सनातनचे ६० टक्के पातळीचे साधक आणि ७० टक्के पातळीचे संत

 

१. ६० टक्के पातळी कशी गाठायची ?

१ अ. ‘अभ्यास केला, तर परीक्षेत उत्तीर्ण होतोच. त्याप्रमाणे साधना योग्य तर्‍हेने केली, तर ६० टक्के पातळी गाठली जातेच. यात आश्चर्य नाही.’

१ आ. व्यवहारातील परीक्षा आणि साधनेतील परीक्षा : ‘साधना सोडून इतर सर्वच विषयांत वार्षिक परीक्षा असते. परीक्षेच्या आधी फक्त २ – ३ महिने अभ्यास करूनही बहुतेक जण उत्तीर्ण होतात. साधनेत मात्र प्रतिदिन, प्रत्येक क्षणी परीक्षा असते. तिच्यात उत्तीर्ण व्हावे लागते, तरच ६० टक्के आणि पुढची पातळी गाठता येते.’

१ इ. ‘साधक आश्रमात किंवा प्रसारात त्याच त्याच सेवा करतांना बाह्यतः दिसले, तरी ती सेवा अधिकाधिक परिपूर्ण, भावपूर्ण आणि अहंविरहित होत गेली की, त्यांची प्रगती होते.’

– डॉ. आठवले (पौष शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (२.१.२०१२))

२. सनातनचे ६० टक्के पातळीचे साधक आणि ७० टक्के पातळीचे संत

२ अ. साधकांची पातळी ओळखणे

‘एखाद्या साधकाची पातळी ६० ते ७० टक्के झाली, हे काही साधकांना ओळखता येते. काहींना ओळखता आले, तरी खात्री नसते आणि बहुतेक साधकांना ते ओळखता येत नाही.

२ अ १. पातळी ओळखता न येण्याची कारणे

अ. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या प्रकारचे बोलणे, चालणे, वागणे असते. त्यामुळे या घटकांवरून पातळी ओळखता येत नाही.

आ. प्रत्येकातील व्यष्टी साधनेच्या अंतर्गत असणारे नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष- निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृती हे घटक निरनिराळ्या प्रमाणात असतात, तसेच समष्टी साधनेचे क्षेत्रही निरनिराळे असते. त्यामुळेही पातळी ओळखता येत नाही.

२ अ २. पातळी ओळखता येण्यासाठी उपयुक्त घटक

अ. चेहरा सात्त्विक किंवा आनंदी दिसणे

आ. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होणे

इ. बोलणे ऐकतांना, सहवासात असतांना किंवा छायाचित्राकडे पाहून चांगले वाटणे

ई. अंतर्मुखता जाणवणे

हे घटक लक्षात घेऊन इतर साधकांचा अभ्यास करावा. त्यामुळे हळूहळू कोणाची पातळी किती आहे, तसेच पातळी वाढण्यासाठी कोणी काय प्रयत्न केले पाहिजेत, हे लक्षात येईल आणि इतरांना साहाय्य करता येईल. तसेच पातळी चांगली असलेल्यांतील गुणही लक्षात येतील आणि ते आत्मसात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.’

– डॉ. आठवले (पौष शु. २, कलियुग वर्ष ५११३ (२६.१२.२०११))

२ आ. सनातनच्या ६० टक्के पातळी गाठलेल्या साधकांची वैशिष्ट्ये

१. मायेपासून अलिप्त होता येते.

२. त्यांच्या अंगाला आणि ते वापरत असलेल्या वस्तूंना सुगंध येतो.

३. मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण करता येतात.

४. चवथ्या पाताळापर्यंतच्या वाईट शक्तींचा आणि मांत्रिकांचा त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करता येतात.

५. मृत्यूनंतर जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटून महर्लोकात स्थान प्राप्त होते.

२ आ १. ६० टक्के पातळी गाठल्यानंतर सनातनच्या साधकांना स्वर्गप्राप्तीची इच्छा न उरता त्यांची महर्लोकापासून मोक्षापर्यंत वाटचाल होण्याची कारणे

अ. ‘६० टक्के पातळीपर्यंत साधकांच्या चित्तावर सर्वच गोष्टींचा त्याग करण्याचा संस्कार झालेला असतो. तो पुढे मायेत अडकू देत नाही.

आ. ६० टक्के पातळीनंतर आनंदाची अनुभूती येऊ लागल्यामुळे मायेतील पृथ्वीवरील सुखाचाच काय; पण स्वर्गसुखाचाही ते विचार करू शकत नाहीत.

इ. कलियुगातील पृथ्वीवरील जीवन त्यांनी अनुभवलेले असल्यामुळे त्यांच्या मनात पृथ्वीवर परत जन्म घ्यायचा विचारही येत नाही.

ई. त्यांच्या मनात ईश्वरप्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यांची पुढील वाटचाल चालूच रहाते. यामुळे साधक देहधारी असो किंवा त्याने देह सोडलेला असो, त्याची मोक्षापर्यंत वाटचाल होत रहाते.’

– डॉ. आठवले (भाद्रपद कृ. ९, कलियुग वर्ष ५११३ (२२.९.२०११))

२ आ २. ६० टक्के आणि ६५ टक्के पातळीचा टप्पा गाठण्यातील महत्त्व
२ आ २ अ. ६० टक्के पातळीचे साधक
२ आ २ अ १. वाईट शक्तींचे त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्याची क्षमता

४ थ्या पाताळातील मांत्रिकांशी सुमारे ४ महिने लढू शकतात.

२ आ २ अ २. पुढील उन्नती

या साधकांनी साधनेत सातत्य राखले आणि अहं वाढू दिला नाही, तर हे साधक ४ ते ५ वर्षांत संत बनू शकतात. (७० टक्के पातळीला साधक संत होतो.)

२ आ २ आ. ६५ टक्के पातळीचे साधक
२ आ २ आ १. वाईट शक्तींचे त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्याची क्षमता

६५ टक्के पातळीचा एक साधक म्हणजे ६० टक्के पातळीचे ३० साधक. हे साधक ४ थ्या पाताळातील मांत्रिकांशी सुमारे ७ महिने लढू शकतात आणि ५ व्या पाताळातील मांत्रिकांशी सुमारे २ महिने लढू शकतात. या दृष्टीने वाईट शक्तींबरोबर सूक्ष्मातून चालू असलेल्या आपल्या लढ्याला हळूहळू बळ प्राप्त होत आहे.

२ आ २ आ २. पुढील उन्नती

या साधकांनी साधनेत सातत्य राखले आणि अहं वाढू दिला नाही, तर हे साधक २ ते ३ वर्षांत ७० टक्के पातळी गाठू शकतात, म्हणजेच संत होऊ शकतात.

२ इ. ७० टक्के पातळी गाठलेल्या सनातनच्या संतांची वैशिष्ट्ये !

‘कमीत कमी ७० टक्के पातळी गाठलेल्यांना ‘संत’ म्हणतात. संत किंवा महाराज म्हटले की, दाढी अन् लांब केस असलेले, भगवा पेहराव असलेले असे चित्र बहुतेकांच्या मनात येते. सनातनचे संत अशा रूपात दिसत नाहीत. त्यामुळे बर्‍याच जणांना ते ओळखता येत नाहीत. अर्थात् हा सनातनच्या संतांचा दोष नसून त्यांच्या सहजावस्थेतील रहाण्यामुळे इतरांना त्यांना ओळखता येत नाही. सूक्ष्मातील कळणार्‍या संतांना मात्र सनातनचे संत लगेच ओळखता येतात.

समाजात अनेक संत असतात. असे असतांना सनातनच्या संतांचा उल्लेख नेहमी ‘सनातनचे संत’, असा केला जातो. याचे कारण हे की, इतर बहुतेक संतांमध्ये पुढील सर्व वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत; मात्र सनातनच्या संतांमध्ये ती दिसून येतात. सनातनच्या संतांमध्ये ६० टक्के पातळी गाठलेल्यांतील सर्व लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येतात. फरक एवढाच की, ते मृत्यूनंतर जनलोकात जातात.

१. तन-मन-धनाचाच नाही, तर घरादाराचाही त्याग

२. अहंभाव अल्प

३. आज्ञापालन

४. सतत सेवारत

५. कृतज्ञताभाव

६. लोकेषणा नसणे

७. सूक्ष्मातील कळणे

८. साधनेविषयी मार्गदर्शन करू शकणे

९. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कार्य (समष्टी कार्य)

१०. चवथ्या पाताळापर्यंतच्या वाईट शक्तींशी आणि मांत्रिकांशी लढण्याची क्षमता’

– डॉ. आठवले (पौष शु. ५, कलियुग वर्ष ५११३ (२९.१२.२०११))

Leave a Comment