी यांच्या एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते दिवसभर नारायण-नारायणाचा जप करतात आणि सतत भ्रमण करीत. त्यांच्या या ‘नारायण, नारायण…’ जयघोषानेच त्यांच्या आगमनाची सूचना सर्वांना प्राप्त होत असे. यातून ते मुळात भक्तीचा प्रसार करत. कीर्तनभक्तीचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते. नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे मुनी आहेत. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, राजा अंबरिष, महर्षि वाल्मिकी आदी महान व्यक्तिमत्त्वांना भक्तिमार्गावर घेऊन जाण्याचे श्रेय नारद मुनींनाच जाते. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षि नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी नारद पुराणाची रचना केली आहे.

अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शाङ्‌र्गधन्वनः ।
गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत् ॥

‘अहो ! हे देवर्षि नारद धन्य आहेत. जे आपली वीणा वाजवीत भगवद-गुणगायनात तल्लीन होतात व संसारदुःखाने तप्त जीवांना सदा आनंदित करतात – श्रीमद्‌भागवत, स्कंध १-६-३९

 

 वाल्याचे वाल्मिकीमध्ये रुपांतर होण्यासाठी
नारदमुनींचा सत्संगच कारणीभूत !

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो नारद मुनींच्या काही मिनिटांच्या सत्संगाने ! दरोडेखोर वाल्या वाटसरूंना मारायचा, लुटायचा. एकदा वाल्याला नारदमुनी भेटले आणि त्यांनी वाल्याला विचारले, ‘तू हे पाप ज्यांच्यासाठी करत आहे, ते तुझे कुटुंबीय म्हणजे बायको आणि मुले या पापामध्ये वाटेकरी व्हायला तयार आहेत का ?’ हा प्रश्‍न वाल्याने घरी गेल्यावर विचारल्यावर त्याच्या बायका-मुलांनी पापामध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्याच्या पुढचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. नारदमुनींच्या केलेल्या प्रश्‍नानंतर वाल्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी अहोरात्र साधना केली आणि पुढे वाल्याचे रुपांतर संपूर्ण विश्‍वाला वंदनीय असणार्‍या वाल्मिकी ऋषींमध्ये झाले. इतके सत्संगाचे महत्त्व आहे.

 

देवर्षि नारद यांची निस्सीम भक्ती

एकदा नारदांना “अहं” नव्हे, परंतु उगाचच वाटून गेले की, ‘मीच खरा नारायणाचा भक्त!. कारण मी दिवसरात्र “नारायण नारायण” जप करत असतो.’ महर्षी नारद खरेखुरे भक्त होतेच, परंतु त्यांना “अहंकार” होऊ नये म्हणून भगवंतांनी मुद्दामहून अर्जुनाचे नाव घेतले. का? प्रश्न आलाच. शेवटी मुनी स्वतः अर्जुनापाशी गेले, अर्जुन झोपलेला म्हणजे झोपेत स्वप्न बघणारा माणूस, कुठले देवाचे नाव घेणार!! पण नाही त्यांना “कृष्ण कृष्ण” नाव ऐकू येऊ लागले. जवळ जाऊन बघतो तो अर्जुनाच्या जटांमधून ते नाव येत होते. परंतु नारदांच्या ठायी देखील तेवढीच निस्सीम भक्ती होती.

देवर्षि नारद भक्तिमार्गातील अधिकारी पुरुष म्हणून सर्वज्ञात होते. त्यांनी लिहिलेली भक्तीसूत्रे ‘नारद भक्तीस्तोत्रे’ म्हणून ओळखली जातात. भक्तिमार्गाचे महत्व, स्वरूप, आणि भक्तिमार्गाची आवश्यकता या सूत्रातून नारदांनी अतिशय थोडक्यात व्यवस्थित रीतीने “नवविधा भक्तीची रहस्ये” सांगितली आहेत.

संदर्भ : संकेतस्थळ

Leave a Comment