श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

Article also available in :

श्री. नितीन (योगिराज महाराज) डोळे

‘सती अनसूयेच्या सतित्वाची परीक्षा पहाण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश भूतलावर आले अन् तिच्या तपोबळामुळे त्यांचे अवतरण तीन छोट्या बालकांत झाले. त्यामधे श्रीविष्णूचे अवतरण ज्या बालकात झाले, ते म्हणजे श्रीगुरु दत्तात्रेय !

ही घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण आहे श्रीक्षेत्र रक्षोभुवन ! महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या दक्षिण तिरावर वसलेले एक पवित्र दत्तपीठ !! कालांतराने या तीर्थक्षेत्राचे नाव ‘श्री राक्षसभुवन’ असे झाले.

 

१. श्री राक्षसभुवन येथील स्थानाला ‘आद्य दत्तपीठ’ असे का म्हणतात ?

श्री दत्तगुरूंची अन्य पिठे, उदा. कारंजा, माणगाव, नृसिंहवाडी इत्यादी ठिकाणे म्हणजे मानवी देहावतारी दत्तपिठे आहेत. ही पिठे श्री दत्तात्रेयाच्या त्या त्या अवताराच्या नावाने प्रसिद्ध आहेत; मात्र राक्षसभुवन येथे प्रत्यक्ष दत्त जन्माला आले. त्यामुळे ते तत्त्वरूपी दत्तपीठ आहे. त्यामुळेच या स्थानाला ‘आद्य दत्तपीठ’ असेही म्हणतात. येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी माता अनसूयेला वर दिला असल्याने हे ‘वरद दत्तात्रेय मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे निर्गुण पीठ असल्याने या मंदिराला कळस नाही.

मंदिरातील एकमुखी श्री दत्तमूर्ती
श्री दत्त पादुका

 

२. दत्तमंदिरातील दत्तप्रभूंची विलोभनीय एकमुखी मूर्ती

दत्त मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यानंतर समोर दिसते, ती वालुकाश्मापासून बनवलेली आणि पूर्वाभिमुख असलेली सुंदर एकमुखी दत्तमूर्ती ! मूर्तीवर नागाचा फणा आहे. या मूर्तीचे उजवे पाऊल पुढे उचललेले आहे. दत्ताच्या वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र, मधल्या दोन हातांत डमरू अन् त्रिशूळ, तसेच खालच्या दोन हातांत दीपमाला आणि कमंडलू आहे. अशी ही दत्तप्रभूंची विलोभनीय एकमुखी मूर्ती आहे.

निर्गुण दत्ततत्त्व आकृष्ट करणारे दुर्मिळ दत्तयंत्र

 

३. दत्तयंत्र

दत्त मंदिराच्या वरच दत्तयंत्र आहे. यंत्र हे निर्गुणाशी संबंधित असते. या दत्तयंत्राच्या साहाय्याने वातावरणातील निर्गुण दत्ततत्त्व या ठिकाणी आकर्षिले जाते. हे अतिशय दुर्मिळ असे दत्तयंत्र आहे. या यंत्राची रचना तीन भागांत केली आहे. वरच्या भागात ‘दत्तयंत्र’ असे लिहिले आहे. मधल्या भागात ‘श्री गुरवे नमः ।’ लिहिले आहे आणि शेवटच्या भागावर ‘श्री वरद दत्तात्रेय’ असे लिहिले आहे. हे यंत्र दगडी आहे. या यंत्राची रचना अष्टकमलदलाकृती आहे. मधे तारका आहेत. दत्तमूर्तीच्या शिरोभागावर यंत्र असलेली अशी रचना अन्यत्र कुठेही बघायला मिळत नाही. संपूर्ण भारतात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दत्तयंत्र असलेले, असे हे एकमेव स्थान आहे.

सगुण रूपातील श्री अन्नपूर्णामाता

 

४. सर्व आयुधांसह असलेली अन्नपूर्णामातेची मूर्ती

ज्या ठिकाणी दत्तकार्य असते, त्या ठिकाणी अन्नपूर्णामाता असतेच. त्यामुळे या ठिकाणी अन्नपूर्णा सगुण रूपात वास्तव्यास आहे. अन्य ठिकाणी अन्नपूर्णेची मूर्ती हातात पळी असलेली असते; पण येथे ती सगुण रूपात आल्याने ती सर्व आयुधांसह आहे.

 

५. मंदिरात होणारी अन्नपूर्णामातेची आराधना

प्रत्येक मासाच्या (महिन्याच्या) पौर्णिमेला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, असा उल्लेख करून तिला पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवला जातो. तिचा जोगवा मागितला जातो आणि तिची आराधना केली जाते. आजही साधक किंवा स्त्रिया यांना सेवेनंतर अन्नपूर्णेचे सगुण रूपात दर्शन झाल्याची अनुभूती प्राप्त करता येते.

 

६. दत्त महाराजांची फेरी निघाल्यावर साधक आणि भाविक यांना येणार्‍या अनुभूती

आजही दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि अन्नपूर्णामातेचा वावर आपल्याला जाणवतो. ज्या वेळी दत्त महाराजांची फेरी निघते, तेव्हा चमेली आणि गुलाब या फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो. कधी कधी साधक किंवा भाविक यांना स्नान-संध्या करतांना पळी-भांड्याचा जो मंजुळ ध्वनी निर्माण होतो, तो ऐकू येतो. असे हे जाज्वल आणि जागृत ठिकाण आहे.

 

७. श्री. नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांच्या कुळातील दत्तभक्तांची माहिती

दत्तमूर्तीच्या चरणांपाशी आमचे मूळ पुरुष, म्हणजे सद्गुरु भाऊ महाराज उपाख्य दत्तास्वामी डोळे यांची समाधी आहे. प.पू. भाऊस्वामी हे अयोनी संभवातून जन्माला आले होते. त्यामुळे गऊबाई आणि गोपालस्वामी हे त्यांचे ऐहिक युगातील माता आणि पिता होते. ते अजानुबाहू होते. त्यांच्या कानांच्या पाळ्या खांद्यापर्यंत होत्या. भाऊसाहेब महाराज, अंतोबादादा, दत्तास्वामी, अवधूतबुवा, केशवबुवा, ऋषीकेशस्वामी इत्यादी सात पिढ्यांपर्यंत अजानबाहू परंपरा कायम होती. आठव्या, नवव्या आणि दहाव्या पिढीत त्यात पालट झाला. आमच्या परंपरागत गादीवर एक पुत्र आणि दोन कन्या अशी परंपरा होती. एकच पुत्र असल्याने म्हणजे शके १६०० पासून भाऊ महाराजांपासून ते आमच्या गुरूंपर्यंत परंपरा अखंड होती. त्या काळात अपत्यसंख्या अधिक असायची. तेव्हाही आमच्याकडे एकच पुत्र असे. मला मात्र दोन भाऊ आहेत आणि आता आमचा वंशवृक्ष विस्तारेल. पिठावरील महाराजांनी अन्नदान, गुरुमंत्र, शिष्य संप्रदाय, कुलधर्म अशा प्रकारे साधना केली. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य वाढत गेले.

दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला, म्हणजे आपल्या उजव्या बाजूला डोळे कुळातील दुसर्‍या पिढीतील दत्तभक्त, म्हणजे प.पू. भाऊस्वामी यांचे चिरंजीव प.पू. बाबास्वामी, उपाख्य केशवस्वामी यांची समाधी आहे. त्या समाधीच्या वरच्या बाजूला एक शिवलिंग आहे. या समाधी मंदिरावर शीलालेख कोरलेला दिसतो. याच मंदिराच्या डाव्या बाजूला एक घुमटी दिसते. या घुमटीतून प.पू. बाबास्वामी यांच्या समाधीकडे जाण्याचा भुयारी मार्ग आहे.

