‘ऑक्सिजन’चा आपत्काळ !

संपूर्ण मानवजातीला आवश्यक असणारा प्राणवायू अर्थात् ऑक्सिजन ! शरीर वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतो आणि त्याद्वारे ऊर्जेची निर्मिती होते. त्यामुळे ऑक्सिजन हे जगण्याचे प्रमुख साधन आहे. इतके दिवस ऑक्सिजनच्या प्राथमिक आवश्यकतेविषयी कुणालाही तितकेसे मोल वाटत नव्हते. तसे वाटण्याची मनुष्यावर तितक्या प्रमाणात कधी वेळही ओढवली नाही. पर्यावरणतज्ञ आणि वृक्षप्रेमी यांनी त्यांच्या परीने ऑक्सिजनचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला; पण मानवाने त्याकडे दुर्लक्ष केले. सद्य:स्थिती पहाता ‘ऑक्सिजन’ या सूत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची आणि त्याला ‘बहुमूल्य’ समजण्याचीच वेळ निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अत्यावश्यक उपाययोजनांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस यांच्या जोडीला ऑक्सिजनचाही समावेश आहे. कोरोनामुळे गंभीर किंवा अत्यवस्थ झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. संपूर्ण देशभरात ऑक्सिजनच्या वाढत्या वापरामुळे त्याचा सर्व स्तरांवर तुटवडाही तितक्याच प्रमाणात जाणवत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. एवढे असूनही ऑक्सिजन उपलब्ध होतोच, असे नाही. शेवटी पदरी निराशा पडते आणि नाईलाजास्तव आपल्या नातलग रुग्णाला मृत्यूच्या दारी लोटावे लागते. हे सर्वत्र दिसणारे भीषण चित्र आहे. अशा मृत्यूंचे आज आपण सर्वच जण दुर्दैवाने मूक साक्षीदार ठरत आहोत. मृत्यूच्या दाढेत जाणारे रुग्ण पहाता ऑक्सिजनच्या तुटवड्याकडे गांभीर्याने आणि प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.

कोरोनामुळे सर्वत्र हाहाःकार माजला आहे. प्रत्येक राज्य आपापल्या स्तरावर ऑक्सिजनच्या अमुक इतक्या मेट्रिक टनची मागणी करत आहेत. तो तितक्या प्रमाणात उपलब्ध न झाल्यास टीकेचे हत्यारही उगारले जात आहे. कोरोनाचे रुग्ण राहिले बाजूलाच, उलट या स्थितीत राजकारणाला ऊत येऊन आरोप-प्रत्यारोपाच्याच फैरी झडत आहेत. अनेक ठिकाणी वाक्युद्ध पेटले आहे. आपत्काळात अशा घटना विदारक आणि तितक्याच लज्जास्पदही आहेत. ‘हेवेदावे आणि राजकारण दूर ठेवून हातात हात घालून संघटित होऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावरले’, असे दृश्य भारतात दिसणे अवघड अन् दुर्मिळच आहे. इतकी दशके सर्वजण मतांसाठी झगडलेे; पण आता वेळ आली आहे, ती माणसासाठी झगडण्याची ! माणूसच माणसाला वाचवू शकतो आणि माणूसच माणसाचा जीव घेऊ शकतो, असे आजचे वास्तव आहे.

गांभीर्य जाणावे !

ऑक्सिजनवर पहिला अधिकार रुग्णांचा असतो. त्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाययोजना म्हणून उद्योगांना केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून तो रुग्णांसाठी वापरण्यात यावा, असा आदेशही देण्यात आला. त्याप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा होतही आहे; पण मागणी प्रचंड वाढल्याने तितक्या प्रमाणात पुरवठा करणे प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग यांना अवघड झाले आहे. अशी वेळ कधी काळी आपल्यावर ओढवेल, याचा कुणी विचारही केला नसेल ! अर्थात् असे म्हणून वेळ मारून नेली, असे चालणार नाही. अत्यवस्थ असणार्‍या प्रत्येक रुग्णापर्यंत ऑक्सिजन पोचणे तितकचे आवश्यक आहे. देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या सल्ल्यात म्हटले आहे की, भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या ! न्यायालयाला असे शब्द वापरून गांभीर्य पटवून देण्याची वेळ का येते ? ऑक्सिजनच्या तुटवड्याचे भयावह परिणाम सरकारने लक्षात घेऊन सर्वच नागरिकांना दिलासा द्यायला हवा. आज देशातील नागरिक भयभीत आहेत. कुणाचा कधी मृत्यू होईल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे अशा स्थितीत सर्वांना सांभाळणे आणि आश्‍वस्त करणे हे सरकारचे दायित्व आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याने गाठलेला उच्चांक पहाता सरकारने इतके दिवस काय केले ? आणखी किती रुग्णांचे मृत्यू आम्ही पहायचे ? असे प्रश्‍न जनतेच्या मनात आहेत. त्यांची उत्तरे सरकार देईल का ? काही ठिकाणी सामान्य नागरिक सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून स्वतः पदरमोड करून स्थानिक रुग्णांसाठी ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध करून देत आहेत. ऑक्सिजनच्या भीषण तुटवड्यावर उपाय म्हणून टाटा उद्योग समूहाने पुढाकार घेत २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. ते परदेशातून ऑक्सिजन वाहक सिलिंडरची आयात करणार आहेत. मग जे या सगळ्यांना जमते, ते सर्व यंत्रणा आणि अधिकार हाताशी असतांना सरकारला का बरे जमत नाही ?

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे तो मोठ्या प्रमाणात विकत घेण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. याचा अपलाभ घेत मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकारही  होत आहे. ऑक्सिजन सिलिंडरच्या विक्रीतून पुष्कळ पैसे उकळले जात आहेत. मध्यप्रदेशातील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या सिलिंडरची चोरी करण्यात आली. सिलिंडरसाठी अनेक ठिकाणी भल्यामोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. तेथे वाद होत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजनची गळती होत आहे. गंभीर स्थितीतील रुग्णाला असणार्‍या ऑक्सिजनच्या आवश्यकतेपुढे सामान्य स्थितीतील कुटुंबे तर अक्षरशः जणू आपले आयुष्यच पणाला लावून आटापिटा करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच ठिकाणी योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हायला हवा; पण तो पुरवण्यात अनेक अडचणीही येत आहेत. कारखान्यातील टाकीतून ऑक्सिजन गाडीत भरणे आणि तो पुन्हा गाडीतून खाली उतरवणे हे काम जिकिरीचे आहे. त्यासाठी प्रशिक्षित चालक आणि ऑक्सिजनचा प्रकल्प हाताळण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञ आवश्यक आहेत; पण त्यांची संख्या पुरेशी नाही. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी पुरेसे टँकरही उपलब्ध नाहीत. याचा प्रत्यय कळंबोली येथून विशाखापट्टणम् येथे ऑक्सिजन आणण्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या वेळी आला. रेल्वेतून १० टँकर पाठवण्याचे नियोजन होते; पण ऐनवेळी केवळ ७ टँकर घेऊन रेल्वे गेली. केवळ ऑक्सिजनची मागणी आणि त्याचा पुरवठा इतक्यावरच हे गणित मर्यादित नसून त्याच्या मुळाशी असलेल्या संबंधित यंत्रणांतील त्रुटी सोडवणेही महत्त्वाचे आहे. सर्व यंत्रणांचे नियोजन अचूक करणे हा ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरूपी संपवणारा आणि ऑक्सिजनच्या १०० टक्के उपलब्धतेची फलनिष्पत्ती मिळवून देणारा उपाय ठरू शकतो, हे  सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment