श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्‍वर मंदिराचा इतिहास आणि माहात्म्य

Article also available in :

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्‍वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामींनी काही काळ तपश्‍चर्या केल्याने हे महानुभव पंथाचे पूजनीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

 

१. पांचाळेश्‍वर हे दत्तात्रेयांच्या भोजनाचे स्थान

श्री क्षेत्र पांचाळेश्वर- दत्त महाराज रोज येथे मध्यांन भोजन करतात

मी येथील विश्‍वस्त आहे. मी लहानपणापासून येथे सेवा करत आहे. हे दत्तात्रेयाचे भोजनस्थान आहे. दत्तात्रेय काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात आणि पांचाळेश्‍वराला भोजन करतात.

 

२. पांचाळ राजाच्या नावावरून या गावाला ‘श्रीक्षेत्र पांचाळेश्‍वर’ असे नाव पडणे

पांचाळराजा आणि आत्मऋषी यांच्या विनंतीवरून येथे दत्तात्रेय प्रतिदिन दुपारी १२ वाजता भोजनाला येतात. दत्तात्रेयांनी पांचाळराजा आणि आत्मऋषी यांना वरदान दिले आहे, ‘जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत या ठिकाणी येऊन मी भोजन करीन.’ पांचाळ राजाच्या नावावरून या गावाला श्रीक्षेत्र पांचाळेश्‍वर असे नाव पडले. आत्मऋषींच्या नावाने या स्थानाला ‘आत्मतीर्थ’ असे संबोधले जाते.

 

३. दत्तात्रेय, गोविंदप्रभु आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा करणे

गोविंदप्रभु महाराज पंचलिंगीहून संन्यास घेऊन या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींनी याच ठिकाणी दत्तात्रेयांची भेट घेतली. दत्तात्रेय, गोविंदप्रभु आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा केली.

 

४. आध्यात्मिक महत्त्व

दत्तात्रेयांच्या कृपेने भूतबाधा, करणी आणि मानसिक व्याधी यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीने या ठिकाणी येऊन एकनिष्ठेने सेवा केल्यास ती व्यक्ती १ मासात (महिन्यात) ठीक होते. येथे लांबून येऊन लोक सेवा करतात आणि तृप्त होतात.

 

५. साजरे होत असलेले उत्सव

चैत्र कृष्ण पक्ष सप्तमीला येथे यात्रा भरते, तसेच छबीना आणि पालखी निघते. येथे धार्मिक कार्यक्रम होतात. येथे दत्तजयंती, श्रीकृष्ण जयंती आणि सर्वज्ञ चक्रधरप्रभु जयंती असे उत्सव साजरे केले जातात.

दत्तजयंतीला ७ दिवस आधी सप्ताह असतो. पौर्णिमेला यात्रा उत्सव होतो आणि सप्ताहाची समाप्ती होते. ‘दत्त महाराजांच्या कृपेने अनेक मानसिक रुग्ण बरे होतात’, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

 

६. दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे ठिकाण

श्री पांचाळेश्‍वर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला श्री दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे, म्हणजे दुपारच्या भोजनानंतर डाव्या अंगावर पहुडून विश्रांती घेण्याचे स्थळ आहे. येथे सुंदर मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या अवतीभोवती डौलदार वृक्ष आहेत. सभोवताली भक्कम तटबंदी आहे. मंदिराच्या समोर भव्य प्रवेशद्वार आहे. त्यावर नगारखाना बांधलेला आहे.

 

७. अनुभूती

वैद्यकीय उपचारांनी बरा न होणारा मुलाचा आजार श्रीक्षेत्र पांचाळेश्‍वर येथे आल्यावर बरा होणे : दत्तप्रभूंचे चमत्कार सांगावे तितके अल्पच आहेत. मी माझा स्वत:चा अनुभव सांगतो. मी काही कामानिमित्त संभाजीनगर येथे गेलो होतो; कारण माझे वडील तेेथे सेवा करायचे. माझा एकुलता एक मुलगा पुष्कळ रुग्णाईत होता. वैद्यकीय उपचारांचा काहीही परिणाम होत नव्हता. एका जाणकार माणसाने सांगितले, ‘‘तुम्ही श्रीक्षेत्र पांचाळेश्‍वर येथे जा.’’ त्याप्रमाणे मी येथे आलो आणि मुलात पूर्णपणे पालट झाला. मी आणि माझे कुटुंब आता आनंदात आहे.’’

– श्री. बाबासाहेब गुलाबराव कोठी, सचिव, श्री पांचाळेश्‍वर मंदिर ट्रस्ट, राक्षसभुवन. (१६.११.२०१४)

Leave a Comment