दत्तपिठातील भगव्या रंगातील पाच समाध्या डोळे कुळातील दत्तभक्तांच्या आहेत. भगवा रंग वैराग्याचे दर्शक आहे. प.पू. भाऊस्वामी आणि प.पू. बाबास्वामी यांच्यासह एकूण सात समाध्या या ठिकाणी आहेत. नंतरच्या तीन पिढ्यांना आदेश नसल्याने त्यांच्या समाध्या येथे नाहीत. मी (श्री. नितीन उपाख्य योगिराज महाराज डोळे) प.पू. भाऊस्वामींचा अकरावा वंशज आहे.

 

८. भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर !

प.पू. बाबास्वामी डोळे यांच्या समाधी मंदिराकडे नेणार्‍या घुमटीच्या बाजूला सोमेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. अत्रिऋषींची पत्नी अनसूया सती जाण्याच्या वेळी भगवान शिव नंदीविना या ठिकाणी आले होते. त्यामुळे हे मंदिर भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर आहे.

 

९. दत्तभक्त श्री. नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांचे आध्यात्मिक कार्य

९ अ. सद्गुरूंच्या आज्ञेने वैद्यकीय व्यवसाय बंद करून आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणे

माझे पिता आणि सद्गुरु एकच ! त्यांनी मला वर्ष २००८ मध्ये आज्ञा केली, ‘‘अजून किती काळ वैद्यकीय सेवा करणार ?’’ मी १६ वर्षे वैद्यकीय सेवा केली. ‘कोणताही पिता आपल्या पुत्राला व्यवसाय बंद कर’, असे सांगणार नाही; पण ‘ती माझ्या पित्याची नसून गुरूंची आज्ञा आहे’, हे माझ्या लक्षात आले. मग मी व्यवसाय हळूहळू न्यून केला. मी आध्यात्मिक क्षेत्रात काम चालू केले. संस्थानाचे काम वाढवले. एक वर्षात माझे पिता कालवश झाले. मग माझ्या लक्षात आले, ‘एक वर्षापूर्वी त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी का सूचना केली होती ?’

९ आ. आद्यपिठाचे महत्त्व जाणण्यासाठी अभ्यास करणे

वर्ष २००९ पासून संस्थानचे पूर्ण दायित्व माझ्याकडे आले. त्या वेळी मी वैद्यकीय व्यवसाय न्यून केला होता. मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मला जिज्ञासा अधिक होती. मी ठरवले, ‘दत्ताचे जे आद्यपीठ आहे, ते केवळ वाडवडील म्हणतात; म्हणून नव्हे, तर ‘आद्यपीठ म्हणजे काय ?’, हे आपण शोधून काढू.’ त्यासाठी मी वाचन, लेखन आणि अभ्यास चालू केला.

९ इ. ‘महान विभूतींमुळे एखाद्या स्थानाला महत्त्व प्राप्त होते’, हे लक्षात येणे

मी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि नेपाळपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व दत्तस्थानांना भेट दिली. मी कारंजा, गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी आणि माहूर या ठिकाणी गेलो. मी जमेल तेवढी साधना केली. अक्कलकोटला स्वामी समर्थ, शेगावला गजानन महाराज, नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वती आणि कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झाले.

अर्वाचीन काळात प.प. टेंब्येस्वामी यांनी कारंजा, कुरवपूर आणि पिठापूर या स्थानांचा शोध लावला आणि प्रचार, प्रसार केला. त्यापूर्वी ‘पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे’, हे कुणालाही ठाऊक नव्हते. प.प. टेंब्येस्वामींनी त्याचा प्रचार केला; म्हणून आज ते ‘दत्तस्थान’ म्हणून उदयास आले.

 

१०. दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावणे

त्याही पूर्वी शके १६०० मध्ये नरसिंह सरस्वतींच्या ३०० वर्ष आधी आमचे मूळपुरुष दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावला आणि त्या ठिकाणी येऊन स्वतः साधना केली. त्यांनी दत्तजन्माचा उत्सव चालू केला आणि तो आजही अव्याहत चालू आहे. हे सर्व दत्तप्रभूंची इच्छा असल्याने होत आहे. आमचे कर्तृत्व या ठिकाणी शून्य आहे.’

– दत्तभक्त श्री. नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे, राक्षसभुवन, गेवराई, जिल्हा बीड, महाराष्ट्र.

 

Leave a Comment