समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानवर पाच मुसलमानी राजे राज्य करत असतांना हिंदुस्थान एक प्रचंड मोठे अखंड राष्ट्र आहे, याची जाणीव मात्र समर्थ रामदासस्वामींना होती. त्या अनुषंगानेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले. छत्रपती संभाजी महाराजांपुढेही त्यांनी तोच आदर्श ठेवला. स्वामी विवेकानंदांनी ओळखलेले समर्थ रामदासस्वामींचे अनन्यसाधारण महत्त्व त्यांच्याच शब्दांत पू. सुनील चिंचोलकर यांनी उद्धृत केले आहे !

ज्या वेळी एखादा महापुरुष दुसर्‍या महापुरुषाचे वर्णन करतो, तेव्हा त्या अल्पशा वर्णनात अवघे चरित्र साठवले आणि आठवले जाते. संत नामदेवांनी संत ज्ञानदेवांच्या जीवनावर केलेले अभंग याची साक्ष देतील. समर्थांच्या कार्याचे स्वामी विवेकानंदांनी केलेले मूल्यमापन प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंद लिहितात –

 

१. अखंड राष्ट्र निर्मितीसाठी शिष्यांना
भ्रमंती करायला लावणारे समर्थ रामदासस्वामी !

भारत हे अखंड राष्ट्र आहे याची जाणीव महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी या दोघांना होती. समर्थांनी भिक्षेच्या माध्यमाचा स्वीकार करून त्यांच्या शिष्यांना भ्रमंती करायला लावून हे अखंड राष्ट्र डोळ्यांनी पहायला लावले. भारतभर त्यांनी विणलेले मठांचे जाळे हे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे एक सुंदर प्रतीक होते.

 

२. भारताची अखंडता जनमानसाच्या
पटलावर बिंबवण्यासाठी भिक्षा हे उपजीविकेचे साधन !

अत्यंत मार्मिक शब्दांत स्वामी विवेकानंद लिहितात, समर्थांच्या व्यापक व्यक्तीत्वाचे दर्शन घडले. समर्थांनी त्यांच्या संप्रदायात भिक्षापद्धती सांगितली. भिक्षा हे उपजीविकेचे साधन होते, असेच प्रथम दर्शनी सामान्य जनांना वाटते. मात्र समर्थांना त्या पाठीमागे स्थलांतराची (Migration) वृत्ती वाढवून, जोपासून भारताची अखंडता जनमानसाच्या पटलावर बिंबवायची होती. त्या वेळी भारताचे पाच तुकडे झाले होते. पाच इस्लामी शाह्यांची राजवट होती. त्यामुळे विजापूरचा भारतीय देहलीला गेला की, तो त्याला विदेश वाटे. कारण शासन पालटले की भाषा, नियम सारे भिन्न दिसते;

पण समर्थांनी त्यांच्या महंतांस सांगितले –

कुग्रामे अथवा नगरे ।
पहावी घरांची घरे ।
भिक्षामिसे लहानथारे ।
परिक्षुनी सोडावी ।
जयास भिक्षेचा अभ्यास ।
त्यास वाटेना परदेश ।
जिकडे तिकडे स्वदेश । लाकत्रयी ॥
भिक्षेने ओळखी होती ।
भिक्षेने भ्रम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करती ।
सकळ प्राणी ।
जगामध्ये जगमित्र ।
जिव्हेपाशी आहे सूत्र ।
कोठेतरी सत्पात्र ।
शोधून पहावे ।

 

राष्ट्रीय संघटना उभी करणे, तसेच अनेक
सुप्त हेतू साध्य करून देणारे भिक्षा हे माध्यम !

भिक्षेपाठीमागे समर्थांचे जे राष्ट्रीय धोरण होते, ते प्रथम स्वामीजींनी निदर्शनास आणून दिले. आज माणसे फिरतात; पण त्या पाठीमागे केवळ विलासी भावना असते. समर्थ कुग्रामापासून म्हणजे अगदी खेड्यापासून मोठ्या नगरांपर्यंत सर्वत्र हिंडा म्हणतात. भिक्षेच्या निमित्ताने नुसती घरे पाहू नका, तर घरांची घरे म्हणजे पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे । तितुकी भगवंताची घरे । पहा, असा उपदेश करतात. नवनवीन ओळखी निर्माण करून एक राष्ट्रीय संघटना उभी करण्यासाठी ते भिक्षा हे माध्यम वापरतात. भिक्षा हे हुकमी आणि गुप्त साधन आहे. शत्रूला भिक्षेचा हा डाव लक्षात येणार नाही; म्हणून तो सुरक्षित मार्ग आहे.

 

३. समर्थांचा महाराष्ट्र धर्म !

आजही समर्थांच्या १ सहस्र १०० मठांपैकी ज्याचा सविस्तर तपशील उपलब्ध आहे, त्यात पहेलगाव (हिमाचलप्रदेश), काशी, अयोध्या, मथुरा, वृंदावन (उत्तरप्रदेश), जयपूर (राजस्थान), हैद्राबाद (म्हणजे भाग्यनगर), इक्केहळी (आंध्रप्रदेश), तंजावर, मन्यारगुडी, रामेश्वर (तामिळनाडू), बिदर, विजापूर (कर्नाटक) या विविध प्रांतात आणि महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या मठांचे जाळे विणलेले दिसून येते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची चळवळ निर्माण केली होती त्याला समर्थांनी महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठी माणसाचे कर्तव्य ! हे अत्यंत संयुक्तिक नाव दिले. महाराष्ट्र धर्म हा राष्ट्रीय एकात्मतेचा पहिला प्रयोग होता. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ एका पत्रात लिहितात –

देवमात्र आच्छादिला । आपुला स्वधर्म बुडाला ।
जित्यापरीस मृत्यू भला । ऐसे समजावे ॥
मराठा तितुका मेळवावा ।
महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
ये विषी न करता तकवा । पूर्वज हासती ॥

 

स्वराज्याची चळवळ महाराष्ट्राबाहेरही
पसरवण्याचा समर्थांचा संभाजी महाराजांना सल्ला !

संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ म्हणतात –

सकळ लोक एक करावे ।
गलिम निपटून काढावे ।
ऐसे करता कीर्ती धावे । दिगंतरी ॥
आहे तितुके जतन करावे ।
पुढे आणिक मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥
पुढे अणिक मेळवायचे आणि महाराष्ट्र राज्य जिकडे तिकडे करायचे याचा अर्थ काय ? छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जी स्वराज्याची चळवळ निर्माण केली ती छत्रपती संभाजी राजांनी जिकडे तिकडे याचा अर्थ महाराष्ट्राबाहेरही पसरवावी, हा मौलिक संदेश समर्थ त्यांना देतात.

 

४. आध्यात्मिक राष्ट्रवादाचे आद्यतम प्रणेते समर्थ रामदासस्वामी !

आध्यात्मिक राष्ट्रवादाचे समर्थ आद्यतम प्रणेते होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आनंदवनभुवनी प्रकरणात वर्णन करतांना ते आनंदाने लिहितात –

बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छसंहार झाला ।
मोडीली मांडिली क्षेत्रे । आनंदवनभुवनी ।
बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले ।
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनी ।

हिंदुस्थान हा शब्द औरंग्या पापीच्या पार्श्वजभूमीवर समर्थ वापरतात. याचा उघडउघड अर्थ अखंड भारताची किंवा अखंड हिंदुस्थानची संस्थापना होय. जसे कृष्णाने अर्जुनाला निमित्त करून भगवद्गीता सांगितली, तसे संभाजीला निमित्त करून समर्थांनी अवघ्या भारतियांना राष्ट्रीय एकात्मतेचा महामंत्र दिला समर्थ म्हणतात –

शिवरायास आठवावे ।
जीवन तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी उरावे । कीर्ती रुपे ॥
शिवरायाचे आठवावे स्वरूप ।
शिवरायाचा आठवावा साक्षेप ।
शिवरायाचा आठवावा प्रताप ।
भूमंडळी ।
शिवरायाचे कैसे बोलणे ।
शिवरायाचे कैसे चालणे ।
शिवरायाचे सलगी देणे । कैसे असे ।
सकळ सुखांचा त्याग ।
करूनि साधिजे तो योग ।
राज्य साधनेची लगबग । ऐसी असे ।

समर्थांनी शिवाजी महाराज हे राज्यसाधनेचा मानदंड डोळ्यांसमोर ठेवायला सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्ते नव्हते, तर राज्यसाधक होते. नुसते श्रीमंत नव्हते, तर योगी पण होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समर्थांच्या राष्ट्रीय एकात्मतेचे सगुण, साकार स्वरूप होते !

– पू. सुनील चिंचोलकर, दत्तनगर, सातारा. (संदर्भ : विशाल हिंदु संमेलन, आळंदी, १९८७ स्मरणिका)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

 

मन शुद्ध केल्यावरच खर्‍या
सुखाची आणि आनंदाची अनुभूती घेता येईल !

एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ । असा आवाज दिला. त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,

स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.

समर्थ : आज नाही. उद्या देतो.

दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला. त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली. ती समर्थांना म्हणाली,

स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.

समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.

स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.

समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?

स्त्री : हो महाराज.

समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल.

संदर्भ : गुरुपूर्णिमा महोत्सव स्मारिका, २२.७.२०१३

रामदासनवमीच्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment