दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त योद्धावतार भगवान परशुराम !

भगवान परशुरामाची गुणवैशिष्ट्ये विशद करणारा हा लेख त्याच्या चरणी सविनय अर्पण !

 

१. सप्तचिरंजिवांपैकी एक

अश्‍वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्‍च बिभीषण:।
कृपः परशुरामश्‍च सप्तैते चिरजीविनः ॥

अर्थ : अश्‍वत्थामा, बळी, महर्षि व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत.

परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.

 

२. श्रीविष्णूचा सहावा अवतार

सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगु यांच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार घेतला. ‘महर्षि जमदग्नी यांच्या धर्मपत्नी रेणुका यांना चार मुलांनंतर पुन्हा दिवस राहिले. भगवान विष्णूंनी आपल्या सर्व अंशांनी रेणुकेच्या उदरी प्रवेश केला. त्यामुळे रेणुका अतुल तेजस्वी दिसत होती. पूर्ण दिवस भरल्यावर त्रेतायुगाच्या संधीकालांत वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीयेला, पुनर्वसु नक्षत्रावर रेणुकेला मुलगा झाला. सर्वत्र आनंदोत्सव झाला. त्याचे नाव ‘राम’ ठेवण्यात आले. जमदग्नीचा सर्वांत धाकटा मुलगा राम ! रामात सूर्यतेज होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास भार्गवराम असेही संबोधले जात असे.

जमदग्नीने मोठ्या थाटाने रामाचे सर्व द्विजसंस्कार पार पाडले. राम व्रतबंधाला योग्य झाल्यावर जमदग्नीने त्याचे उपनयन करण्याचे ठरवले. अनेक ऋषीश्रेष्ठ, राजे-महाराजे यांना निमंत्रण दिले. मोठ्या थाटाने रामाचे मौंजीबंधन झाले. उपनयनानंतर राम पित्याची अनुज्ञा घेऊन अध्ययनाकरता कश्यपमुनींच्या आश्रमी गुरुगृही गेला. अमित तेजस्वी रामाकडे पाहून कश्यपांना आनंद झाला. त्यांनी रामाचा शिष्य म्हणून स्वीकार केला. राम विष्णूचाच अवतार. त्याच्या जिव्हेवर साक्षात् सरस्वतीच वास करत होती. लवकरच राम सर्व विद्यांत पारंगत झाला. वेद आणि सर्व शास्त्रांचे त्याचे अध्ययन पूर्ण झाले.

 

३. रामाचे नाव ‘परशुराम’ होणे

पुढे तो कैलासावर तपश्‍चर्येस गेला. गणपतीची आराधना करून त्याने गणपतीस प्रसन्न करून घेतले. गणेशाकडून रामाने ‘परशूविद्या’ मिळवली. गणपतीने रामास दिव्य ‘परशू’ दिला. त्या दिव्य परशूचे तेज अग्नीशिखेसारखे होते. त्याची धार अखंडित होती. गती अकुंठित होती. दिव्य परशू मिळाल्यामुळे भार्गवरामास ‘परशुराम’ म्हणू लागले.

अमित शक्तिशाली परशुराम घरी येण्यास निघाले. वाटेत त्यांना घनदाट अरण्य लागले. कीर्र झाडीतून हिंस्त्र श्‍वापदांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. अकस्मात् परशुरामाने दीनवाणीने आक्रंदन करणार्‍या मनुष्याचा आवाज ऐकला. त्या आक्रोशाच्या दिशेने ते रोखून पाहू लागले. त्या वेळी वाघाने एका तरुणास पकडल्याचे त्यांना दिसले. तात्काळ परशुरामाने स्वतःचे धनुष्य सिद्ध केले आणि बाणाने त्या व्याघ्राचा वेध घेतला. परशुरामाच्या बाणाने क्षणार्धात त्या वाघास लोळवले आणि त्या तरुणाची सुटका झाली. त्याचा पुनर्जन्म झाला. त्या तरुणाचे नाव ‘अकृतव्रण’. तो शांताऋषांचा पुत्र. अकृतव्रण परशुरामाचा एकनिष्ठ आणि अनन्य शिष्य झाला.’

(संदर्भ – श्रीमहाविष्णूचा सहावा परशुराम अवतार,  पृ.२०. – २१. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ))

 

४. काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केलेले दैवत !

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील लोटे गावातील महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे पुरातन मंदिर आहे. तेथे परशुरामाचे पदचिन्ह उमटलेल्या शिळेचे नित्यपूजन होते. या शिळेच्या मागे तीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मध्यभागी भगवान परशुरामाची आकाराने मोठी आणि रेखीव मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे काळदेवता आणि डावीकडे कामदेवता यांच्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत. भार्गवरामाने काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केल्याचे त्या द्योतक आहेत.

 

५. अखंड ब्रह्मचारी आणि परम वैरागी असणे

परशुरामाने कामवासनेला जिंकले होते. त्यामुळे तो अखंड ब्रह्मचारी आहे. परशुरामामध्ये प्रचंड विरक्ती होती. त्यामुळेच त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकूनही कश्यपऋषींना तिचे सढळ हस्ते दान करून महेंद्र पर्वतावर एकांतात राहून संन्यस्त जीवन व्यतीत केले.

 

६. अपराजेय योद्धा असलेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा
विनाश करण्यासाठी परशुरामाने केलेला अद्वितीय पराक्रम !

६ अ. परशुरामाने तपश्‍चर्या करून सहस्रार्जुन कार्तविर्यापेक्षा अधिक
तपोबल अर्जित केल्याने सूक्ष्म स्तरावर कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या पराभवाचा आरंभ होणे

हैैहय वंशातील अधर्मी राजा महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने सहस्रो वर्षे कठोर तपश्‍चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि असीम बलशाली बनून सहस्रो भुजा धारण करण्याचे वरदान प्राप्त केले होते. अशा कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा नाश करता यावा, यासाठी त्याच्या तपोबलापेक्षा अधिक तपोबल अर्जित करण्यासाठी परशुरामाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्‍चर्या केली. कार्तविर्याचे तपोबल परास्त करण्यासाठी परशुरामाने त्याहून कठोर तपश्‍चर्या करून ब्राह्मतेजाच्या शस्त्राने कार्तविर्याच्या पुण्यबळावर एकप्रकारे प्रहार करून त्याला क्षीण केले. त्यामुळे कार्तविर्याच्या सहस्रावधी भुजांद्वारे कार्यरत असणार्‍या सूक्ष्म कर्मेंद्रियांची दिव्य शक्ती निष्प्रभ होऊ लागली आणि अधर्माचे प्रतीक असणार्‍या कार्तविर्याच्या पराभवाचा सूक्ष्मातून आरंभ झाला. कार्तविर्याला पराभूत करण्यासाठी भगवान परशुरामाने दिलेला हा आध्यात्मिक स्तरावरील लढा अद्वितीय आहे.

६ आ. गोधन चोरणार्‍यांचा विनाश होवो, असा संकल्प करून तो पूर्णत्वास नेणे

कार्तवीर्य सहस्रार्जुनाने ऋषी दांपत्याच्या विरोधाला न जुमानता जमदग्नी आश्रमातून कामधेनूला बलपूर्वक स्वतःसमवेत नेऊन गोमातेचे अपहरण केले. ही घटना घडली, त्या वेळी परशुराम आश्रमात नव्हता. तो घनघोर अरण्यात कठोर तपश्‍चर्या करण्यात मग्न होता. जेव्हा तो जमदग्नींच्या आश्रमात पोचला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार समजला. कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या कह्यात असणार्‍या कामधेनूची मुक्तता करून गोमाता आणि गोधन यांचे संरक्षण करण्यासाठी त्याने गोधन चोरणार्‍यांचा विनाश होवो, असा संकल्प केला. त्याची शापवाणी खरी ठरली; कारण गोधन चोरल्याचा अपराध केल्यामुळे कार्तविर्याचा पुण्यक्षय झाला. जमदग्नीऋषींवर प्राणघातक आक्रमण केल्यामुळे कार्तविर्याच्या पुत्रांनाही पातक लागले. परशुरामाने कार्तविर्याच्या कुळाचा विनाश करण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास नेऊन गोमातेची मुक्तता करून तिला पुन्हा जमदग्नींच्या आश्रमात आदराने आणले.

६ इ. कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा अंतःकाळ जवळ येताच त्याच्यावर परशूने
स्थुलातून वार करणे आणि शिवाने दिलेल्या परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ करणे

कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा पुण्यक्षय झाल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर सपशेल पराभव झाल्यामुळे स्थुलातून त्याचा विनाश काळ समीप आला. त्याच्या अंतःकाळ जवळ येताच भगवान परशुरामाने सहस्रार्जुनावर स्थुलातून परशूने वार करून त्याच्या सहस्र भुजा छाटून टाकल्या आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे भगवान परशुरामाने क्षत्रियांचे निर्दालन करण्यासाठी महाकालेश्‍वर शिवाने दिलेल्या परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ केला.

 

७. भगवान परशुरामाने केलेले
अपूर्व अवतारी कार्य आणि पराक्रम यांची ठळक उदाहरणे

७ अ. २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करणे

भगवान परशुरामाने एकट्याने संपूर्ण पृथ्वीला २१ वेळा प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर माजलेल्या अहंकारी आणि अधर्मी क्षत्रियांचा निःपात केला. अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्याने पृथ्वीचा भार हलका केला आणि त्याचसमवेत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचे परम पुण्यही प्राप्त केले.

७ आ. सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य असणे

प्रजेचा छळ करून संपूर्ण पृथ्वीवर उपद्रव माजवणार्‍या क्षत्रियांची संख्या सहस्रो होती. त्यांच्याजवळ लक्षावधी अक्षौहिणी सैन्यबळ होते. भगवान परशुराम हा नरदेह धारण केलेला साक्षात् श्रीमन्नारायणच होता. त्यामुळे त्याच्यात सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य होते.

७ इ. दानशूर

एकछत्र सम्राटाप्रमाणे अखिल भूमीचा अधिपती असूनही अश्‍वमेध यज्ञाच्या वेळी परशुरामाने यज्ञाचे अध्वर्यू महर्षि कश्यप यांना संपूर्ण पृथ्वीचे दान दिले. यावरून परशुराम किती दानशूर होता, हे दिसून येते.

७ ई. नवसृष्टीची निर्मिती करणे

भगवान परशुरामाने अवघ्या तीन पावलांत समुद्र मागे हटवून क्षणार्धात परशुराम भूमीची निर्मिती केली आणि चितेतून चित्तपावन ब्राह्मणांची निर्मिती करून परशुराम क्षेत्रात नवीन सृष्टीच साकार केली.

 

८. शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेज यांचा उत्कृष्ट
उपयोग करणार्‍या श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान परशुराम !

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥

अर्थ : मुखात चार वेद आहेत, पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, असा परशुराम शाप देऊन किंवा बाणाने शत्रूचा नाश करतो.

परशुरामाने शास्त्रबळ म्हणजे ज्ञानबळ आणि शस्त्रबळ म्हणजे बाहूबळ या दोन्हींच्या संयोगाने रिपुदमन केले. आध्यात्मिक परिभाषेत ज्ञानबळ म्हणजे ब्राह्मतेज आणि बाहूबळ म्हणजे क्षात्रतेज होय. परशुरामाने ब्राह्मतेजाच्या बळावर शाप देऊन, म्हणजे संकल्पाने आणि क्षात्रतेजाच्या बळावर परशूने वार करून, म्हणजे प्रत्यक्ष प्रहार करून शत्रूचा संहार केला. अशा प्रकारे भगवान परशुराम हे शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण आहे.

 

९. जन्माने ब्राह्मण असूनही काळानुसार आवश्यक असणारे क्षत्रियांचे कर्तव्य पूर्ण करणे

महर्षि जमदग्नींचा वर्ण ब्राह्मण आणि रेणुकामातेचा वर्ण क्षत्रिय होता. परशुराम जन्माने ब्राह्मण; परंतु गुण अन् कर्म यांनी क्षत्रिय होता. त्यामुळे त्याने क्षत्रिय वर्णानुसार आचरण करत क्षात्रधर्माचे पालन करून दुर्जनांचा नाश केला. भगवान परशुराम हे काळानुसार समष्टी साधनेचे आणि वर्णानुसार क्षात्रधर्म साधनेचे उत्तम उदाहरण आहे.

पित्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि मातेप्रमाणे क्षात्रतेज असणारा परशुराम हा योद्धावतार आहे. ब्रह्मवृंदांना नामशेष करण्यासाठी त्यांचे आश्रम आणि गुरुकुलाची उज्ज्वल परंपरा उद्ध्वस्त करणार्‍या अन्यायी राज्यसत्तेला दोन्ही तेजांनी संपन्न असणार्‍या परशुरामाने ललकारले. वैदिक ज्ञानाचे ब्राह्मतेज आणि शस्त्ररूपी क्षात्रतेज यांद्वारे परशुरामाने अधर्माचे उच्चाटन केले. दुष्टांना शाप देऊन किंवा शस्त्राने वार करून कठोर शासन केले. अशा प्रकारे परशुरामाने काळानुसार आवश्यक असणारे क्षत्रियांचे कर्तव्य पूर्ण केले.

 

१०. कर्नाटक येथील तुंगभद्रा नदीच्या तटावर वसलेल्या तीर्थहळ्ळी या तीर्थक्षेत्राचे महात्म्य

पिता जमदग्नीऋषी यांच्या आज्ञेवरून परशुरामाने मातेचा शिरच्छेद केला. परशुरामाच्या प्रार्थनेनंतर जमदग्नीऋषींनी रेणुकेला पुनर्जीवित केले; परंतु परशुरामाच्या परशूला लागलेले रेणुकामातेचे रक्त काही केल्या कोणत्याही नदीच्या किंवा सरोवराच्या जलाने धुतले जात नव्हते. परशुराम भ्रमण करत कर्नाटक येथील तुंगभद्रा नदीच्या तटावर वसलेल्या क्षेत्री येऊन पोचले. तेथील तुंगभद्रा नदीच्या जलात परशु धुतला असता त्याला लागलेले शोणित धुतले गेले. त्यामुळे हे स्थान तीर्थहळ्ळी या नावाने विख्यात झाले. या तीर्थक्षेत्रातील तुंगभद्रेच्या पाण्यात समस्त पापांचे शमन करण्याचे सामर्थ्य आहे. या पाण्याची चवही अतिशय मधुर आहे.

 

११. शिव आणि दत्त यांना गुरुस्थानी मानून त्यांची कृपा संपादन करणे

परशुरामाने शिव आणि भगवान दत्तात्रेय यांना गुरुस्थानी मानून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. त्याने कैलासावर १२ वर्षे वास करून गुरुस्थानी असणार्‍या शिवाकडून गायत्री उपासनेद्वारे एकाग्रता, युद्धकौशल्य, शस्त्रकला, अस्त्रविद्या आणि तंत्रविद्या यांसह वेदांचे ज्ञान अन् आत्मज्ञान प्राप्त केले. दुष्टांचा संहार करण्याकरता शिवाने आपल्याजवळचे दिव्य पाशुपतास्त्रही दिले. त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रेयांना गुरुस्थानी मानून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या कृपेने हठयोग, शक्तीपातयोग अन् ध्यानयोग यांचे गूढ रहस्य जाणून घेतले.

 

१२. संपूर्ण अवतार काळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण

गुरुकुलाची परंपरा, आश्रम व्यवस्था आणि ऋषी जीवन यांना क्षत्रियांच्या उन्मत्तपणाने ग्रासून टाकले होते. क्षत्रियांच्या जाचातून परंपरा, संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे भगवान परशुरामाने शिष्यावस्था संपताच शिवाने आशीर्वाद स्वरूप दिलेल्या परशु, धनुष्यबाण आणि शापमय वाणी यांचा शत्रूवर वार करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करून कार्तवीर्य सहस्रार्जुनासह सर्व उन्मत्त क्षत्रियांचा निःपात केला. संपूर्ण अवतार काळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे भगवान परशुराम होय.

भगवान परशुरामाच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०१५)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

१३. भगवान परशुरामाने अपरान्त भूमीची अशी केली निर्मिती !

जग पादाक्रांत करून भार्गवराम (भगवान परशुराम) पृथ्वीचे अजिंक्य चक्रवर्ती सम्राट झाले. राजैश्‍वर्याला शोभेल, असा वैभवसंपन्न विश्‍वजीत महायज्ञ त्यांनी केला. या यज्ञाचे यजमानपद त्यांनी आनंदाने भूषवले आणि या निमित्ताने सर्व संपत्तीचे दान केले. स्वतःजवळ केवळ शस्त्रविद्या आणि शरीर शिल्लक ठेवून जिंकलेली पृथ्वीदेखील कश्यपांना दान करून टाकली.

त्यानंतर कश्यपांनी त्यांना त्यांच्यावरील आणखी एका नैतिक दायित्वाची जाणीव करून दिली. धर्मशास्त्रानुसार दात्याने दान केलेल्या वस्तूंचा उपभोग घ्यायचा नसतो. कश्यपांनी त्यांना सांगितले, हे रामा, आपण समस्त पृथ्वीचे दान देऊन त्यावरील आपले स्वामित्व सोडले आहे. इतःपर या भूमीवर निवास करण्याचा आपणाला अधिकार नाही.

परशुरामांनी त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले आणि निवासासाठी नवी भूमी निर्माण करावी, या विचाराने सागराला काहीसा मागे जाण्यास विनवले.

सागर मागे हटत नाही, असे दिसून आल्यावर त्यांनी धनुष्यास बाण लावून तो सागरावर सोडला आणि त्याला सांगितले, हा बाण पश्‍चिमेला ज्या ठिकाणी पडेल, तेवढ्या रुंदीचा आणि सह्याद्री पर्वताच्या लांबीएवढा प्रदेश मला प्रदान कर !, अशा प्रकारे समुद्राचा जो भाग भूपृष्ठाच्या वर आला, त्या भूमीला अपरान्त असे म्हणतात. कन्याकुमारीपासून ते उत्तरेस भृगुकच्छपर्यंतचा हा प्रदेश होय.

संदर्भ ग्रंथ : वैश्‍वानर अवतार, ग्रंथकर्ता : डॉ. श्रीकांतजी राजीमवाले
साभार : वेदावती पारखे उरणकर