पीडितांचे दुःख निवारणारे साखळी, गोवा येथील दत्त देवस्थान !

सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !

गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे ४० किलोमीटरवर साखळी हे शहर वसलेले आहे. सांखळी शहरात प्रवेश करतेवेळी प्रथम ज्याला प्रतिपंढरपूर म्हटले जाते, ते वाळवंटी तिरावर वसलेले विठ्ठल मंदिर लागते. याच वाळवंटी नदीच्या तिरावर श्री विठ्ठल मंदिराच्या समोर दत्त देवस्थान आहे. रस्त्याला लागूनच असलेल्या दगडी तटास एक महाद्वार आहे. महाद्वारातून आत जाताच पाय धुण्याची व्यवस्था आहे. बाजूलाच दत्त परिवारातील गाय आणि ४ श्‍वाने दिसतात. यातील गाय ही पृथ्वी आणि चार श्‍वान म्हणजे ४ वेद होत. पाय धुवून पुढे गेल्यानंतर मंडप लागतो. मंडपाच्या पायर्‍यांवरूनच गर्भागारातील श्री दत्तमूर्तीचे दर्शन घडते. देवालयात लख्ख प्रकाश, खेळती हवा, स्वच्छता, टापटीपपणा, कडक शिस्त अन् कडक सोवळे-ओवळे ही या देवस्थानची वैशिष्ट्ये आहेत. देवालयाच्या पाठीमागे औदुंबर वृक्षाच्या पारावर दत्तमहाराजांची एकमुखी जुनी पाषाणी मूर्ती आहे. वक्तशीरपणा हे या देवस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. येथील दैनंदिन कार्यक्रम, उत्सव वेळेत आणि नीतीनियमांचे पालन करूनच होतात. देवालयाच्या परिसरात थुंकणेे, लघुशंका करणे, पायात वहाणा घालून फिरणे यांना बंदी आहे. गर्भागारात २४ घंटे तेलाचे अन् तुपाचे दीप तेवत असतात.

सांखळी येथील दत्त देवस्थान

इतिहास

सांखळी गावातील लक्ष्मण म्हाळू कामत हे परम दत्तभक्त होते. ते श्री क्षेत्र नरसोबावाडीत दत्तमहाराजांच्या चरणी श्री गुरुचरित्र वाचन, भजन अशा सेवा करत असतांना काही लोकांनी त्यांचा अपमान केला. त्या वेळी त्यांनी दत्तमहाराजांना मनोभावे प्रार्थना केली की, आज माझा झालेला अपमान हा तुझाच अपमान आहे, असे मी समजतो. त्याच क्षणी लक्ष्मण म्हाळू कामत यांच्या स्वप्नात येऊन दत्तमहाराजांनी दृष्टांंत दिला आणि सांगितले की, भक्ता तू चिंता करू नकोस, मी लवकरच तुझ्या गावी येईन. लक्ष्मण कामत यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच सुमारास सांखळी येथील श्रीमती मथुराबाई शेणवी बोडके यांना त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ औदुंबर वृक्षाचे रोपण आणि त्यास पार बांधण्याची प्रेरणा मिळाली. त्यानुसार त्यांनी हे काम त्यांचे कुलपुरोहित वेदशास्त्रसंपन्न रामेश्‍वरभट्ट पित्रे यांच्यावर सोपवले. पित्रेशास्त्री यांनी एका निर्जन आणि विनावापर पडून असलेल्या जागेवर औदुंबर वृक्षाचे रोपण केले आणि येथेच सध्याचे दत्तमंदिर आहे.

हे मंदिर सांखळी गावातील लोकांनी श्रमदानाने केले आहे. देवालयाची वास्तू सिद्ध झाल्यानंतर लक्ष्मण म्हाळू कामत, पित्रेशास्त्री आणि चिंतामणराव वालावलकर यांच्यासह मुंबईला गेले. तेथे त्यांना एक दत्तमूर्ती आवडली; परंतु ती नेपाळनरेशांसाठी बनवली असल्याने आणि मूर्तीकाराने सांगितलेल्या किमतीएवढी रक्कम त्यांच्या जवळ नसल्यामुळे ते निराश झाले. दुसर्‍या दिवशी त्या दुकानदाराचा नोकर त्या तिघांकडे त्यांचा शोध घेत आला आणि मालकाने मूर्ती नेण्यासंदर्भात बोलावले असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष भेटीत त्या दुकानदाराने सांगितले की, रात्री स्वप्नात एक तेजस्वी साधूने ती मूर्ती विनाविलंब तुम्हाला देण्यास सांगितले. तुम्ही मला काहीही द्या आणि दत्तमूर्ती घेऊन जा, असे तो दुकानदार म्हणाला अन् ती मूर्ती सांखळी येथे आली.

संकलक : श्री. श्रीपाद बाकरे, सांखळी, गोवा.

 

मंदिरात कडक शिस्तीचे पालन

हे देवस्थान जागृत असल्याची अनुभूती अनेक जणांस आली आहे. श्रींच्या कृपाप्रसादाने आजपर्यंत सहस्रावधी दुःखी-कष्टी जिवांना, रुग्णांना, भूत-प्रेत, पिशाच्च आदींची बाधा असलेल्यांना गुण आला आहे. त्यांच्या व्याधी आणि दुःख दूर झालेले आहे. दत्तजयंती आणि दुसरा दिवस या दोन्ही दिवशी पणजी येथील प्रसिद्ध उद्योगपती धेंपे यांच्या घराण्याकडून महाप्रसादाची सेवा आजतागायत चालू आहे. येथे पणजीकरांच्या वतीने गुरुपाडवा, म्हापसेकरांच्या वतीने गुरुद्वादशी आणि शेणवी धेंपे कुटुंबियांच्या वतीने दत्तजयंती उत्सव साजरे होतात. या उत्सवाच्या वेळी येथे नाटके, वाद्यवृंद आणि नाच असे कार्यक्रम न होता कीर्तन, भजन, पुराण, प्रवचन असे कार्यक्रम ठेवले जातात, या मंदिराच्या मंडपात व्रतबंध संस्कार होतात; परंतु विवाह करण्यात येत नाहीत. येथे कडक शिस्तीचे पालन आणि देवालयाचे पावित्र्य अजूनही राखले जाते; म्हणूनच भाविकांना ‘दत्त महाराज हाकेला धावून येतात’, अशी प्रचीती येते. अशा या सांखळी येथील दत्त देवस्थानच्या ठिकाणी श्रद्धा असलेल्या भाविकांवर श्री गुरूंची कृपादृष्टी सदोदित राहो, हीच श्री दत्तचरणी प्रार्थना !

Leave a Comment