पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित

‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते. त्यांची पांडुरंगावरील भक्ती आणि अध्यात्मातील त्यांचा अधिकार दर्शवणारे काही प्रसंग येथे दिले आहेत.

रुक्मांगद पंडित समाधी, विजापूर (कर्नाटक)

 

१. श्री. रुक्मांगदांची मानसपूजा

श्री. रुक्मांगद प्रतिदिन पांडुरंगाची मानसपूजा करायचे आणि ती पूजा स्वीकारण्यासाठी पंढरपूरहून पांडुरंग स्वतः यायचा !

 

२. महामारीचा उपद्रव आणि रुक्मांगदांच्या भक्तीची शक्ती !

२ अ. विजापूर येथे महामारीचा उपद्रव झाल्याने गावातील सर्व लोकांनी जवळच्या
वनात जाऊन रहाणे; मात्र विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेल्या रुक्मांगदांनी घरातच रहाणे

एकदा विजापुरात महामारीचा उपद्रव झाला. असंख्य लोक मृत्यूमुखी पडले. सर्वत्र हाहाःकार माजला. जे मागे उरले, ते सर्व जण गाव सोडून वनात जाऊन राहिले. आदिलशहाही त्याचे सर्व वैभव सोडून वनात जाऊन राहिला. अशा वेळी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले श्री. रुक्मांगद मात्र आपल्या घरातच राहिले होते.

२ आ. रुक्मांगदांच्या शिष्यांनी त्यांना गाव ओस पडले असल्याचे सांगणे
आणि तेव्हा रुक्मांगदांनी विठ्ठलावर पूर्ण श्रद्धा ठेवून शिष्यांनाही घरातच ठेवून घेणे

संपूर्ण गाव ओस पडल्याने सकाळी सकाळीच रुक्मांगदांचे शिष्य त्यांच्याकडे आले. त्यांनी गावातील सर्व माहिती रुक्मांगदांना दिली आणि ‘आता आपण काय करायचे ?’, असे विचारले. यावर रुक्मांगदांनी ‘पांडुरंग आहे ना ? काही काळजी करू नका’, असे आपल्या शिष्यांना सांगून त्यांनाही आपल्या समवेत घरातच ठेवून घेतले.

२ इ. रुक्मांगदांची विठ्ठलाची मानसपूजा पूर्ण झाल्यावर स्वतः महामारीदेवी
दारात उभी असलेली दिसणे आणि ‘मी तुझ्या दर्शनासाठी आले आहे’, असे तिने रुक्मांगदांना सांगणे

स्नान करून रुक्मांगदांनी पांडुरंगाची मानसपूजा केली. ते ध्यानातून बाहेर आले. तेव्हा त्यांना विक्राळ रूप धारण करून महामारीदेवी दारात उभी असलेली दिसली. ही महामारी अष्टभुजा होती. तिने आपल्या हातांत आठ आयुधे धारण केली होती. तिच्या मुखातून प्रखर ज्वाळा निघत होत्या. तिचे नेत्र आरक्त, म्हणजे लाल होते. रुक्मांगदांना पहाताच श्री महामारीदेवी त्यांना म्हणाली, ‘हे विष्णुभक्ता, त्रिभुवनात तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. मी तुझ्या दर्शनासाठी आले आहे.’

२ ई. रुक्मांगदांनी श्री महामारीदेवीचे स्तवन करून तिला शांत होऊन
स्वस्थानी जाण्यासाठी प्रार्थना करणे आणि देवीने रुक्मांगदांना वर देऊन स्वस्थानी जाणे

रुक्मांगदांनी जगदंबास्वरूपिणी श्री महामारीदेवीचे स्तवन केले आणि तिला शांत होण्यासाठी अन् स्वस्थानी जाण्यासाठी प्रार्थना केली. ते स्तवन ऐकून देवी प्रसन्न झाली आणि देवीने रुक्मांगदांना वर दिला, ‘तुझ्या वंशाला, तुझ्या शिष्यांना आणि जे कुणी हे स्तवनाष्टक भावासहित म्हणतील, त्यांच्यावर माझी कृपा राहील. त्यांच्यासाठी मी शांत राहीन.’ रुक्मांगदांना असा वर देऊन आणि त्यांचा निरोप घेऊन श्री महामारीदेवी स्वस्थानी गेली.

२ ई १. रुक्मांगदांनी रचलेले श्री महामारी अष्टक

विधिप्रार्थिते विष्णुनेत्रालयस्थे । नमो योगनिद्रे महाकालि भद्रे ॥
नमः कालरात्रि प्रपन्नार्तिहन्त्रि । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ १ ॥

विनोदाय निर्गत्य सर्वामरिभ्यः । क्षणादेकतामेति हत्वा सुरेन्द्रम् ॥
त्रिलोकी-परित्राणभारं वहन्ति । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ २ ॥

अभिन्नापि गौरीशरीरादुदैत्य । स्वतःशक्तिसङ्घं पृथक् दर्शयित्वा ॥
तमाशूपसंहृत्य शुम्भं निहंसि । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ३ ॥

भृकुट्यैव निर्माय कांश्‍चिद्विभूतिम् । रणे रक्तबिन्दु-जगद्व्याप्यमूर्तिम् ॥
क्षणात् घातयित्वा सुरान् मोदयन्ति । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ४ ॥

परैवत्वमादीक्षकारान्तरूपा । यदा वैखरीभावमेषि स्वभावात् ॥
तदा वाग्विभूतिः प्रवृत्ता पुराणि । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ५ ॥

त्वमुत्थाय मूलाद्विहृत्यान्तराले । विभिद्य द्विपत्रं चिदब्जे यदास्ये ॥
परानन्दमग्नं तदा योगचित्तम् । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ६ ॥

शिवे या कलार्णा तुरीयाङ्गकूटा । तया सुन्दरि त्वां समाराध्यधन्यः ॥
तृणीकृत्य तिष्ठेत्पदं पारमेष्ठ्यम् । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ७ ॥

स्थितिस्त्वं गतिस्त्वं मतिस्त्वं धृतिस्त्वम् । भृतिस्त्वं मृतिस्त्वं श्रुतिस्त्वंं स्मृतिस्त्वम् ॥
त्वयैवैकया व्याप्तमेतत्समस्तम् । प्रसीद प्रसिद्धे महामारि मातः ॥ ८ ॥

भुजङ्गप्रयान्तं कृतं रुक्मनाम्ना । मुदे कालरात्र्या जगन्मातुरेतत् ॥
पठन् भक्तितो मुच्यते दुष्प्रधर्षान् । महाकालवेगात् भुजङ्गप्रयातात् ॥ ९ ॥

२ उ. गावातील एका गृहस्थांना तीर्थ आणि विभूती देऊन महामारीची लागण
झालेल्या पत्नीला लावण्यास सांगणे, त्यामुळे त्यांची पत्नी रोगमुक्त होणे आणि
ते ऐकून वनात गेलेले गावातील सर्व लोक रुक्मांगदांची स्तुती करत गावात परत येणे

त्यानंतर मेलगिरीपंत नावाचे एक गृहस्थ रुक्मांगदांकडे आले आणि त्यांनी ‘माझ्या पत्नीला महामारीची लागण झाली असून आपण तिला त्यातून वाचवा’, अशी रुक्मांगदांना प्रार्थना केली. रुक्मांगदांनी त्या गृहस्थाला तीर्थ आणि विभूती देऊन ती घरी जाऊन पत्नीला लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर त्या गृहस्थाची पत्नी रोगमुक्त झाली. ते उभयता रुक्मांगदांचे दर्शन घेऊन गेले. ही वार्ता वार्‍याप्रमाणे सर्व जनांमध्ये पसरली आणि वनात गेलेले गावातील सर्व लोक रुक्मांगदांचे स्तवन करत गावात परत आले.

 

३. ‘श्री. रुक्मांगदांनी पंढरपुरी यावे’, यासाठी पांडुरंगाने योजलेली युक्ती !

३ अ. ‘श्री. रुक्मांगदांनी पंढरपुरी यावे’, असे पांडुरंगालाच वाटणे आणि ‘त्या काळातील
अनेक महान संतांपेक्षाही या भक्तात काय विशेष आहे ?’, असे रुक्मिणीमातेने पांडुरंगाला विचारणे

पांडुरंगाचे अनन्य भक्त असूनही रुक्मांगद कधीच पंढरपूरला गेले नव्हते. ‘आपल्या या भक्ताने पंढरपूरला यावे’, असे पांडुरंगालाच वाटू लागले. पांडुरंगाला सचिंत पाहून माता रुक्मिणीने पांडुरंगाला त्याचे कारण विचारले. माता रुक्मिणीने ‘संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, संत सावता माळी, नरसीमेहता, कूर्मदास, संत ज्ञानेश्‍वर आणि भावंडे’, अशा त्या काळातील अनेक भक्तांची नावे घेऊन ‘या सर्व भक्तांपेक्षा तुमच्या या भक्तात असे काय विशेष आहे ? या भक्तांपेक्षाही हा भक्त एवढा प्रिय का आहे ?’, असे विचारले.

३ आ. ‘रुक्मांगदांची मानसपूजा स्वीकारण्यासाठी मी प्रतिदिन
विजापूरला जातो; मात्र तो एकदाही पंढरपुरी आला नाही’, असे विठ्ठलाने
रुक्मिणीला सांगणे, रुक्मांगदांना पंढरपूरला आणण्यासाठी पांडुरंगाने स्वतःच्या नाभीत
जलरोग निर्माण करून ‘तो रोग केवळ रुक्मांगद बरा करू शकतील’, असा बडव्यांना स्वप्नदृष्टांत देणे

पांडुरंग रुक्मिणीला सांगतो, ‘‘वैद्य वंशातील रुक्मांगद माझी नित्य मानसपूजा करतो आणि त्याची पूजा स्वीकारण्यासाठी मी प्रतिदिन विजापूरला जातो; मात्र तो एकदाही पंढरपुरी आला नाही.’’ पांडुरंगाचे हे बोल ऐकून या भक्ताला भेटण्याची इच्छा माता रुक्मिणीनेही व्यक्त केली. तेव्हा रुक्मांगदांना पंढरपुरात आणण्यासाठी पांडुरंगाने एक युक्ती केली. पांडुरंगाने स्वतःच्या नाभीत जलरोग निर्माण केला. पांडुरंगाच्या नाभीतून सतत जल वाहू लागले. त्यामुळे त्याचा पितांबर भिजू लागला. बडव्यांनी नानाविध उपचार केले; पण गुण येईना. एक वर्ष झाले, तरी पांडुरंगाचा जलरोग बराच होईना. त्या वेळी पांडुरंगाने प्रल्हाद बडवे यांना स्वप्नदृृष्टांत देऊन ‘विजापुरातील ‘रुक्मांगद पंडित’ नावाच्या वैद्याला पाचारण करा. तेच माझा रोग बरा करू शकतील’, असे सांगितले.

३ इ. प्रल्हाद बडव्यांनी ही गोष्ट तुकाराम आदी संतांना सांगणे, सर्वानुमते रुक्मांगदांना पंढरपूरला आणण्याचे
ठरणे आणि तेव्हा ‘पांडुरंगाने स्वतःला पंढरपूरला नेण्यासाठी केलेली ही युक्ती आहे’, हे रुक्मांगदांनी जाणणे

प्रल्हाद बडव्यांनी ही गोष्ट तुकाराम आदी संतांना सांगितली. यावर सर्वानुमताने ‘रुक्मांगदांना आणण्यासाठी जावे’, असे ठरले. त्यानुसार लवाजमा विजापूरला गेला. रुक्मांगदांकडे पोचल्यावर त्यांनी सर्वांचा आदरसत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. बडव्यांचा निरोप त्यांना सांगितल्यावर रुक्मांगदांनी सर्वांना विश्रांती घेण्यास सांगून ‘उद्या निघूया’, असे सांगितले. तेव्हा ‘नित्य मानसपूजा स्वीकारण्यासाठी पांडुरंग येतो. तेव्हा त्याच्या शरिरावर कुठेही कुठल्याही रोगाचे चिन्ह दिसत नाही. ही केवळ मला पंढरपूरला नेण्यासाठी पांडुरंगाने केलेली युक्ती आहे’, हे रुक्मांगदांनी अंतरातून जाणले.

३ ई. दुसर्‍या दिवशी मानसपूजेच्या वेळी रुक्मांगदांना लगेच पंढरपूरला येण्यास सांगून पांडुरंग अंतर्धान पावणे

दुसर्‍या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे आटोपून रुक्मांगद नेहमीप्रमाणे मानसपूजा करण्यास बसले. त्या वेळी पांडुरंग तेथे आले; मात्र न थांबता त्यांनी रुक्मांगदांना लगेच पंढरपूरला येण्यास सांगितले आणि ते गुप्त झाले. तेव्हा रुक्मांगद सर्वांना घेऊन पंढापूरला जाण्यासाठी निघाले. त्यांनी पांडुरंगासाठी उंची बुक्का घेतला. पंढरपूरला गेल्यावर त्यांची संत तुकाराम महाराज आणि अन्य संत यांच्याशी भेट झाली. नंतर ते पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेले. त्या वेळी पांडुरंग साक्षात् प्रकट झाले आणि त्याने रुक्मांगदांना मिठी मारली. रुक्मांगदांच्या उपचारांनी पांडुरंगाचा जलरोगही बरा झाला.

या उदाहरणावरून रुक्मांगदांची भक्ती आणि त्यांचा अध्यात्मातील अधिकार लक्षात येतो. पू. डॉ. नीलकंठ दीक्षित हे अशा महान भक्ताचे वंशज आहेत.’

– सौ. अंजली कणगलेकर (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment