योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

Article also available in :

मंदिरातील बोलकी दत्तमूर्ती

१. ‘मंदिरातील दत्तमूर्ती बोलत आहे’, असे जाणवणे

शेवगाव येथील दत्त मंदिर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या खडतर तपसाधनेचे फळ आहे. मंदिराचे बांधकाम दादाजींच्या संकल्पित आराखड्याप्रमाणे पूर्ण झाले. गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता. दादाजींनी या दत्तमूर्तीत प्राण ओतला असल्यामुळे मूर्तीमध्ये जिंवतपणा जाणवतो. ‘ती मूर्ती जणूकाही आपल्याशी बोलत आहे’, असे जाणवते.

 

२. दत्तमंदिरातील पूजाविधी

या मंदिरात कडक सोवळे पाळले जाते. येथे मुख्य मूर्तीला स्पर्श करण्यास प्रतिबंध आहे. दादाजींनी दिलेल्या दुसर्‍या संगमरवरी मूर्तीवर भाविक अभिषेक करतात. तेथे प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा आणि आरती होते. दुपारी दत्तात्रेयांना नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक गुरुवारी सायंकाळी महाआरती होते. सर्व भाविकांना प्रसाद आणि दादाजींकडून लक्ष्मीप्रसाद दिला जातो. ‘श्रद्धेने आणि निष्ठेने या क्षेत्री येणार्‍या भक्तांच्या मनोकामना निश्‍चित पूर्ण होतात’, अशी प्रचीती अनेक जणांना आली आहे. या परिसरात अनेकांना नागराजाचे दर्शन होते.

योगतज्ञ दादाजींना अष्टसिद्धींपैकी ‘लघिमा’ ही सिद्धी प्राप्त असल्याने ‘ते आरतीच्या वेळी सूक्ष्मरूपाने उपस्थित असतात’, अशी प्रचीती अनेक साधकांना आली आहे.

 

३. दत्तमूर्तीचे वैशिष्ट्य

या दत्तमूर्तीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे रंग आपोआप पालटतात. दत्तमूर्तीचा मूळ रंग पांढरा आहे. मूर्तीचा रंग कधी कधी पूर्ण गुलाबी होतो, तर कधी फिकट निळा होतो. या बुद्धपौर्णिमेला (दादाजींच्या वाढदिवसाच्या दिवशी) मूर्तीचा रंग गुलाबी झाला होता.

 

४. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी साधकांना गुरुद्वादशीनिमित्त मंदिरात हवन करण्यास सांगणे

४ अ. ४० साधकांनी हवन करणे

१६.१०.२०१७ या दिवशी गुरुद्वादशी असल्याने दादाजींनी येथील साधकांना काही मंत्रजप देऊन हवन करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ४० साधकांनी सायंकाळी हवन केले. नंतर महाप्रसाद होऊन हवनाची सांगता झाली. सर्व साधक रात्री मंदिर बंद करून घरी गेले.

४ आ. दुसर्‍या दिवशी पूजा करण्यासाठी दत्त मंदिराचा
दरवाजा उघडल्यावर साधकाला ‘मूर्तीवर भस्माचा अभिषेक झाला आहे’, असे दिसणे

दुसर्‍या दिवशी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्री. कुलकर्णी हे साधक पूजा करण्यासाठी मंदिरात गेले. त्यांनी गाभार्‍यातील दत्त मंदिराचा दरवाजा उघडल्यावर त्यांना दिसले, ‘दत्तात्रेयाच्या मूर्तीवर पुष्कळ भस्म आले आहे. जणूकाही मूर्तीवर भस्माचा अभिषेक झाला आहे. मोठ्या मूर्तीवरही काही प्रमाणात भस्म आले होते.’ साधकांना ‘मूर्तीवर भस्म आले आहे’, हे वृत्त समजताच त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी दत्तगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. (यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीही मूर्तीवर भस्म आले होते.)

४ इ. दत्तगुरूंची प्रचीती

हे योगतज्ञ दादाजींना सांगितले असता ते म्हणाले, ‘‘हा शुभसंकेत आहे. दत्तगुरूंनी ही प्रचीती देऊन प्रसाद दिला आहे.’’

 

५. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी वर्तवलेले भाकित सत्यात उतरणे

योगतज्ञ दादाजींनी वर्ष १९९८ मधे दुबई येथे असतांना ‘शेवगाव येथे २४.५.२००६ या दिवशी दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना होईल’, असे भाकित केले होते. त्या वेळी त्यांची आणि आताचे मंदिराचे विश्‍वस्त श्री. अर्जुनराव फडके यांची ओळखही नव्हती.’

– श्री. अतुल पवार, नाशिक (ऑक्टोबर २०१७)

 

Leave a Comment