समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे. त्यासाठी

आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥

प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ – दासबोध, दशक १२, समास १, ओवी १ आणि २

अर्थ : माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार करावा. विवेकी जन हो ! येथे आळस करू नका. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही कष्टी व्हाल. जर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सावधपणे व्यवस्थित कराल, तरच तुम्हाला विवेकी म्हणता येईल.

 

समर्थांचा राजकारणातील रस

गनिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ – दासबोध, दशक १९, समास ९, ओवी २५

अर्थ : शत्रूच्या फौजा पहाताच ज्याचे बाहु लढण्यासाठी स्फुरण पावतात असा पराक्रमी राजा असावा. त्याने कायम प्रजेचे हित पहावे आणि रक्षण करावे.

छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवण्याचे काम तू केले पाहिजेस, ही भवानीमातेला केलेली प्रार्थना ! ‘तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाची देखता ॥’ या प्रार्थनेतून श्री समर्थांचा राजकारणातील रसच दिसून येतो.

 

भिक्षा मागण्याचे महत्त्व

शिष्यांनी भिक्षेला जाणे आवश्यक होते. ‘ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।’ (दासबोध, दशक १४, समास २, ओवी १) म्हणजे ‘ब्राह्मणाच्या जीवन आचारांमध्ये ‘भिक्षा मागणे’ हे प्रमुख लक्षण आहे.’ हे त्यांचे सांगणे होते. भिक्षेमुळे निरीक्षण करता येते. ‘भिक्षामिसे लहान थोरे । परीक्षून सोडावी ।’ (दासबोध, दशक १५, समास ६, ओवी २४) म्हणजे ‘भिक्षेच्या निमित्ताने समाजातील लहान थोर सर्वांचे निरीक्षण करावे,’ असा त्यातील हेतू होता. भिक्षान्न खाल्ल्यामुळे वासनेवर, रसनेवर जय म्हणजेच ताबा मिळवता येतो. ‘जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।’ (दासबोध, दशक २, समास ७, ओवी ५६) म्हणजे ‘ज्याने आपल्या जिभेवर आणि कर्मेंद्रियांवर विजय मिळवला आहे’, असा महंत सिद्ध झाला की, तो समाजसेवेचे काम अत्यंत दक्षतेने करतो.

समर्थांचे कार्य करण्याची चतुःसूत्री
मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥
चौथा अत्यंत साक्षप……॥ – दासबोध, दशक ११, समास ५, ओवी ४ आणि ५

अर्थ : नेत्याची लक्षणे सांगतांना समर्थ म्हणतात, अध्यात्माची पार्श्‍वभूमी हे पहिले लक्षण होय, व्यवहाराने वागणे हे दुसरे लक्षण आहे. हे करतांना अखंड सावधान असणे तिसरे लक्षण तर; सतत उद्योगात रहाणे हे चौथे लक्षण होय.

ही त्यांची कार्य करण्याची चतुःसूत्री होती.

(संदर्भ : ‘हरिविजय’, दीपावली २०११)

Leave a Comment