श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे संत गोरा कुंभार

तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत. एकदा त्यांची पत्नी आपल्या एकुलत्या एक लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्या वेळी संत गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवत पांडुरंगाचे भजन करत होते. त्यात ते अगदी तल्लीन झाले होते. जवळच रांगत, खेळत असलेले ते मूल तिकडे येऊन आळ्यात म्हणजेच त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करत होते. माती बरोबर त्यांनी स्वतःच्या मुलालाही तुडवले. पांडुरंगाच्या भजनात ते निमग्न असल्यामुळे माती तुडवतांना रडलेले मूलही त्यांना समजले नाही.

थोड्या वेळाने त्यांची पत्नी पाणी आणल्यावर मुलाला शोधू लागली. ते मूल तिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभारांकडे गेली. इतक्यात तिची दृष्टी चिखलाकडे गेली. त्या वेळी तो चिखल रक्ताने लाल झालेला पाहून मूल तुडवले गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला. या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायश्‍चित्त म्हणून गोरा कुंभार यांनी स्वतःचे दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळे त्यांचा कुंभारकीचा व्यवसाय चालेना. त्यानंतर विठ्ठल-रखुमाई त्यांच्या घरी कामगार बनून येऊन राहू लागले आणि त्यामुळे गोरा कुंभारांचा व्यवसाय पुन्हा बहरला. पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली. त्या वेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वरमाऊली आणि संत नामदेव ही संत मंडळी पंढरपुरास निघाली. वाटेत तेरेडोकी येथे येऊन संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला पंढरपुरास आपल्यासमवेत आणले.

पंढरपूरच्या गरुड पारावर संत नामदेवांचे कीर्तन चालू झाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांसह सर्व संत मंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. गोरा कुंभारसुद्धा पत्नीसह कीर्तनास बसले. कीर्तन चालू असतांना लोक वर हात करून टाळ्या वाजवून विठ्ठलाचा गजर करू लागले, त्या वेळी गोरा कुंभार यांनीही स्वतःचे थोटे हात अभावितपणे उचलले. तेव्हा त्या थोट्या हातांना हात फुटले. ते पाहून संत मंडळींना आनंद झाला. पांडुरंगाचा सर्वांनी जयजयकार केला. गोरा कुंभारांच्या पत्नीनेही श्री विठ्ठलाची करुणा भाकली, ‘‘पंढरीनाथा, माझे मूल पतीच्या पायाखाली तुडवले गेले. मी मुलावाचून दुःखी कष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावर दया कर. मला माझे मूल दे.’’ पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. तिचे चिखलात तुडवून मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचे तिने पाहिले. त्या मुलाला तिने उचलून कडेवर घेतले. त्यानंतर संत मंडळींसह सर्वांनी आनंदाने टाळ्यांसह विठ्ठलाचा गजर चालवला.

संदर्भ : संकेतस्थळ

Leave a Comment